पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने जाग आली. क्षणभर मी कुठे आहे तेच समजेना.
काल संध्याकाळीच मी माझा असिस्टंट, कुणालबरोबर खंडाळ्याच्या एका आलिशान फार्महाऊसवर आलो होतो. मराठी सिनेजगतातील एक अतिशय सुप्रसिद्ध तारका, कांचन, कुणालच्या चांगलीच परिचयाची होती. हे तिचंच फार्महाऊस होतं. कांचन या क्षेत्रात येण्यापूर्वी, ती आणि कुणाल, पुण्याला जिमखान्यावर एकाच सोसायटीत रहात होते. नंतर कुणाल कोथरुडला आणि ती जुहूला शिफ्ट झाली होती.
अरे हो! माझी ओळख करुन द्यायची राहिलीच. मी श्रीनिवास, विनय वगैरे बाजूला ठेऊन सांगायचं झालं, तर एक बऱ्यापैकी नाव कमावलेला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह..गुप्तहेर.
नुकतीच कांचनची एक फिल्म सुपरहिट झाली होती. त्यानिमित्त तिने तिच्या जुन्या दोस्तमंडळींना खंडाळ्याच्या फार्महाऊसवर सेलिब्रेशनसाठी बोलावलं होतं. कुणालकडून माझ्याबद्दल तिने थोडंफार ऐकलं होतं. ज्या अवघड केसेस, मी आणि अर्थात कुणालनेही अगदी यशस्वीरित्या सोडवल्या होत्या, त्या सगळ्या केसेसचे किस्से माझ्याकडून ऐकण्यासाठी तिने मलाही आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं. रोजच्या व्यस्त रुटीनमधला हा अनपेक्षित सुखद बदल मलाही इंटरेस्टिंग वाटला, म्हणूनच माझी कांचनशी फारशी ओळख नसतानाही मी हे आमंत्रण स्वीकारलं होतं. दुसरं असं, माझी अशी पक्की धारणा आहे, खुल्या वातावरणात आपल्या मनाची कवाडंही उघडतात. ‘पॅरॅशूट वर्कस्, ओनली व्हेन इट ईज ओपन’. त्यामुळे उत्तम मानसिक आरोग्यासाठी मधूनमधून निसर्गाच्या सान्निध्यात जरुर जावं.
काल रात्री हवेतला गारवा वाढल्यामुळे मी खिडकी लावून घेतली होती. ती आत्ता उघडली आणि..ओहोहो! समोरचा अतिसुंदर देखावा मी मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिलो. सगळ्या आसमंतावर दाट धुक्याचं आवरण पसरलं होतं. खिडकीच्या बाहेरच नीट निगा राखलेली, मखमली हिरवळ होती. त्यावर सूर्याच्या कोवळ्या, उबदार किरणांनी चमकणारे दवबिंदू, त्यावर बागडणारी फुलपाखरं,सगळंच कमाल दिसत होतं. काही अंतरावर असलेली खोल दरी काल संध्याकाळी बघितली होती म्हणून, नाहीतर त्यावर धुक्याचा इतका जाड पडदा होता की सहज त्यावरुन चालत कोणीही जाऊ शकलं असतं. लॉनच्या मध्यभागीच अतिशय देखणा, छोटासा स्विमिंगपूल होता.
तेवढ्यात कुणाल रुममध्ये डोकावून म्हणाला,
“गुडमॉर्निंग सर! तुमचं आवरुन झालं की पूलजवळ याल का? कांचनने सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी तिथेच जमायला सांगितलंय.”
“येस बॉस! चल, लगेचच जाऊ. काल खूप दिवसांनी मस्त, गाढ झोप लागली होती. कुठल्या केसचा विचार नाही, आजूबाजूची नीरव शांतता, आल्हाददायक वाऱ्याच्या झुळूका..कुणाल, तू आग्रह केलास म्हणून अश्या स्वर्गीय वातावरणाचा लाभ घेता आला.”
“सर, मी दोन-तीन वेळा इथे आलो होतो. त्यामुळेच तुम्हाला ही जागा खूप आवडेल याची मला खात्री होती.”
