सफाईदार वळण घेत मी रोजच्याच रस्त्याने घरी निघालो आहे. हा माझा अगदी आवडता दिनक्रम होता. एका छोट्याशा टेकडीवर आम्ही राहतो. आमच्या गावापासून ११ किलोमीटर अंतरावर तालुक्याचं गाव. अनेक गोष्टींसाठी आम्हाला या तालुक्याच्या गावावरच अवलंबून राहावं लागतं. माझी नोकरी सुद्धा याच गावी आहे. शाळेसाठी सुध्दा याच गावी जायचो. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी हा 11 किलोमीटरचा प्रवास मी करतो आणि हा वेळ माझ्या दिवसातला सगळ्यात सुंदर वेळ असतो. माझी सेकंड हॅन्ड गाडी आणि त्यात अर्जितची प्ले लिस्ट ” तू है तो मुझे फिर और क्या चाहिएssss? ” ,तू है तो मुझे फिर और क्या चाहिए? निसर्गालाच मी हा प्रश्न विचारत असतो. हा निसर्ग ही खळखळून हसतो या प्रश्नावर. चिक्काsssर गप्पा होतात आमच्या. माझ्या आणि भोवतालच्या हिरव्यागर्द निसर्गाच्या ! अकरा किलोमीटर पैकी पाच किलोमीटर हा घाट रस्ता आहे आणि या घाटात एका बाजूला काळाकभिन्न दगड तर दुसऱ्या बाजूला खोलवर दरी या दरीवर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे.सुदैवानं ही जागा अजून टुरिस्ट स्पॉट झालेली नाही. त्यामुळे हा निसर्ग अस्पर्श आहे. ताजातवाना आहे. बारा महिने ही दरी हिरवीगार असते वेगवेगळ्या ऋतुत वेगवेगळी फुलं फुलतात. हा अलवार बदल अनुभवणं शब्दात मांडताच येत नाही.महसूस करनेवाली चीज है भाई!
मी बाबा आणि माझा छोटा भाऊ उमेश रोज हा प्रवास करायचो. लहानपणी तिघे सायकल घेऊन जायचो. आता उमेश दूर शहरात असतो. मला मात्र इथंच करमतं. टेकडीवरची एक छोटीशी जागा मला खूप आवडली आणि तिथेच घर बांधायचं मी ठरवलं. त्या घरासाठी मला नव्या कोऱ्या कारचं स्वप्न मात्र बाजूला ठेवावं लागलं. चलता है ! माझी ही सेकंड हॅन्ड कार ही मस्तच चालते मला खूप छान साथ देते. थोड्या दिवसात नवीन गाडी घेणार आहेच. तेंव्हा ही मी अशीच निवांत गाडी चालवणार. मला खात्री आहे या नवीन वर्षात नवीन गाडीचं स्वप्न पूर्ण होणारच. या सगळ्यात श्वैताची साथ ही मोलाची आहे. श्वेता माझी बायको, ती ही याच परिसरातील आहे. तिलाही निसर्ग, शांतता आवडते. तिचे कष्ट ,तिची बचत आणि नियोजन यामुळेच तर सगळं उत्तम सुरु आहे. आणि आमची छोटीशी परी रमणी ! दोन वर्षांची माझी मुलगी माझा जीव की प्राण आहे.

