लघुकथा : जून महिन्याचा शेवटचा आठवडा. बाहेर पावसाची रिमझिम सुरु . त्या ओलसर वातावरणात ‘गंधवती पृथ्वी’ या वचनाची प्रचिती येत होती. आजचा पाऊस जणू पृथ्वीची विरहवेदना शांत करण्यासाठीच आला होता.पावसाचा रिमझिम -रिमझिम नाद सुरु होता आणि विजय कॅफेत बसून सिगारेटचे झुरके घेत अस्वस्थपणे कोणाची तरी वाट बघत होता.पावसामुळेच उशीर होत आहे असे वाटून , हातातल्या सिगारेटचे चटकेच त्या पावसाच्या धारांना द्यावेत आणि पूर्ण पाऊसच जाळून टाकावा , असे त्याला क्षणभरासाठी वाटले. वेळ जागीच गोठून गेल्याचा भास झाला. असहाय्यपणे तो कॅफेत सभोवताल येरझाऱ्या मारू लागला.
विजयचे लक्ष कुठेच लागत नव्हते , त्याला फक्त नेहाच्या येण्याचे वेध लागले होते. ‘नेहा’…त्याची एकुलती एक परी…त्याच्या हृदयाचा तुकडा ….त्याचा जीव की प्राण असणारी त्याची लाडकी मुलगी ! नेहा आज मसूरीहून I.A.S. चे ट्रेनिंग पूर्ण करून करून ,तब्बल दीड वर्षांनी आता पुण्यात परतणार होती. बापलेकीचे ऑनलाईन भेटणे -बोलणे होत असले तरी प्रत्यक्ष भेटीची सर ऑनलाईन भेटीला येत नाही.विजय येरझाऱ्या घालत असताना त्याला ,आपल्याला कोणीतरी नजर रोखून पाहत आहे असा भास झाला .पण, ‘आपल्याला असे रोखून बघणारे या जगात उरलेले आहे तरी कोण ?’ असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तिकडे दुर्लक्ष केले.
विजय विचारांच्या तंद्रीत असतानाच , “विजय ” अशी आर्त हाक त्याच्या कानावर पडली. त्याला आवाज ओळखीचा वाटला . मागे वळून पाहतो तर डोळ्यांवर विश्वासच बसेना ! त्याच्यासमोर त्याची वेदना , त्याची कधीच न भरून निघणारी जखम – त्याची एकेकाळची पत्नी जयश्री उभी होती.विजयच्या तोंडाला कोरड पडली,मेंदूने तर जणू काम करणेच बंद केले होते. सगळे बळ एकटवून तो कातर स्वरात म्हणाला, ”जयश्री तू ? तू आणि इथे कशी ?” त्याचा तोल जाताना पाहून जयश्री त्याला आधार देण्यासाठी पुढे झाली पण,त्याने मात्र खुणेनेच तिला दूर केले आणि स्वत:च सावरत मटकन खुर्चीवर बसला. जयश्रीही त्याच्या पुढ्यात बसली. विजय शब्दांची कशीतरी शब्दांची जुळवाजुळव करीत अडखडतच म्हणाला, “इतक्या वर्षांनी सुद्धा तू पटकन ओळखलीस मला…..ते कस?” खाली नजर टाकत जयश्री म्हणाली , “ती सव्वा सहा फूट उंची, चालण्यातली लकब…मी नाही विसरले अजून ! खरंतर तुझ्यापुढे येण्याचे धाडस मला आजवर झाले नाही. यापूर्वी सुद्धा तू दोन वेळा मला दिसलास, पण माझी हिंमत झाली नाही तुझ्या पुढे येण्याची ,आणि कुठल्या तोंडाने मी येणार होती तुझ्या समोर ! पण आज हृदयाने बुद्धीचे ऐकले नाही आणि…..हाक दिली ” टेबल वरचे पाणी घटाघटा विजयने संपवून टाकले आणि त्याला आता घाम फुटला.आजवर झाकलेल्या जखमेवरच्या खपल्या गळून पडल्या आणि जणूकाही भडाभडा त्या रक्त ओकू लागल्या. दोघेही एकमेकांसमोर बसलेले दोन पुतळेच वाटत होते. निस्तब्ध शांतता पसरली. त्याच्या समोर त्याच्या चिंध्या झालेल्या जीवनाचा पंचवीस वर्षापूर्वीचा सगळाच चित्रपट झरझर येऊन गेला .

