नात्यांचा गोडवा जपणारी अलवार कथा..
आज जयश्रीताईंच्या सुनेची राधाची पहिली मकरसंक्रांत. पहिल्या मकरसंक्रातीला माहेरी जाण्याचा रिवाज असतो. म्हणून जयश्रीताई सुनेला माहेरी देण्यासाठीच्या सगळ्या गोष्टींची अगदी उत्साहाने तयारी करत होत्या. भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या,तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, तिळाची गुळपोळी, तीळवडी, तिळगुळ असे बरेच प्रकार त्यांनी केले होते. सगळी तयारी झाली आणि आता भोगीची भाजी फक्त उरली होती.भोगीची भाजी फोडणीला टाकता टाकताच, त्या नकळत त्यांच्या भूतकाळात गेल्या. एखादा चित्रपट डोळ्यासमोरून हळूहळू पुढे सरकत जावा, तसं त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं.
जयश्रीताईंना आठवलं त्यांचं परकर पोलक्यातलं, बोबड्या बोलातलं गोंडस रुपडं. किती तो उत्साह, संक्रात आली म्हटलं की, नवीन परकर पोलक हवंच.त्यासाठी आजीकडे हट्टही आलाच. मग आजीने एखादं खणाचं छानसं परकर पोलक शिवावं आणि ते छोट्याशा जयुने घालून घरभर मिरवावं.
” तिलगुल घ्या गोल गोल बोला!
आमचे तिलगुल सांन्दू नका
आमच्याशी भांन्दू नका.”

असं म्हणत ती घरभर फिरायची. संक्रांतीदिवशी सकाळी लवकरच आजी तिळ-तांदूळ टाकलेल्या गरम गरम पाण्याने आंघोळ घालायची. नवीन शिवलेलं परकर पोलक, दारातल्याच अबोलीचा गजरा केसांत माळून जयु देवाला आणि थोरा-मोठ्यांना नमस्कार करायची. आणि मगच तिला आजीकडून तिळाची गुळपोळी मिळायची. तिळाची गुळपोळी म्हणजे जयूचा जीव की प्राणच जणू. मकरसंक्रांत म्हणूनच तर आवडायची जयुला. त्या तिळाच्या गुळपोळीची अप्रतिम चव आजही जीभेवर रेंगाळत असल्याचं त्यांना क्षणभर जाणवलं.स्वतःचच बालपण आठवुन जयश्रीताईंच्या चेहऱ्यावर नकळत हसू पसरलं.खरंच किती गोड असतं नाही बालपण अगदी त्या तिळगुळासारखं….
हळूहळू वय वाढू लागलं. जयु आजी आणि आई कडून सगळं काही शिकत होती. जयूचं कौतुक करताना आजी कधीच थकत नसायची.दिसायला अतिशय सुंदर,नाकी डोळी नीटस, लांबसडक काळेभोर केस, उंच सडपातळ बांध्याची जयु पाहता क्षणीच कुणालाही आवडेल अशी आणि अशातच सातारच्या एका तालेवार घराण्यातील स्थळ चालून आलं. लग्न होऊन जयश्रीताई सासरी आल्या. छोटीशी जयु आता सासर घरची सौ.जयश्री माधवराव देशमुख झाली. नव्याचे नऊ दिवस संपले आणि जयश्रीताईंचा संसार सुरू झाला.वय तसं लहानच होतं. तरीही कितीतरी जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या.
जयश्रीताई मुळच्याच सुगरण होत्या पण इतर कामांची त्यांना सवयच नव्हती.अंगण सारवण्यापासून ते चूल पेटवून स्वयंपाक करण्यापर्यंत सगळंच करायला लागायचं. नाही म्हणायला दिमतीला नोकर- चाकर असायचे. तरीही एवढीशी जयु थकून जायची, पण करणार काय आणि सांगणार कोणाला? सासरे थोडे करारी होते, सासूबाईही जरा कडकच होत्या. त्यांना सगळं कसं साग्रसंगीत लागायचं. रुचकर-स्वादिष्ट स्वयंपाक, पूजा-अर्चा, सण-समारंभ, पै-पाहुणे सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे असा त्यांचा दंडक.नवरा सांभाळून घ्यायचा. पण त्यांच आई-वडीलांपुढे जास्त चालायचं नाही. त्यामुळे जयश्रीताई म्हणाव्या अशा संसारात अजून रमल्या नव्हत्या.
