ट्रेननी फलाट सोडला. घाई घाईने डिंपल पळत येत होती. डिंपलच्या मैत्रिणींनी तिचा हात धरून तिला ट्रेनमध्ये ओढून घेतले.
माध्यमिक शाळेत शिकणारी ही मुलींची टीम इंटर स्टेट कबड्डीची मॅच खेळायला निघाली होती. पीटीचे सर डिंपलवर खूपच चिडले,”आत्ता ट्रेन सुटली असती तर? तू टीमची कॅप्टन आहेस हे वागणे तुला शोभत नाही”
डिंपलच्या घरची बेताची परिस्थिती होती.
वडिलांच्या अपघातामुळे घराची सर्व जबाबदारी तिच्या आईवर येऊन पडली होती. डिंपल घरातली मोठी मुलगी म्हणून आईला घर सांभाळण्यात मदत करत असे. आजारी वडिलांची सुश्रुषा करताना घरातून निघायला डिंपलला उशीर झाला. तिच्या घरची सर्व परिस्थिती सरांना माहीत होती, पण या महत्त्वाच्या स्पर्धेला तिने उशिरा येणे त्यांना अजिबात मंजूर नव्हते. डिंपल कबड्डीमध्ये पहिली‘रेडर’. आक्रमणाकरता म्हणून ओळखली जायची, एकदम चित्त्यासारखी चपळ होती आणि म्हणूनच सरांचा डिंपल दिसेपर्यंत जीव टांगणीला लागला होता.
आपली चूक कबूल करून डिंपलने सरांची माफी मागितली. सहा तासाची निश्चिती असल्यामुळे सरांनी डुलकी घ्यायची ठरवली व ते दुसऱ्या डब्याकडे निघाले.
ट्रेनमध्ये एका वेळेस बारा-चौदा खेळाडू ,एक पीटीचे शिक्षक व एक मदतनीस यांचे सलग बुकिंग मिळाले नसल्यामुळे दोन-तीन वेगळ्या डब्यांमध्ये या मुलींची सोय झाली होती.डिंपल व तिच्या तीन मैत्रिणींनी एकत्र बसणे पसंत केले.
ट्रेनने हळूहळू वेग पकडला व मुलींमध्ये गाण्याच्या भेंड्या रंगू लागल्या.सर्व मुली मॅचचे टेन्शन दूर करण्यासाठी गाण्याच्या भेंड्या खेळून एक प्रकारे रिलॅक्स होऊ पाहत होत्या.
सुरुवातीचे एक दोन तास डब्यातल्या सहप्रवाशांनी मुलींच्या गाण्याच्या भेंड्यांचा आनंद लुटला, नुकतेच लग्न झालेल्या व देव दर्शनाला निघालेल्या दाम्पत्यानी पण या मुलींच्या सुरामध्ये सूर मिसळला. थोड्यावेळाने एक दोन जणांनी मुलींना व त्या नवविवाहित दांपत्याला हटकून गप्प बसायला लावले.
कंटाळलेल्या मुली व ते नवरा बायको आता थोडे पेंगु लागले.डिंपल आपल्या खेळाची रणनीती मनात ठरवत होती. या मॅचमध्ये जास्तीत जास्त प्रतिस्पर्ध्याच्या खेळाडूंना हात लावून बाहेर कसे घालवायचे व ‘सुपर रेड’ व ‘बोनस पॉईंट’ कसे मिळवायचे याचे मनात नियोजन करत होती.
डिंपलने कबड्डीचा सराव करताना घरातली कामे पण लिलया पेलली होती. एका हाताने काम करताना दुसरा पाय लांब करून (पायाच्या बोटात पाण्याची नळी पकडून) फुलझाडांना पाणी घालायचा सराव केला होता. श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी पहाटे लवकर उठून ‘प्राणायाम’, ‘अनुलोम- विलोम’ ची प्रॅक्टिस ती करत होती. शेतातल्या विहिरीत उंचावरून सूर मारून विहीरीच्या तळाशी जाऊन जास्तीत जास्त वेळासाठी श्वास रोखायचे तंत्र तिने आत्मसात केले होते.
