समाजाने विकलांग ठरवलेल्या सुदृढ मनाच्या मुलांची कथा
‘गॉर्जियस जेम्स’ नावाचा फलक हॉल च्या गेटवर दिमाखात झळकत होता. येणार्या पाहुण्यांमध्ये प्रचंड ऊत्सुकता होती. हॉल मध्ये इंग्लिश ‘टी’ अक्षराच्या आकाराचा स्टेज होता आणि त्याच्या आजूबाजूने बसण्याची व्यवस्था केली होती जेणेकरून प्रत्येकाला स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक ताऱ्याला बघता यावे. काही नावजलेल्या फॅशन डिझायनर्स सगळ्यात पुढील रांगेत बसले होते. आज अनामिकाला खूप अभिमान वाटत होता. कारणही तसंच होतं. आज तिच्या आणि राज च्या प्रयत्नांना, तिच्या संस्थेच्या मुलांच्या कष्टांना सशक्त समाजात मान्यता आणि ओळख मिळणार होती. अनामिकाने हाथ जोडून मनोमन देवाची प्रार्थना केली.
“नमस्कार. तुमचं सर्वांचे आमच्या ‘वात्सल्य’ संस्थेतर्फे हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलात ह्यासाठी तुमचे आभारही मानते. तुम्हा सगळ्यांची उपस्थिती आमच्या ताऱ्यांना प्रोत्साहित करेल. तसेच मी मिस्टर राज आणि मिस्टर साकेत ह्यांचे ही आभार मानू इच्छिते. त्यांच्यामुळेच माझ्या मुलांना ह्या नवीन क्षेत्रात कार्यरत होण्याची आणि नवीन मार्गावर चालण्याची संधी मिळत आहे. आजच्या फॅशन शो साठी त्यांनीही खूप मदत केली आहे. सर्वांची अनुमती असेल तर आजचा फॅशन शो सुरू करूया. ” असं म्हणत अनामिका ने शो ला सुरूवात केली. मध्यम गतीचे, शांत म्युझिक सुरू झाले. एकेक मॉडेल्स येऊ लागले आणि तेथील उपस्थितांमध्ये आश्चर्यचकित कुजबुज सुरू झाली. पण काही सेकंदात सर्वजण शो बघण्यात दंग झाली. शो संपल्यावर फॅशन डिझायनर्स आणि मान्यवरांना स्टेजवर बोलवण्यात आले आणि त्यांना संस्थेतर्फे एक भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. आता स्टेजवर साकेत बोलण्यासाठी आला.
“नमस्कार मंडळी. काय कसे आहात? म्हणजे आत्ताचा शो बघितल्यानंतर कसे आहात? आहेत की नाही आमचे मॉडेल्स जगावेगळेच. आम्ही आजच्या शो मध्ये अनेक प्रांतात बनले जाणारे कापड आणि प्रत्येक प्रांतातील वेगवेगळ्या प्रकारे कपडे परिधान केली जाणारी पद्धत ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुमच्या पसंतीस आले असतील. ह्या फॅशन शो ची कल्पना, शो ची थीम, हे मॉडेल्स नी घातलेले कपडे हे सर्व आमच्या मुलांनीच केलेले आहे आणि हे मॉडेल्स सुद्धा आमच्या संस्थेची मुलं आहेत. आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. कारण ही मुलं जरी शारीरिक दृष्ट्या कमकुवत असली तरी मनाने कणखर आहेत. ‘समाजाने अपंग ठरवलेल्या सदृढ मुलांची संस्था’ हीच आमच्या ‘वात्सल्य’ संस्थेची ओळख आहे. ही संस्था मिस अनामिका ह्यांची आहे. आम्ही फक्त त्यांना ओळख देण्याचा प्रयत्न करत आहोत.
तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही हे मॉडेल्स कसे, कधी कुठे शोधले? तर झालं असं की मी आणि जय एका पतंग महोत्सवात गेलो होतो. तिथे ह्या मिस.अनामिका ह्यांच्याशी ओळख झाली. ती ओळख कशी झाली हे तुम्हाला ऐकावयास हवे त्याखेरीज हा शो करण्यामागील हेतू लक्षात येणार नाही.” असं म्हणत साकेत नी पतंग महोत्सवातील ती घटना सांगण्यास सुरूवात केली.
भूतकाळ. काही महिन्यांपूर्वीचा. स्थळ पतंग महोत्सव..
“अरे यार काय मुलगी आहे ही. स्वतः मस्त पतंग ऊडवण्याचा आनंद घेतला. पण बिचार्या त्या मुलांना मात्र पतंग उडवू दिला नाही. त्यांचा पतंग फाडून मांजा आणि फिरकीच हिसकावून घेतली. भांडते पण सॉलिड. लेडी डॉनच आहे ही काळी साडी नेसलेली पांढरी म्हैस. “
“तू काय बडबडतोस? पांढरी म्हैस काय? तुझं लक्ष कुठे आहे साकेत. अरे आपण एका प्रोजेक्ट साठी इथे आलो आहोत. विसरला आहेस का. आपण इथे पतंग महोत्सवाचे सुंदर आणि कन्डिड फोटो काढायला आलो आहोत. इथे आपल्याला रिअलिस्टीक फोटोज मिळतील. विदाऊट मेकअप रियल आर्टिस्ट. अरे ह्यातले काही जण आपल्या पुढच्या प्रोजेक्ट साठी आपल्याला हेरायचे आहेत. पुढचा प्रोजेक्ट एका मोठ्या कंपनीचा आहे. आणि पुढच्या पंधरा दिवसांत आपल्याला ते प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे हे माहित आहे ना. सो आता फोकस कर आपल्या कामावर. चल कामाला लाग. “
“अरे असा कसा आहेस तू जय. मी माझं कामच करत होतो. त्यासाठीच तिकडे गेलेलो. पण ती तिकडे अशी भांडत होती की पुढे काही करायची इच्छाच नाही झाली. आणि इथे तू मला इतका मोठा लेक्चर दिलास. भलाई का जमानाच नाही म्हणतात तेच खरं. कामच करत होतो…”
“अरे हो हो. शांत हो साकेत. किती चिडचिड करशील. बरं बाबा माझं चुकलं. चल तुझं डोकं शांत करतो. चहा घेऊ. चल. “
साकेत आणि जय दोघे मित्र. एका ॲड एजन्सी चे पार्टनर. फोटोग्राफी त्यांचा छंद. जयला निसर्ग, नदी, आकाशात ऊडणारे पक्षी,व्यक्तींच्या चेहर्यावरचे भाव, त्यांचे चेहरे आपल्या कॅमेर्यात बंदिस्त करणे आवडायचे. फोटोग्राफी त्याचं पॅशन. कमर्शियल फोटोग्राफी पेक्षा त्याला नेचर फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी फोटोग्राफीची आवड होती. साकेत ला तो सगळ्यात खेचून घेत असे.
चहा पीता पीता साकेतला परत ती मुलगी दिसली. साकेत वैतागून म्हणाला, “अरे यार सुखाने चहा सुद्धा पिऊन देत नाही. आली इथे सुद्धा पांढरी म्हैस. ”
साकेत कुणाबद्दल बोलतो आहे हे बघण्यासाठी जय ने आपली नजर तिकडे फिरवली जिथे साकेत बघत होता. आणि जय ची नजर तिथेच तिच्यावर खिळून राहिली. खरचं तीचं ते साधं रूप मनाला मोहवून टाकत होतं. गोरीपान, थोडी मध्यम ऊंची, आकर्षक बांधा, लांब मोकळे केस, डोळ्यात काजळाची रेख आणि कपाळावर छोटी नाजूक चंद्रकोर, गळ्यात साधी चैन, कानात ऑक्साईड चे झुमके, हातात ब्रेसलेट. पण चालताना ती थोडी अडखळत चालते आहे असं जय ला वाटले. तरीसुद्धा त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. जय इतकं न्याहाळत होता तिला कि साकेत काय बडबडतोय तिकडे त्याच लक्षंच नव्हते. शेवटी साकेत ने त्याला हलवून भानावर आणले.
