चैतन्या आणि आकाश Made For Each other जोडपं. दोघं ही एकमेकांची काळजी घेणारं, कडाडून भांडणारं आणि पुन्हा एकत्र येऊन नांदणारं उत्साहाने सळसळणारं जोडपं. तुमचं लव्ह मॅरेज ना ? असं हमखास त्यांना विचारलं जाई. ते हसून हो म्हणत “पण आमची लव्ह स्टोरी जरा वेगळी आहे” असं ही म्हणत.
आकाशच्या ऑफीसमध्ये संध्याकाळी एक छोटीशी पार्टी होती. मोतिया कलरच्या ड्रेसमध्ये चैतन्या आणि रॉयल ब्लू सलवारमध्ये आकाश खुलून दिसत होता. पार्टीमध्ये सगळेच तरुण असल्यामुळे हास्य विनोद रंगला होता. एकमेकांची चेष्टा करता करता सगळ्यांनी आकाश आणि चैतन्याकडे मोर्चा वळवला.अशी काय वेगळी लव्हस्टोरी आहे तुमची हे आज सांगाच म्हणाले.आकाश म्हणाला माझ्यापेक्षा चैतन्याच आमची लव्हस्टोरी छान पद्धतीने सांगेल,हसत हसत आकाशने सूत्रं चैतन्याच्या हातात दिली. चैतन्याही आनंदाने ही लव्हस्टोरी सांगायला सरसावली. एक क्षणभर तिने डोळे मिटले, मोठा श्वास घेतला आणि ती म्हणाली आमची लव्हस्टोरी सांगण्याआधी एक छोटासा प्रसंग सांगते
तर ऐका, संध्याकाळची वेळ होती.त्या छोट्या शहरांतल्या बस स्टॅण्डवर बराच वेळ बसच नसल्यामुळे एका प्लॅटफॉर्मला गर्दी प्रचंड होती. प्रोफेसर चैत्रालीची कार दुरुस्तीला दिल्यामुळे त्यांना आज बसनेची यावं लागलं होतं.खरंतर या कॉलेजला जॉईन झाल्यापासूनच हा रोजचा 30 किलोमीटरचा प्रवास आधी एसटीने आणि डॉक्टरेट पूर्ण झाल्यानंतर कारने करण्यापर्यंत चैत्रालीचा प्रवास होता. आज पुन्हा एकदा खूप वर्षांनी सार्वजनिक वाहतुकीने म्हणजे एसटीने प्रवास चैत्राली करणार होत्या. थंडीचे दिवस असल्यामुळे अंधारही लवकर पडला होता.
गर्दीकडे नजर टाकताना चैत्रालीला सुरुवातीचे दिवस आठवले. खरं तर लहानपणापासून प्रवासाची सवय होतीच आधी शिक्षणासाठी छोट्या गावातून मोठ्या शहराकडे प्रवास करावा लागायचा आणि आता नोकरीसाठी मोठ्या शहरातून छोट्या शहराकडे प्रवास करावा लागतोय. सुरुवातीच्या दिवसात पाण्याची बाटली, डबा दिवसभर लागणा-या काही ना काही वस्तू, पेन, वह्या, पुस्तकं यासाठी एक थोरली मोठी पर्स घेऊन चैत्राली प्रवास करायच्या. व्यवस्थित इस्त्रीचे चुडीदार घालून हा प्रवास करत असल्यामुळे चैत्राली कितीही गर्दीमध्ये पहिला किंवा दुसरा नंबरला बसमध्ये प्रवेश करण्याची सवय होती.