तर सांगत काय होतो, की निसर्गाच्या सानिध्यातला हा छोटासा रोजचा प्रवास मला फार आवडतो. आताही मी माझं शहरातलं काम आवरून माझ्या निसर्गातल्या घरात, निसर्गातल्याच वाटेनंचं परत निघालो आहे. आज जरा लवकर बाहेर पडलो. आईची औषधं घेऊन तिला द्यायची होती आणि थोडंफार सामान ही तिला द्यायचं होतं. तालुक्याच्या गावावरून माझ्या घरापर्यंत येताना दोन किलोमीटर आधी माझी आई राहते. मी नवीन घर बांधल्यानंतर आईला नवीन घरात येण्याचा खूप आग्रह केला. पण ती नाहीच म्हणते. “माझा सगळा जन्म इथेच गेला, मला काही तिथे करामायचं नाही मी आपली इथेच बरी. माझ्या मैत्रिणी, माझी झाडं माझा निसर्ग, सगळं इथेच. हे सगळं सोडून मी काही येणार नाही. अगदीच हात पाय हलेनासे झाले तर येईन बापडी तुझ्याकडे !” हा आईचा युक्तिवाद! मीही आग्रह करायचा सोडून दिला. श्वेताचं आणि माझ्या आईचा उत्तम पटत. तिलाही वाटतं की आईनं तिचं स्वातंत्र्य उपभोगावं. आईला काही हवं असेल, बरं नसेल तर तत्परतेनं श्वेता आईकडे येऊन तिला मदत करते. गेले दोन दिवस श्वेताच्या आईला खूप ताप होता त्यामुळे ती माहेरी गेली होती. त्यामुळे माझ्या आईची औषधं आणि सामान आणण्याची जबाबदारी माझ्यावर पडली होती. नेहमी या गोष्टी श्वेता जबाबदारीने करते.
श्वेता माहेरी गेली आहे हे आईला माहिती असल्यामुळे तिने गरमागरम आंबोळी केली होती. रोजचा संध्याकाळचा चहा माझा आईबरोबरच होतो. मग घरी पोचून रमणीबरोबर दंगा धुडगूस! आज रमणी पण घरी नाही,तर आज रहा इथेच असा आईचा आग्रह. तिला कुणीतरी दरड कोसळणे सुरू आहे असं सांगितलं होतं. इथल्या निसर्गाचाच तो एक भाग. खऱ तर असे प्रकार पावसाळ्यात जास्त होतात. आता जानेवारीत कुठल्या दरडी कोसळायला? क्वचित कधीतरी असं घडतं. दरडी कोसळतात अर्थात घाटभागात यांचं प्रमाण जास्त आहे. घाट एरिया सोडून मी पुढे आलो आहे. आईच्या घरापासून पुढे आता दोन किलोमीटरचा साधा रस्ता, त्यामुळे काळजीचं कारण नाही. आईला समजावून मी घरी निघालो.
आईची काळजी मी समजू शकतो. कारण खरंच दरडी कोसळतात तेंव्हा मोठमोठे दगड रस्त्यावर वेगाने येऊन पडतात. त्यांचा स्पीड आणि वजन बघता माणसाची काही खैर नसायची.आम्ही याच निसर्गाच्या कुशीत वाढलो त्यामुळे निसर्ग कायम आमच्या पाठीशी उभा असतोच. या रस्त्यावरून जाणारे प्रवाशी मात्र निसर्गाच्या ताकदीला कमी लेखतात आणि बळी जातात. गावकऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घाटात जीव गमवावा लागला आहे. असे अप*
घात बरेचदा पावसाळ्यात होतात. “अहाहा ! काय गातोय अर्जित !”
“इन वादियों में टकरा चुके हैंsss
हमसे मुसाफ़िर यूँ तो कईsss
दिल ना लगाया हमने किसी से
किस्से सुने हैं यूँ तो कईsss
अर्जित असा तुफान गातोय “अरे एss !” या समोरून येणाऱ्या प्रवाशाला सांगायला हवं. तुम्हीच बघा मी गाडी बाजूला घेऊन याला जीव तोडून सांगतोय, पुढं जाऊ नको,दरड कोसळण्याची शक्यता आहे तर तो पठ्ठा माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करून मोबाईल मध्ये तोंड खुपसून निघून जातोय. “इतका सुंदर निसर्ग भवताली असताना तुम्ही मोबाईल कसे बघू शकता यार?” मरु दे त्याला ,आपलं ऐकणारच नसेल तर करणार काय ?