विजय आणि जयश्रीचे लग्न ठरवूनच ,रितीरिवाजाप्रमाणे झाले होते .विजय एक गरीब पण होतकरू, उमदा , देखणा असा तरुण मुलगा होता. घरी फक्त आई होती. ती सुद्धा नेहमी आजारी असायची. विजय कॉलेजमध्ये अतिशय हुशार मुलगा म्हणून ओळखला जात होता. भरपूर पात्रता असूनही त्याला त्याच्या योग्यतेची नोकरी पुरेसा वशिला नसल्याकारणाने मिळाली नाही . शेवटी त्याने स्वत:चा छोटासा व्यवसाय सुरु केला. जयश्रीचे वडील एका मित्राच्या माध्यमातून विजयला ओळखत होते. त्यांना अगदी विजय सारखाच मुलगा त्यांच्या एकुलत्या एका मुलीसाठी पाहिजे होता. पुढे विजयच्या हुशारीचा उपयोग आपल्या बिजनेस मध्ये करून घेऊ , असा त्यांच्या विचार होता .जयश्रीला सुद्धा तिच्या वडिलांच्या विचार पटला.विजयच्या नम्र, मिलनसार स्वभावामुळे तो तिला आवडला. दोघांचेही लग्नात थाटामाटात पार पडले. दोन वर्षांनी नेहाचा जन्म झाला. विजय आपला व्यवसाय सांभाळून आईचे आजारपणही सांभाळत होता. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित होते, पण हळूहळू जयश्रीला विजयचे कासवाचे बिऱ्हाड नकोसे झाले .तिला सश्याच्या चालीने प्रगती हवी होती .कासवासारखे मंद जीवन तिला नको वाटत होते. तिने अनेकदा विजयच्या मागे हेका लावला की, त्याचा तुटपुंजी मिळकत असलेला व्यवसाय सोडून तिच्या वडिलांच्या बिझनेस त्याने सांभाळावा, पण विजयला मात्र ते पटत नव्हते. जे काही साध्य करायचे ते स्वतःच्या मेहनतीवर , कर्तुत्वावर या विचाराचा तो होता. जयश्रीला तिच्या वडिलांची श्रीमंती, लक्झरी लाईफ खुणावत होते. तिला पै – पै जमवणे आणि संसार करणे पटत नव्हते.
तिला विजयच्या गरिबीचा आता तिटकारा वाटू लागला. एक दिवस तिने विजयला स्पष्टच सांगितले, “तुझ्यासोबत कासवाच्या चालीने मला चालायचं नाही. मला सश्यासारखी दौड लावायचीय आणि प्रगती करायचीय.जर तू माझ्या वडिलांच्या बिझनेस सांभाळणार नाहीस तर मी सांभाळते आणि त्यासाठी मला तुझा संसार सोडून जावं लागेल.” विजय निशब्द, हतबल झाला . काय बोलणार होता तो ! आणि एक दिवस खरोखरच जयश्री विजय आणि नेहाला सोडून तिच्या वडिलांकडे कायमची गेली .वडिलांचा बिझनेस यशस्वीपणे सांभाळू लागली .तिच्या वडिलांचा बिझनेस पार्टनर समीरशी तिचं हळूहळू सूत जमलं आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याच्या निर्णय घेतला. जयश्रीने विजयला घटस्फोट मागितला आणि त्याने त्याने सुद्धा तिच्या इच्छेखातर कोणतेही आढेवेढे न घेता दिला. जयश्रीने नेहाच्या ताबा सुद्धा मागितला नाही. तिची तशी मुलाबाळात अडकण्याची इच्छाच नव्हती. तिला तर तिच्या महत्त्वाकांक्षा खुणावत होत्या. तिला उत्तुंग झेप घ्यायची होती , ते सुद्धा सश्याच्या गतीने ! आता विजय पूर्णपणे एकटा पडला होता. कोलमडून गेला होता. आजारी आई आणि लहानगी, दुधावरची नेहा यांचं करता करता त्याची दमछाक व्हायची. दिवसभर कामवाल्या काकू दोघींचं करायच्या पण रात्री मात्र विजय थकून भागून घरी येत असे घरी आल्यावर दोघींचं करताना मात्र त्याच्या नाकी नऊ यायचे.त्याला जयश्री ची खूप आठवण व्हायची,तो डोळ्यातून आसू पाडायचा आणि पुन्हा आपल्या कर्तव्याला जागायचा . काही वर्षांनी विजयची आई सुद्धा वारली. नेहा आता शाळेत जाऊ लागली होती.