हे असं बोलत-बोलतच आम्ही स्विमिंगपूलपाशी पोचलो. तोपर्यंत बाकीची मंडळी तिथे जमली होती. काल संध्याकाळी आलो तेव्हा जुजबी ओळख झाली होती. कुणालसकट हे सगळे फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी. रोमा, श्रिया, सिध्दार्थ, कांचन आणि कुणाल असा हा पाच जणांचा ग्रुप. कांचन तर सेलिब्रेटीच झाली होती. पण कुणाल सोडून बाकी तिघेही अभिनयक्षेत्रातच चमकत होते. कुणालने एका डिटेक्टिव्ह टीव्ही सिरिअलमध्ये काम केलं होतं आणि त्यानंतर त्याला अचानक हे क्षेत्र चॅलेंजिंग वाटायला लागलं होतं.
मी पण कोथरुडकर. तिथल्याच बागेत जॉगिंगसाठी मी नियमित जातो. तेव्हा योगायोगाने आमची भेट झाली. तो माझा असिस्टंट म्हणून रुजू झाला आणि वयाचं अंतर झुगारुन, अल्पावधीतच त्याच्याशिवाय माझं पान हलेनासं झालं. चिकाटी, चाणाक्षपणा, कायम ‘ऑन द टोज्’ असण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका इशाऱ्यावर, मला कोणती ऍक्शन अपेक्षित आहे, हे लगेच ध्यानात येण्याचा गुण, या सगळया गोष्टींमुळे तो माझा अगदी उजवा हात बनला होता. तो मला ‘सर’ म्हणत असला तरी त्यापलिकडच्या स्नेहबंधात आम्ही बांधले गेलो होतो.
कांचन आम्हाला बघून अगदी मधाळ हास्य करत म्हणाली, “सुप्रभात! सर, झोप कशी लागली? काही गैरसोय वगैरे नाही ना? आमचा इथला केअरटेकर, संतोष आणि त्याची बायको, रजनी सगळी व्यवस्था तशी एकदम चोख ठेवतात. पण तरी एखादी गोष्ट राहून जाऊ शकते.”
“खरंच सगळी व्यवस्था राजेशाही आहे. मी स्वर्गात वावरतोय असाच फील येतोय मला. नाहीतरी, तुमच्यासारख्या अप्सरा वावरत आहेतच आजूबाजूला.” माझ्या या विधानावर त्या तिघीही अगदी मनापासून लाजल्या.
हसतखेळत आमचा ब्रेकफास्ट चालला होता. रोमा टेबलवर ठेवलेला कॉफीचा मग घेत होती तेव्हा सहज माझं लक्ष तिच्या ब्रेसलेटकडे गेलं. तिचं पूर्ण नाव छोट्या खड्यांच्या सहाय्याने, इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. रोमामधल्या ‘ओ’ च्या जागी एक लाल बदामाच्या आकाराचा मोठा खडा होता. गळ्यात बदाम, कानातही छोटे बदामच होते.
मी गंमतीने म्हंटलं, “हे इमोजीज् आता आपल्या जगण्याचा एक भाग बनले आहेत, नाही?”
यावर कुणाल म्हणाला, “सर, रोमाची ती एक सवय आहे. टाईप करताना जिथे ‘ओ’ हे अल्फाबेट येतं, तिथे ती हार्टचा इमोजीच टाकते. तिच्या सगळ्या पर्सनल गोष्टींमध्ये हार्टशेपचंच काहीतरी डिझाईन असतं. आम्ही तिची यावरुन खूप चेष्टा करतो; पण तिचं बदामाचं वेड काही कमी होत नाही.”
रोमा म्हणाली, “सर, थोडासा वेडेपणा जगण्यासाठी आवश्यक असतो का नाही, तुम्हीच सांगा.”
“हो तर, मी स्वतःही तसाच आहे.”
