चिरनिद्रा घेतलेल्या संपदाकडे पाहून योगिता धाय मोलकून रडू लागली. एक संपदाच तिच्या जीवनाचा आधार होती आणि तीच सोडून गेली होती. संपदाचा दोन वर्षांचा मुलगा पियुष त्याच्या बोबड्या भाषेत तिला सारखा उठवत होता, ” मम्मा ! उत ना. मम्मा उत ना.” त्याच्या बोलण्याने तिथे जमलेल्या सगळ्यांचे काळीज पिळवटत होते.
जमावातून एक स्त्री पुढे आली आणि योगिताचा हात हातात घेऊन तिच्या बाजूला बसली. त्या स्त्रीला पाहताच योगिताचा बांध फुटला आणि ती दुःखाने बरळू लागली, ” मीच कारणीभूत आहे ह्या सगळ्या गोष्टींना. मी पाप केलं पण माझ्या मुलीला नको होतं ना भोगायला. माझ्या लेकीचा आता कुठे संसार सुरू झाला होता. मी तुमच्या भरल्या संसारात शिरले म्हणून माझ्या लेकीचा पण संसार पूर्ण होऊ शकला नाही.”
ती स्त्री काही न बोलता केवळ योगिताला थोपटत राहिली. ती स्त्री म्हणजे संहिता गणेश किर्लोस्कर. एका बड्या उद्योजकाची धर्मपत्नी तर योगिता ही गणेश किर्लोस्करांची रखेल.
गणेश किर्लोस्कर त्यांच्या संसारात अतिशय सुखी होते. त्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती. संहितासारखी अतिशय हुशार पत्नी तसेच दोन सोन्यासारखी मुले त्यांना होती. दोन्ही मुले देखील आता हाताशी आली होती. एकदा गणेश यांना टायफॉईड झाला असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते. त्या हॉस्पिटलमध्ये योगिता नर्स म्हणून काम करत होती. त्या पंधरा दिवसांच्या कालावधीत गणेश आणि योगिता कधी एकमेकांमध्ये गुंतले ते त्यांचे त्यांनाच समजले नाही. योगिता अनाथ असून गणेश यांच्यापेक्षा तब्बल वीस वर्षांनी लहान होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर गणेश यांनी योगिताला एका बिल्डिंगमध्ये छोटीशी खोली घेऊन दिली. गणेश यांचा योगितासोबत अनौरस संसार सुरू झाला.
संहिताताईंच्या कानावर गणेश यांच्याबद्दल बातम्या येत होत्या; पण नवऱ्याचे समाजातील स्थान आणि त्यांना लोकांकडून मिळणारा मानसन्मान याचा विचार करून त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याचे अपराध पोटात घातले होते. दरम्यान योगिताला दिवस गेले आणि तिला मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून गणेश यांना अत्यानंद झाला होता. त्यांनी त्यांच्या लेकीचे नाव ‘ संपदा ‘ ठेवले.
योगिताच्या जीवनात गणेश हे गृहस्थ आल्यापासून योगिताने नोकरी सोडली होती. गणेश यांनीच तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले होते. संपदा पाच वर्षांची झाल्यावर गणेश यांची प्रकृती वारंवार ढासळू लागली असल्याने त्यांनी काही रक्कम योगिताच्या नावे ठेवली. संपदा सात वर्षांची झाली आणि गणेश जग सोडून गेले. गणेश यांच्या शेवटच्या काळात योगिता त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटू शकली नाही. त्यांच्या अंत्य*दर्शनाला मात्र योगिता संपदाला घेऊन हॉलमध्ये एका बाजूला उभी राहिली. संहिताचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर तिने स्वतःहून योगिताला गणेश यांचे अंत्य*दर्शन करू दिले. गणेश गेल्यावर आता योगिता पुन्हा अनाथ झाली. एका मुलीची जबाबदारी आता तिच्यावर होती. गणेश यांनी जी रक्कम योगिताच्या नावावर ठेवली होती ती त्या दोघींना आयुष्यभर पुरेल इतकी नव्हती त्यामुळे योगिताने उदरनिर्वाहासाठी चार घरी पोळ्या करण्याचे काम सुरू केले.
दिवसागणिक संपदा मोठी होत होती. संपदाने स्वबळावर उच्चशिक्षण घेतले. संपदाला एका नावाजलेल्या कंपनीत मॅनेजरचे पद मिळाले. नोकरीला लागल्यावर संपदाने तिच्या आईला घरकामे करण्यास बंदी घातली. संपदा अतिशय सुंदर आणि बुद्धिमान असल्याने तिच्याच ऑफिसमधल्या प्रथमेश काळे याने तिला लग्नाची मागणी घातली. प्रथमेशमध्ये नाव ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. योगिताने संपदाचे लग्न अतिशय धुमधडाक्यात लावून दिले. संपदाचा संसार सुरू झाला. लग्नानंतर दोन वर्षांनी संपदाला मुलगा झाला. त्याचे नाव पियुष ठेवण्यात आले.
