मराठी कथा – त्याचा पाठींबा!

WhatsApp Group Join Now

“हा रुसवा सोड सखे…

पुरे हा बहाणा…

सोड ना अबोला…” हृषी हे बोल गुणगुणतच रेवाच्या मागेमागे करत होता. दोन दिवस झाले होते मॅडम त्याच्यावर रुसून बसल्या होत्या. या गाण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. एरवी त्याने एक ओळ जरी गाणं म्हटलं तरी ती खुदकन हसत होती.

“रेवा…”आता तिला समजवण्याचे पेशन्स संपले. त्याने तिला स्वतःकडे वळवले. तिच्या हाताला धरून त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला.ती त्याच्या हाताची पकड सोडवू पाहत होती. पण त्याने घट्ट पकडून ठेवले होते. 

“काय सुरू आहे तुझं? हा कसला राग म्हणायचा तुझा?” त्याने काहीसं चिडूनच विचारले. त्याचा आवाज नकळत वाढू लागला होता. ती काहीच न बोलता मुसमुसत होती. त्याने तिला मिठीत घेतले. ती त्याच्या मिठीत अश्रूंना वाट करून देऊ लागली.

“अजून अबोला धरणार आहेस?” त्याने तिच्यावर नजर रोखून विचारले.

“हो!”

“खूप झालं हे…” तो चिडलाच. ती त्याच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली.

“मी तुला जॉब सोड म्हटलं म्हणून इतकी का रागावत आहेस? मी तुझ्या काळजीने म्हणालो ना राणी… सकाळी पाच वाजता उठून सगळं आवरून दोघांचे डबे करून तासभर प्रवास करून तू जातेस. लग्नाआधी तू जॉब करत होती. पण बाकीच्या जबाबदाऱ्या नव्हत्या ना तुझ्यावर!

आता तुझ्यावर जबाबदारी आहे. मी तुला मदत केलेली घरी कुणाला पटत नाही. मला तुझी काळजी आहे. मी त्यांच्या नकळत तुला मदत करतो. तुला सोपी, साधी मदतही करता येत नाही. घर तुझ्या प्रायोरिटीमध्ये पहिले आहे. ऑफिसमधून दमून आल्यावरही तुला काम करावे लागते. शिवाय ऑफिसचे पेंडिंग काम असलं तर ते ही रात्री असते.अशाने तुझी तब्येत बिघडली आहे. स्पष्ट दिसत आहे राणी, तुला ही ओढाताण सहन होत नाहीये.”

“पण मला करायचा आहे ना जॉब… मी एकुलती एक मुलगी आहे. आईबाबांना मदत करणे ही जबाबदारी आहे माझी. बाबांची पेन्शन खूप कमी आहे रे… त्यांचा थोडा भार हलका करायचा आहे.”

“सगळं मान्य आहे. माझा त्याला कधीच विरोध नव्हता आणि नसणार आहे. तू एक दोन-तीन महिने ब्रेक घे. त्यावेळी मी हातभार लावतो.”

“घरी नाही चालणार हे सगळं…तू समजून का घेत नाहीस?” ती हतबल झाली होती.

“शांत! एकदम शांत! अजून विचार कर…”

“माझा निर्णय झाला आहे. मी जॉब कँटीन्यू करणार आहे.” ती ठामपणे म्हणाली.

“तुला जे करायचे आहे ते तू कर! पण जर तुला त्रास झाला तर मात्र तू जॉब सोडणार.” तो ही चिडून म्हणाला.

रेवा काहीही न बोलता तिची कामं उरकत होती. दोघांमध्ये परत अबोला सुरू झाला होता.दोघेही माघार घेत नव्हते.

असेच आठ दिवस झाले. रेवाने तिच्या आईबाबांचे मंथली चेकअप केले.त्यावेळी हृषीसुद्धा सोबत होता. तो अगदी मनापासून त्यांचे करत होता. रेवाने कधी हृषीच्या आईबाबांमध्ये आणि तिच्या आईबाबांमध्ये फरक केला नाही. तसेच हृषीनेही दोन्ही आईबाबांमध्ये फरक केला नाही. जावई म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून तो कायम त्याचे कर्तव्य पूर्ण करत होता. 