या विधानाला सगळ्यांनीच दिलखुलास हसून दाद दिली. एकीकडे आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या. दुसरीकडे खाणंही भरपेट चालू होतं. मधूनच संभाषणाची गाडी, सध्या वाढलेली गुन्हे*गारी या विषयावर येऊन थांबली. कांचन विचारायला लागली, “सर, असं म्हणतात की कुठलाही गुन्हे*गार काहीतरी पुरावा मागे ठेवतोच आणि हमखास पकडला जातो. म्हणजे सगळे गु*न्हे उघडकीस येतात?”
“नाही, छडा न लागलेले कितीतरी गु*न्हे असतात. सबळ पुराव्याअभावी गुन्हे*गार नाही पकडला जात. कायद्याच्या मर्यादा तिथे आड येतात. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं, मनाचं जे न्यायालय आहे तिथून त्याची सुटका नसते. असं म्हणतात, पापाच्या सावल्या लांब असतात. त्यामुळे अगदी निर्ढावलेला गुन्हे*गार असला तरी भूतकाळातील या सावल्या त्याला वर्तमान किंवा भविष्यात हमखास भेडसावतात.”
अचानक श्रिया गंभीरपणे म्हणाली, “सर, मी एक खू*न होताना बघितला आहे.”
“काय? कुठे आणि कधी?” मी आश्चर्याने जवळजवळ ओरडलोच.
त्याहून आश्चर्य म्हणजे बाकीचे सगळे हसत होते. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून कुणाल म्हणाला, “सर, तुम्ही श्रियाचं हे बोलणं अजिबात मनावर घेऊ नका. सध्या तिने अभिनयाबरोबरच स्क्रिप्ट रायटिंगपण सुरु केलंय. हा तिचा नेहमीचा फंडा झालाय. खूप गंभीरपणे एखादा प्रसंग सांगायचा, मग आम्ही त्यावर काहीतरी प्रतिक्रिया, एखादं सोल्यूशन दिलं की हसतंच विचारायचं, ‘कसा होता प्लॉट?’ आत्ताही तिला एखादा प्लॉट सुचला असणार.” सिध्दार्थपण कुणालला दुजोरा देत म्हणाला,
“अगदी बरोबर, आपली एवढी चर्चा ऐकून तिला हा खु*नाचा प्लॉट सुचला असणार. त्या प्लॉटमध्ये जी लूपहोल्स असतील ती नेमकी हेरुन तुम्ही सुधारणा सांगणार, अशी खात्री तिला वाटत असणार. काय श्रिया? बरोबर ना?”
श्रिया मात्र अगदी सात्विक संतापाने म्हणाली,
“अरे यार, कधीतरी माझं बोलणं गांभीर्याने घ्या. मी कुठलाही प्लॉट सांगत नाहीये. चार महिन्यांपूर्वी, पंधरा ऑगस्टला, रात्री साडेबाराच्या सुमारास, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला इथल्या दरीत ढकलून दिलेलं मी स्वतः पाहिलंय.”
कांचन तिला म्हणाली, “हो? मग इतके दिवस का गप्प राहिलीस? कोण होत्या त्या दोन व्यक्ती?” पंधरा ऑगस्टला तर आपण दोघीच होतो इथे. आपल्या व्यतिरिक्त संतोष आणि रजनीच फक्त होते इथे. जर आपण चौघंही जिवंत आहोत तर खू*न कोणाचा झालाय? चार महिन्यांत या खु*नाचा, कोणालाच पत्ता लागला नाही असं म्हणायचंय तुला?”
तिच्या बोलण्यात तथ्य असलं तरी श्रिया इतकं खोटं बोलत असेल, तेसुध्दा माझ्यासमोर, असं मला नाही वाटलं.
मी तिला म्हणालो, “काय घडलं होतं ते सगळं नीट सांग बघू. अगदी छोटीशी गोष्टही वगळू नको.”
ती सांगायला लागली, “सतरा ऑगस्टपासून कांचनच्या एका बिग बजेट फिल्मचं शूटिंग सुरु होणार होतं. पुढचे तीन-चार महिने अजिबात सुट्टी मिळणार नव्हती; म्हणून दोन दिवस छान आराम करावा, यासाठी आम्ही दोघी चौदा तारखेला इथे आलो होतो.
