कथेचे नाव – बचापोष –  प्रथम क्रमांक विजेती कथा 

WhatsApp Group Join Now

कथेचं नाव – बचापोष

दुपारचे चार वाजले होते …सुमतीताई हातात चहाचा कप घेऊन कोचावर  विसावल्या.  त्या मानसशास्त्रं विषयाच्या प्राध्यापिका होत्या.   सध्या त्या  “मागासलेल्या देशांतील स्त्रियांची मानसिक स्थिती” या शोध निबंधावर काम करत होत्या.

   तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला

 दारात रावी, त्यांची लाडकी विद्यार्थिनी उभी होती.

” काय गं? आज अचानक?” त्या म्हणाल्या

 काहीही नं बोलता रावी तरातरा कोचावर जाऊन बसली. ‘लालबुंद चेहरा, डोळ्यात पाणी, कपाळावर आठ्या’

“बाईंचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय, शांत हो.आणि मग सांग काय झालंय ते” सुमतीताई रावीला म्हणाल्या

 रावी जरा सावरली. ती सुमतीताईंना म्हणाली ” मॅडम माझ्या आईबाबांनी एक मुलगा पाहीलाय माझ्यासाठी. अमेरिकेतला. पण मला अमेरिकेला जायचं नाही ईथंच राहायचं आहे भारतात, पण ते ऐकतच नाहीयेत. आपल्या देशात स्त्रियांच्या मताला काही किमतच नाही मुळी”

“हो का?”

“चुकीचं बोलते आहेस तू रावी. आपला समाज आता खूप सुधारला आहे. महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री बाई फुले यांच्या अथक प्रयत्नानं स्त्रिया शिकू लागल्या.  आजकाल स्त्रियांना विचार करण्याचं, शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे.

स्वत:च्या कर्तृत्वामुळे स्त्रिया आज अत्युच्च पदांवर आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर किरण बेदी, कल्पना चावला, मेरी कोम, सुश्मीता सेन, बचेंद्री पाल, टेसी थॅामस, अजून कितीतरी नावं सांगता येतील.

 पण अजुनही काही देशांमध्ये कमालीच्या टोकाची पुरुषप्रधान संस्कृती आहे. लांब कशाला? आपला शेजारीच असलेला अफगाणिस्तान पहा.

संपूर्ण नियंत्रण पुरूषांच्या हातात, तिथे घरात काय किवा समाजात काय,  प्रथम पुरुष आणि द्वितीय सुद्धा पुरुषच. मुलींना आणि महिलांना कायमच दुय्यमपणाची आणि कनिष्ठपणाची वागणूक दिली जाते”

      “मुलींना शालेय शिक्षणाची परवानगी नाही, एकटीनं बाहेर जायला बंदी, ग्राउंडवर खेळायला बंदी, जाहीरपणे बोलायला बंदी, नोकरी करायला बंदी, सततचा बुरखा”

     “अरे बापरे मग कशा जगतात या मुली?” रावीनं आश्चर्यचकीत स्वरात विचारलं

     “ऐकायचं आहे तुला त्याबद्दल?”

  “हो हो” रावी म्हणाली

    ” ईतकी पराकोटीची बंधनं असल्यावर, त्यातून तो समाजच काहीतरी पळवाटा काढतो, अशीच एक पळवाट म्हणजे “”बचापोष””

      “म्हणजे काय?” रावीनं विचारलं

   “पर्शियन भाषेत बचापोषचा अर्थ आहे मुलासारखा पोषाख केलेली मुलगी. तिथल्या लहान मुलींना त्यांचे आईवडिल मुलांचा पोषाख चढवतात, केस कापतात, आवाज घोगरा करायला सांगतात. मग या मुली शाळेत जाणं, बाकीच्या बहीणींना घराबाहेर संरक्षण देणं, मुलांबरोबर खेळणं अशी कामं करु शकतात, ही मुलगी बचापोष आहे  हे फक्त त्या परिवारालाच माहिती असतं.

   श्रीमंत आणि गरीब दोन्ही समाजात हा प्रकार प्रचलित आहे. पण त्या मागची दोन्ही समाजाची कारणं वेगळी आहेत, कल्पना वेगळ्या आहेत”

   “दोन्ही समाजातल्या बचापोष मुलींच्या कथा मला माहिती आहेत”

   “सांगते ऐक, एक बसरा आणि दुसरी अमीना. दोघीही बचापोष झाल्या होत्या

   बसराची त्यामागे अगतिकता होती तर  अमीना बचापोष झाली ती तिच्या आईवडिलांची  मनापासून ईच्छा होती, म्हणून”

   आधी मी बसराची कथा सांगते

   ” बसरा, एक अफगाणी मुलगी. गरीब आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली. वडील वीट काम करणारे वयस्क गृहस्थ होते. तिला पाच लहान बहिणी होत्या..

