मराठी कथा -संप्या 

WhatsApp Group Join Now

“काय दिती वो तुमची शाळा ?”  तुमाला  तुमच्या  शाळेचच पडलं. इंत  भुकेन  आ आ आ आ वासलेली  पाच  तोंड  हायेत माज्या  पदरात  वरून  नवरा तसला  पिदाडा. आदी पोटापान्याच  बगावं  का  तुमची शाळाच  बगावी ??

       आईच्या  पदराआड  तोंड लपवुन  किलकिल्या  डोळ्यांनी दिपा मॅडमकडे बघत  त्या दोघीतला  हा  संवाद  ऐकत  होता  संप्या. आपल्या  मॅडम यातून  नक्की  मार्ग  काढतील, ही आशा  त्या  टपोर्या  डोळ्यात होती. पण  मॅडम  आपल्या आईला  समजवण्यात  अयशस्वी झाल्या  आणि  आता  सगळं आपल्या  मनाविरूद्ध  होणार, हे लक्षात  येत  होतं  त्या  छोट्या जीवाला ! मॅडम म्हणाल्या, “आहो ऐकातरी  मी  शाळेच्या वसतिगृहात  सोय  करते  त्याची राहण्याची. आहो  खूप  हुशार आहे  संप्या. त्याला  असं  मध्येच नेऊन  नुकसान  नका  करूत  त्याचं.”

     “नग  पाचीच्या  पाची  लेकरं घिउन  जातीया  मी .चार  पोरींच्या  पाठीवर  झालयं  हे पोरगं  मला. त्येला  इतं  ठिऊन  तितं  कसा  जीव  लागलं माजा ?”

Marathi Sad Story

    आपलं  काहीही  ऐकून घेण्याची  सध्यातरी  तिची मानसिकता  नाहीये , हे  लक्षात घेऊन. एक  दीर्घ  श्वास  घेत  बाई म्हणाल्या, “बरं  ठिकय,  मी तुम्हाला  काही  माहिती सांगते, त्याप्रमाणें  करा, तुम्ही  जिथं  कुठं  जाणार  आहात  तिथं हंगामी  साखरशाळा असतात. तिथं  पाठवत  जां त्याला . जेणेकरून  शिक्षणात  खंड पडणार  नाही  त्याच्या आणि ..”त्यांच  बोलणं  मध्येच तोडून …”आता  तितबी  शाळा का ?  इतंच  कदर आलाय  त्येच्या  अब्यासाचा . उटलं  का सुटलं  निसता अब्यास  अब्यास  करत  अस्तया . आन  तुमी मनताव  तसं न्हायीच जमणार . पोरी  आन  मी  आमी समध्याजनी  यीळभय  ऊस तोडाया  जानार.  आन  ह्याला  बी शाळत   पाटविल्यास   कोपीची राकन  कोन  करील? तीत  काय घरयं  का , कुलूप  लावून जायला? कोपीला  दार  नसतंय मेडम !  जाऊ  द्या  तुमाला काहीच  माहीत  न्हायी. तुमाला सांगून  उपेग  न्हाई.”

आठवडाभर  चर्चा करून  दिपा मॅडमला  संप्याच्या  आईकडून निराशाजनक  व  काहीस  कटू उत्तर  मिळालं  होतं. पण त्याक्षणी  मॅडम  हे ही  जाणून होत्या , की  त्यांना  केवळ शिक्षणाबद्दल  अनास्था असलेली , अशिक्षीत  पालक बोलत  नसून  नवर्याच्या  त्रासाला कंटाळून  गेलेली , पाच  लेकरांच्या  पोटापान्याचा आ  वासून उभा असलेला प्रश्न भेडसावत  असलेली  हतबल आई  बोलत  होती.

    अखेर  परिस्थिति  समोर नाईलाज  झाला  अन प्रथमसत्राचा  पेपर  देवून  संप्या काही  महिन्यांसाठी  आईसोबत ऊसतोडणीसाठी  भटकंती  करत गावोगावी  फिरणार  यावर शिक्कामोर्तब  झालं!!  गरिबीचे निकष  अन्  व्याख्या  तिला सोसणाराच  सांगू  शकतो. इतरांनी  त्यावर  सांगितलेल्या उपाययोजना  केवळ  पुळचट असतात!  शेवटी  आपली आग्रहाची  मूठ दिपा मॅडमने  आणि  संप्यानीपण सैल  केली  .

