पहाटे साडेपाचची वेळ. बऱ्याच दिवसांच्या धावपळी नंतर आज सुट्टीचा दिवस आला होता. स्वच्छ मोकळ्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी बाल्कनीत खुर्चीवर बसलो होतो.चांदणे पांघरलेल्या सृष्टीला सूर्यनारायण कसे उठवतात हे पाहण्यात मला आनंद वाटत होता. थंडी अजून पूर्णपणे संपली नव्हती.हवेत थोडा गारवा होता. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानांना सुखावत होता. त्या किलबिलाटामध्ये कोणता आवाज कोणाचा हे ओळखण्यात मी रमलो होतो.
तेवढ्यात अतिशय मार्दवतापूर्ण आवाज कानी आला,” K.K.कॉफी ! पाहिजे का? की आणखीन काही पाहिजे?”
प्रेमाच्या रणांगणात पदार्पण करताना याच शब्दांनी मला गंधाक्षत लावलं होतं. हे शब्द पहिल्यांदा माझ्या कानी पडले तेव्हा मी सगळ्या मित्रांबरोबर आमच्या गावात उघडलेल्या पहिल्या मॉलमध्ये फिरायला गेलो होतो आणि कॉफी शॉप मध्ये कॉफीची वाट पाहत होतो. तेवढ्यात माझ्या पाठीमागून एका मुलीचा आवाज आला,
“मला K.K. कॉफी घ्यायची आहे. तुम्ही पण ट्राय करून पहा.” रुपा, कामिनी, नेहा, राजनंदिनी या सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं की, नेमकं रेणुकाला काय पाहिजे आहे? तेवढ्यात रेणुका म्हणाली,
“नाही कळलं ना कोणाला? एवढ्या माझ्या बालमैत्रिणी ना तुम्ही, तरी समजलं नाही?”
मग पुढे नाटकी आवाजात ती म्हणाली, “K.K.कॉफी” म्हणजे कडक काळी कॉफी लिंबाबरोबर.”
तेवढ्यात नेहा म्हणाली म्हणजे “हॉट ब्लॅक कॉफी विथ लेमन” आणि सगळ्याजणी खिदळायला लागल्या. नुसता गोंधळ चालू होता आणि तो आवाज आमच्या गोंधळाच्या आवाजामध्ये जरी मिसळला होता तरीदेखील “K.K.कॉफी” या शब्दांनी माझी उत्सुकता चाळवली होती. माझ्यासमोर आलेली कॉफी मी संपवली आणि खुर्चीवरून उठून मागे फिरलो, मुलींच्या घोळक्याकडे तोंड करून म्हणालो, “हाय! मी आशुतोष.”
त्यांना कळेनाच, अचानक एक हँडसम मुलगा, व्यवस्थित भांग पडलेला, नुकतीच मिसरुड फुटलेला,चमकदार त्वचा पण रंग सावळा, सरळ नाक, पाणीदार डोळे पण मिश्कील नजर, असा रुबाबदार तरूण हात वर करून आपल्याला ‘हाय’ का बरं म्हणत आहे?
त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्हं बघून त्याने स्वतःची आणि आपल्या मित्रांची ओळख करुन दिली, “अजय, अक्षय, पंकज, मनोज आणि मी आशुतोष.”
बोलता बोलता लक्षात आलं, आम्ही सगळे एकाच महाविद्यालयात होतो. मग आमची सगळ्यांची छान गट्टी जमली आणि कॉलेजमध्ये आमचा ग्रुप तयार झाला. आम्ही सगळी मुलं पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो आणि मुली पहिल्या वर्षाला होत्या. कॉलेज चालू होऊन दोनच महिने झाले होते. येत्या गणेशोत्सवात, कोणाचं काय सादरीकरण आहे याविषयी ग्रुपमध्ये चर्चा चालू होती. मी मराठी सिनेमातील गाण्यावर डान्स करणार होतो. सोलो परफॉर्मन्स होता माझा आणि राजनंदिनी पण कथकचा सोलो परफॉर्मन्स करणार होती. पंकज आणि मनोज हे दोघे मिळून एक नाटक सादर करणार होते.