“काय रे इतकं काय तिला बघतोस. मी काय बोलतोय तिकडे लक्ष दे. आता नाही का तुझा फोकस हलत आहे. मगाशी मला लेक्चर दिलास. आता तुझं काय सुरू आहे. काम कर. फोकस कर कामावर. पांढर्या म्हशीला बघून काही होणार नाही. चल.”
ती मुलगी काही मुलांबरोबर अजूनही भांडत होती. जय ने अगदी शांतपणे तिला चिडण्याचे कारण विचारले. तिने अतिशय तीक्ष्ण कटाक्ष जय वर टाकला. आणि नंतर त्या मुलांना बडबडत होती, ” तुम्ही जे धारधार मांजा वापरता त्याने पक्षांना जशी इजा झाली तशी माणसांना सुद्धा होऊ शकते. त्या काकांच्या सुद्धा हाताला तुमच्या मांज्यामुळे इजा झाली आहे. त्यांची माफी म्मागायची सोडून त्यांच्यावर हसत होतात. काही लाज नाही वाटतं का तुम्हाला. मगाशी त्या पतंग काटाकाटी च्या नादात काटलेली पतंग मिळवण्यासाठी तुमच्यातला एक मुलगा रस्त्यावर वर पतंग कुठल्या बाजुला पडतेय हे बघत धावत होता. त्याचा अपघात होऊ शकला असता. पडला असता. बरं तो धावता धावता त्याचा धक्का लागून एक छोटा मुलगा पडला. त्याला ऊठवायचं, काही लागलं का हे बघायचं सोडून पळत होता पतंगाच्या मागे. खरंच किती बेजबाबदार पणे वागताय तुम्ही. मी मगापासून त्या काकांची, त्या मुलाची माफी मागा सांगत आहे तर तुम्ही हसताय माझ्यावर. पण मी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी तुम्हाला जाऊ देणार नाही. माफी मागा.” शेवटी तिने मुलांना माफी मागायला लावलीच.
जय कडे वळून म्हणाली. “सॉरी मगाशी जरा चिडलेले होते म्हणून ते असं रागाने बघितलं. माफ करा. ऊगाच कुणाचातरी राग तुमच्यावर निघाला. हाय मी अनामिका. मी इथे माझ्या संस्थेच्या मुलांना घेऊन आले आहे पतंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी आणि त्यांनी बनवलेल्या सुंदर वस्तूंच्या विक्रीसाठी. पण हे असे बेजबाबदार लोकं बघितले की माझा रागाचा पारा चढतो आणि मग मी हे असं. खरंच मनापासून सॉरी.. “
“अहो किती वेळा सॉरी म्हणालं. इट्स ओके. आय कॅन अंडरस्टॅड. हाय मी जय. आणि हा साकेत. आम्ही इथे आमच्या एजन्सीसाठी काही फोटोज क्लिक करण्यासाठी आलो आहोत. इथे येऊन माणसांच्या चेहऱ्यावरचे खरे भाव आमच्या कॅमेर्यात कैद करतो. रिअलिस्टीक फोटोग्राफी. “
“अच्छा म्हणजे ही सगळी माणसे तुमचे मॉडेल्स आहेत तर. छान आहेत. ” अनामिका अगदी मनमोकळं हसत म्हणाली. जय परत तिला बघण्यात गुंतून गेला. साकेत च्या ते लक्षात आले. अनामिकाला हे कळण्याआधी जय ला भानावर आणण्यासाठी साकेत ने मुद्दाम जय ला विचारले. “निघायचं का मग आपण.”