   शेवटच्या  दिवशी  शाळेतून निघतानां  संप्याने  एक  कोरी चिठ्ठी  मॅडम  कडे सरकवली. “मॅडम  आमच्यासोबत  मावशीपन  येनार  हाय. ह्यावर मला  तुमचा  नंबर  लिहून  द्या. मावशीच्या  फोनवरून  मी  कधी मिसकॉल  केला  तर  करताल   का  मला  फोन?  फक्त मिसकॉल देता  इल  मला. कॉल  केला  अन् फोनमधील  बॅलेन्स  उडाल्याच तिच्या  लक्षात आलं  तर  मारील मला  ती ! म्हणून  मंग….क्षणभर  थांबला  त्या  चिमुकल्या जिवाची  ती  किरकोळ  मागणी किती  आर्त  वाटली  त्याक्षणी! काळीजभर  ओलावा  पेरून  गेली  ती !  नंतर  नोटीस आली . सर्वांना  दिवाळीची  सुट्टीची नोटीस  वाचून  दाखवली. फटाके उडवतांना  घ्यावयाची काळजीबाबत  सांगून  एकमेकांनाह शुभेच्छा  दिल्या. सुट्टीतील  गृहपाठ  सांगितला, तो सुट्टीनंतरच्या  पहिल्याच  दिवशी  तपासलाह जाईल  याची  तंबीही दिली.

   पण  संप्या  येणारच नव्हता. पहिल्या  दिवशी  आणि  त्यानंतर कित्येक  महिने. काय  वाटलं कोणास  ठाऊक ?  मॅडम च्या हातात  आपला  कोवळा  हात दिला  त्याने.  खूप  काही सांगायच  होत , त्या स्पर्शातून .कारण  ते  शब्दात मांडता  येण्याइतकं  वय  नव्हतं त्याचं.

  घंटा  वाजली , शाळा सुटली , मुलं गेली. पर्स , टाचणवही, पाण्याची बाॅटल, हजेरी, खडू, डस्टर  सगळ्या  शैक्षणिक साहित्याची  मॅडम  आवराआवर करू  लागल्या. काहीही  न बोलता  रोजच्या  सवयीप्रमाणे आजही  मॅडमची  बाॅटल  आणि हजेरीची  बॅग  घेवून  तो  पुढे निघाला. बाकीची  सगळी आवराआवर  करून , वर्गाचं  दार बंद  करून  त्याच्या  मागून चालत  त्याच्या  पाठमोर्या आकृतीकडे  बघत  होत्या  मॅडम. एक  उत्कट  ईच्छा  पायाशी तुडवत  कुणाविषयीच ,  कसलीच तक्रार  न  करता  तो  चिमुकला जीव  आपल्या  मनाविरूद्ध जगण्यासाठी  चकारही शब्द  न काढता  निघून  गेला.

     दिवसा आई , बहिणी कामावर  गेल्या  की , कपड्याच्या घड्यांत  लपवुन  ठेवलेली  पुस्तक काढून  वाचायचा. ऊसाच्या त्या चरबट  पानांच्या  सळसळीत त्याच्या  पुस्तकाच्या  पानांचा आवाज  विरून जायचा. भाऊबीजेच्या  दिवशी  दुपारी मॅडमचा  फोन  अचानक  किंचीत चमकला, थरथरला  लगेच  बंद झाला. एखादी  किंकाळी  दाबावी तसा !  Unknown number. ..  नंबरवर  फोन  लावला. रिंग  जाते ना जाते तोच  फोन  उचलला  गेला. एक मृदु , कोवळा, नाजूक, सच्चा  पण  दबका  आवाज …”मॅडम, मी  संप्या!!” ओह!  बोल  रे बाळा.. कसा  आहेस? कुठे आहेस?  दिवाळीत  आलास  का ईकडे??

मॅडम आमी  इकडं  लै लांब आहे . ह्या  गावच  नाव  बी म्हायीत  नायी  मला. सारखंच गाव  बदलत  जातोत  आमी ऊसतोडीला!  मुकादम  लै कडक हाये”

बरं !! मग  दिवाळी  कशी झाली तुझी ? नवा  ड्रेस  घेतला ना ??आईने  काय काय  केलं फराळाला ??

