सावर रे…..
एक अलवार प्रेम कथा..
मिहीर आणि स्वराचं नुकतंच लग्न झाले होते. सगळं काही व्यवस्थित जुळून आले . स्वरा फार्मसी झाली होती आणि मिहीर सॉफ्टवेअर इंजिनीयर. स्वरा छोट्याश्या गावातुन आली होती. नाही म्हणायला बीफर्मसी होई पर्यंत ती शहरात राहिली होती म्हणा. पण तिचं मन गावीच जास्त रमायचे. मनाने थोडीशी हळवी असणारी स्वरा लग्नानंतर मिहीर बरोबर बंगलोरला आली.
मिहीर लहानपणापासून शहरात वाढलेला . त्याचं सारं शिक्षण पुण्यातच झालेलं. अगदी नौकरी देखील पुण्यातच लागली होती. त्यामुळे तो एक पक्का पुणेकर होता. पण नौकरीचे एक वर्ष संपतो न संपतो, तोच त्याने दुसऱ्या कंपनीत जॉब धरला.आणि आता तर लग्नानंतर मिहिरने मुद्दामच बंगलोर चा प्रोजेक्ट निवडला. आणि दोघेही बंगलोरला रवाना झाले. तिथूनच ते केरळ ला हनिमून साठी जाऊन आले.
स्वरा प्रचंड बडबडी, तर मिहीर एकदम शांत. सतत कामात व्यस्त. लग्न ठरल्या पासून ते पार पडे पर्यंत मध्ये तसा फारसा अवधी नव्हता, त्यामुळे ते दोघे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते. स्वराला वाटले केरळ ट्रिप मध्ये ही सगळी कसर भरून काढावी. ती मिहीर सोबत खूप खूप बोलायची, पण मिहीर मात्र जेवढ्यास तेवढीच उत्तरं देत. त्यामुळे दोघांमध्ये हवा तसा सवांद घडत नव्हता. पण मिहीर स्वराची प्रचंड काळजी घेत असे. इतकी की, या आठ दिवसांत केवळ तिच्या बॉडी लँग्वेज वरूनच तिला काय आवडेल काय नाही हे त्याच्या लक्षात येऊ लागले. आणि स्वरा या गोष्टी मुळे खूप मोहरुन गेली!

त्याचा तो अलगद स्पर्श तिला सुखावून टाकत होता.पण तरीही तिला कळत नव्हते की नेमकं काय चुकतंय!! नेमकं काय कमी आहे त्या दोघांमध्ये. आणि स्वरा डोक्यात हेच प्रश्न घेऊन केरळहुन परत आली होती. स्वरा मांडवपरतनी साठी माहेरी आली होती. त्यावेळी तिच्या मैत्रणींने तिला गुलाबी चिमटे काढून हैराण केलं होतं. आणि स्वरा देखील लाजून लाजून, सगळ्या ची उत्तरे देत होती. पण तरीही तिच्या मनातून हा विचार जातच नव्हता की तिचं आणि मिहीरचं नातं हवं तसं का बरं बहरत नाहीये. नेमकं काय आणि कोणाचं चुकतंय? हेच अनुत्तरित प्रश्न घेऊन ती मिहीर सोबत बंगलोरला आली. सुरुवातीचे काही दिवस मिहिरचे आईबाबा त्यांच्या सोबत बंगलोरला राहिले. एकदा का सगळा संसार व्यवस्थित लागला की, ते दोघेही पुण्यात परत आले.