   बसराच्या लहानपणीच तिला बचापोष करायचा तिच्या आईवडिलांनी निर्णय घेतला. कारण वडिलांना मदतीचा हात हवा होता. तिचे रेशमाच्या लड्यांसारखे केस कापले गेले, तिला मुलाचे कपडे चढवले आवाज घोगरा करायला सांगितलं

  आणि ती बसराची बशीर झाली.

“ आई, मला नाही व्हायचं बचापोष”

 ती खूप रडली दु:खी झाली मनातून पार कोसळूनच गेली. बंरं वडिलांशी बोलायची काही सोय नव्हती कारण तशी पद्धतच नव्हती मुळी.

       हळूहळू, तिला ती बचापोष असण्याची सवय झाली.ती  मुलांसारखा विचार करायला लागली. तिला घराबाहेर मिळणारं स्वातंत्र्य,दुकानात जाऊन सामान आणण्याची मुभा, खेळाच्या ग्राऊंडवर मनसोक्त फुटबॅालल खेळणं, बहिणींना घराबाहेर सोबत करणं, या गोष्टीत आता तिला आनंद मिळू लागला होता. तिला मिळणारी  मोकळीक, स्वातंत्र्य आता तिला आवडू लागलं होतं. ती दिवसा वडिलांना मदत करायची आणि संध्याकाळी मनसोक्त फुटबॅाल खेळायची                    

    पण पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं १३-१४ व्या वर्षी ती वयात आली. त्यानुरुप तिच्यात बदल होऊ लागले होते. आता तिचं बचापोष राहणं शक्य नव्हतं.

    आईने ताबडतोब तिला मुलींचे कपडे दिले. केस वाढवायला सांगितले. तिचा घोगरा आवाज बदलून मुलींसारखा कोमल करायला सांगितलं, आता ती पुन्हा बशीरची  बसरा होणार होती.

     पण तिचं  मन आता त्या बदलाला तयार नव्हतं. तिची मानसिकता आता पुरुषांप्रमाणे झाली होती. आता ती एकदम पार बदलूनच टाकायची? अगदी उलट दिशेने?

ती आईला म्हणाली, “नाही नाही .आई,  राहू दे नं मला असंच, मला बुरखा नाही घालायचा, मला हेच आयुष्य छान वाटतंय, मोकळं, स्वतंत्रं, बेबंद, आई, आई गं ऐक नं गं”

पण छे, परंपरेचे पोलादी हात तिच्या भोवती आवळायला सुरवात झाली होती, अखेर तिनं परिस्थिती पुढे शरणागती पत्करली कारण? ती एक एक स्त्री होती आणि पुरूषी समाजाचे पोलादी पंजे खूप मजबूत होते.

    ही होती बसराची कहाणी, जिला बचापोष व्हावं लागलं कारण तिच्या घरची परिस्थिती आणि काळाची गरज”

      “अरे बापरे भयानकच आहे हे सगळं” रावी म्हणाली.

    “आता दुसरी गोष्ट आहे अमीनाची, ती पण बचापोष झाली होती, पण कारण वेगळच होतं.

          तिचे वडिल सनदी अधिकारी, ‘किंचित’ सुधारकी विचारांचे होते . अमीना त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांना आणि अमीनाच्या आईला वाटायचं की पुढे जाऊन हिच्या नशिबातला बुरखा, दुय्यम वागणूक  आणि कष्ट तर आपण वाचवू शकणार नाही. मग आत्ताच, लहानपणी हिला बचापोष करुयात

 म्हणजे काही काळतरी  ही मुलांसारखं मोकळं, स्वतंत्र आयुष्य जगू शकेल.

    आणि ती अमीनाची आमीर झाली.

    तिच्या राहणीमानात जमीन अस्मानाचा फरक झाला. ती आता एकटी बाहेर जाऊ शकत होती. शिक्षणाची दारं तिला खुली झाली होती. ती आता  मुलांबरोबर फुटबॅाल खेळू शकत होती. अशी बरीच वर्षे उलटली. ती मजेत होती. तिचं आयुष्य ती छान जगत होती.

    बघता बघता ती अठरा वर्षांची झाली. आणि तरीही ती ‘वयात’ आली नव्हती. तिच्या आईला आता काळजी वाटायला लागली. वडिलांनी काबूलमधल्या डॅाक्टराशी चर्चा केली. त्या डॅाक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे, हा बचापोषचा परिणाम होता.

