Marathi Story for reading- एक अनोखे लग्न

WhatsApp Group Join Now

एक अनोखे लग्न

” आई, बाबा ! मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे.” कावेरी तिच्या आईवडिलांना म्हणाली. 

                कावेरी काय सांगणार आहे याची कल्पना तिच्या आईबाबांना होतीच कारण आजकाल कावेरी कुठल्यातरी मुलामध्ये गुंतली असावी असे त्यांना प्रकर्षाने जाणवत होते. कावेरी जोपर्यंत स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत ते तिला काही विचारणार नव्हते.

                  ” हं ! बोल बेटा, तुला काय बोलायचे आहे ते एकदम मनमोकळेपणाने बोल.” कावेरीचे बाबा म्हणाले. 

                   ” आईबाबा, मला एक मुलगा खूप आवडतो. त्याचे नाव रुपेश मिश्रा आहे. तो डिग्रीला माझ्या कॉलेजमध्ये होता आणि माझ्या स्विमिंग क्लास मध्ये देखील. तो तर पट्टीचा पोहणारा आहे. त्याला त्या क्षेत्रात स्कोप मिळाला नाही म्हणून आता तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय बघतो. आम्हाला दोघांना लग्न करायचे आहे त्यासाठी तुमची संमती हवी आहे.” कावेरी म्हणाली. 

                   ” अग पण काऊ, तो मुलगा आपल्यातील नाही आणि त्याच्या घरी चालणार आहे का इतर जातीची मुलगी ? मी असे ऐकून आहे की, ते लोक एकतर खूप कर्मठ असतात. त्यांच्या घरी तुला खूप जुळवून घ्यावे लागेल.” कावेरीची आई काळजीने म्हणाली. 

                  ” तुझी आई म्हणते ते काही चुकीचं नाही. तो मुलगा कसा आहे ? त्याचं घर, त्याच्या घरातले लोक कसे आहेत ? पहिल्यांदा सगळं आम्हाला पाहायला तर लागेल.” कावेरीचे बाबा बोलले.

marathi-motivational-story
कथा – एक अनोखे लग्न

                   ” हो ! म्हणून तर मी ही गोष्ट तुमच्या कानावर घातली. आईबाबा मी खूप डोळसपणे रुपेशला निवडले आहे. गेली पाच वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतो; पण मी त्याला हल्लीच होकार दिला. त्या पाच वर्षात मी त्याचा स्वभाव, त्याची मते, त्याच्या घरातल्यांची मते व्यवस्थित जाणून घेतली. तो सुंदर आणि श्रीमंत आहे त्यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे हे पाहिलं. तुम्हाला तो भेटायला आज संध्याकाळी येणार आहे तेव्हा तुम्हीच पहा तुमच्या होणाऱ्या जावयाची निवड लेकीने चांगली केली आहे की नाही ते.” कावेरी म्हणाली.

                  ” इतकं पारखून घेतलं आहेस त्याला तर तो नक्कीच छान असेल.” कावेरीचे बाबा म्हणाले. 

                   ” चला, मी निघते ऑफिसला जायला. संध्याकाळी आम्ही दोघे बरोबरच येऊ.” असे म्हणत खांद्यावर पर्स अडकवून कावेरी घराबाहेर पडली देखील.

                  कावेरी घराबाहेर पडल्यावर तिच्या आईने बडबड सुरू केली, ” हद्द झाली ह्या मुलीची. वाटलं होतं मुलगा आपल्यातला तरी निवडला असेल; पण एकदमच जातीबाहेरचा निवडला आहे. कसं काय होईल पुढे हिचं ? किती ऍडजस्टमेंट करावी लागेल ? तुम्ही इतके शांत कसे हो ?” 

                ” हे बघ ! संध्याकाळी तो मुलगा येणार आहे ना आपल्याला भेटायला तेव्हा समजेल ना कसा आहे तो. आता लेकीने तावून सुलाखून पारखला आहे म्हणजे नक्कीचं चांगला असेल. चला तर सासूबाई ! संध्याकाळी जावई येणार आहे तर काहीतरी तुमची मस्त स्पेशल डिश बनवा.”

