“रोहन, ए रोहन, ऐक ना रे”, कल्पना लडीवाळ पणे बोलत होती.
“ ऐकतोय राणी सरकार, तुमचंच ऐकतोय, बोला”, रोहन मोबाईल बघत बोलला.
“ नेमकं राणी सरकार कोणाला म्हणतोस रे! मला काही कळत नाही, असं वाटतं का तुला! माझ्यापेक्षा तर सतत हा मोबाईल जास्त जवळ असतो तुझ्या”, कल्पना नाराजीच्या सुरात बोलली.
“ अगं काहिही बोलतेस का? हा मोबाईल कसा असेल बरं! माझी राणी तर तूच, माझी कल्पना”, रोहन तिला समजावत होता.
“ हमम, मी फक्त नावाप्रमाणे कल्पनेतच आहे, जाऊदे 2 वर्ष झालेत हेच बघतेय”, कल्पना बोलली.
“ अगं वेडाबाई दोन कुठे आतातर उद्या एक वर्ष होईल फक्त तुझ्या लग्नाला”, रोहन.
“ लग्नाआधी एक वर्ष एकमेकांना डेट केलं ते कुठे गेलं आणि का रे माझ्या लग्नाला? तूझं लग्न नाही का झालं? हो रे”, बेडवरची उशी रोहन ला मारत कल्पना बोलत होती.
“ अगं हो हो चेष्टा करत होतो गं, मारू नकोस लागतंय”, रोहन.
“ लागावं म्हणून च मारतात कळलं का? ते जाऊदे काय प्लॅन आहे उद्याचा?”, कल्पना लाडात येऊन बोलत होती.
“ अम्म, विचार करतोय तुला उंच अश्या ठिकाणी घेऊन जावं, जिथे फक्त आपण दोघ असू आणि सगळं जग खाली असेल, काय म्हणतेस?”, रोहन बोलला.
“ काय ढगात नेतोस की काय मला?”, कल्पना हे बोलताच रोहन तिच्या तोंडावर हात ठेऊन तिला गप्प करतो आणि म्हणतो, “आज बोललीस परत असं कधीच बोलू नकोस, आपण दोघे खूप सुंदर आयुष्य जगू, त्याला प्रेमाने भरून टाकू, सगळीकडे प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमच असलं पाहिजे, आपल्याला बघून प्रेम करणाऱ्यांना सुद्धा आपला हेवा वाटला पाहिजे, माझं खूप प्रेम आहे कल्पना तुझ्यावर, तुझ्या शिवाय आयुष्याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही, मी उंच पर्वता वर नेण्याचा प्लॅन करत होतो आणि तू आपलं भलतच काहीही बोलते, परत असं बोललीस ना तर, तर मी बोलणारच नाही तुझ्याशी, जा”.
कल्पना जोरात हसली आणि म्हणाली, “अरे बापरे! रोहन तू इतका पॅझेसिव आहेस माझ्याबद्दल हे माहिती नव्हतं मला, पण छान वाटलं हं, नाहीतर नेहमी मला असच वाटायचं की तुला माझ्यापेक्षा मोबाईल चं प्रिय आहे”.
“काहिही”, असं म्हणून रोहन पुन्हा मोबाईल बघू लागला.
“ मला सकाळ पासून फार अस्वस्थ वाटतंय रे”, कल्पना म्हणाली
“ रात्री जागरण झालं नं म्हणून होत असेल”, रोहन मिश्किल पणे म्हणाला.
“चावट कुठला, अरे अस्वस्थ म्हणजे असं वेगळंच वाटतंय रे, काहीतरी घडणार होणार असं वाटतंय. असो, तुला काय म्हणा त्याचं, तू आपला आकंठ बूड त्या मोबाईल मध्ये”,असं कल्पनाने म्हणून सुद्धा रोहन चं लक्ष मोबाईल मधेच होतं.