आणि बाकी सगळे पडद्यामागे राहून आम्हाला प्रोत्साहन देत होते.
एके दिवशी सकाळी प्रॅक्टिस करत असताना अचानकपणे रेणुका समोर आली. लुकलुकणारे डोळे, हळुवार चालणे, सरळ नाक, ओठांवर मंद स्मितहास्य, गळ्यामध्ये काळा दोरा आणि त्यामध्ये चांदीची टोपी लावलेले रुद्राक्ष घातलेली रेणुका, आकाशी रंगाच्या कॉटनच्या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसत होती की मी तिला बघून पार हरवून गेलो आणि घसरुन पडलो. तिला पण हे जाणवलं की तिच्याकडे बघताना मी पडलो होतो. मला बराच मुका मार लागला होता. पण मला त्या वेदना जाणवत पण नव्हत्या. माझ्या वेदनांमुळे, माझ्यापेक्षा ती जास्त कासावीस झाली होती. आम्हां दोघांनाही हे कळून चुकलं होतं की आमच्या मनामध्ये, एकमेकांविषयी काही विशेष भावना आहेत. माझ्या संपूर्ण उजव्या अंगाला मुका मार लागला होता. अंग आखडलं गेलं होतं. लगेचच इतर सगळी मित्र मंडळी व ओळखीचे गोळा झाले आणि मला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सक्तीचा आराम सांगितला. मी पण हो ला हो केलं.
दोन दिवसांनी मित्र-मैत्रिणींचा ग्रुप घरी आला आणि तब्येतीची चौकशी सुरू झाली, तेव्हा मी त्यांना सांगितलं, फक्त डाव्या बाजूच्या हातापायाच्या सहाय्याने मी डान्सच्या काही वेगळ्या स्टेप्स बसवल्या आहेत. ग्रुपमधील काही जणांना याचं खूप अप्रूप वाटलं. काही जणांनी मात्र माझ्या काळजीपोटी मला आराम करण्याचा सल्ला दिला.
पण माझा निर्णय पक्का होता. मला कोणत्याही परिस्थितीत कला सादर करायची होती. काही झालं तरी आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे यावर मी ठाम होतो. सगळेजण घरी आले होते त्यावेळी रेणुकाने माझा फोन नंबर घेतला होता. आमचे नियमितपणे फोनवर बोलणे चालू झाले. तिला माझा प्रचंड राग आला होता कारण मी पूर्ण बरा होण्याआधीच नवीन काहीतरी डान्स करण्याच्या मागे लागलो होतो.
मी अशा अवस्थेमध्ये डान्स करु नये यासाठी तिने बराच प्रयत्न केला व त्यामुळे आमच्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वाद पण झाले. तरीदेखील मी माझा हट्ट सोडायला तयार होत नव्हतो.
यामध्ये वेळ पुढे पुढे चालला होता आणि ज्या दिवशी माझा परफॉर्मन्स होता तो दिवस उगवला. जे घडू नये ते घडले ज्याचा विचार देखील मी केला नव्हता. माझ्या आधीचे सगळे परफॉर्मन्स चांगले झाले होते.
ज्यावेळेस माझे नाव पुकारले गेले त्यावेळी मी स्टेजवर परफॉर्मन्स देण्यासाठी गेलो आणि पुन्हा पडलो. यावेळी मात्र स्टेजवर सगळ्यांसमोर पडलो. आता मात्र सगळ्यांसमोर माझे हसू झाले होते. आपल्यावर सगळे हसत आहे, हे दृश्य बघता बघता मी बेशुद्ध झालो. डोळे थेट रुग्णालयातच उघडले होते. डॉक्टरांनी सहा महिने सक्तीची विश्रांती सांगितली.