                   ” हो बाई.” असं म्हणत कावेरीची आई म्हणजेचं मधुरा खुर्चीवरून किचनमध्ये जाण्यासाठी उठली.

                   समीर आणि मधुराची कावेरी एकुलती एक लाडावलेली मुलगी. आईवडिलांच्या गळ्यातील ताईत जणू. कावेरी म्हणेल ती त्यांच्या घरात पूर्व दिशा. कावेरी लहानपणापासून अतिशय हुशार होती. अभ्यासाखेरीज कथ्थक डान्स, स्विमिंग ह्यात ती पारंगत होती. कावेरी उच्चशिक्षण घेऊन आता मोठया पदावर एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती. तसंही आईबाबांना तिच्या लग्नाचे वेध आता लागलेच होते. आता कावेरीने कुठला मुलगा पसंत केला आहे याची उत्सुकता दोघांना लागली होती.

                 संध्याकाळी कावेरी आणि रुपेश एकत्रच घरी आले. सहा फूट उंचीचा, भारदस्त, रुबाबदार, देखणा रुपेश कावेरीच्या आईबाबांना लगेचंच पसंत पडला. रुपेशचे बोलणे देखील अतिशय नम्र असल्याने समीर आणि मधुरावर त्याची लगेच छाप पडली. मधुराने बटाटावडे आणि गोड शिरा केला होता. अत्यंत आवडीने, कावेरीच्या आईची स्तुती करत रुपेशने खाण्याचा आस्वाद घेतला त्यामुळे अजूनच जास्त मधुराला तो आवडला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुपेश उत्तम मराठी बोलत होता. निघताना रुपेशने येणाऱ्या रविवारी कावेरीच्या आईबाबांना त्याच्या घरी त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी बोलावले.

                  रविवारी दोन्ही घरातील लोकं भेटल्यावर रुपेशचे घर आणि त्याचे आईवडील देखील कावेरीच्या आईबाबांना आवडले. रुपेशचे आईवडील देखील उत्तम मराठी बोलत होते. मोठ्या माणसांनी मिळून रुपेश आणि कावेरीच्या लग्नासंबंधी बोलणी केली. रुपेश आणि कावेरीने आपल्या आईवडिलांसमोर त्यांचे लग्न कशाप्रकारे आणि कुठे करायचे याचे आपले मत मांडले. दोघांच्या आईवडिलांनी त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला.

                  कावेरी आणि रुपेशच्या लग्नाची तयारी दोन्ही बाजूंनी सुरू झाली. कावेरी आणि रुपेशला लग्नातील अवास्तव खर्च मान्य नसल्याने उगीचच संगीत, हळद, मेहंदी यावरील खर्चाचा मोह त्यांनी टाळला.लग्नाची तारीख आली आणि ठरल्याप्रमाणे दोघांच्या घरातील नातेवाईक आणि मित्रमंडळी धरून केवळ पन्नास आमंत्रित लोकांना घेऊन एका फार्महाऊसवर लग्नाचे वऱ्हाड गेले. 

               फार्महाऊसवर गेल्यावर सर्वांचा चहा, नाश्ता झाल्यावर कपडे बदलायला म्हणून कावेरी आणि रुपेश गेले आणि स्विमिंगचे कपडे घालून फार्महाऊसमधील स्विमिंग टँकमध्ये ते दोघे उतरले. तिथे जमलेल्या लोकांना एक क्षण काहीच समजले नाही की, नक्की हा काय प्रकार आहे ? त्यांच्या डोळ्यांपुढे असे चित्र होते की, आता नवरा – नवरी छान तयार होऊन येतील, नवरी छान शालू आणि दागिने घालून येईल, लग्नाचे विधी सुरू होतील; पण त्यांच्या कल्पनेला तडा गेला होता कारण अशा प्रकारच्या लग्नाची कोणतीही पूर्वकल्पना कुठल्याही नातेवाईकांना दिली गेली नव्हती. 