चेकअप पूर्ण झाल्यावर तिने त्यांना बागेत घेऊन गेली. त्यांच्यासोबत वेळ घालवला. चेकअपचे बिल तिने बाबांच्या नकळत भरले. शिवाय त्यांना खर्च कमीच सांगितला. घरी जाऊन किराणा सामान आणायची यादी करून ते ऑनलाइन मागवून घेतले.लाईटबिल ती फोनवरून भरतच होती. त्यांच्या फोनचा रिचार्ज आधीच केलेला असायचा. आज तो शांतपणे ती कायकाय करते ते बघत होता.

हृषी हे सगळं करत होता. तो नोकरीला लागल्यापासून आईकडे एक ठराविक रक्कम देत असायचा. ज्यातून आई तिचा, किराणा, दूध असे सगळे खर्च भागवत होती.एक मुलगा म्हणून तो ज्या गोष्टी करत होता त्याच सगळ्या गोष्टी रेवा करत होती. निम्म्याहून अधिक खर्च ती भागवत होती. शिवाय इन्शुरन्स काढले होते. हे सगळे करून उरलेले पैसे ती हृषीकडे देत होती. तिला लागणारी रक्कम ती ठेवत होती.

त्याचदिवशी रात्री ऋषीने अबोला दूर करायचा ठरवलं.

“रेवा…” त्याने तिला आपल्या मांडीवर बसवलं.

“तू तुझा जॉब कँटीन्यू कर. इथून पुढे मी कधीच तुला जॉब सोड म्हणून सांगणार नाही.” त्याने तिच्या डोळ्यांत बघून सांगितलं.

“तू मनापासून बोलत आहेस ना?”

“हो गं राणी… मला तुझं म्हणणं पटलं आहे. एक मुलगी म्हणून तू जो विचार करत आहेस त्यामुळे मला तुझा अभिमान वाटत आहे.” त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवून सांगितले. ती त्याला बिलगली. हे दोन शब्द जरी असले तरी तिला सगळं करायची एनर्जी देत होते. आपण घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयात आपल्या नवऱ्याची आपल्याला साथ आहे, भक्कम पाठींबा आहे. जर त्याची साथ नसली तर ती प्रयत्न करून पुढे गेली जरी असती तरी तिच्या मनात एक रुखरुख  कायम राहिलीच असती. 

दुसऱ्या दिवशीपासून हृषी त्याने ठरवल आहे तसं तो वागू लागला. रेवाला तो घरच्या कामात मदत करू लागला. 

“तू कशाला काम करत आहेस? इतक्या दिवसात कधी पाणीही स्वत:च्या हाताने घेतलं नव्हतं, तुझ्या बाबांनी कधीही चहाचा रिकामा कप किचनमध्ये नेवून ठेवला नाही. आणि तू भांडी विसळत आहेस? काय गरज आहे तुला हे करायची?” आई भडकली होती. 

“आज मावशी येणार नाही म्हणून मी घासून ठेवत आहे.” त्यानेही शांतपणे उत्तर दिले.

“तुझी बायको आहे ना ती करेल हे सगळं? काय दिवस आले आहेत. बायको घरात असताना नवरा भांडी घासत आहे. ती काय करत आहे? रेवा???” 

“ती आताच तिचे आवरायला गेली आहे. नाश्ता, जेवण करून कपडे मशीनमध्ये घालून ती तयार होते आहे. आज तिची लवकर मिटिंग आहे.” हृषी

“चांगलं आहे. घरी काम करायला नको म्हणून मिटिंग आहे सांगून लवकर चालली. काय गरज आहे तिला जॉब करायची? तू व्यवस्थित कमावतो आहेस, तुझ्या बाबांना पेन्शन मिळते. शिवाय रेंट मिळते ते वेगळेच. घर बघावं लागणार म्हणून जॉब… कोणतीही जबाबदारी घ्यायला नको.”

“आई तू शांत होशील? तिने जॉब करायचा की नाही हा सर्वस्वी निर्णय तिचाच राहिल. तू त्यावरून तिला काहीही  म्हणणार नाहीस. ती तिच्या कर्तव्यात कुठे चुकत नाहीये. नोकरी आणि संसार ती व्यवस्थित बघते. कधी कमीजास्त झालं तर मी आहे. मी मला करता येणार आहे तितकी मदत तिला करणार. मग कुणाला पटले नाही तरी चालेल.” त्याने निक्षून सांगितले. आई त्याच्या या पवित्र्यावर अचंबित झाली. 