संप्या शांत होता . एक  आवंढा गिळत  म्हणाला , “न्हाई  मॅडम अमास्नी  भाजीसाटीचं  तिकट मिट  आनाया  पनं  पशे न्हाईत  आईजवळ. चार  दिस  झाले आमी  रानातली  कच्ची पात खायलोत  भाकरी  संग. कोरडा घास  गिळतच  न्हाई . मंग  पानी पेतपेत  जेवावं  लागत  हं”. ओह!!  इकडं  मॅडमनी  आवंढा  गिळला. विषय बदलला . “इतं मित्रच न्हाई खेळायला अशोक,गजा,मंगेशची  लै आटवन यती”प्रत्येक  पानाची  पानगळ  अन् प्रत्येक  जन्माची  व्यथा  निराळी असते. त्याची  ती व्यथा केविलवाण्या स्वरात  बोलत होता.

“आत्ता  वह्या  बघत  बसलो व्हतो”

अरे  तिथं  पण  अभ्यास  करतोय का ?  साखर शाळेत  पाठवते का  आई.” न्हायी  मॅडम  शाळेच नाव बी काढू देत न्हायी ती, पन  मी  कपड्यात  लपवून सगळे पुस्तक  आनलेत, आंन. भैनी, आई  कामावर  गेल्या की मी  आब्यास  करतो. व्हयी वरच्या  तुमच्या  सह्या  बघून  लै आटवण  येती , तुमची . शाळा किती  तारखेला भरनारैत मॅडम?”

   शाळेचं  निस्त  नाव  बी  काडलं तरी  आई  जोरात  खेकसून मनती, “काय  दिती  रंग  तुजी  ती  शाळा? असंच  लै  शिकलेला मनू मनू ,नटून,नटू  लगन  केलं व्हतं  तुझ्या  बापा संग  पन  काय झालं? पेताड  निघाला कडू. राकरांगुडी  किली  सार्या संसाराची. आन  तुला  बी  तसंच यडाय . उगं  कामापुरत  शिकायचं  बंग  संप्या. लय  येड न्हायी  व्हयचं  ते  शिकण्यापायी!”  तिचं  ते  बोलन ऐकलं. पर इशय  बदलला “मॅडम,मला  वजाबाकीच  समजना  गेली  वो. सांगता  का समजून?”  तिकडून  कळकळीन विचारला  गेला प्रश्र्न!

संवाद संपला .डोळे मिटून मॅडम विचार करू लागल्या.. जगण्यासाठी आयुष्यात काही अलिखित अटी गुपचूप मान्य केलेल्या असतात.दीर्घ सुट्टी नंतर शाळा भरलेल्या वर्गात हजेरी सुरू झाली.

१)अनिकेत जाधव……यस मॅडम

२)अथर्व शिंदे…यस मॅडम.

३)संपत शहाणे….शांतता

मॅडमनी मान वर करून संप्याच्या डेस्क कडे बघितलं.त्या रिकाम्या डेस्कची जागा खूप काही बोलत होती. त्याचा मंजूळ आवाज.ऊत्तर देण्याची धडपड..शाळा सुटली सगळी मुलं लगबगीने बाहेर पडली. मॅडम ने सामानाची आवराआवर करुन वर्गाला कुलूप लावून त्या घरी जाण्यासाठी गाडीकडे जातच होत्या, तोच एक आवाज आला.कोण हाक मारत आहे हे बघण्यासाठी मागे वळाल्या. एक छोटी मुलगी पळत आली आणि म्हणाली,” तुम्हाला संप्याच्या आईनं बोलिवलंय.”

   संप्याची आई..त्या इथं कस काय?  कधी  आले ते सगळे इकडं?? का बोलावलं असेल ?असे विचारे पर्यंत ती मुलगी पळून गेली.मॅडमला आश्चर्य आणि आनंद वाटला.

     गाडी तशीच संप्याच्या घराकडे वळवली.सगळी मुलं मॅडम आलेल्या म्हणून ओरडू लागले पण त्यात संप्या काही दिसला नाही.मॅडमने गाडी लावली आणि त्या घरासमोर आलेल्या.कुडाच पत्र्याच घर ते! दुरावस्था झालेलं.सगळ भकास,ओसाड, दाराच्या आतं डोकावलं. भयाण शांतता होती.त्या शांततेत घोंघावणार्या माश्यांचा आवाज.जवळच नाल्यांची दुर्गंधी, दारिद्र्याची लक्षण दाखवणारे कवडसे.मागच्या दाराबाहेर खाटेवर दारुच्या नशेत पिऊन बेधुंद अवस्थेत पडलेला संप्याचा बाप,अन् कुठल्याशा कोपरयात गुडघ्यात तोंड खुपसून बसलेली संप्याची  आई !!!

   आत  जाताच,  “संप्या…” हाक मारली. तोच आईने छताकडे बघत मोठ्याने  हंबरडा  फोडला.

