नुकताच संक्रांतीचा सण झाला होता त्यामुळे शहरात बरंच काही नवीन पाहायला मिळेल असा विचार करून मीनू मांजरीण शहरात चक्कर मारायला गेली होती. मीनू मांजरीण आज शहरात जाऊन परत आली होती . ती नेहमी तिथे जाऊन आली कि काहीतरी नवीन शिकून यायची आणि मग इथे जंगलात सर्व प्राण्यांना शिकवायची हा तिचा आवडता छंद होता.
मीनूच्या दोन जिवलग मैत्रिणी होत्या, शीला ससीण आणि चित्रा माकडीण. तिघी मैत्रीणींमधे खूप प्रेम होते.
मीनू मांजरी सोडून, दोघींना छोटी बाळे असल्याने त्यांना काही मांजरीसारखे मनात येईल तेव्हा शहरात जाता यायचे नाही. पण मीनू त्यांना शहराच्या गमती जमती सांगत असे.
“अरे शीला, तुला कळले का मीनूने शहरातून काहीतरी वस्तू आणली आहे म्हणे त्यात आपण दिसतो.” चित्रा माकडिणीने शीला ससणीला विचारले.
“हो कळले आहे मलापण आहे असेच काहीतरी. त्यात म्हणे गाणी गाताना लोक पण दिसतात, मीनू त्याला कमेरा -का असेच काहीतरी म्हणत होती.” शीलाने त्याला आपल्याकडील माहिती दिली. दोघींनाही ती वस्तू काय आहे ते जाण्याचे कुतुहल. दोघी पोहचल्या मीनू मांजरीजवळ.पण मीनूपण अशी सहजासहजी थोडी सगळे दाखवणार होती!
तिला माहित होते कि त्या वस्तुमुळेच तर तिला भाव मिळतोय. तिने लगेच त्या दोघींना सांगितले ,”दाखवेन पण त्याकरता तुम्हाला मला दोन चीजचे तुकडे द्यावे लागतील.”
दोघींना मीनूचा हावरट स्वभाव माहित होता म्हणून त्या आधीच चीज घेऊन तिथे पोहचल्या होत्या .चीज हातात मिळताच, मीनूने लगेच त्यांना कॅमेरा दाखवला.
त्यांनी तिला ह्यात चालती बोलती माणसे दिसतात म्हणे, ते दाखवायला सांगितले.
“दाखवते, दाखवते थांबा. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गम्मत सांगते. आज मी जेव्हा शहरात गेले तिथे एका घरात मला काही बायकांचे हसण्याचे आवाज आले. मी हळूच लपून पहिले तर तिथे काहीतरी समारंभ चालला होता. आणि एक बाई त्या समारंभाला एका डबीसारख्या वस्तूतून बघत होती. मला इथून तो समारंभ त्या डबीच्या झाकणावर दिसत होता. मी ते बघितले आणि मला ती डबी खूप आवडली. नंतर सगळ्याजणी फराळ करू लागल्या. जेव्हा त्या फराळ करत होत्या तेव्हा त्या बाईने ती डबी एका टॅबलवर ठेऊन दिली, मी हळूच सगळ्यांचा डोळा चुकवून ती घेत आले तीच वस्तू म्हणजे हा छोटा कॅमेरा!
मी ती बाई जेव्हा सगळ्यांना तो समारंभ झाल्यावर पुन्हा पुन्हा व्हिडीओ पहा म्हणत ती चित्रं त्या डबीत दाखवत होती, तेव्हा ते कसे दाखवत होती ते बघून घेतले आणि मग माझ्या हातात कॅमेरा आल्यावर एकदा तिथेच चालवून बघितला. व्हिडीओ दिसत होता म्हणून म्हटले माझ्या मैत्रिणींना तर हे दाखवायलाच हवे, म्हणून कॅमेरा उचलून घेउन आले .”
“अच्छा तर इतके विशेष आहे का हे?” शीला म्हणाली.
“हो मग नुसता कॅमेराच नाही, तर समारंभ पण खूप विशेष आहे नीट बघा दोघी.”
मीनूने त्यांना एक विडिओ लावून दिला.तो व्हिडिओ चित्रा माकडीण एकदम नीट लक्ष देऊन बघू लागली. तो व्हिडिओ होता एका बोरन्हाणाचा !
“बघग, बाळाला कसे छान तयार करून बसवलय. चॉकलेट बिस्किटांच्या माळा घातल्या आहेत त्याला, किती छान ना?” चित्रा म्हणाली
“हो ना आणि मागे पतंग पण छान लावले आहेत नाही का?” शीलाने दुजोरा दिला.