पियुष दोन वर्षांचा झाल्यावर संपदा तापाचे निमित्त होऊन ती जग सोडून गेली. संपदाची वाईट बातमी ऐकून संहिताताई संपदाच्या घरी जाण्यास निघाल्यावर मोठ्या मुलाने त्यांना टोकले, ” आई ! तू त्या बाईच्या मुलीसाठी का जाते आहेस ? तुझ्या आयुष्यात त्या बाईने वादळ निर्माण केले तरी तू इतकं सहन कसं केलंस ?”
लेकाच्या बोलण्यावर संहिता ताई म्हणाल्या, ” मला माहिती आहे त्या बाईची चूक झाली आहे; पण तेवढीच तुझ्या बाबांची देखील चूक आहे. बाबांनी तिच्याशी लग्न न करता तिच्याबरोबर संसार केला. एक ठेवलेली बाई म्हणून ती तिचे जीवन आतापर्यंत जगली; पण एक गोष्ट आहे ती स्त्री आपल्या घरापर्यंत कधी आली नाही का कधी तिने माझ्याकडे कुठल्या गोष्टीला हात पसरले नाही का कधी कुठला हक्क दाखवला नाही. ती कायम स्वाभिमानात जगली. तिला जेव्हा ह्यांच्याबद्दल प्रेम वाटू लागले तेव्हा ती वयाने लहान होती. अनाथ असल्याने तिला कधी कोणाचे प्रेम मिळाले नव्हते ते प्रेम तिला ह्यांच्यामध्ये दिसले. तिच्या तरुण वयात हे तिला सोडून गेले तरी ती एखाद्या पतिव्रतेसारखी एकनिष्ठ राहिली. आज मी जाते आहे म्हणजे केवळ एक माणुसकी म्हणून. आज तिच्यावर इतका वाईट प्रसंग आला आहे. तिच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल ? हा सगळा सारासार विचार करून मी जाते आहे. आता मला त्या योगितासाठी काहीतरी तरतूद करून ठेवावी लागेल.” इतके बोलून संहिता ताई योगिताकडे गेल्या होत्या.
संपदाचा नवरा वैकुंठ*भूमीवरून घरी आल्यावर संहिताताई घरी जाण्यास निघाल्या. जाण्यापूर्वी त्यांनी योगिताला मिठी मारली.
संपदाची कार्ये झाल्यावर संहिताताई योगिताच्या घरी तिला भेटण्यास गेल्या आणि म्हणाल्या, ” योगिता, आपल्या घरी चल. आता इथे एकटी राहू नकोस. तुझ्या आयुष्यात तुझं आवडत माणूस दैवाने कायम हिरावून नेलं. खूप सोसलस आता आपल्या घरी चल. चार माणसात राहा. जावयाच्या दारात तुला राहवणार नाही. एकटेपणाचा खूप त्रास होईल तुला. देवाच्या कृपेने माझी मुले आणि सुना खूप चांगले आहेत.”
” ताई ! तुमचं मन किती मोठं आहे. माझ्यासारख्या बाईचा तुम्ही इतका विचार करत आहात ? मी तुमच्या घरी कशी येऊ ? कुठल्या हक्काने येऊ ? कुठल्या नात्याने येऊ ? तुमची मुलं सुना काय म्हणतील ? ते मला आपलं मानतील का ? त्यापेक्षा मी इथे माझ्या घरी राहीन. आता मला सवय केली पाहिजे ना एकटेपणाची.” योगिताच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत होते.
” हे बघ योगिता, मी माझ्या मुलांना आणि सुनेला विचारूनच तुला न्यायला आले आहे. तू म्हणतेस ना मी कुठल्या नात्याने तुमच्या घरी येऊ तर तू माझ्या मुलांची मावशी म्हणून आपल्या घरी चल. नातवंडांमध्ये तुझं मन रमेल.” संहिताताई म्हणाल्या.
” ताई ! मी काय बोलू ? माझ्याकडे काही शब्दच नाहीत. तुम्ही देवासारख्या आहात. तुम्हाला माझ्यामुळे मानसिक त्रास होऊन देखील आज तुम्ही मला बहिणीचा दर्जा देत आहात. मला माझीच लाज वाटू लागली आहे.” योगिता म्हणाली.
” झालं गेलं गंगेला मिळालं. चल योगिता आता जास्त विचार करू नकोस. पटकन आवरून निघ.” संहिताताई म्हणाल्या.
योगिताने भराभर आवरले आणि संहिता ताईंसोबत त्यांच्या घरी जाण्यास निघाली. संहिताताईंच्या रूपाने एक माणसातला देव योगिताला भेटला होता.
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे,ठाणे
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
छान👌👌
मनःपूर्वक आभार 😊🙏
खूप सुंदर👌
मनःपूर्वक आभार 😊🙏