डिंपलच्या शारीरिक लवचिकते विषयी सर्वांना कुतूहल व आश्चर्य वाटायचे.
अनेक दिवस डिंपलने केलेला सराव, घेतलेली मेहनत , घरची बाजू सांभाळून व प्रचंड मानसिक ताणातून ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट पाहिली होती, तो दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला होता. घरच्यांनी डिंपलला अगदी निर्वाणीचे सांगितले होते की,या खेपेला अगदी शेवटची कबड्डी मॅच खेळायची व इथून पुढे दहावी झाल्यावर शाळा सोडून देऊन शेतात काम करून घराची व छोट्या भावंडांची जबाबदारी घ्यायची.
डिंपलच्या दृष्टीने उद्याची मॅच तीच्या आयुष्यातली शेवटची मॅच असणार होती, त्यामुळेच या मॅच मध्ये स्वतःसाठी आयुष्यभर लक्षात राहील असे क्षण ती गोळा करणार होती. स्वतःला अभिमान वाटेल अशी छान कामगिरी करायचे तिने मनोमन ठरवले. अर्थात याविषयी तिने तिच्या सरांना व मैत्रिणींना काही सांगितले नव्हते.
डिंपल विचारांच्या तंद्रीत असतानाच तिला काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. तीन-चार मुलांची एक टोळी तिच्या रेल्वेच्या डब्यामध्ये येऊन नवीन लग्न झालेल्या नववधूच्या अंगावरचे दागिने हिसकावून लागले. दोन लोकांकडे ह*त्या*र असल्यामुळे सहप्रवाशांनी कुठलाही विरोध दर्शविला नाही.
त्या नवविवाहितेच्या नवऱ्याने विरोध दर्शविला तर त्याला चा*कू*ने वार करून चालत्या गाडीच्या बाहेर फेकून दिले. काही क्षणार्धात घडणाऱ्या घटनांनी सर्व सहप्रवासी खूपच घाबरले. सगळीकडे अफरातफर माजली. कोणाला काही सूचेना. डिंपल व तिच्या मैत्रिणी पण खूपच घाबरून गेल्या.
घडलेल्या प्रकारामुळे डिंपलला खूपच संताप आला. तिच्या डोक्यात उद्याच्या मॅचचे नियोजन चालू होते. कुठल्याही परिस्थितीत उद्याची मॅच तिला खेळायचीच होती आणि त्यामध्ये आज अचानक आलेला हा व्यत्यय. डिंपल ‘रेडर’ असल्यामुळे तिच्या डोक्यात ‘लोण पॉईंट’ घोळत होता.कोणाला काही समजायच्या आत डिंपलने ह*त्या*र घेतलेल्या मुलाच्या हातावर जोरात पायाने लाथ मारली व दागिने हिसकावणाऱ्या मुलाचे डोके जोरात खिडकीवर आपटले. एकाच वेळेस दोघांवर ‘सुपर टॅकल पॉईंट’ चे तंत्र वापरल्यामुळे झालेला अनपेक्षित हल्ला त्यांच्या दुष्ट इराद्यांना कमजोर करून गेला. आता चपळाईने ट्रेन मधली साखळी ओढण्यासाठी म्हणून डिंपलने हालचाल केली. *लु*टा*रू मुलांच्या टोळीतल्या एकाने डिंपलला अडवण्यासाठी पोटात लाथ मारली, ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली,”कोणीतरी साखळी ओढा.. त्यांना पकडा..”सगळी लोक घाबरून आपापल्या जागेवर बसून राहिले.
स्वतःला सावरत डिंपलने साखळी पर्यंत जायचा प्रयत्न केला पण त्यातल्या एका मुलांनी एवढ्या जोरात तिला ढकलले की चालत्या गाडीतून ती फेकली गेली. आता मात्र भीती,लाचारी बाजूला ठेवून लाजेने गाडीतली काही लोक त्या चार मुलांवर धावून गेली व काही जणांनी मिळून ट्रेनची साखळी ओढली.