नोकरी आणि नोकरी बरोबरच डॉक्टरेटचा अभ्यास करत करत लवकरच त्या डॉक्टर झाल्या. पगार वाढला.पद मिळालं आणि मग कारनं प्रवास करणं चैत्रालीला सोयीचं वाटायला लागलं. प्रमोशन झाल्यामुळे चैत्राली आता कारनं येताना व्यवस्थित कॉटनची साडी नेसून कॉलेजला निघायच्या. भरगच्च केसांची सैलसर वेणी घातलेली असायची. चेहऱ्यावर कायम मंद स्मित ही असायचंच. आता कामाची जबाबदारी वाढली होती, की रोज लॅपटॉपही कॅरी करावा लागायचा. लॅपटॉपची बॅग,पर्स आणि साडीत आपण कसे बसमध्ये चढणार याची चिंता खरंतर आज त्यांना लागून राहिली होती. खूप वेळ झाला बस ही येत नव्हती. त्यांनी गर्दी वरती नजर टाकली नेहमीप्रमाणे वयस्कर लोक, वयस्कर स्त्रिया, मुलं आणि मुली यांची गर्दी होती. काही महिलांबरोबर लहान मुलंही होती. आता बस येणार कधी ?आणि सगळ्यांना जागा कशी मिळणार ?असा एक प्रश्न चैत्रालीच्या मनात उमटून गेलाच , इतक्यात एक बस त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने आली आणि सगळी गर्दी बसच्या दिशेने उसळली. अगदी पहिला दुसरा नंबरने चढता जरी आलं नाही तरी चैत्रालीने चपळाई करून बसमध्ये प्रवेश मिळवलाच. खिडकीतून बरेच जणांनी बॅगा टाकल्यामुळे चैत्रालीने थेट शेवटची सीट गाठली खिडकीची जागा मिळाल्यानंतर त्यांना जरा बरं वाटलं. लॅपटॉपची बॅग, पर्स पुन्हा एकदा चेक करत त्या थोडयाशा विसावल्या. पर्समधली बाटली काढून घोटभर पाणीही प्यायलानंतर चैत्रालीला जरा बरं वाटलं. खांद्यावरती विसावलेला स्कार्फ व्यवस्थित कानाला गुंडाळून घेईपर्यत मागची सीट सुद्धा पूर्ण भरली होती आणि स्टॅंडिंग मुळे माणसं अंगावर येत होती.
तिच्या शेजारी एक जाडगेला माणूस येऊन बसला त्याच्या पलीकडे एक युवती येऊन बसली. नुकतीच नोकरीला लागलेली ती मुलगी कामानिमित्त या गावात आली होती,परत जाताना थोडासा उशीर झाला होता. थोडीशी भांबावली होती. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ही बस आली होती शिवाय अंधार ही चांगलाच पडला होता त्यामुळे ही बस सोडून दुसऱ्या बसची वाट बघणं तिच्या जीवावर आलं होतं. नाईलाजानं तिने शेवटच्या सीटवरची अवघडलेली जागा स्वीकारली.आपल्या आणि त्या मुलीच्या मधला माणसाची लक्षणं नीट दिसेना हे लक्षात आल्यानंतर चैत्रालीने त्याला म्हटले की “तुम्ही प्लीज पलीकडे जा आणि त्या मुलीला इकडे पाठवा” त्यावर तो निर्लज्जपणे हसत म्हणाला “त्यापेक्षा मॅडम तुम्ही मला खिडकीची जागा द्या की !” एक क्षण चैत्रालीच्या डोक्यात तिडीक गेली. एसटी सुरू झाल्यानंतर खिडकीतून येणाऱ्या झुळुकीने जरा बरं वाटेल असा विचार करूनच तिने ही खिडकीची जागा पटकावली होती. पण त्या मुलीचा चेहरा बघून ती उठली आणि त्या माणसाला खिडकीची जागा दिली.अवघडलेल्या त्या मुलीला हायसं वाटलं , ती मनापासून thanks म्हणाली.
“..आणि ती मुलगी तू होतीस चैतन्या ! बरोबर ना ?
आकाशच्या मित्राने उत्सुकतेने विचारलं.
चैतन्या हसून हो म्हणाली.
तशी आकाशची कलीग रीना म्हणाली,
“अगं पण या कहाणीत आकाश कुठं आहे?”
“अरे हो थांबा जरा ! अजून माझी गोष्ट पुर्ण झाली नाही.”
चैतन्या पुढे सांगायला लागली, आठ दिवसांनी माझ्या बेस्ट फ्रेंडचं, चिनूचं लग्न होतं. तिच्या लग्नासाठी महिनाभर आम्ही खरेदी करत होतो.तिचा घागरा निवडायला आम्ही चार मैत्रीणीनी अख्खं शहर पालथं घातलं होतं . शेवटी छानसा गुलाबी रंगाचा घागरा चिनूला पसंत पडला. चिनू आपल्या निवडीवर प्रचंड खुष होती. लग्नाला दोन दिवस आधी मात्र चिनूचा चेहरा उतरला होता.तिला आम्ही विचारलं “काय झालं ग ?” तिने एक भरजरी जांभळी साडी आमच्या समोर टाकली, म्हणाली घागरा कॅन्सल ,हीच साडी नेसायची आहे, सासुबाईंनी पाठवली आहे. यावर आम्ही मैत्रिणी तावातावाने बोलत होतो ,पण चिनू फक्त रडत होती, घरात कुणीतरी हाक मारल्यामुळे ती रूम मधून निघाली, पण आम्ही कुणी काही बोलणार यांचं promise घेऊनच.