“मी काय तुझ्यासोबत उंच पर्वतावर येणार नाही बा, मागच्या वेळी तू असच नेलं होतंस, तुझी हौस फिटते पण माझे पाय, जिवाच्या आकांताने ओरडून सांगतात, परत जाऊ नकोस बाई तिथे म्हणून. त्यापेक्षा आपण शांत ठिकाणी जाऊ, जिथे शांती असेल निसर्ग असेल, खूप मजा येईल किंवा समुद्रावर जायचं का? काय म्हणतोस!”, कल्पना उत्साहात म्हणाली.
“ समुद्र, इथे, पुण्यात! काहिही तुझं, एक काम करतो, समुद्राला सांगतो, बाबा एक दिवस तुझं प्रस्थान पुण्यात हालव, माझ्या बायकोला तुझ्या किनारी बसायचंय, काय, म्हणू का?”, रोहन जोरात हसत म्हणाला.
“ ए गप रे काहिही ,वायफळ बोलतोस पण असं नाही म्हणत की चल मी तुला मुंबई ला नेतो, अशी किती दूर आहे रे मुंबई!”, कल्पना नाराजीच्या स्वरात म्हणाली.
“ अगं नेलं असतं, पण तुला माहिती ना, बाळू च्या वडिलांची तब्येत नाजूक आहे, त्याचा कधीही फोन येऊ शकतो मला, अश्यावेळेस आपण तिथे जाणं बरोबर आहे का? तूच सांग मला”, असं म्हणून रोहन ने कल्पना ला शांत केलं.
तेवढ्यात फोन ची रिंग वाजते.“हॅलो, काय? अरे, बरं मी निघतोय लगेच, आता बघतो कश्याने जमतं ते, काय? सतीश येतोय बरं झालं, येतो मग त्याच्याचसोबत, अरे बापरे! मग तर त्याला भरपूर उशीर होईल यायला, असूदे, मी बघतो कसं यायचं ते पोहोचतो मी, हा चल बाय”, असं बोलून रोहन ने त्याचा मित्र कल्पक चा फोन कट केला.
कल्पना ला काय घडलंय याची कल्पना आली होती पण धाराशिव ला रोहन ला ट्रॅव्हल्स ने पाठवायची तिची अजिबात इच्छा नव्हती आणि रात्रीची ट्रेन पण उपलब्ध नव्हती. सतीश सोबत तर विषयच नव्हता पाठवायचा. सतीश जरी रोहन चा मित्र असला तरी तो खूप वाईट कार चालवतो हे तिला माहित होतं. ती रोहन ला अडवत होती आणि त्यामुळे त्यांच्या मध्ये किंचित वादावादी सुरु झाली.
“रोहन ऐक माझं ट्रॅव्हल्स ने जाणं रिस्की आहे”, कल्पना जीव तोडून रोहन ला सांगत होती.
“मग काय म्हणणं आहे तुझं, मी जाऊ नको का?”,
“अरे तसं नाही पण पहाटे निघ”,
“अगं सतीश सोबत जातोय, 3 वाजेपर्यंत पोहोचेल. सकाळी उठून लवकर मातीला जावं लागेल अगदी जवळचा मित्र आहे गं माझा तो”,
“मला कळतंय पण ऐक ना, पहाटे निघ हवतर एस टी ने जा, सतीश अजिबात गाडी नीट चालवत नाही आणि ट्रॅव्हल्स ने रात्रीचा प्रवास करू नकोस रे ऐक माझं”,
“ डोन्ट वरी, मी लवकर आटोपून संध्याकाळ पर्यंत येतो मग आपण आपला लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करू पण साध्या पद्धतीने, चालेल ना?”,
रोहन चं बोलणं ऐकून कल्पना ने नुसतीच मान हलवली.
रोहन ने कल्पना ला जवळ घेत तिचा निरोप घेतला आणि सतीश ची वाट नं बघता ट्रॅव्हल्स नेच निघाला.