स्पीड पकडलेल्या ट्रेनला थांबायला थोडा वेळ गेला, तोपर्यंत चारी मुलांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारून पोबारा केला. अचानक ट्रेन थांबल्यामुळे बाकीच्या डब्यातल्या सहप्रवाशांना काही समजले नाही. जवळच्या स्टेशनला सूचना मिळताच तातडीने रेल्वे प्रशासन व पो*ली*स दलातले काही लोक घाई घाईने आले. डिंपलचे सर व मदतनीस सर्व मुली ठीक आहेत का बघण्यासाठी म्हणून आले तर घाबरलेल्या मुलींनी घडलेला प्रकार सरांना सांगितला.
सरांनी सहप्रवाशांची मदत घेत डिंपलचा व त्या नवविवाहित नवऱ्या मुलाचा शोध सुरू केला. जोरात धक्का बसल्यामुळे व वाऱ्याच्या वेगामुळे डिंपल शेजारून जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन वर धडकून खाली पडली होती.
पो*ली*स प्रशासनाने तात्काळ डिंपलला व त्या माणसाला ॲम्बुलन्स मध्ये घालून जवळच्या सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी पाठवले. घडलेला सर्व प्रकार वरिष्ठांना कळवून पीटीच्या सरांनी शाळेकडून अजून शिक्षकांची कुमक मागवली व डिंपलच्या आईला दवाखान्यात घेऊन जायची व्यवस्था केली.
‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत उरलेल्या मुलींनी पूर्ण धीर एक वटून कबड्डीची मॅच खेळली. या मॅचमध्ये डिंपलची उणीव नक्कीच जाणवली. आठवडाभरानंतर चषक घेऊन सर्व मुली व सर डिंपलला भेटायला गेले.
दोन दिवस बेशुद्ध अवस्थेत असताना डिंपलच्या डोक्यात फक्त आणि फक्त मॅच घोळत होती.सरांना व पूर्ण कबड्डी टीमला जिंकलेले पाहून डिंपलला खूपच आनंद झाला. आपले शेवटचे स्वप्न अशाप्रकारे तुटलेले पाहून तिला वाईट वाटले पण तिच्या या कृतीमुळे त्या गुंड मुलांना पकडण्यात व शिक्षा देण्यात प्रशासनाला यश आले होते. आणखीन एक जमेची बाजू म्हणजे त्या नवविवाहित दांपत्यातल्या तो माणूस सुखरूप बचावला होता. डिंपलच्या मित्र परिवाराने,शाळेने, प्रशासनाने सर्वांनी डिंपलचे भरभरून कौतुक केले होते व तिला आर्थिक मदत केली .
सगळ्यांची आयुष्य परत सुरळीत सुरू झाली फक्त एक व्यक्ती सोडून….
डिंपलच्या जागी दुसरी नवीन ‘रेडर’आली. आंतरराज्य स्पर्धांमध्ये सर्व मुली कौतुकास्पद कामगिरी करू लागल्या.
दोन अडीच महिन्यानंतर शाळेतले पीटीचे सर
डिंपलला भेटायला तिच्या घरी गेले व त्यांना एकदम धक्काच बसला. या अपघातात डिंपलचा पाय इतका जखमी झाला की मांडीपासून निकामी झाला. डिंपलचे जणू जगच उध्वस्त झाले. आयुष्यातल्या शेवटच्या मॅचचे बघितलेली स्वप्न आता कधीही पूर्ण होऊ शकणार नव्हते…पण आयुष्यात परत कधीच ती ‘कबड्डी कबड्डी’ म्हणून खेळू शकणार नव्हती. हेच कटू सत्य होते….
पीटीच्या सरांनी खूप विचार केला. या सर्व परिस्थितीला सरांनी स्वतःलाच दोष लावून घेतला.
त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. डिंपलला काहीही करून मदत करायची व घडल्या प्रकारांबद्दल प्रायश्चित्त घ्यायचे त्यांनी ठरवले.
प्रशासनातल्या मातब्बर लोकांशी डिंपलच्या तब्येती विषयी त्यांनी चर्चा केली, स्वतः डॉक्टरांकडे जाऊन यातून काही मार्ग काढू शकतो का या शक्यते विषयी प्रयत्न केला. या सर्वांमध्ये आठ -दहा महिन्याचा वेळ निघून गेला. डिंपल पूर्णपणे खचून गेली होती. त्यातच डिंपलनी दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार केली.