बाकी ग्रुपमधल्या कोणाला जमणार नव्हतं. पंधराला रात्री बाराच्या सुमारास पावसाची एक सर येऊन गेली होती. मी जागीच होते.
ओल्या मातीचा छान सुवास येत होता; म्हणून बाहेर येऊन थांबले होते. तेवढ्यात दरीच्या दिशेने कसलातरी आवाज ऐकू आला म्हणून मी निरखून बघितलं. तेव्हा दोन आकृत्या मला तिथे दिसल्या. स्त्री का पुरुष ते लांबून ओळखता येत नव्हतं. खूप अंधार असल्यामुळे नुसत्या बाह्याकृती दिसत होत्या. त्या व्यक्ती एकमेकांशी झटापट करत होत्या आणि अचानक एकाने दुसऱ्याला दरीत ढकललं. मी इतकी घाबरले होते की तशीच माझ्या रुममधे पळाले. दुसऱ्या दिवशी कांचन भेटल्यावर तिला विचारणार होते; पण कांचननेच मला पहाटे उठवलं होतं. तिचं शूटिंग एक दिवस प्रीपोन झालं होतं, त्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागणार होतं. जाताना गाडीत तिला सतत फोनकॉल्स येत होते.
मधूनमधून तिचं स्क्रिप्टवाचन चालू होतं. शेड्युल बदलल्यामुळे तिची तारांबळ उडाली होती. मग तिला या बाबतीत काही विचारायचं राहून गेलं. दोन दिवसांनी, आपण पाहिलं होतं ते खरं घडलं होतं का, याची मलाच खात्री वाटेना, कारण आम्ही दोघी आणि संतोष, रजनी यांच्याशिवाय तिथे कोणी नव्हतंच. कांचन शूटिंगमध्ये बिझी होती आणि बाकी ग्रुपमधल्या कोणाला सांगावं तर त्यांची रिऍक्शन तुम्ही आत्ता बघितलीच. त्यामुळे मी गप्प राहिले. आत्ता इथे आल्यावर परत तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला आणि इतके दिवस जे गुपित सांभाळलं होतं ते मी तुम्हाला सांगून टाकलं.”
मी हे ऐकून चांगलाच गंभीर झालो होतो. ही हसण्यावारी नेण्याची बाब नव्हती.
मी लगेचच तिथून उठलो आणि रुमवर येऊन जुहू पोलीस स्टेशनचे हेड, इन्स्पेक्टर भोसले यांना कॉल केला. मुंबईला एका सेमिनारच्या वेळी आमची ओळख झाली होती आणि छान मैत्रीही जमली होती. कुणालकडून कांचनचा पत्ता घेतला होता, तो त्यांना देऊन तिच्या घरी रेग्युलरली येणाऱ्या व्यक्तींची माहिती काढायला सांगितली. पंधरा ऑगस्टनंतर अचानक कोणाचं येणं बंद झालंय का, याची मुख्यत्वे चौकशी करायला सांगितली. मग मी संतोषला जाऊन भेटलो. त्याच्याकडून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला समजली. इथे काहीतरी पाणी नक्कीच मुरत होतं.श्रियाच्या त्या सनसनाटी विधानानंतर एकूणच वातावरण जरा गंभीर बनलं होतं. इथे येण्यामागचं जे प्रयोजन होतं त्याचा मागमूसही राहिला नव्हता. सगळे जरा गप्प-गप्प राहून आपापले उद्योग करत होते.
रात्री साधारण अकराच्या सुमारास मी हॉलमध्ये वाचत बसलो होतो. कुणाल तिथे येऊन बसला आणि मला म्हणाला, “सर, तुम्हाला खरंच असं वाटतं की इथे खू*न झालाय? भोसलेसरांकडून काही समजलं?”
“अजून नाही; पण उद्या सकाळपर्यंत नक्कीच काहीतरी समजेल.”
एवढ्यात कुणालचं लक्ष समोरच्या सोफ्यावर असलेल्या मोबाईलकडे गेलं आणि तो आश्चर्याने म्हणाला, “अरे! सिध्दार्थचा मोबाईल इथे? तो कुठे दिसला तर सांगितलं पाहिजे त्याला; नाहीतर शोधत बसेल.”