हळूहळू पडत, सावरत जयश्रीताईंचा संसार सुरू होता. आणि जयश्रीताईंची पहिली मकरसंक्रांत आली. त्यांच्या सासूबाईंनी सगळी तयारी केली . तिळाच्या पोळ्या, तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि भोगीची भाजी. जयश्रीताईंना काळी चंद्रकला, हलव्याचे दागिने आणि बरंच काही.पहिली मकरसंक्रांत त्यात खूप दिवसांनी माहेरी जायला मिळत होतं, त्यामुळे जयश्रीताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज कामंही अंमळ लवकरच आवरली,असं त्यांना वाटलं. माहेरहून दारातल्याच झाडांचे पेरू, चिकू, सिताफळं, नारळ, केळी आणि आजीच्या हातचे तिळाचे लाडू अन् करंजी असं बरंच काही घेऊन जयश्रीताईंना घ्यायला मुराळी म्हणून त्यांचा भाऊ आलेला.भावाचा पाहुणचार उरकताच जयश्रीताई भावासोबत माहेरी निघाल्या. रस्त्याने जाता-जाता भावाबरोबर सुख- दुःखाच्या गप्पा झाल्या अन् जयश्रीताईंना जरासं हलकं वाटायला लागलं. माहेरी जाण्याच्या ओढीनं की काय ,पण आज जरा जास्तच वेळ लागतोय घरी पोहचायला अशी शंका जयश्रीताईंच्या मनात अनेकदा डोकावून गेली.
माहेरच्या अंगणात पाऊल पडताच, जयश्रीताईंना आजी दिसली आणि त्यांनी आजीला कडकडून मिठी मारली. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.आजीने नऊवारी साडीच्या पदराने त्यांचे डोळे पुसले आणि असं रडू नये जयु बाळा म्हणून समजूत घातली. “आजी मी आता सासरी जाणारच नाही, खूप काम असतं तिथे मला खूप कंटाळा येतो सगळं करायचा” असं म्हणत जयश्रीताई हुंदके देऊन रडतच होत्या. आजीने जयश्रीताईंची कशीतरी समजूत घातली.दुपारची वेळ झाली आणि सगळेच जेवायला बसले. सासर घरी बनेल ते, ताटात येईल ते खाली मान घालून खाणाऱ्या जयश्रीताई मात्र आज भोगीची भाजी पाहून रडायलाच लागल्या.जयश्रीताईंना भोगीची खरंतर आवडत नव्हती. माहेरीही कधी कोणी ती खावी म्हणून आग्रह केला नाही. आज मात्र भोगीच्या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा एक घास भरवत आजी सांगू लागली,
” या भोगीच्या भाजीसारखंच तर असतं स्त्रीचं आयुष्य. न आवडणारी माणसंही सांभाळून घ्यावी लागतात. जसं भोगीच्या भाजीतली न आवडणारी भाजीही इतर भाज्यांबरोबर आवडीने खाल्ली जाते. जयु आता सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील असं नाही बरं, कधी कधी मन दुखावेल, वाईट वाटेल, तरीही या कुटुंबाला बांधून ठेवण्याचे काम आता तुझेच आहे. भोगीच्या भाजीत जशा वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या चवीच्या भाज्या असतात,तशीच स्त्रिच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या ढंगाची अनेक माणसं येतात. कुणाशी पटेल, कुणाशी पटणार नाही, तरीही या सगळ्यांना एकत्रित बांधून तुला नात्यांची भोगी बनवावी लागेल.
आणि त्याचवेळी खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यात तिळगुळाचा गोडवा येईल बाळा.” पहिला घास खाल्ला आणि जयश्रीताईंना चक्क भोगीची भाजी आवडली. संसार म्हटलं की, रुसवे-फुगवे, हेवेदावे आलेच, तरीही सगळ्यांना एकत्रित बांधून कसं ठेवावं हे आजीने अगदी समर्पक शब्दांत जयश्रीताईंना सांगितले.