अश्याच नवनवीन कथा वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
निस्तब्ध शांततेच्या भंग करत जयश्रीने विचारले, ” तू इथे कसा ? आणि कोणाची वाट पाहत आहेस ?” त्यावर विजय उत्तरला , “आज माझी मुलगी मसूरीहून I.A.S. चे ट्रेनिंग पूर्ण करून, ऑफिसर बनून पहिल्यांदा परतत आहे.” जयश्री क्वचित किंचाळून ,”माझी मुलगी ? म्हणजे ती माझी मुलगी नाही का विजय? अरे मी जन्म दिला तिला!” “जन्म दिला ?…नुसतं जन्म देण्याने, स्त्री आई बनते काय जयश्री ? अगं माझी दुधावरची मुलगी सोडून तू गेली होतीस ! मी आई झालो तिची ! मी मैत्रीण झालो तिची !आणि मीच बापही झालो तिचा !” जयश्री आगतिकतेने विचारते, “का तू आई झालास तिची? तू सुद्धा माझ्यासारखा दुसरा संसार थाटायला हवा होतास ना ! तू सुद्धा या शहरातील एक यशस्वी उद्योजक म्हणून गणला जातोस.” “दुसरा संसार ? जयश्री खूप प्रेम करत होतो तुझ्यावर ! आता तू दुसऱ्याची आहेस तरीही करतो… तुझी जागा मला कोणाला द्यायची नव्हती, तू शरीराने माझ्याजवळ नव्हतीस पण मनाने मात्र मी तुला दूर सारूच शकलो नाही. तू कधीतरी फिरून येशील… नेहासाठी , माझ्यासाठी.. या खोट्या आशेवर होतो आणि नेहा केव्हा मोठी झाली हे कळलेच नाही. बरं केलस, गेलीस…सश्याची दौड लावलीस. तुझ्या प्रगतीच्या वार्ता अधून मधून कानावर यायच्या माझ्या, आणि प्रसन्न व्हायचो मी ! कारण यासाठीच तर तू माझा त्याग केला होतास ! माझा संसार सोडून गेली होतीस ! माझ्या तारुण्याची हिरवळ जाळली होतीस ! माझ्या लेकराला पोरकं करून गेली होतीस !” विजय तिच्या डोळ्यात भेदकपणे पाहत म्हणाला. “हो, मी धावले सश्याच्या वेगाने ! पण धावताना खूप ठेचा लागतात रे ! सावरायला कोणीच नसतं…रक्तबंबाळ होते…जखम बांधायलाही कोणीच नसतं…. एकटच उठावे लागते…एकटच सावरावं लागते, आणि परत धावावे लागते सश्याच्या गतीने…..या सश्याला मात्र कुठे विसावा घेण्याची परवानगी दैवाने दिलीच…..नाही धावले तर उध्वस्त होणार ……म्हणून सतत धावत असते. पण आता मी पार थकलेय विजय… धावता धावता…” हताशपणे जयश्री म्हणाली. “तेच तर हवं होतं ना तुला ? का बरं तुझे मिस्टर असतील की सक्षम ? का तुला एकटेच धावावे लागते ?”