“अरे रे हे काय..काय करत आहेत ह्या बायका, त्या बाळाला लागेल ना ?” दोघींच्या तोंडून एकत्र हे शब्द पडताच मीनू मांजरीण जोरात हसू लागली.
झाले असे कि व्हिडिओत त्या बायका बाळावर एक टोपली धरून त्याच्यावर बोर, मटार, चॉकलेट वगैरे टाकू लागल्या होत्या.
“अरे मूर्खांनो त्याला बोरन्हाण म्हणतात” मीनू मांजराने आपलयाला शहराबद्दल आणि माणसांबद्दल सगळे माहित असल्याचा आव आणला आणि म्हणाली,”असे करून माणसे आपल्या मुलांना भाज्या फळेखायची आवड लावायचा प्रयत्न करतात.”
“हो का मग आपणही हे करायला पाहिजे, आपली मुले पण आजकाल नुसते चायनीज खाऊ पाहतात, नाहीका ग शीला?” चित्राने म्हटले आणि तिघी मैत्रीणीना हा विचार एकदम पटला.
झाले मग काय, पौर्णिमेचा दिवस ठरला चित्राने आपल्या आणि शीलाने आपल्या बाळांचे बोरन्हाण करायचे ठरवले. जंगलात सर्व प्राण्यांना आमंत्रण देण्यासाठी किरीट कबुतराला सांगितले गेले. किरीटने पण प्रत्येकाला आवर्जून “नक्की या बरं , काहीतरी वेगळे दिसणार आहे” असे आमंत्रण दिले.
आज पौर्णिमा होती.चित्राच्या नवऱ्याने म्हणजे मनोज माकडाने कालच शहरात जाऊन एका दुकानातून बिस्किटाचे पुडे, चॉकलेट्स आणल्या होत्या.चित्राने जंगलाच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या बुंध्याला पतंगी लावल्या. शीलाने आजूबाजूला दोन-दोन मोरपिसे लावली. सुलु सुगरणीने गोळ्या चॉकलेटचे हार बनवून दिले.दुपार सरता सरता सगळे प्राणी पक्षी ठरलेल्या जागी एकत्र झाले. तिथे दोघी आया आपापल्या बाळांना घेऊन आल्या.बोरन्हाण करायला टोपली घेऊन बाळांच्या मावश्या आल्या.
आता सगळ्या मिळून बोरन्हाण करणार तेवढ्यात मीनूच्या लक्षात आले कि काहीतरी कमी आहे. तिने ओरडून म्हटले “थांबा जरा काहीतरी राहतंय”आणि तिने पटकन पुन्हा तो विडिओ बघितला, आणि चित्राच्या लक्षात आले कि अरेच्चा बाळांना घातलेले दागिने तर राहिलेच की. ती उदास झाली ,कि आपल्या बाळांना असे दागिने नाहीत. पण एवढ्यात कुठे तरी गेलेली मीनू मांजरीण हातात दोन डबे घेऊन परत आली आणि ते डबे शीला आणि चित्राच्या हातात ठेवत म्हणाले अरे मला मुले नसली म्हणून काय झाले मी दोन गोड लेकरांची मावशी आहे, मग दागिने कसे विसणार होते मी. ही घ्या हीच माझ्याकडून दोन्ही बाळांना बोरन्हाणाची भेट.मग दोन्ही आयांनी लगबगीने बाळांना दागिने घातले आणि त्यांचे बोरन्हाण झाले सगळ्या बाल प्राण्यांना आणि पक्ष्यांना बोर, मटार , चॉकलेट आणि बिस्कीट लुटण्यात खूपच मज्जा आली. सगळ्या प्राण्यांनी बाळांना खूप आशीर्वाद दिले आणि ते सगळे पाहून सिंह महाराजांनी आपल्या राज्यात दरवर्षी लहान बाळांचे असे बोरन्हाण केले जाईल आणि ते करवायची जवाबदारी मीनू मांजरीची असेल आणि त्याचा सगळा खर्च शासन देईल हे जाहीर केले.
सगळ्या प्राण्यांनी “सिंह महाराजची जय” अशी घोषणा केली आणि चित्रा आणि शीलाने बनवलेल्या फराळावर ताव मारायला सुरुवात केली.
अश्याच कथा वाचण्यासाठी आमचा watsapp ग्रुप जॉईन करा. (Marathi kids Story 2024)
लेखिका – सौ. अनला बापट
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Nice one…
धमाल कथा👌👌