बघा आपला विषय पुन्हा भरकटला. तुम्हांला म्हणून सांगतो आईची काळजी दरड कोसळणे इतकीच नाही, मला पक्कं माहिती आहे. याच दोन किलोमीटरच्या पट्ट्यात माझे आजोबा एका विशिष्ट स्पॉट वर अचानक आलेला दगड अंगावर कोसळून मृ*त्यू मुखी पडले होते. काही वर्षांनी त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने माझ्या वडिलांचा मृ*त्यू झाला होता.खरं तर या पट्ट्यात दगड कोसळणं अशक्य असतं. पण कुठून कोण जाणे दगड आले आणि माझ्या आजोबांचा आणि वडिलांचा प्राण घेऊन गेले.पण म्हणून काही माझ्या जीवाला धोका आहे असं होतं नाही. आईला कितीही समजावलं तरी ती काळजी करणं काही सोडणार नाही. असो.
तुमच्याशी बोलता बोलता मी घरी पण पोचलो. पण श्वेता आणि रमणी घरी नाहीत म्हणून मी अंगणातच जरा निवांत बसतो.मला मोबाईलच वेड नाही,टीव्ही पहायला आवडत नाही. घरच्या अंगणातून दूरवर दिसणारी दरी मी तासन् तास पहातो. हळूहळू सुर्य त्याss समोरच्या डोंगरामागे गुडुप होईल.
पण हे काय आज मोबाईल वर इतके मेसेज का येत आहेत? श्रद्धांजली! हा आमचा परिसर समृद्ध पण वस्ती तुरळक.घरं ही लांब लांब आहेत. पण जिव्हाळा मात्र भरपूर. एकमेकांसाठी कोणत्याही वेळी धावून जाणारा. हा सुर्यास्त झाला की मी निघेन. कोण वारलय पहायला हवं,पुढची तयारी करायला हवी. या मोबाईलवर ही चांगले फोटो टाकावेत ना? अप*घाताचे फोटो उगाच का पाठवतात? हे बघा आत्ताचेच फोटो,अरेरे कुणीतरी दरडी खाली सापडला वाटतं,गाडीचा चेंदामेंदा झालाय अगदी.तो मघाशी भेटलेला प्रवासी तर नसेल? अजिबात ऐकत नव्हता तो माझं.हंsss. त्यांची वेळच आली होती म्हणायची.
“अरे हे काय ? श्वेता अशी अचानक कशी आली?” “रमणी कुठं आहे?” आणि माझे दोन्ही मेव्हणे ते का आलेत? अशी रडवेली का झालीय श्वेता? माझ्या समोरून घरात गेली श्वेता पण माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही तिने. आणि ही माणसं ? यांनी मला वाळीत टाकलय का ? काय झालंय नेमकं? मी काय चूक केलीय की हे सगळे माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करताहेत. अरे काय चाललंय? कुणी सांगेल का मला ? हे मोबाईलचे मेसेज पण नको तेंव्हा टिवटीव करतात. फोन सायलेंटला टाकतो. मनोहर पाटील श्रद्धांजली !
कसं शक्य आहे? अहो एका ना ,मी बोलतोय तुमच्याशी, तुम्हांलाही कळला की नाही हा माझा प्रवास, पण मग मी? असं कसं घडेल? हे मेसेज खोटे आहेत, किंवा चुकीचे आहेत किंवा? किंवा मी स्वप्न पहातोय? नक्की मी स्वप्नात आहे. स्वप्न नाहीतर काय मी आईकडे गेलो,सामान आणि औषधं दिली,तिला म्हटलं काळजी करू नकोस आणि मी निघालो घरी,वाटेत काय झालं? मी कुठे थांबलो ? नाही? मी अगदी सावकाश गाडी चालवत होतो, अच्छा! हां काहीतरी माझ्या गाडीसमोर होतं ? काय होतं ? काssळाss दगडss ? बॉनेटवर काहीतरी आदळलं. तो दगड होता ?तो तोच स्पॉट होता का…जिथे आजोबा आणि बाबा…..?? कसं शक्य आहे?अहो …मी….मीच मनोहर पाटील…..मीच कसा..काय….?
लेखिका – माधुरी केस्तीकर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Nice story…
Thank you so much😊
Good story
Thank you so much 😊
V nice story
खूप सुंदर👌👌
धन्यवाद 🙏
उत्कंठा vadhvanari कथा 👌शेवटचा twist तर… बापरे 👏, खूप छान 👌
धन्यवाद 🙏
sundar likhan