“अं… हो.. निघू या. बाय द वे. तुमची कुठली संस्था आहे म्हणालात मिस अनामिका…” जय ने अनामिकाला विचारले.
“ज्यांना समाज अपंग समजतो अशा ॲक्टिव्ह मुलांची संस्था आहे माझी.” अनामिकाने ऊत्तर दिले.
“म्हणजे मी नाही समजलो.” जय ने विचारले.
“या दाखवते. .” असं म्हणतं अनामिका त्यांना घेऊन तिच्या संस्थेच्या मुलांजवळ घेऊन गेली. “ही बघा ही माझी मुलं. माझ्या ‘वात्सल्य’ संस्थेतील माझी मुलं.”
जय आणि साकेत ला धक्काच बसला मुलांना बघून. कुणी व्हीलचेअर वर होतं तर कुणाचा एक हात नाही. कुणाचे दोन्ही हात नाहीत. कुणाची दृष्टी नाही. कुणाची वाचा नाही तर कुणी मतिमंद. जय आणि साकेत च्या चेहऱ्यावरून अनामिकाला कळले होते की त्यांचा विश्वास बसत नाही की ही मुलं पतंग महोत्सवात पतंग ऊडवण्याचा आनंद घेत आहेत.
अनामिकाने त्यांना विचारले, “काय झालं विश्वास नाही बसत ही मुलं इथे पतंग ऊडवण्याचा आनंद घेत आहेत ते. अहो ह्या मुलांमध्ये फक्त काही शारिरीक व्याधी आहेत. मानसिक नाही. त्यांची इच्छाशक्ती आणि आकलन शक्ती जबरदस्त असते. त्यामुळेच ते नवीन गोष्टी सहज आत्मसात करू शकतात. आमची संस्था त्यांना सर्व बाबतीत सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना कुठेही असं वाटू देत नाही की ते सामान्य माणसांपेक्षा वेगळे आहेत. एक सामान्य माणूस जे करू शकतो ते करण्याचा प्रयत्न त्यांना आम्ही करायला लावतो. आणि ते ही प्रामाणिक प्रयत्न करतात. आपल्यापेक्षा काकणभर जास्तच चांगल्या प्रकारे करतात. आता ह्या इथे ठेवलेल्या गोष्टी बघा. ह्या सगळ्या ह्यांनी बनवल्या आहेत. ह्या पिशव्या, ही ग्रिटींग कार्ड, ह्या शोभिवंत वस्तू, हे विणलेले रुमाल, टेबलक्लॉथ, ही भरतकाम केलेली ओढणी, ही हाताने शिवलेली गोधडी हे सगळंच ह्यांनी बनवलं आहे. मॅरोथाॅन मध्ये ही भाग घेतात. आणि मगापासून तुम्ही जो माझ्याकडे बघून विचार करताय तो सुद्धा मला कळाला आहे. माझा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यात माझे पाय गेले. पण मी आता जयपूर फूट लावून घेतला आहे. आणि म्हणूनच मी अशी अडखळत चालत आहे. पण सरावाने येईल मला तुमच्या सारखं चालता. माझ्या बाब॔नी ही संस्था सुरू केली. माझी आई आणि भाऊ सुद्धा संस्थेचे काम पाहतात. आम्ही सगळ्यांनी कामं वाटून घेतली आहेत. काय झालं विश्वास नाही का बसत आहे तुमचा. असं का पाहताय.”