कुणाल निघून गेल्यावर पाच मिनिटांत मी पण उठलो. वरती रुममधे गेल्यावर आठवलं, जॅकेट खालीच हॉलमध्ये राहिलं होतं. मी ते आणायला खाली गेलो. सहज सोफ्याकडे लक्ष गेलं तर सिध्दार्थचा मोबाईल आता तिथे नव्हता. मला जरा आश्चर्य वाटलं, एवढ्यात कोणी उचलला असेल? अर्थात सगळी घरची मंडळीच होती, त्यामुळे तशी काळजी नव्हती.
दुसऱ्या दिवशी पहाटे मला साडेचारलाच जाग आली. प्रयत्न करुनही पुन्हा झोप येईना, तेव्हा मी माझं आवरुन बाहेर एक रपेट मारुन यायचं ठरवलं. बाहेर अक्षरशः बेधुंद करणारं वातावरण होतं. स्विमिंगपूलजवळ असलेल्या प्रशस्त चेंजिंग रुमच्या समोरुन जाताना अंधूक प्रकाशामुळे मी कशालातरी अडखळलो. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात बघितलं आणि नखशिखांत हादरलो. ती श्रिया होती आणि मृतावस्थेत होती. कोणीतरी गळा आ*वळून तिचा खू*न केल्याचं सकृतदर्शनी तरी दिसत होतं. मी ताबडतोब कुणालला फोन लावून इथले जवळचे जे डॉक्टर असतील त्यांना घेऊन यायला सांगितलं. माझ्या स्वरातील निकड ओळखून त्यानेही मला एक प्रश्नही विचारला नाही. मी खंडाळा पोलीस स्टेशनचा नंबर शोधून तिथे या खु*नाची बातमी दिली. त्यांची टीम कुठल्याही क्षणी येऊन थडकणार होती.
आता तर माझी खात्रीच पटली होती, इथे आधी पण एक खू*न नक्की झाला होता. श्रियाच्या कालच्या विधानानंतर लगेच तिचा खू*न, याचा अर्थ खु*नी पण आत्ता इथेच आहे? कांचन? ती असू शकेल यामागे?
एक गु*न्हा लपवायला दुसरा? ती इतकं भयंकर कृत्य करण्याएवढी निर्ढावलेली आहे?
मला डिटेक्टिव्ह एजन्सी सुरु करुन पंचवीस वर्षं झाली होती. त्यामुळे मुखवट्यामागचा खरा चेहरा किती भयानक असू शकतो हे मी चांगलंच जाणून होतो. पण खुनामागचं मोटिव्ह काय ते शोधावंच लागणार होतं. माझं विचारचक्र चालू असतानाच कुणाल डॉक्टरांना घेऊन आला. समोरचं दृश्य बघून त्याला कमालीचा धक्का बसला. मी त्याला धीर देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण व्यर्थ! कुणालने माझ्याबरोबर कामाला सुरुवात केली होती त्याला सहा वर्षं होऊन गेली होती. त्यामुळे मृत्यू आमच्या परिचयाचा असला तरी ही वेळ सर्वथा वेगळी होती.
सावरायला वेळ तर लागणारच. तोपर्यंत डॉक्टरांनी श्रियाला तपासून तिला मृत घोषित केलं. तेवढ्यात इन्स्पेक्टर कदम आणि त्यांची टीम पण तिथे आली. त्यांचं रुटीन तपासकाम चालू असतानाच मी कदमांच्या परवानगीने माझंही निरीक्षण चालू ठेवलं होतं. अचानक, श्रियाच्या हाताखाली दबला गेलेला तिचा मोबाईल मला दिसला, आणि अजून एक गोष्ट सापडली.