सगळ्यात जास्त वाईट गोष्ट म्हणजे रेणुका या प्रसंगानंतर कुठेतरी गायबच झाली होती. बाकी सगळे होते पण माझी नजर तिलाच शोधत होती. इतरांशी चर्चा करताना मला कळलं की तिनेच पुढाकार घेऊन मला रुग्णालयात दाखल केलं होतं. पण आता मात्र अजिबात समोर येत नव्हती. त्यामुळे माझा जीव कावराबावरा होत होता. त्याचबरोबर ती समोर आली तर कोणत्या तोंडाने तिला सामोरा जाऊ हे देखील कळत नव्हतं. तिने मला हरप्रकारे माझ्या आततायी निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता तरी देखील मी तिचं ऐकलं नव्हतं. झालेल्या दुखापतीमुळे माझं हे शैक्षणिक वर्षदेखील वाया जाण्याची दाट शक्यता मला वाटत होती.
बघता बघता पंधरा दिवस झाले अजून रेणुकाचा पत्ता नव्हता. आता कॉलेजमधून येणाऱ्या मित्र-मैत्रिणींचे भेटणे देखील कमी झाले होते. फक्त अक्षय मला भेटण्यासाठी येत होता. मी प्रत्येक वेळेस त्याच्याकडे तिच्याबद्दल चौकशी करत होतो पण त्याने सांगितले की ती त्याच्याशी देखील बोलत नाही. याचे मला खूप वाईट वाटत होते. जसे हे पंधरा दिवस गेले तसाच पुढचा संपूर्ण महिना गेला पण तिच्याशी बोलणे झाले नाही तिने फोन पण बंद केलेला होता. तिच्या आठवणीने आता माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. या ओघळत्या अश्रूंबरोबर अजून पंधरा दिवस गेले आणि शेवटी डॉक्टरांनी मला व्हीलचेअरवर घरी जाण्याची परवानगी दिली. मला घरी नेण्यासाठी अक्षय आला होता घरातले तर होतेच पण अक्षय असल्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळाला होता.
आम्ही घराजवळ पोचलो तेव्हा गल्लीच्या कोपऱ्यावर मला रेणुका दिसली. मी इतका हर्षभरित झालो की असं वाटलं आताच्या आत्ता खुर्चीवरून उठावं आणि तिच्याशी जाऊन बोलावं. पण सगळं व्यर्थ! तिने माझ्याकडे अनोळखी नजरेने बघितलं आणि ती तिथून निघून गेली.
असाच अजून एक महिना गेला. आता मात्र मला रहावेना आणि तेवढ्यात दिवाळीनिमित्त सगळा ग्रुप घरी आला, रेणुकासकट.
ती माझ्याशी फक्त एकच वाक्य बोलली, “तू बरा झाल्यानंतर मी तुला भेटायला येईन. मला तुझ्याशी फक्त एकदाच बोलायचं आहे.” हे बोलत असताना पण ती चिडलेलीच होती.
मी तिला खुलविण्याचा प्रयत्न केला पण मला यश आलं नाही. ती घरी आली, माझ्याशी बोलली, मी याच आनंदात होतो पण ती जे रागाने बोलली त्यामागे काय हेतू असावा हे मात्र मला अजिबात समजत नव्हतं.
मी खूप विचार केला की नेमकं तिला काय बोलायचं असेल? अक्षयदेखील यामध्ये काही मदत करू शकत नव्हता कारण तिचं आणि त्याचं संभाषण देखील होत नव्हतं. मी नियमित त्याच्याकडे तिच्याबद्दल चौकशी करायचो पण काहीच उपयोग होत नव्हता. तो मला भेटला की मला नेहमी, ‘अरे,अभ्यास कर. बघता बघता परीक्षा येईल’ असं सांगायचा आणि त्याच्या सांगण्यानुसार मी दोन-तीन दिवस अभ्यास करायचो आणि पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी.