               कावेरी आणि रुपेशने स्विमिंग टॅंकमध्ये उडी मारली आणि फ्री स्टाईल स्ट्रोक, बटरफ्लाय स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बेस्टस्ट्रोक, साईडस्ट्रोक असे विविध प्रकारचे स्विमिंगस्ट्रोक केले. त्यानंतर स्विमिंग पुलाच्या काठाशी येऊन दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले.

               असे अजब लग्न पाहून दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये कुजबुज सुरू झाली, ” हे असलं कसलं पाण्यातल्या बेडकाप्रमाणे लग्न ? काय मेलं फॅड आलं आहे ? मनात येईल तिथे, मनाला वाटेल तसे लग्न होऊ लागले आहे. कोणी बोटीत लग्न करतं, तर कोणी रेल्वेत करतं, तर एखादे गिर्यारोहक प्रेमी ट्रेकिंग करत करत लग्न करतं, तर कोणी कितीतरी किलोमीटर धावत येऊन आहे त्या ऍथलिटच्या कपड्यांवरच लग्न करतं. काही एक अर्थ राहिला नाही. अजून पुढे काय काय पाहावे लागणार माहीत नाही.”

             नातेवाईक मंडळी कुजबुजत होते; पण कावेरी आणि रुपेशची मित्रमंडळी त्यांच्या लग्नाचा आनंद लुटत होती. कावेरी आणि रुपेशने वॉश घेतला आणि आता मात्र त्या दोघांनी लग्नाचे कपडे परिधान करून लग्नाचे मोजकेचं विधी केले. लग्नाच्या जेवणात भरमसाट प्रकार न ठेवता मोजकेचं पदार्थ ठेवले होते जेणेकरून अन्नाचा नासाडा होणार नाही. साधेसे जेवण पाहून कावेरीच्या मावशीच्या मिस्टरांनी कावेरीच्या बाबांना खोचकपणे विचारलं की, ” समीरभाऊजी मला वाटलं जेवणामध्ये मच्छीचे प्रकार असतील कारण थीम पाण्यातल्या लग्नाची होती ना ?” मेहुण्यांच्या ह्या प्रश्नावर कावेरीचे बाबा केवळ मंद हसले.

              वऱ्हाडी मंडळींची जेवणं झाल्यावर रुपेशने माईकचा ताबा घेतला आणि तो बोलू लागला, ” आम्ही दोघांनी असं लग्न का केलं हा तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेलच. आम्हाला माहीत आहे की, आम्ही केलेल्या या अनोख्या लग्नाविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न, कुतूहल, राग असेल. काही जणांनी आम्हाला भरपूर नावे देखील ठेवली असतील. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की, आम्ही अशा प्रकारचे लग्न समाजातील सर्व स्तरातील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केले. आपल्या भारत देशात एकमेव क्रिकेट या खेळाला अत्यंत मान आहे. क्रिकेट या खेळासाठी ज्या सुविधा दिल्या जातात, पुरस्कार दिले जातात, जो मानमरातब खेळाडूंना मिळतो तितका मान, सुविधा, पुरस्कार इतर खेळांना किंवा खेळाडूंना मिळत नाही. क्रिकेट या खेळाव्यतिरिक्त अनेक खेळ आहेत, त्यातील पारंगत खेळाडू आहेत अशा मुलांचे करियर फारच क्षणभंगुर असते. आज मला देखील या क्षेत्रात स्कोप मिळाला नाही त्यामुळे मी जे करियर मनात योजले होते ते माझे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही त्यासाठी आम्ही असे आमचे लग्न केले.”

                आता माईकचा ताबा कावेरीने घेतला आणि ती बोलू लागली, ” आम्ही मुद्दामहून लग्नातील अवाढव्य खर्चाला आळा घातला. तो पैसा आम्ही आमच्या स्विमिंग अकॅडमीला देणार आहोत. ज्यामुळे जे खरंच होतकरू खेळाडू आहेत ते वंचित राहू नयेत. त्यांना त्यांचे करियर प्रस्थापित करण्यासाठी प्राधान्य मिळावे अशी आमच्या दोघांची मनोमन इच्छा आहे. आमच्या दोघांच्या आईवडिलांना आम्ही आमची कल्पना सांगितली आणि आमच्या पालकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्या कल्पनेला मंजुरी दिली ह्याबद्दल मी आमच्या दोघांच्या पालकांचे खरोखरच मनापासून आभार मानते.”