मी दोन्ही माझ्या जॅकेटच्या खिशात ठेवलं. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट कदम मला दुपारपर्यंत देणार होते. त्यांना इथल्या सगळ्या मंडळींचे जबाब घ्यायचे होते. कुणालने तोपर्यंत सगळ्यांना या घटनेची खबर दिली होती. सगळे आले तेच अगदी हवालदिल होऊन. कांचन तर सतत हातातल्या रुमालाला डोळे पुसत होती. बोलूनचालून ती कसलेली अभिनेत्री होती, त्यामुळे कितपत विश्वास ठेवायचा त्याबद्दल शंकाच होती. सगळे सोपस्कार होऊन कदम आणि टीम जाईपर्यंत चांगलंच उजाडलं होतं. आम्ही परत आपापल्या रुमवर गेलो. कोणी बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हतंच.
मी खोलीत आल्यावर लगेच श्रियाचा मोबाईल चालू केला. सुदैवाने तो पासवर्ड प्रोटेक्टेड नव्हता. त्यातला शेवटचा मेसेज वाचताना माझे डोळे विस्फारले गेले. मी लगेच भोसल्यांना कॉल केला. त्यांनी तर झकास कामगिरी बजावली होती. आता एकेक दुवा सांधला गेला होता. फक्त पहिल्या खु*नाचा हेतू मात्र समजत नव्हता.असो, तो आता खु*न्याच्या तोंडूनच वदवून घेता आला असता.
मी कुणालला सांगून सगळ्यांना स्विमिंगपूलपाशी जमायला सांगितलं. मी तिथे पोचलो तेव्हा सगळे सुन्न होऊन बसलेले होते. काल सकाळी असेच आम्ही जमलो होतो, फक्त त्यात श्रिया होती.मी माझ्या नेहमीच्या नाट्यमय पद्धतीने खु*न्याला उजेडात आणणार होतो.
मी बोलायला सुरुवात केली, “दोन मैत्रिणी, एक खूप बडी, दुसरी अतिसामान्य. दुसरीचा पहिलीकडे सारखा हट्ट, ‘मला मदत कर, मला तुझ्यासारखंच मोठं बनायचं आहे. एक दिवस, पहिली तिला मदत करतेही; पण दुसरीचं काय बिनसतं माहिती नाही, ती पहिलीला जाब विचारायला येते. दोघींची तिथे बाचाबाची होते आणि पहिली दुसरीला दरीत ढकलून देते…”
“नाही,” अचानक कांचन ओरडून म्हणाली,
” ढकलून नाही दिलं, झटापटीत तिचा तोल जाऊन ती पडली.”
हे ऐकून बाकीचे सगळे अवाक झाले होते.कांचन आता तंद्रीत बोलावं तसं बोलायला लागली, “सुरेखा, माझी कामवाली. वय जेमतेम बावीस-तेवीस. दिसायला नावाप्रमाणेच सुरेख. बारावीपर्यंत शिकलेली होती. भाषा शुद्ध, चारचौघात वावरणं वगैरे एकदम मॅनर्ड. ती अनाथ होती आणि रहायची पण माझ्याकडेच.
ती सतत माझ्या मागे लागली होती, ‘ताई, मला पण सिरिअलमध्ये, पिक्चरमध्ये काम करायचं आहे. तुमच्या ओळखीने द्या की काम.’ मी तिला खूप समजावलं होतं की, वरवर पहाणाऱ्याला फक्त या क्षेत्रातलं ग्लॅमर आणि पैसा दिसतो. त्यामागची कठोर मेहनत, कराव्या लागणाऱ्या तडजोडी दिसत नाहीत. पण ती हटूनच बसली होती. शेवटी एका प्रोड्युसरला फोन केला आणि सुरेखाची तेरा ऑगस्टची अपॉईंटमेंट घेतली. मला मात्र तिच्याबरोबर जायला जमणार नव्हतं. ती रात्री उशिरापर्यंत आली नाही म्हणून मी तिला कॉल केला. ती फोनवर फक्त ‘उद्या भेटते’ एवढंच बोलली. तिला मी खंडाळ्याला जाणार असल्याचं सांगितलं; पण तिने न बोलता फोन ठेवलाच.