आधीच आईने ठरवल्याप्रमाणे शाळा सोडून देऊन डिंपलला घर सांभाळायचे होते व आता शेताची पूर्ण जबाबदारी एकट्या आईवर येऊन पडली होती.
दिवस भराभर पुढे सरकत होते पण डिंपलचे आयुष्य कुबडीच्या साह्याने संथ गतीने लंगडत खुरडत होते. एक दिवस अचानक डिंपलला गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
काय झाले म्हणून बघण्यासाठी ती खुरडत बाहेर पडली व तिच्या लक्षात आले की, गाईचे छोटे वासरू अनावधानाने विहिरीत पडले होते, व म्हणूनच गाय जोरात हंबरडा फोडत होती. दुपारच्या वेळी घरात व आजूबाजूच्या परिसरात कोणी मदतीला येऊ शकते का म्हणून डिंपलने आवाज दिला, पण दुर्दैवाने घरातले व गावातील सर्व लोक शेतामध्ये मोलमजुरी करायला गेली होती.
एक-दोन वयोवृद्ध माणसे सोडली तर परिसरात कोणीच नव्हते. डिंपलला एकदम ट्रेनमध्ये घडलेला प्रसंग आठवला व काही क्षणासाठी ती एकदम बधीर झाली. गाईचा तिच्या पिल्लासाठी टाहो फोडून कासावीस झालेला आवाज ऐकून डिंपल भानावर आली. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिने मनाशी निश्चय केला व विहिरीमध्ये उडी घेतली. आपल्याला एक पाय नाही हे पूर्णपणे विसरून तिने गाईच्या वासराला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, तेवढ्यात आरडाओरडा ऐकून गावातल्या वयोवृद्ध लोकांनी मदतीसाठी बाकी गावकऱ्यांना निरोप पाठवले.
काही क्षणार्धात डिंपल व वासरासाठी गावकऱ्यांनी दोर खंड टाकून दोघांनाही बाहेर काढले. परत एकदा जीवावर बेतलेल्या बिकट प्रसंगातून डिंपल सुखरूप बाहेर आली.
डिंपलच्या सरांना जेव्हा हा प्रसंग समजला तेव्हा ते तीला भेटायला आले. बोलण्याच्या ओघात सरांनी तिला ‘तुला काय मदत करू’ असे विचारले. घडल्या प्रकारानंतर डिंपलनी मनाशीच निश्चय केला होता की, स्वतःच्या पायावर खंबीरपणे परत कसे उभे राहायचे. प्रदीर्घ चर्चेनंतर सरांनी तिची भेट एका अशा व्यक्तीबरोबर करून दिली की पुढे तिचे आयुष्यच बदलून गेले…
डिंपलला चांगले पोहता येत होते. आता प्रश्न होता एका पायाने शरीराचा तोल सांभाळत पोहायचे. आर्मी मधून रिटायर झालेले ‘कर्नल झा’ जातीने तीला पोहण्याचे प्रशिक्षण देऊ लागले.
मातीत खेळणाऱ्या डिंपल ला पाण्यावर तरंगताना बरेच अडथळे येत होते पण तिचा निर्धार पक्का होता. हा रस्ता सोपा नक्कीच नव्हता. अनेक रात्र डिंपलने तळमळून काढल्या होत्या. रात्री झोपेत ती अनेक वेळा घाबरून ओरडत उठली होती. ज्या मजबूत पायांवर उभे राहून अनेक वेळा ‘सुपर टॅकल पॉईंट’घेतले होते त्या पायाच्या आठवणीने तिचा जीव तळमळत होता…
कित्येक दिवस त्या भयानक प्रसंगामुळे तिच्या डोळ्याला डोळा लागत नसे.तेरा -चोदा वर्षाच्या कोवळ्या वयात झालेला हा आघात इतका सहजासहजी भरून निघणे कठीणच होते.