तोपर्यंत स्वराने देखील स्वतः साठी जॉब शोधला होता. सगळं काही सुरळीत चालू होते. मिहीर स्वराला काय हवं नको ते सारं पहात होता. तिचं मन दुखणार नाही याची काळजी घेत होता. इतकी की स्वराने कुठल्याही गोष्टी ला नकार दिला, तर तो ती गोष्ट सोडून द्यायचा. आणि तिच्या कोणत्याच गोष्टी ला तो विरोध करत नव्हता. त्यामुळे त्या दोघांत कधीच भडणांचे प्रश्न उपस्थित झालेच नाहीत. थोडक्यात काय स्वरा म्हणेल ती पूर्व दिशा! असा मिहिरने पवित्रा घेतला होता. स्वरा जेंव्हा हे असं सगळं तिच्या मैत्रिणींशी शेयर करायची त्यावेळी सगळ्या एकजात तिला म्हणायच्या,”स्वरा तू किती भाग्यवान आहेस ग! तुझ्या हो ला हो करणारा नवरा मिळाला”.
“अग पण तो माझं सगळंच ऐकतो, कशालाच विरोध करत नाही. अगदी रात्री सुध्दा…….
” स्वराला कळतच नव्हतं की तिला जे वाटतंय, जे सांगायचे आहे ते कसे सांगावे? तिच्या आणि मिहिरच्या नात्यात नेमका काय गोंधळ आहे?
पहिल्या दिवाळसणा निमित्त स्वरा आणि मिहीर पुण्यात आले. लग्नानंतर ते दोघेही पहिल्यांदाच पुण्यात आले होते, त्यामुळे या आठ दिवसांत स्वरा आणि मिहीर प्रचंड बिझी होते. रोज नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या भेटींचे सत्र सुरू होते. मिहिरने सगळ्यांकडे जाणे शक्य होणार नाही म्हणून त्याच्या सगळ्या खास मित्रमैत्रिणींना घरीच बोलावले होते.
गप्पांची मैफिल रंगली, शाळेपासूनचे एकेक किस्से बाहेर येऊ लागले. आपला नवरा इतका मोकळा आणि हसरा आहे, हे स्वराने पहिल्यांदाच पाहिले होते. तिनं अनुभवलेला शांत आणि समजूतदार मिहीर आणि आताचा हस्यकल्लोळात चिंब भिजलेला मिहीर यांच्यात जमीन असमानचा फरक होता. स्वरा त्याला स्वयंपाक घरातून दुरून न्याहाळून पहात होती. आणि विचार करत होती की हा मिहीर मला का नाही भेटला? ती या विचारात असतांनाच हॉल मधून एकदम जोरात आवाज आला, सगळे जण मिळून मिहिरला कशावरून तरी चिडवत होते. आवाज वाढला तसं स्वराचं तिकडं लक्ष गेलं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक भरली.
मिहीर आज सगळ्या जुन्या आठवणींतच रममाण होता. अजूनही त्याचे खास मित्र हॉल मध्ये गप्पा मारत बसलेलेच होते. स्वरा काम करून दमली होती आणि तिने मिहीर ला मेसेज केला की ती झोपायला चालली आहे . मिहिरने स्वराकडे पाहून होकार भरला. आणि माहीत नाही तो आणि त्याचे मित्र पुढे रात्री किती उशिरा पर्यंत गप्पा मारत बसले होते.
स्वरा दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या एका मैत्रिणीकडे जाऊन येणार होती. ही भेट थोडी अचानकच ठरली होती, त्यामुळे स्वराची थोडीशी धावपळ झाली.
ठरल्या प्रमाणे मिहीर आणि स्वरा बंगलोरला परत आले. आणि स्वरा पुन्हा तोच बांगलोरचा मिहीर परत अनुभवायला लागली.
आज शनिवार होता, मिहीर स्वराला पिक्चर पहायला जाऊ या का म्हणून विचारत होता. पण त्याने पाहिलं की स्वरा आज कामात खूप व्यस्त आहे, त्याने स्वराला विचारलं, ” आज काही खास आहे का?” “अरे हो,माझी एक खास मैत्रीण येणार आहे”.
स्वराने सांगितले . त्यावर मिहीरने विचार केला की घरीच एखादा पिक्चर पहात बसावं.
स्वरा आज खूपच खुश दिसत होती. मिहिरने अंदाज लावला की येणारी मैत्रीण स्वराची खूप जवळची आणि खास असेल. मिहिरने स्वराला काही मदत करू का म्हणून विचारना केली, त्यावर स्वराने गरज पडली तर नक्की आवाज देते म्हणत आपलं काम करत राहिली.
थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली आणि स्वराने मिहीरला आवाज दिला, “मिहीर जरा बाहेर ये ना अरे”.
स्वरा आणि मिहीर ने दोघांनी मिळून दार उघडले आणि मिहीर त्या व्यक्ती कडे बघतच राहिला.
“देवयानी!” मिहीरचं पहिलं क्रश.
तो स्वराकडे बघतच बसला, हिला कसं कळलं? स्वराने त्यादिवशी मित्रमंडळी घरी आले तर काही वेगळं पाहिलं, ऐकलं का? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाले. त्याने त्या दोघींकडे पाहिलं तर दोघीही एकदमच कूल दिसत होत्या. त्याला नेमकं काय करावे, काय बोलावे हे कळतच नव्हते.
शेवटी स्वराने मिहीर ला हळूच कोपरा मारला, आणि एक मिश्किल स्माईल दिलं. मिहीर स्वराला काही बोलणार एवढ्यात देवयानी मिहीर ला म्हणाली,” अरे मिहीर घरात तर बोलाव”. तसा मिहीर भानावर आला.
तिघेही हॉल मध्ये बसले. त्या दोघी एकदम निवांत गप्पा मारत होत्या तर मिहीर अजूनही हे काय चाललंय याच विचारात बसला होता.
शेवटी स्वराने मिहिरला सांगितले, “त्यादिवशी पुण्यात, तु मित्रांशी गप्पा मारतांना मला जाणवलं, की तू देवयानीच नाव आलं की तो विषय बाजूला करायला लागला होतास. मग मी दुसरे दिवशी सकाळी देवयानीच्या घरी जाऊन आले.तिच्याशी बोलल्यावर जाणवलं की तिच्यासाठी तू फक्त एक जवळचा मित्रच होतास, आणि आहेस. तुला कदाचित सतत मित्रांनी तिचं नाव घेऊन चिडवल्यामुळे हा भास झाला की तिलाही तू आवडतोस.आणि ऐनवेळी खूपच श्रीमंत स्थळ आल्यामुळे तिनं तुला नाकारलं. याउलट देवयानी मागच्या दोन वर्षांपासून त्या मुलाला डेट करत होती.”
आज जेवणाच्या टेबलावर मिहीर आणि देवयानी मधले सगळे गैरसमज दूर झाले. आणि हे केवळ स्वरामुळे शक्य झाले.
स्वराचं सगळं आवरून झाल्यावर मिहीर स्वराकडे आला. आणि तिच्याशी बोलू लागला, “स्वरा, मी तुला फसवलेलं नाहीये, किंवा तुझी प्र*ता*रणा देखील केली नाहीये”.
स्वराला हे सगळं अपेक्षितच होतं, त्यावर ती शांतपणे म्हणाली, “मिहीर मला हे माहिती आहे, मी तुझ्यावर कोणताही आरोप करत नाहीये”.
त्यावर मिहीर म्हणाला, “अग, मी कधी देवयानीला हक्काने काही सूचना केल्या तर ती खूप चिडून जायची, त्यामुळे मला वाटलं की, मुलींना हक्क दाखवला तर आवडत नसावा, आणि म्हणून मी तुला कधीही कुठल्याही गोष्टींत विरोध केला नाही. कारण मला तुला गमवायचे नव्हते”.
त्यावर स्वरा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, “मिहीर, तिला तो हक्क आवडला नाही, कारण ती तुझी नव्हतीच कधी.”
….आणि पुढे ती काही बोलणार एवढ्यात मिहीरने तिला जवळ ओढले, हक्काने! तिच्या विरोधाची पर्वा न करता!!!आणि तीही त्याच्यात विरून गेली…..
तुम्हाला ही कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका : सौ. सुषमा दडके.वारजे, पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
कथा खूप खूप छान आहे .
पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा💐
सुष छान कथा ♥️