“आपल्याला एनिवर्सरी सोबत साजरी करायची आहे लक्षात ठेव, काहिही झालं तरी”, कल्पना जोरात आवाज देत म्हणाली.
“हो हो नक्की, काळजी करू नको”,
असं म्हणून रोहन रिक्षात बसला.
पहाटे ट्रॅव्हल्स ने रोहन कल्पक कडे पोहोचला. अंधार होता त्यामुळे दोघांनी सकाळी 7 वाजता बाळू कडे जायचं ठरवलं.
रोहन कल्पक च्या घरी येऊन झोपला आणि 7 वाजता त्याला जाग आली तर त्याच्यासमोर चक्क कल्पना उभी होती.
“ओय, तू कशी आली? कोणासोबत आली? काय सुंदर सरप्राईझ दिलंस तू मला!”, रोहन चमकूनच डोळे चोळत बोलला.
“मी म्हटलं होतं नं, आपण ऍनिव्हर्सरी सोबत साजरी करू म्हणून. बघ आले तुला भेटायला इथेच. तुझं काय तू आला असता नसता आणि ट्रॅव्हल्स ने गेलास तो ही रात्रीचा, मला काही करमेना त्यामुळे मी सतीश च्या गाडीत आले”.
“काय? सतीश सोबत! अरे बापरे! जगातलं आठवं आश्चर्य म्हणायचं, मला तर खूप बोलत होती त्याच्यासोबत जाऊ नकोस म्हणून आणि आता स्वतः बरी आलीस गं”, रोहन कल्पनाला म्हणाला.
“तुला जाऊ दिलं नाही आणि योगायोगाने मी आले त्याच्यासोबत ,बरं जाऊदे, हे घे, माझं गिफ्ट राहिलं असतं म्हणून द्यायला एवढा आटापिटा केला. आपली पहिली ऍनिवर्सरी आहे ती खासच झाली पाहिचे हो नं; हा, पण तुझं गिफ्ट मात्र पेंडिंग आहे हं”, कल्पना हसत म्हणाली.
“आईशप्पथ, तू फक्त गिफ्ट देण्यासाठी इतक्या लांब तेही सतीश सोबत आलीस, मला विश्वासच बसतं नाहीये आणि हो आपली पहिली ऍनिवर्सरी स्पेशल च हवी आणि ती तू केली पण, तुझी सरप्राईज देण्याची सवय काय गेली नाही हं. पण अगं संध्याकाळी मी येणारच होतो नं”, रोहन गिफ्ट बघत म्हणाला.
“परत राहून गेलं असतं रे, काही गोष्टी वेळेतच केलेल्या चांगल्या असतात नाहीतर आयुष्य आपल्याला सरप्राईज देतं. बरं जाऊदे, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन”, असं कल्पना ने म्हणताच ‘हैप्पी एनिवर्सरी डिअर’,असं म्हणून रोहन तिला मिठी मारणार तेवढ्यात कल्पक जोरात ओरडला, “अरे रोहन पटकन ये, अरे हे बघ बातम्यामध्ये काय सांगतायत”.
“अरे, बातम्या नंतर बघतो, तू थांब रे जरा”, असं म्हणून रोहन परत कल्पना ला मिठी मारणार तर तेवढ्यात, कल्पक खूप जोरात किंचाळला, “अरे रोहन ये रे इकडे, हे बघ काय दाखवतायत”.
“याचं की नाही, कबाब में हड्डी, बायकोला मिठी सुद्धा मारु देत नाही, बघतोच याला ,कल्पना चल बघू त्याला काय झालंय तर”,असं म्हणून रोहन हॉल कडे जायला निघाला, तर कल्पना त्याला परत बोलली, “हैप्पी फर्स्ट मॅरेज ऍनिवर्सरी डिअर, लव्ह यू सो मच ”.
रोहन ने वळून कल्पना कडे पाहिलं पण कल्पक एवढा हाका मारत होता की त्याने कल्पनाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि हॉल मध्ये गेला.