               मघापासून जे लोकं कावेरी आणि रुपेशला नावे ठेवत होते त्यांचे चेहरे आता बघण्यासारखे झाले होते तरीही त्या दोघांच्या सामाजिक उपक्रमासाठी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांनी दोघांसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. 

              कावेरी आणि रुपेशच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांसाठी समाधानाचे हास्य झळकत होते.

समाप्त

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

25 thoughts on “Marathi Story for reading- एक अनोखे लग्न”

  1. नवीन विचाराची कथा. समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहेच.

  2. Anupama potphode

    एकदम वेगळी आहे कथा.. एक संदेश पण दिला गेलाय हे समजले.. छान लिहिलेस

  3. रश्मी कोळगे

    अतिशय सुटसुटीत आणि जगावेगळी लग्नाची कहाणी सुफळ संपूर्ण 👌👌

  4. अरुण समेळ

    अगदी अलिकडेच लेखकांच्या पंगतीत जाऊन बसलेल्या या लेखिकेची, सौ. नेहा उजाळे यांची ही कथा वाचुन मनाला फारच आनंद झाला. कथेचा विषय अगदी आतांच्या समाजांतील परिस्थितीप्रमाणे प्रमाणे आहे. हल्ली मुले, मुली आपले विवाह स्वतःच ठरवितात व कांहीजण भाग्यवान ठरतात, तर कांहीजण दुर्दैवाने अपयशी ठरतात. येथे दोघांनीही इतके योग्य कारण दिल्याचे व आई वडीलांना विरोध करण्यास वाव न दिल्याचे व विवाहसोहळा एका आगळ्या वेगळ्या प्रकारे संपन्न केल्याचे लेखिकेने दाखवून आपल्या कल्पना शक्तीची एक उत्कृष्ट भरारी दाखविली आहे. कथेंतील सहज, सोपी भाषा, आई वडीलांच्या व समाजांतील इतर घटकांच्या अपेक्षा व एकंदरीत विषयाची अगदी योग्य प्रकारे हाताळणी लेखिकेने केली आहे.
    माझ्याकडून लेखिकेला खुप खुप शुभेच्छा!

    1. आपले मनःपूर्वक आभार काका, मी कायम आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत असते कारण तुम्ही प्रत्येकवेळी अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रोत्साहनपर प्रतिक्रिया पाहून माझ्या लिखाणाचे चीज झाले असे वाटते.

    2. आपले मनःपूर्वक आभार काका, मी तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत असते. आपण माझ्या कथा वाचून कायम प्रत्येकवेळी सुंदर प्रतिक्रिया देत असता. अशा प्रतिक्रियेमुळे लिखाणाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्या लिखाणाचे चीज झाले असे वाटते. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार 😊🙏

  5. विषयाची अतिशय सहज सुंदर मांडणी, नाविन्य पूर्ण समाज उपयोगी कल्पना👌👏 उत्तम संदेश दिला

  6. सुंदर कथा. दोघांमधील समान आवड सोबत घेऊन तिच्या साक्षीने विवाह ही कल्पना छान आहे. आपली मतं, आवड जपत जगताना नव्या पिढीने आधीच्या पिढीला सोबत घेणे, पालकांसह इतर ज्येष्ठांना योग्य मान देणे हे यापुढे आनंदी जगण्याचे सूत्र लेखिकेने नकळत दिलेले दिसते. तसेच आधीच्या पिढीनेही नव्या पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे. हे सर्व सूचित करणारी ही कथा वाचताना एक आठवले…
    एका संस्कृत कवीने म्हटले आहे,
    पुराणमित्येव न साधु सर्वं… सन्त: परीक्ष्यान्यतरत् भजन्ते….|| म्हणजेच जुने तेच सोने आणि नवे सगळेच निंद्य असे नव्हे. शहाणा माणूस स्वबुद्धीने परीक्षा करूनच योग्यायोग्याची निवड करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top