    तिचे आईवडिल काळजीत पडले, घाबरले. त्यांनी तिला परत मुलींसारखं वागायला भाग पाडलं. ती  पुन्हा आमीरची अमीना झाली. पण आता तिचा वेष मुलीचा आणि मानसिकता पुरुषी. असं काहीसं विचित्र झालं होतं. ईच्छा असूनही ती काही करु शकत नव्हती

   त्याच काळात,  भारतातून आलेल्या शिष्टमंडळात एक स्त्रीरोगतज्ञ होत्या. डॅाक्टर मीना, अमीनाचे वडील त्यांच्याशी बोलले. सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. आणि मग अमीना डॅाक्टर मीनांकडे, भारतात आली. भारतातल्या मोकळ्या वातावरणामुळे ती  सुरवातीला भांबावून गेली. पण तिथे ती सुखावली, स्थिरावली. डॅाक्टर मीनामुळे तिला मैत्रिणी मिळाल्या. पण तिची मानसिक स्थिती? ती तशीच होती पुरूषी.

    डॅाक्टर मीनांनी तिची संपूर्ण तपासणी केली. तिला काही औषधं दिली. आणि तिला मानसोपचार तज्ञ डॅाक्टर शहांकडे पाठवलं.

  “काहीतरी करा डॅाक्टर प्लीज… या विचित्र परिस्थितीतून माझी सुटका करा. या संकटातून सोडवा मला” ती रडत त्यांना म्हणाली.

     डॅाक्टरांनी तिला शांत  केलं. समजूत घातली. म्हणाले,  “हे बघ यातून तुझी सुटका नक्कीच होईल. आपल्याला थोडी समुपदेशनाची सत्रं करावी लागतील. पण मला खात्री आहे की मी तुला यातून बाहेर काढू शकेन”

     अमीनाच्या समुपदेशनाच्या बैठका सुरु झाल्या.ती हळूहळू शांत झाली. सैलावत गेली.

    दोन महिने जवळ जवळ रोज हे चालू होतं. 

     काही दिवसांच्या उपचारानंतर ती बरी झाली. तिला तिचा कोमल आवाज परत मिळाला, स्त्रीत्व मिळालं.

      भारतातल्या एका समाजसेवी संस्थेनं तिची मुलाखत घेतली. विचारलं, “तुझं बचापोष होणं, हे बरोबर होतं की चूक होतं?”

      त्यावर अमीना म्हणाली “मला माहीत नाही. पण आयुष्याचा तो काळ मी एंजॅाय केला हे नक्की.  बचापोषमध्ये मला ढलकल्या बद्दल माझ्या मनात थोडा कडवटपणा जरूर आहे, पण शेवटी, ते आयुष्यात कधीतरी मला मुक्त जीवन अनुभवायला मिळावं  म्हणूनच होतं”

     “आता माझा visa संपतो आहे मी परत जाणार आहे. पुन्हा त्याच दुनियेत. पण एक गोष्ट मात्रं जरुर आहे. भारतानं मला समाजातला खुलेपणा दाखवला , एकता दाखवली, समानता दाखविली. मी ईथे मोकळा श्वास घेतला”

    “मी अफगाणिस्तानात परत जाऊन माझ्या सारख्या स्त्रियांना निश्चितच मदत करीन.

.हा माझा वादा आहे. भारतदेशाला, डॅाक्टर शहांना, मीनामॅमना, माझ्या भारतातल्या मैत्रिणींना,

शुक्रीयाभारत, खुदाहाफीज”     असं बोलून अमीनानं आपलं मनोगत संपवलं

  ” अरे बापरे कठीणच आहे सगळं एकूण”रावी म्हणाली

    ” मग असंही काही जगात असतं, तुला काय वाटलं?

  ” आता माझं ऐक, आपल्या समाजानं स्त्रियांना  स्वत:चे विचार मांडण्याचं, निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे आईबाबांना विश्वासात घे. मला खात्री आहे की ते तुझं म्हणणं ऐकतील” सुमतीताई म्हणाल्या.

 “धन्यवाद मॅडम “

 ” बरं झालं मी तुम्हाला भेटले ते… आपण ईथे किती मोकळ्या आणि सुरक्षित वातावरणात आहोत  याची मला जाणीव झाली”

 आणि… निश्चिंत मनानं रावी घरी निघाली.

 ………………………………………समाप्त…………………………………………

लेखिका -अस्मिता महाजन,पुणे

(कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत, कोणीही परवानगीशिवाय कथेचा वापर करू नये )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top