“तुला सोडून गेल्यावर काही दिवस खूप मजेत गेले, पण माझ्या मिस्टरांना लवकरच ड्रग्सचे व्यसन लागले. ते नशेत तर्र राहू लागले. इतके व्यसन की पूर्ण बिझनेस ची राख रांगोळी झाली. ते सदानकदा नशेत तर्र असतात. दोन मुले आहेत पण ते सुद्धा वडिलांसारखेच निघालेत . मला खूप सहन करावे लागते विजय ! माझ्या पापाची शिक्षा मी भोगत आहे. अनेकदा वाटले ,भेटावे तुला ! तुझे ते कासवाचे बिऱ्हाडच सुखाचे होते .यावं वाटलं मला पुन्हा त्या कासवाच्या बिऱ्हाडात, पण सगळे मार्ग माझ्यासाठी बंद झाले होते. आता सुद्धा मिटिंगसाठी चाललेली आहे. गत्यंतर नाही,जावेच लागेल मला, धावावेच लागते……ऊर फुटेस्तोवर!” जयश्री ने आपली कथा सांगीतली. विजयच्या जीवनात ती गेल्यावर काय – काय घडले,त्याला विचारू लागली, अडवलेल्या पाण्याचा बांध फुटावा तसा तोही घडाघडा बोलू लागला ,“ तू सोडून गेल्यावर आईच्या आग्रहाखातर एकदा विचार सुद्धा केलाहोता लग्नाचा ! प्रियवंदा माझी सहकारी मैत्रीण, परिस्थितीने गांजलेली होती बिचारी. नेहाचा खूप लाड करायची, आईचा ,नेहाचा खूप लोभ करायची, नेहा सुद्धा तिच्या अंगावरची होती. आई वारल्यानंतर तिनेच नेहाचं खूप केलं. नेहाला जेव्हा आईची गरज भासली तेव्हा – तेव्हा तिने पूर्ण केली. आईच्या हट्टा खातर मी प्रियवंदांशी लग्न करणार होतो, पण नशिबाने तिला सुद्धा माझ्यापासून हिरावून नेले. अक्सिडेंट मध्ये ती सुद्धा मला सोडून गेली, तुझ्यासारखीच नेहमीसाठी ! आता मात्र मी निश्चयच केला ,कधीच लग्न न करण्याचा ! मग राहिला माझ्या जीवनाचा एकमेव साक्षीदार ,माझा जीवश्च – कंठ्श्च मित्र – मधुकर ! पण आजारपणाने त्याला ग्रासले त्याला , आणि तोही सोडून गेला एक दिवस मला या जगात एकटा ! आता मी ज्याच्याजवळ माझे मन उघडे करावे, माझ्या जखमा वाहू द्याव्यात, असं कोणीही मला या जगात राहिलेलं नव्हतं.
फक्त माझी नेहाच या जगात माझ्यासाठी आधार आहे. मला जीवनात जी-जी माणसे भेटली ती सर्व मला सोडून जाण्यासाठीच भेटली. प्रथम तू गेलीस, आई गेली, प्रियवंदा गेली, मधुकर गेला, आता मात्र मला खूप भीती वाटते नेहाला गमवायची ती तर जाणार नाही ना! तुझ्यासारखी मला सोडून, असा विचार येतो कधी कधी, झोप लागत नाही,या विचारानेच मी अस्वस्थ होतो, म्हणून मी तुझी सावली सुद्धा नेहावर पडू देणार नाही आणि हो, ती येईलच इतक्यात…. तेव्हा तू ,तिला तुझी ओळख दाखवू नकोस… मी तिला तिची आई लहानपणीच देवाघरी गेली, असे सांगितले आहे. “काय मी मेली असे सांगितलेस तू तिला !” “होय जयश्री , तुझ्या लालसेने,महत्त्वाकांक्षेने माझा संसार होरपळून निघाला. जगाला संघर्ष फक्त स्त्रीचाच दिसतो. आपुलकी , सहानुभूती ही स्त्रीबद्दलच वाटते, पण माझा एकटेपणाचा संघर्ष ? माझ्या भावना ? त्याचं काय ? रथाचा एक चाक निखळल्यावर रथ चालवणे महाकठीण होते जयश्री , पण मी तो रथ हाकला आणि पैलतीरी पोहोचलो . कर्तव्य आणि भावना यांचा संघर्ष सदैव माझ्या मनात सुरू असे, मी एकटा पडलो होतो, सावरणारे कोणीच नव्हते, रडलो, धडपडलो, खूप वेदना झाल्या, पण एकटाच सावरलो. शाळेत जेव्हा सर्व मुलींच्या आया दिसायच्या, तेव्हा घरी आल्यावर नेहा माझ्याशी अबोला धरायची, त्रागा करायची, सण-समारंभ काय असतात ? हे त्या लेकराने पहिले नाही कधी….. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. सांभाळलं तिला मी कसेतरी . आज मी सुद्धा तुझ्यासारखी उत्तुंग भरारी घेतली आहे ,पण सशाच्या नव्हे कासवाच्या चालीने !! काय मिळाले जयश्री तुला शेवटी ? अगं संयमातच आणि समाधानातच आणि तृप्ती असते. संघर्ष आपल्या दोघांच्याही वाटायला आला तो तुझ्या एका निर्णयामुळे .तू केलेला संघर्ष महान की, मी केलेला संघर्ष महान? याचे उत्तर नाही माझ्याजवळ ! मला ते नको . माझ्या नेहाने केलेला संघर्ष खरंच महान आहे. मला नेहाचा भावनिक संघर्ष आणि तिने त्यावर केलेली मात मला खूप मोलाची वाटते.”