अनेक वेळा असं घडलं होतं. पण अचानक एके दिवशी तो खूप खूश होऊन हसत हसत आला आणि सांगितलं,” आज रेणुका आणि माझं बोलणं झालं. तिने तुझ्याबद्दल चौकशी केली. पण तिची एक अट आहे. परिक्षेमध्ये ऐंशी टक्के पडले तरच ती तुझ्याशी बोलेल असा निरोप तिने दिला आहे.
अक्षय रेणुकाबद्दल, तिच्या भेटीबद्दल सांगत होता. तिने माझ्याबद्दल केलेली चौकशी मला खूपच आनंद देत होती. पण तिच्या अटीबद्दल मनात थोडीशी भीती देखील होती. कारण आतापर्यंत मला नेहमी साठ ते पासष्ठ टक्के पडत होते.
दोन दिवस तिच्या आठवणींच्या आनंदात घालवल्यानंतर अक्षयने पुन्हा एकदा ऐंशी टक्क्यांची आठवण करून दिली.
आता मात्र मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐंशीचा टप्पा पार करायचा होता आणि रात्रंदिवस मी अभ्यास करायला लागलो. अक्षय मला साहित्य पुरवत होता. सध्या
अभ्यासाशिवाय दुसरं कुठलंही व्यवधान मला नव्हतं त्यामुळे माझा अभ्यास जोरदार चालू होता.
परीक्षेच्या पंधरा दिवस आधी मी चालायला फिरायला लागलो आणि परीक्षेपर्यंत सगळ्या प्रकारची हालचाल करण्यामध्ये सक्षम झालो. बघता बघता परीक्षा झाली शेवटचा पेपर झाला. त्या दिवशी मी रेणुकाच्या समोर जाऊन उभा राहिलो तरीदेखील ती माझ्याशी काहीच बोलली नाही. आता मात्र मला राग येणं देखील बंद झालं होतं आणि मी देखील यानंतर तिचा नाद सोडायचा असा निर्णय घेऊन झालेली शरीराची झीज भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
उत्तम शरीरयष्टी कोणाची असते ?
एक तर खेळाडूंची किंवा सैनिकांची म्हणून मी सैनिकांसारखा दिनक्रम तयार केला.
योग्य व्यायाम व योग्य आहार याचा सराव चालू केला. त्याचा परिणाम देखील शरीरयष्टीवर दिसत होता. त्यापेक्षाही मनोवृत्तीत पडलेला फरक मला जास्त आनंद देत होता.
बघता बघता निकालाचा दिवस उगवला. मला ब्याऐंशी टक्के पडले होते. मी आनंदात होतो आणि रेणुकाने मला गाठून माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण तिने बोलण्याचा निश्चय केला होता. तिने मला सरळ घरी येण्याचा आग्रह केला. मी म्हणालो, “तुला माझ्याशी बोलायचं नाही ना! तरीदेखील कशाला परत जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेस?”
मग तिने, ती माझी चौकशी नियमित अक्षयकडे कशी करत होती आणि कश्या पद्धतीने दोघांनी मिळून माझ्याकडून हे यश संपादून घेतलं हे सविस्तर सांगितलं. हे ऐकत असताना सुरुवातीला मला अक्षयचा थोडासा राग आला होता पण जे काही घडलं ते सगळे माझ्या हिताचंच होतं हे मला रेणुकाने समजावून सांगितले व तिच्या स्वप्नांचा राजकुमार मीच असल्याची कबुली देऊन आग्रहाने घरी घेऊन गेली.
कालांतराने दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं व कमावते देखील झालो. आज आमच्या विवाहाला दोन वर्ष पूर्ण झाली होती.
काळ किती वेगाने पुढे जात आहे या विचाराला,
“हे घ्या K.K.कॉफी.” या शब्दाने पूर्णविराम मिळाला.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखक : तन्मय देशपांडे, छ.संभाजी नगर