अंथरुणाला खिळलेले वडील, कामाच्या ओझ्यात दबलेली आई व छोटी भावंडे डिंपल कोणाकडे मन मोकळे करणार होती…
‘कर्नल झा’ हे केवळ डिंपलचे पोहण्याचे प्रशिक्षक नसून तिला जीवनात जगण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. डिंपलच्या मनातली भीती घालवण्यासाठी कर्नल झा डिंपल ला भेटून दररोज त्यांच्या आयुष्यातल्या अवघड व कसोटीच्या प्रसंगांची गोष्टी रूपाने चर्चा करत असत. कठीण प्रसंगातही आपला आत्मविश्वास डळमळून न देता आयुष्यात नवीन संधींना शोधून पुढे जाणे हेच क्रमप्राप्त आहे असे तिला सांगत असत.
बघता बघता डिंपलने अथक परिश्रमाने पोहण्याचे कौशल्य आत्मसात केले.
विकलांगांसाठी पोहण्याच्या स्पर्धेत डिंपलची तयारी करून घेताना तिने केलेला दुहेरी पराक्रमाची(ट्रेनमध्ये गुंडांना पकडून एका माणसाचे प्राण वाचवले व विहिरीत पडलेल्या वासराला जीवनदान दिले) नोंद भारत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे ही काम ‘कर्नल झा’ ह्यांनी केले.
बघता बघता डिंपल नी बारावीची परीक्षा पण उत्तीर्ण केली.क्रीडा कोट्यातील सरकारी नोकरी डिंपलला मिळावी म्हणून ते खटपट करत होते. ज्यामुळे डिंपलची आर्थिक परिस्थिती सुधारेल व तिच्या घरचे तिला पोहण्यासाठी पाठिंबा देतील.एकंदर परिस्थिती सुधारत असल्यामुळे डिंपल पण सकारात्मक विचार करू लागली.
भारत सरकारचा शौर्य पुरस्कार, क्रीडा विभागातून नोकरीसाठी होणारे प्रयत्न व अनेक मदतीचे आलेले हात यामुळे डिंपलच्या घरच्या परिस्थितीत फरक पडला व तिच्या आई-वडिलांची काही अंशी काळजी दूर झाली. ‘कर्नल झा’ यांच्या बरोबर गप्पा मारताना डिंपल ला आता खूप आत्मविश्वास निर्माण झाला होता.
गेल्या दोन-तीन वर्षात शाळेमध्ये, गावामध्ये डिंपल चे अनेक सत्कार समारंभ झाले. विविध माध्यमांनी तिच्या पराक्रमाची व बलिदानाची दखल घेतली.
यावर्षीच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी शाळेने डिंपल ला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले होते.सलग दुसऱ्यांदा डिंपल ला शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यासाठी भारत सरकारने दिल्लीला आमंत्रण दिले होते. डिंपलच्या शाळेने तिचे गुरु, मार्गदर्शक असलेल्या ‘कर्नल झा’ यांना पण या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.
झेंडावंदन झाल्यावर ‘कर्नल झा’ यांना शाळेने चार शब्द बोलायचा आग्रह केला. नुकताच हातात आलेल्या दुसऱ्यांदा शौर्य पुरस्काराची आमंत्रण पत्रिका सगळ्यांना दाखवत ‘कर्नल झा’ यांनी आपल्या लाडक्या शिष्याचे कौतुक करून ही गोड बातमी सर्वांना सांगितली.
डिंपलच्या डोळ्यात आज अश्रू होते पण जे ओघळत होते ते अभिमानाचे, आनंदाचे, समाधानाचे….
आज डिंपलने नियतीवर जणू ‘सुपर रेड’ केली होती..सर्वांना खूपच आनंद झाला.
भाषणाच्या शेवटी ‘कर्नल झा’ नी खास सैन्यात ठोकतात तशी एक आरोळी ठोकली व सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला…
“खूब लडी मर्दानी ‘रेडर’ डिंपल राणी”
वृषाली पुराणिक ,पुणे
अन्यायाविरुद्ध लढून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वीरित्या आयुष्य जगणाऱ्या एका सच्चा स्त्री खेळाडूची प्रेरणादायी कथा . ही तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)