“नाही विजय , दोघांच्याही नावात ‘जय’ शब्द जरी असला तरी खऱ्या अर्थाने तूच विजयी झालास ! मी नेहमीच हरत गेले. तूच जिंकलास विजय…शक्य असेल तर मला माफ कर, तुझ्या संघर्षाला मी सलाम करते….आपली कोणतीही चूक नसताना वाट्याला आलेल्या संघर्षावर तू निमूटपणे मात करून दाखविलीस, आम्ही दोघे आई – वडील सोबत असतानाही आमची मुले नालायक निघालीत आणि तू एकटा फक्त वडील असताना तुझी मुलगी कलेक्टर झाली,म्हणूनच तुझा संघर्षच खरा संघर्ष आहे !!!” आगतीकपणे जयश्री कबुली देते. इतक्यात “बाबा” अशी हाक कानावर येते आणि दोघांचेही आवाजाच्या दिशेने लक्ष जाते , जयश्री पाहते तर समोर तिला तिचेच दुसरे प्रतिबिंब जणू उभे असलेले दिसते. न राहवून ती नेहाच्या दिशेने वळते पण विजय तिला मानेनेच नकार देतो. ती स्तब्ध ,निश्चल, हताश, गोठल्यासारखी उभी असते. नेहा कडाडून विजयला मिठी मारते. ‘या बाप लेकीच्या मिठीत जर आपणही असतो तर !!…. आज या सश्याच्या गतीमुळे आपण बाप लेकांच्या मिठी पासून वंचित आहोत, हा विचार तिला स्पर्शून जातो. आपण जीवनाच्या प्रवासात पूर्णपणे आज हरलो आणि विजय चा खरा संघर्ष सार्थ झाला. विजय नावाप्रमाणेच विजयी झाला. जयश्रीचे मन याची ग्वाही देत होते आणि तिच्या डोळ्यातून नकळत गरम अश्रू वाहू लागले आणि बरसणाऱ्या पावसाच्या थंड पाण्यात मिसळून गेले.जयश्रीच्या हातात एक मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी हळूच देत विजय नेहाला गाडीत घेऊन निघून गेला. आज पुन्हा एकदा सश्याच्या शर्यतीत कासव जिंकले होते.रिमझिम बरसणारा पाऊसही पृथ्वीला घटकावर भेटून शांत झाला होता आणि पृथ्वी मात्र पावसाची आता कधीतरी भेट होईल या आशेने , क्वचित शून्य नजरेने पाठमोऱ्या गाडीकडे पाहत होती. तिला आता तिच्या सश्याच्या वेगाची घृणा आली होती
लेखिका -कीर्ती सेलोकर,(बालपांडे ) विनोबा नगर ,तुमसर,जि. भंडारा
(या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईट ला दिली आहे )
खुप खुप सुंदर कथा👌👌👌👌
खूप मस्त👌👌👌
खूप छान👌👌
खुप सुंदर मनाला भिडणारे लिखाण
अतिशय सुंदर कथा…!!!