चिनूच्या लग्नात आम्ही सामील झालो, पण तिच्या भोवती सतत नातेवाईक मंडळी आणि सासरच्या बायकांची ये जा होती त्यामुळे आमचं बोलणं झालं नाही.
पण आम्हांला आश्चर्याचा मोठा धक्का बसला जेंव्हा चिनूने तिच्या बॅगेतून गुलाबी घागरा बाहेर काढला. हे कसं झालं ? हा आमच्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्हं चिनूला दिसलं.
खुदकन हसत ती म्हणाली
“मम्मींच्या एका मैत्रिणीने त्यांना व्यवस्थित समजावलं त्यामुळे मम्मी म्हणाल्या साडीऐवजी घागरा वापरला तरी हरकत नाही. शिवाय यापुढे ही कोणताही निर्णय त्या माझ्या वर लादणार नाहीत, असं ही त्यांनी सांगितलं !”
आम्ही सगळ्याच आनंदाने चित्कारलो ! जुई तर म्हणाली सुद्धा “अशी सासू मिळायला पाहिजे बघ!”
चिनू म्हणाली “आता असं म्हणून काही उपयोग नाही हं जुईताई तू ऑलरेडी सासू निवडली आहेस ,लग्न ठरलंय तुझं, आता बोलून काय उपयोग?”
“हो ग !” जुई निःश्वास टाकत नाटकीपणे म्हणाली. “अगं पण त्या आहेत तरी कोण?”
तेवढ्यात एक बाई आत आल्या चिनूशी काहीतरी बोलल्या. त्या दोन मिनिटात त्यांनी चिनूला इतकं छान समजावलं की चिनू टेन्शन फ्री झालीच. त्या लगबगीनं निघून ही गेल्या.
“याच त्या ! मम्मीची मैत्रीण, डॉक्टर प्रोफेसर चैत्राली!!”
चिनूनं हे सांगीतल्यावर एक क्षण मला ही वाटलं की यार ! खरंच सासू असावी तर अशी!
चिनूचं लग्न आनंदात पार पडलं. त्यानंतर चारच दिवसात माझा मामा घरी आला ते स्थळं घेऊनच. मी स्पष्ट सांगितलं होतं की मला अरेंज मॅरेज करायचं नाही, पण सध्या कुणी मला आवडलेला नाही, आवडला तर नक्की सांगेन. पत्रिका बघून कांदेपोहे कार्यक्रम करून मला लग्न करायचं नाही. आई बाबांचा मला पाठींबा होता.माझ्या मनाविरुद्ध ते कोणतेही गोष्ट करणार नव्हते. मनाविरुद्ध लग्नाचा आग्रह तर ते कधीच करणार नाहीत याची ही खात्री होती.पण मग मामाची बडबड हे का ऐकून घेत आहेत हेच मला कळत नव्हतं.
मामाकडे दुर्लक्ष करून मी जॉबवर निघायची तयारी करत होते.मामा, आई बाबा आणि आजीला मुलांचं कौतुक सांगत होता. मुलाच्या कौतुक करून मामाची गाडी आता मुलाच्या आईवर घसरली
“ताई ,भाऊजी तुम्हांला सांगतो इतकी हुशार आणि कर्तृत्ववान आहे ना वरमाय, आपल्या चैतन्याचं खूप कौतुक करेल. प्रोफेसर म्हणून उत्तम काम करतातच पण जुन्या पिढीतल्या बायकांना, नवीन पिढीच्या मुलींना सून म्हणून कसं समजावून घ्यायचं हे ही फार छान समजावून सांगतात, समाजकार्यात कायम पुढे असणा-या डॉ चैत्रालीचा शब्द कुणी खाली पडू देत नाही बरं का !
आता माझे कान टवकारले, हातातली बॅग खाली टाकत मी मामासमोर उभी राहिले. काय नाव म्हणालास त्या बाईंचं ? “डॉ चैत्राली! ”
“कॉमर्स कॉलेजच्या ,इंग्लीशच्या प्रोफेसर डॉ चैत्राली?”