चौदाला मी आणि श्रिया इकडे आलो होतो. पंधराला रात्री सव्वाबाराच्या सुमारास तिचा अचानक फोन आला आणि तिने मला पूलपाशी यायला सांगितलं. ती इथे आल्याचं बघून मला प्रचंड आश्चर्य वाटलं. मी तिच्याजवळ पोचते न पोचते तोच ती एकदम माझ्या अंगावर धावून आली आणि एकेरी, शिवराळ भाषेत जोरजोरात बोलायला लागली. मला काही समजेनाच.
तिच्या एकंदर बडबडीतून मग मला समजलं, त्या प्रोड्युसरने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. तिचा आरोप होता, की मी मुद्दाम तिला त्याच्याकडे पाठवलं होतं. ‘कास्टिंग काऊच’ ही या क्षेत्राला लागलेली कीड आहे. सगळ्यांना याचा सामना करावाच लागतो. त्यासाठी आपण खंबीर आणि आपल्या मतांशी ठाम असणं फार गरजेचं असतं. ती मात्र फार बेफाम झाली होती. तेव्हा झालेल्या झटापटीत तिचा पाय घसरुन ती दरीत कोसळली. मी पार सुन्न झाले होते. याची खबर पोलिसांत द्यावी तर माझ्यावर त्यांचा विश्वास बसला नसता. दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरु होणार होतं, ते थांबवावं लागलं असतं. माझं पूर्ण करिअर, न केलेल्या गु*न्ह्यासाठी मी पणाला लावू शकत नव्हते. त्यामुळे मी गप्पच राहिले. शिवाय ती इथे आल्याचं कोणाला समजलं नव्हतं. निदान कालपर्यंत मला असंच वाटत होतं. अचानक श्रिया जे बोलली, त्याने मी हादरुन गेले होते. वरकरणी तिचं म्हणणं उडवून लावलं असलं तरी मी खरंच घाबरले होते.”
“अच्छा! म्हणून तू माझ्या श्रियाचा खू*न केलास.” असं बोलत सिध्दार्थ कांचनच्या अंगावर धावून गेला.
“नाही, नाही, मी तिला मारलं नाही. तुमचं दोघांचं प्रेम होतं ही आमच्यासाठी न्यूज आहे. तुम्ही कधीच ते दर्शवलं नाहीत;
पण मी नाही तिचा खू*न केला.”
रोमा मध्येच म्हणाली, “आता एवढं सगळं सांगितल्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का तुझ्यावर? तू श्रियाचा खू*न केला नाहीस तर मग कोणी केला?”
“तू केलास रोमा.” मी अगदी थंड स्वरात म्हणालो.
एकापुढे एक बसणाऱ्या धक्क्यांमुळे सगळे पार जमीनदोस्त झाले होते.
कुणाल कसाबसा बोलला, “सर, हे काय चाललं आहे? सगळया आकलनापलिकडच्या गोष्टी आहेत.”
“थांबा, सांगतो सगळं. आज भोसल्यांशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी सुरेखाबद्दल मला सांगितलं. कांचनच्या कॉम्प्लेक्सच्या वॉचमनने ही माहिती भोसल्यांना दिली. ‘चौदा तारखेपासून ती गावाकडे परत गेल्याचं कांचन मॅडमनी सांगितलं’ अशी माहिती त्याने दिली. काल संतोषने पण सांगितलं, ‘त्या रात्री बाराच्या सुमारास एक बाई मॅडमना भेटायला आली होती. नंतर पाऊस सुरु झाला म्हणून तो आत जाऊन झोपला.’ पुढे काय झालं त्याला कळलं नाही; पण कांचनला तिकडे जाताना त्याने पाहिलं होतं. मग पुढे काय झालं असावं, तो माझा अंदाज होता. फक्त त्यामागचं कारण मला माहित नव्हतं, ते आत्ता कांचननेच सांगितलं.
आज पहाटे श्रियाचा खू*न झालेला बघून, मला कांचनचाच संशय आला; पण श्रियाच्या मोबाईलमधले सिध्दार्थचे दोन मेसेजेस मी वाचले. पहिला दहा वाजता केला होता. ‘लवकर चेंजिंग रुममधे ये.’