“नाही हो. विश्वास बसत नाही म्हणण्यापेक्षा आश्चर्यच वाटतंय. आणि कौतुक ही. एक सुचवू का. जर तुमची परवानगी असेल तर माझ्या एजन्सीच्या पुढच्या प्रोजेक्ट साठी मला ह्या मुलांबरोबर काम करायचे आहे. मॉडेल्स म्हणून मी ह्या मुलांना माझ्या ॲड मध्ये घेऊ इच्छितो. अर्थात तुमची परमिशन असेल तर. कारण इतकी निरागस, सुंदर आणि हसरी मॉडेल्स दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि हे मी काही त्यांची कणव आली आहे म्हणून नाही तर त्यांची कॅपॅबिलीटी आहे म्हणून विचारतो आहे. त्यांनाही त्याबदल्यात आर्थिक स्वावलंबन मिळेल. थिंक अबाऊट इट. अजून एका नवीन क्षेत्रात त्यांचा प्रवेश होईल. ह्या क्षेत्रात अजूनही बर्याच गोष्टीं शिकण्यासाठी आहेत.ज्यामध्ये ही मुलं तरबेज होऊ शकतात.” जय अगदी कळकळीने अनामिकाला म्हणाला. अनामिका विचार करत होती. तिने त्याला होकार दिला.
तर मंडळी ही आहे आजच्या ह्या फॅशन शो मागची कहाणी आणि उद्देश. आणि म्हणूनच आम्ही ह्या मुलांना त्यांच्यातील कलेनुसार त्यांना प्रशिक्षण दिले. ह्या मुलांमधील कोणी खूप छान डिझायनर्स आहेत. कुणाला रंगसंगती खूप छान कळते. कुणाला कपड्यांचा पोत छान कळतो. कुणाला भरतकाम छान येतं. कुणी चित्र छान काढतात. कुणाला कॅमेरा हाताळण्याचे कौशल्य आहे. कुणाला कॅमेऱ्या समोर वावरता येते. कुणामध्ये उत्तम वक्तृत्व आहे. बरेच गुण आणि कला आहेत ह्यांच्यात. ह्या सगळ्याचा विचार करून आमच्या संस्थेतील मुलांना नवनवीन प्रोजेक्ट तुमच्याकडून मिळतील. आणि त्यांना एक सामान्य माणूस म्हणून आपल्यासारखेच समजून एक सामान्य आयुष्य त्यांना जगू द्याल अशी आम्हाला खात्री आहे. त्यांना तुमची कुठलीही दया नको आहे. पाहिजे आहे ती ओळख. ती तुम्ही द्याल ही आशा करते. आणि मी माझे कार्य असेच अविरत सुरू ठेवेन ह्याची खात्री ही तुम्हाला देते. परत एकदा तुमचे सर्वांचेच मनापासून आभार.” असं म्हणत अनामिकाने आनंदाश्रू पुसत चेहऱ्यावर हास्य आणत सगळ्यांचे आभार मानले.
तिथे उपस्थित असलेल्या फेमस फॅशन डिझायनर्सना नेक्स्ट प्रोजेक्ट साठी मॉडेल्स आणि जयला लाईफ प्रोजेक्टसाठी रिअल मॉडेल मिळाली.
__पुजा सारंग, मुंबई
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
कथानक छान आहे, एक वेगळाच विषय मांडून समाजाला शारिरीक दृषट्या विकलांग असणार्या मुलां कडे अशा दृष्टीने पाहण्यास नक्कीच भाग पाडेल.
मागील कथे प्रमाणे या ही कथेत वाचताना दृष्य समोर घडत असल्याचा भास झाला.
खुप खुप शुभेच्छा.
खूप खूप आभारी आहे अभिप्राय दिल्याबद्दल 🙏🏻तुमचे अभिप्राय लिहीण्याची ऊमेद देतात.
mast katha lihili aahe
खूप खूप आभारी आहे 🙏🏻
खूप छान शब्दांकन. असं छान लिहीत रहा
धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. 🙏🏻
भावपूर्ण कथा
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम कथा👌👌
खूप खूप आभारी आहे मॅडम. आम्हाला असंच प्रोत्साहित करत रहा. 🙏🏻