मी अविश्वासाने विचारलं. मामा उत्साहात पुन्हा सुरू झाला
“होय तर त्यांचाच मुलगा ….” मामा पुन्हा मुलांचं कौतुक करण्यात रमला.
मी एकदम म्हटलं “मामा ! मी लग्नाला तयार आहे !”
भूत पाहिल्यासारखं सगळे माझ्याकडे बघत होते. दोन मिनिटांनंतर मीच शांततेचा भंग करत म्हणाले
“मग? मामा कधी जायचं लग्न ठरवायला ?”
आता आई मध्ये पडली “तू ओळखतेस का आकाशला ?”
” कोण आकाश ?”
“तू आत्ता ज्याच्याशी लग्न करायला तयार झालीस तो आकाश”
अच्छा आकाश नाव आहे का त्यांचं!
कुणाला काहीच कळत नव्हतं. पण मामाने स्थळ आणलय आणि मी चक्क हो म्हणतेय हे पाहून भराभर चक्र हलली भेटीगाठी झाल्या. आकाशला भेटल्यावर त्याच्याशी बोलल्यावर तर मा़झा निर्णय पक्का झाला. अर्थात आई बाबा सुद्धा आकाश आणि आकाशच्या परीवाराला भेटून खुश होते. आकाशने होकार दिल्यानंतर आता लग्नाला उशीर करायचा नाही हे सगळ्यांचं एकमतानं ठरलं आणि नवरा नाही तर सासूच्या प्रेमात पडून सुरू झालेली प्रेमकहाणी संपूर्ण झाली.
चैतन्या बोलायची थांबली तशी, सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.आकाशने समाधानाने चैतन्याकडे पाहीलं. चैतन्याही त्याच्याकडे पाहून हसली.
“आणि हो माझ्या या निर्णयाचा गेल्या दोन वर्षांत अजिबात पश्चात्ताप झाला नाही, आकाशने मला उत्तम साथ दिली, माझे सगळे निर्णय मला बेधडक घेऊ दिले, पण डॉ चैत्राली बाहेर जशा वागतात तितक्याच प्रेमळ घरात ही आहेत. सासू नाही एक छान मैत्रीण होऊन त्या माझ्याशी मनमोकळं वागतात. माझ्या मनाचा विचार करतात. कुठलाही निर्णय चर्चा करून फायनल होतो, त्यात माझ्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट मला करावी लागत नाही. मला वाटतं की आजच्या प्रत्येक मुलीला अशीच सासू हवी !”
पार्टीत संपून घरी जाताना प्रत्येकाच्या मनात चैतन्या आणि तिच्या सासूचाच विचार होता, तर आकाश बरोबर कारने घरी जाताना चैतन्या , विचारात रमली चिनू सारखी कितीतरी उदाहरणं आजही समाजात पहायला मिळतात. सुशिक्षित घरातून ही आज सुनेला मोकळीक नसते. हेच केलं पाहिजे, असे कपडे नको, मॉडर्न कपडे वापरायचे नाही, बाहेरून जेवण मागवायचं नाही,एक ना दोन किती बंधनं ? आज कितीतरी जणीं यामुळे लग्नच नाकारतात. मी सुद्धा स्वातंत्र्य गमवायला तयार नव्हतेच की ! पण डॉ चैत्राली आयुष्यात आली आणि क्षणार्धात आपलं आयुष्यच बदललं. डॉ चैत्राली! हो ! हीच ओळख योग्य आहे. सून, मुलगा, पती याआधी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्या प्रत्येकाचा आदर करतात. त्यामुळे त्यांची स्वतःची एक ओळख आहे.
सहजपणाने त्या नव्या पिढीशी स्वतः ला जोडून घेतात. नव्या पिढीला नावं न ठेवता त्यांना समजावून घेणं इतकं अवघड असतं का ?
“अवघड नसतं हो मॅडम,पण समाजात काही बदल हळूहळू घडतात”
तिचा चेहरा वाचून आकाशने तिच्या मनातलं बरोबर ओळखलं होतं.
चैतन्या हसून म्हणाली
“Okay! आता जरा speed ने जाऊया का ? मला माझ्या सासुला, नाही नाही माझ्या जीवाभावाच्या मैत्रीणीलाच पार्टी कशी झाली हे सांगायचं आहे, !” (Marathi Short Story)
लेखिका – माधुरी केस्तीकर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
वा! मस्त👌👌
Thank you राधिका Maam 😊
छान