त्यावरुन त्यांच्या प्रेमाची मला कल्पना आली. दुसरा मेसेज अकरा वाजून दहा मिनिटांनी पाठवला होता. ‘महत्त्वाचं सांगायचं आहे. कम फास्ट.’
सिध्दार्थ मधेच ओरडला, “दुसरा मेसेज मी नव्हता पाठवला.”
“तू नव्हता पाठवलास. तुझा मोबाईल, पहिला मेसेज करुन झाल्यावर, तू सोफ्यावर विसरुन गेला होतास. मी आणि कुणाल इथे बोलत होतो तेव्हा आम्ही तो बघितला होता. मी रुममधे गेल्यावर परत जॅकेट आणायला खाली आलो, तेव्हा तो इथे नव्हता. रोमाने तेवढ्यात तो घेतला होता आणि श्रियाला त्यावरुन दुसरा मेसेज केला होता.”
रोमा एकदम उसळून म्हणाली, “मीच केला कशावरुन? कांचनने केला असणार. तिच्याकडे खू*न करण्याची संधी आणि हेतू, दोन्हीही होतं.”
“कांचनने तिला मेसेजही केला नव्हता आणि तिचा खू*नही केला नाही. मेसेजमधल्या ‘कम फास्ट’ या वाक्यातला ‘ओ’ हार्ट शेपचा होता आणि श्रियाच्या डे*…डबॉ*डीजवळ तुझा गळ्यातला बदाम पण मला सापडला होता.”
रोमाचा हात एकदम गळ्याजवळ गेला आणि गळ्यात लॉकेट नाही हे समजल्यावर तिचा चेहरा पांढराफटक पडला. तिचा आता स्वतःवर ताबा उरला नाही. ती ओरडत म्हणाली, “हो, मी मारलं श्रियाला.
सिध्दार्थ आणि तिची वाढती जवळीक मला असह्य होत होती. काल रात्री ती दोघं चेंजिंग रुममधे गेलेली मी पाहिलं आणि संतापाने वेडीपिशी झाले. श्रियाचा काटा काढला तर तिच्या खु*नाचा संबंध, तिने पाहिलेल्या खु*नाशी जोडला जाईल असं मला वाटलं; म्हणून सिध्दार्थच्या मोबाईलवरुन मी तिला मेसेज पाठवला. ती लगेचच आली आणि मागून मी एका दोरीने तिचा गळा आवळला.”
ती हे बोलत असतानाच इन्स्पेक्टर कदम त्यांच्या टीमबरोबर येऊन पोचले होते. पुढच्या कारवाईमध्ये मला आता रस उरला नव्हता. मन फार विषण्ण झालं होतं.
.आपल्याच घरच्या कामवाल्या मुलीचा ‘अभावितपणे’ झालेला.
-समाप्त
लेखिका -सौ. राधिका जोशी, पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
नैतिक अधोगतीच्या पायऱ्या एकदा उतरायला सुरुवात केली की मनुष्यप्राण्यातला मनुष्य जाऊन, फक्त प्राणी कधी उरला हे त्या व्यक्तीला समजतंही नाही.
तुम्हाला ही गुप्तहेर कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.
धन्यवाद !
वावा! सुरेख मांडणी आणि नेहमीप्रमाणे वेगवेगळे विषय व आपले लिखाण म्हणजे वाचकांना मेजवानी…
खूप सुंदर कथा आहे. अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे.
मस्त लिहिली आहे, फक्त एक वाटलं रोमा ला माहित होतं की ती o लेटर वेगळं लिहिते तरी तिने msg करताना ती रिस्क कशी काय घेतली…. पण असो एकंदर कथा वाचायला खूप मजा आली… 👍
हा ऑन द स्पॉट बनलेला प्लॅन आहे. त्यामुळे इतका सर्व बाजूंनी विचार होणं शक्य नाही. खरंतर ती कन्फेस करताना हा डायलॉग मी तिच्या तोंडी टाकणार होते; पण ऑलरेडी शब्दसंख्या जास्ती झाली होती. त्यामुळे एकूणच शेवट थोडा गुंडाळावा लागला.