“संप्या…..तुझ्या मेडम आल्याररररर! ये कि लवकर….

   काळजात चर्रर्र  झालं!  शंकेची पाल चुकचुकली पण नेमका अंदाज येईना.तोच मागून आवाज आला.”काय सांगावं मेडम…!संप्याचा घात केला हिनं!मा *रून टाकलं ओ त्या बाईनं त्येला!” भोवताली अगणित किंचाळ्या टाहो फोडत घिरट्या घालत असल्यागत झालं एकदम.

   शेजारची म्हतारी बाईजवळ येत म्हणाली.”मीच निरोप धाडला हुता .तुमासनी  बोलिवलं. काय सांगू मेडम ही बया एकट्या संप्याला घरी सोडून ,पोरींना घिवून कामावर गेली.जेवनाच्या सुटीत आली तर लेकरांच्या तोंडातून फेस येत हुता . हातपाय खुडत  व्हता. संप्याला  साप डसला  वो.. लेकरू तडफडून मे*लं!  त्याला  नको  नेवू  म्हणलं तर  मला  म्हणाली  एकुलतं एक हाय चार पोरींच्या  पाठीवर झालंय .म्या  नाय  ठिवनार  हितं अन् संगत  नेलं . इस्वास  नाय  व हिचा . आखीत  गिळून  बसली वो…..” तिचे  शब्द  लाव्हा  सारखे  कानात  ओतल्यागत शिरत  होते  पण  मेंदू  मात्र  थंड पडत  होता. तरी  आवंढा गिळत, जमिनीकडे  खिळलेली   नजर विचलित  न  होऊ  देता विचारलं, “दवाखान्यात  नेलं  नाही  का लवकर?”

    “हिकड  यायला  निघाली  व्हती  पनं  मुकादमानं  यीऊ  दिलं  न्हाई  म्हनं, आदी  घेतलेली वीस  हजाराची  उचल  टाक!  पैकं  नव्हतं  मंग  तितच  कुन्या जानत्याकडं  दावलं . पन दोन दिस  तड*फडत  व्हतं  लेकरू.”

  त्याला  सदान  कदा  यकच मनायची  “काय  दिती  रं  संप्या तुझी  ती  शाळा?” त्येच्या पुसतीकाचा निस्ता रागराग करायची अन् आता रडत बसलीया! म्हतारी  पोटतिडकीने बोलत होती.

आई मात्र शांतपणे छताकडे शुन्यात नजर लावून स्थिर बघत होती.स्वत:च्या लेकराला मा *रल्याचा आरोप तिच्या वर होत होता.मॅडमला आता पुढं काहीच बोलण्यासारखं राहिलेलं नव्हतं हे लक्षात आलं आणि त्या संप्याच्या आईचं सांत्वन न करताच उठून दाराकडे चालू लागल्या.पाषाण ह्रदयाने , नि:शब्द!  तोच मागुन आवाज आला.

मेडममम…. त्यांनी  मागे  वळून पाहिले तर संप्याची आई हाक मारुन बोलत म्हणाली  पाच भुकेली  तोंड  पुसन्या  पलिकड कायबी  करू  नाय  शकले  वो..  मी  उभ्या  आयुष्यात  संप्या असा दगा  दिल  असं  सपनातबी नाय वाटलं. लेकरान  माज्या  दिकत माज्या  मांडीवर हतडफडत  जी*व सोडला .  तेची आठुन  झाली तर  या  दरीद्री मायीकड  तेचा सादा  यक  फोटुबी  नाय. पर आज  तेचं  सामाईन  बघत  हुते तर  यक  गोष्ट  सापडली .तुमाला  मी  जाताना इचारल व्हतं नवं. “तुमची  शाळा  काय  दिती मनुन?”  माझ्या जलमाला  पुरल  अशी  समद्या  मधी  मोठ्ठी आटुन  दिलीया  मला  तुमच्या शाळनं!!! असं  म्हणत  तीने छातीशी  कवटाळलेल्या हातातल्या  मुठीतुन  ऐवज उघडून  मेडमसमोर  धरला. तिच्या  काळजाचं फोलफटासारखं  जगलेल्या . तरीही  माणूस  म्हणून  एका वेगळ्या  उंचीवर असलेल्या  एका शापित  आयुष्याचं, मातीआड झालेल्या  एका  हसर्या  , समंजस, दु:खाणं  भरलेल्या चर्या लेकराचं शाळेने  दिलेलं  ते ओळखपत्र  होतं  ते.!!!

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

1 thought on “मराठी कथा -संप्या ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top