“काय झालं रे? आभाळ कोसळल्या सारखं काय ओरडतोस?”, रोहन ने फटकारत च कल्पक ला विचारलं.
“अरे बघना, काय दाखवतायत, हाय वे वर मोठा अ*प*घात झालाय त्यात, त्यात, त्यात आपला सतीश गे*ला रे”, असं म्हणून कल्पक जोरजोरात रडायला लागला.
“ काय? काहिही काय बोलतोस? कसं शक्य आहे हे?”,रोहन आश्चर्याने विचारतो.
“अरे हो, अप*घात एवढा भयंकर होता की त्यात जे द*गा*वले त्यांची खूप वेळ ओळख सुद्धा पटत नव्हती. आता पोलीसांना एक लायसन्स सापडलं ते, आssपल्या सतीश चं होतं रे ”, असं म्हणून कल्पक ढसाढसा रडू लागला.
“ द*गाव*ले म्हणजे, अरे त्याच्या गाडीत तर कल्पना होती, ती इथे आली तर मग हे कसं शक्य आहे?”, रोहन भांबावून बोलत होता.
“काय बोलतोयस तू, तुझं तुला तरी कळतंय का? कुठे आहे दाखव वहिनी”, असं कल्पक ने विचारताच रोहन म्हणाला, “दाखव काय दाखव; ही बघ कल्पना, माझ्या रूम मध्ये”. असं म्हणून रोहन ने रूम कडे बघितलं तर रूम चं दार उघडं होतं पण कल्पना तिथे कुठेच नव्हती.
“कुठे गेली? कल्पना ए कल्पना, आताच तर इथे होती रे, मला विश केलं, हे बघ गिफ्ट पण दिलं, अजूनही खरं वाटत नाही का तुला?”, रोहन सगळीकडे कल्पनाला शोधत फिरत कल्पक ला सांगत होता.
“ भानावर ये रोहन, वहिनी फक्त तुझ्या कल्पनेत होत्या, इथे नाही”, कल्पक रोहन ला समजावत होता.
“ अरे कसं शक्य आहे? ती भेटली मला आता, म्हणजे, ती फक्त मला भेटायला आली होती, ती जे काही बोलत होती त्याचा अर्थ मलाच कळत नव्हता का? कल्पना का आलीस सतीश च्या गाडीत? काळाची पावलं ओळखली होतीस तू आणि म्हणून मला येऊ दिलं नाही.याला योगायोग म्हणू की काय म्हणू? यासाठी अस्वस्थ होतीस तू, अगं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत प्रेमाने आनंदाने घालवायचं होत गं मला. का सोडून गेली? ते ही अशी. काय करू तुझ्याशिवाय आता. तुला उंच न्यायचं होतं मला. तू स्वतःच निघून गेलीस.मित्राचे वडील गे*ले म्हणून आलो पण माझं तर आयुष्य पूर्ण निघून गे*लं. नाही नाही कल्पनाsssssssssss”,जोरात ओरडत रोहन पूर्ण पणे कोसळला.
“अरे रोहन सतीश च्या गाडीत एक जण अजून होता त्याची ओळख नाही रे पटली अजून”, कल्पक टीव्ही कडे बघत बोलत होता.
“ होता नाही होती, पटली तिची ओळख”, असं म्हणून रोहन हतबल पणे खाली बसला, त्याला कसलंच भान उरलं नव्हतं. कल्पक त्याला जोरजोरात हाका मारत होता, काय झालं विचारत होता पण रोहन ला त्याचा आवाज ऐकूच येत नव्हता, त्याला फक्त एकच आवाज त्याच्या कानात ऐकू आला, “ हैप्पी एनिवर्सरी डिअर”, कल्पनाचा तो आवाज उंच उंच आकाशाकडे जात आसमंतात विरून गेला …
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
ऍड. रश्मी कोळगे,पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
manala chataka lwanaari gosht.chaan.
Thank you so much..