हे सगळे बोलणे तिच्या कानावर पडत होते. तिला हृषीचा अभिमान वाटत होता. त्याने न बोलता तिला खूप साथ दिली. तिची परिस्थिती समजावून घेतली. या गोष्टी तिने कधीच त्याच्या कानावर घातल्या नव्हत्या. जॉब सोडण्याचा विषय झाला तेव्हा मात्र तिने ठामपणे ‘मी माझ्या आईबाबांसाठी जॉब करणार आहे हे’ असं सांगितले होते. हृषीने या तिच्या बोलण्यावर आक्षेप घेतला नाही. तिला काय म्हणायचे आहे ते समजून घेतले. ती आरशात स्वत:ला एकदा बघून ऑफिस साठी निघाली. 

“रेवा…. डबा ने.” ती विसरली होती. हृषीनेच तिला आठवण करून दिली. ती घरात आली. डबा भरून घेतला. देवाला नमस्कार करून तिने आईबाबांना नमस्कार केला. हृषीने डोळ्याने बेस्टलक दिले. ती सगळ्यांचा निरोप घेवून प्रसन्न चेहऱ्याने निघाली. 

आई अजून नाराज होती. तिला हे पटत नव्हते. हृषीला तिने समजवायचा प्रयत्न केला होता. पण हृषी अगदी ठाम होता. तो आपले काही ऐकणार नाही हे आई समजून गेली. बाबांनी जे सुरु आहे त्याला विरोध केला नाही ना पाठींबा दिला. रेवाने त्यांच्यात दुरावा, अबोला होता तेव्हा तिचे रेझीगनेशन दिले होते. ते अजून अप्रुव्ह झाले नव्हते. सगळ्यात आधी तिने ते रेझिग्नेशन मागे घेतले. तिला माहित होते हृषी कधीच तिला तिच्या मनाविरुद्ध निर्णय घेवू देणार नाही. त्याच्या समाधानासाठी तिने रेझिगनेषन दिले होते. पंधरा दिवसांनी ते अप्रूव्ह होणार होते. त्याच्या आतच तिने मागे घेतले.

तिचे ऑफिस व्यवस्थित सुरू होते. त्या घटनेला महिना होऊन गेला होता. आज कंपनीमध्ये मिटिंगमध्ये काहीतरी अनाऊन्स करणार होते. म्हणून लवकर बोलावले होते. आजच्या मिटिंगमध्ये प्रमोशन मिळाले होते. ती समाधानी होती. हृषीला जेव्हा समजले त्याने लवकर येवून सेलिब्रेशन प्लान केले. घरातल्या सगळ्यांनी मिळून आजचा तिचा आनंद साजरा केला. प्रमोशन मिळाल्यावर तिला झालेला आनंद बघून सगळ्यांना बरे वाटले. कारण जॉब सोडण्याचा विषय झाला त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असणारी उदासी सगळ्यांना जाणवली होती. तिच्या मनात काहीतरी सुरु आहे हे जाणवले होते. तिची शांतता घरात पसरली होती. ती उत्साही होती. तिच्या बोलण्याने, हसण्याने घर खुलून गेले होते. त्यामुळे त्यांना हे जाणवून येत होते. 

“मला पाठींबा दिला म्हणून मी आज हे अचिव्ह करू शकले.”

“आभार कसले मानते? ते माझे कर्तव्य आहे. आपण ना तुझ्यासाठी स्कुटी घेवूया. तुला आवडते ना चालवायला? म्हणजे तुझा वेळ वाचेल. खुश?”

“खूप खूप खुश…..” ती त्याच्या मिठीत शिरते. दोघेही स्वप्ने रंगवत होते. आज त्याला सुधा मूर्ती यांनी सांगितलेले वाक्य आठवत होते. ‘प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक खंबीर पुरुष असतो. त्याच्या पाठींब्याशिवाय स्त्री पुढे जात नाही. मग तो पुरुष वडील असो किंवा नवरा.’

समाधानाने झोपलेल्या रेवाकडे बघत तो झोपी गेला. 

समाप्त!

तुम्हाला ही कथा Marathi Love story कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

1 thought on “मराठी कथा – त्याचा पाठींबा!”

  1. वृषाली केळकर वाळके

    खरंच आहे…. त्याचा पाठिंबा असणं खूप गरजेच आहे…. कथेतून वेगळा विषय मिळाला…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top