आज जयश्रीताईंच्या सुनेची राधाची पहिली मकरसंक्रांत. राधा शहरात वाढलेली,उच्चशिक्षित आणि एका मल्टी नॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारी. ती या सणवारांपासून जरा अनभिज्ञच होती. कुठलाही सण समारंभ असो राधा घरी नसायचीच, ती भली आणि तिचं काम भलं.त्यामुळे राधाची पहिली मकरसंक्रांत साजरी करताना जयश्रीताईंना थोडं दडपणच आलं होत. तरीही त्यांनी अगदी उत्साहाने सगळी तयारी केली.गोऱ्यापान राधा वर खुलून दिसेल म्हणून जयश्रीताईंनी मुद्दामच लाल काठाची काळी चंद्रकला राधासाठी घेतली. त्यावर उठून दिसावेत असे लाल हलव्याचे दागिनेही आणले. राधासाठी हे सगळं करत असताना जयश्रीताईंना जणू वयाचाही विसर पडला होता.
जयश्रीताईंना वाटलं,आज आजी असती तर किती बरं झालं असतं? मला सांगितलेली गोष्ट तिने तिच्या नातसुनेला पण सांगितली असती. त्यांनी रात्रीच राधाला साडी दिली होती आणि म्हणाल्या राधा वेळ मिळाला तर घाल हो उद्या. राधाने हलकेच मान हलवली. जयश्रीताईंनी लवकर उठून सगळं आवरलं,तेवढ्यात राधा झालं का आई ? असं म्हणत जवळ आली. एरव्ही मोकळे केस आणि वेस्टर्न कपडे घालणारी राधा आज मस्त साडी नेसून, केसांत गजरा माळून खाली आली. “खूप सुंदर दिसतीयेस राधा” असं म्हणत जयश्रीताईंनी तिच्या कानामागे तीट लावली. राधा म्हणाली आई हे एवढं सगळं करायलाच हवे का?यावर जयश्रीताई हसल्या आणि ‘नात्यांच्या भोगीची’ गोष्ट राधाला सांगू लागल्या.
राधाही भान हरपून सगळं ऐकत होती. गोष्ट संपली आणि राधाने जयश्रीताईंना कडकडून मिठी मारली.आणि म्हणाली “कित्ती गोड आहात आई तुम्ही, अगदी तुमच्या आजीसारख्याच.” लग्न झाल्यापासून गेल्या आठ-नऊ महिन्यांत जयश्रीताईंचं आणि राधाचं कधी विशेष बोलणं झालंच नाही. पण आज राधाने मारलेल्या घट्ट मिठीने ‘शब्दावाचून कळले सारे’ असंच काहीसं झालं. जयश्रीताईं मनोमन सुखावल्या. त्यांनी राधाच्या मकरसंक्रांतीचा जो काही घाट घातला होता त्याला यश आलं. जयश्रीताईंना भरून आलं. त्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या.
तेवढ्यात राधा जयश्रीताईंना भलेमोठे तिळगुळ भरवत म्हणाली,
तिळगुळ घ्या,
गोड गोड बोला.
माझे तिळगुळ सांडू नका.
माझ्याशी भांडू नका.
नात्यांची भोगी साजरी करता करता, सासू-सुनेच्या नात्यातला गोडवा आता अजूनच वाढला
होता, तिळगुळाच्या गोडव्यासारखा…..(Marathi Sankranti Special Story 2024). अश्याच सुंदर कथांसाठी आमचा watsapp channel follow करा.
लेखिका – ॲड. अश्विनी सचिन जगताप.
“सुरेखकन्या” (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईट ला दिली आहे )
तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा….
खरंच छान, विचार बदलवणारी गोष्ट!👍👌तुमचे विचार सकारात्मक विचार करायला लावतातच!!!
Thank you so much 👍
Very nice… Guddi..keep it up..
Thank you 🙏
नात्यानं मधील गोडवा फारच गोड वाटला…. सुंदर लिखाण
Thank you so much 👍
Thank you 🙏
नात्यांची भोगी फारच छान वाटली वाचून अगदी चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
Thank you so much 👍
छान कथा. नात्यांमधला गोडवा छान वर्णन केला आहे.
Thank you 🙏
खूप छान कथा
सुरेख वर्णन केले आहे..