*मनातील श्रावण*
“रिया,अगं श्रावण महिना जवळ आलाय….भाजणी,मेतकुट करायचे आहे की नाही यंदा? अजून घरातील स्वच्छता झाली नाहीये. मुख्य म्हणजे देवघर आवरून घे बाई आधी. आणि हो….बाहेर गेलीस की मला कापूस घेऊन ये म्हणजे फुलवाती,गेजावस्त्र करून ठेवेन. कसं बाई या आजकालच्या मुलींना चैन पडतं सणावाराची तयारी झालेली नसताना देव जाणे.”……इति सासूबाई.
पण रियाच्या मनात काही वेगळेच विचार चालू होते. सासूबाईंचे बोलणे तिच्या आतपर्यंत पोहोचतच नव्हते. तिचे लक्ष नाही हे बघून त्या पुन्हा म्हणाल्या,”मी तुझ्याशी बोलतीये रिया. लक्ष कुठंय तुझं आणि कसला विचार करतीयेस?”
“काय आई ….मला काही म्हणालात का ?”रिया म्हणाली तशा वैतागून त्या म्हणाल्या,”हल्ली तुझे लक्षच नसते . कसला विचार करत असतेस ग?”
“काही नाही हो,माझा गाण्याचा ग्रुप आहे ना त्या सगळ्याजणींनी मिळून आम्ही मंगळागौरीचे खेळ,गाणी असा कार्यक्रम बसवण्याचे ठरवले आहे. त्याची आता प्रॅक्टिस सुरू करावी म्हणतोय. खरं तर उशीरच झालाय सुरुवात करायला पण ठीक आहे करू थोडी जास्त वेळ प्रॅक्टिस.”…..रिया म्हणाली.
रियाच्या या बोलण्यावर सासूबाईंचा पारा चांगलाच चढला. त्या तावातावाने तिला बोलू लागल्या. “अगं असे कसे,श्रावण महिन्यात घरी कमी का काम असते. घरातले कुलधर्म, कुळाचार तुम्ही सुनांनी नाही सांभाळायचे तर कोणी? मला तर आताशी काहीच काम होत नाही हे तू बघतेसच ना. कधी गुडघेदुखी तर कधी कंबर धरते माझी.बीपी,शुगर तर काय पाचवीलाच पूजलेय ना. माझी औषध पण वेळेवर घ्यावी लागतात. त्यामुळे जेवण,पथ्यं सगळं कसं वेळेत व्हायला पाहिजे. तू अशी बाहेर गेलीस तर ते कसं जमणार? मी म्हणते तुझ्या मैत्रिणीपण कशा तयार झाल्या ग? सणावारात घरातील सगळं सांभाळायचे की नटूनथटून कार्यक्रमात मिरवायचे?”…..एका दमात त्यांनी बोलून घेतले.
रियाने सगळं ऐकून न ऐकल्यासारखं केलं तशा त्या आणखी चिडल्या.
“रिया…मी तुझ्याशी बोलतीये” असे म्हणत त्यांनी त्यांचे बोलणे सुरूच ठेवले. “श्रावण महिना म्हणजे कोण उत्साह असायचा बाई आम्हाला. रोज वेगवेगळे नैवेद्य काय,चारी शुक्रवारी पुरणावरणाचा स्वयंपाक, हळदीकुंकू, गोकुळाष्टमी उत्सव,नागपंचमी किती न काय काय. रोज नवनवीन पदार्थ नैवेद्यासाठी करताना आपलंही मन रमते ग त्यात. मन प्रसन्न आणि आनंदी राहते. उगाच भलते विचार करत बसण्यापेक्षा मनाला गुंतवून ठेवावं झालं. पण आजकालच्या तुम्हा मुलींना हे कळेल तर ना.”
सासूबाईंचे बोलणे ऐकत ऐकत स्वयंपाक करणारी रिया आता सासूबाईंच्या समोर येऊन बसली. गेली वीस एक वर्षे ती घरातील सगळे सणवार आनंदाने आणि अगदी सासूबाई म्हणतील त्या पद्धतीने करत आली होती. हे करताना तिने ना कधी तक्रार केली ना कंटाळा. पण आता मात्र तिला काहीतरी नवीन करावे असे सारखे वाटत होते.रोजच्या त्याच त्याच कामाचा आणि रुटीनचा तिला कंटाळा आला होता. म्हणूनच बरोबरीच्या मैत्रिणींसोबत ती या रहाटगाडग्यातून बाहेर पडू इच्छित होती. पण हे सगळं करताना तिला घरात कोणाला दुखवायचे नव्हते ना घरातील जबाबदारी टाळायची होती.
म्हणूनच ती सासूबाईंना समजुतीच्या स्वरात आणि जमेल तेवढे शांतपणे म्हणाली,”आई,तुम्ही एवढी वर्ष बघताय ना मला. कधी चुकीचे,मनमानी वागले का मी?सगळं अगदी तुम्ही म्हणाल तसे आणि तुम्हला आवडेल त्या पद्धतीने करत असतेच ना. खरे तर कधी कधी माझा विश्वास नसतो एखाद्या रितीमागे पण केवळ तुम्हाला बरे वाटावे,आनंद मिळावा म्हणून मी कित्येक गोष्टी करत असते अगदी माझ्या मनाविरुद्ध. मग आता थोडं माझ्यासाठीही जगू द्या ना मला.
तुम्हीच तर म्हणता ना श्रावण म्हणजे चैतन्य, श्रावण म्हणजे आनंद,उत्साह. मग जो श्रावण बाहेर फुलतो तो मनातही फुलायला पाहिजे की नको? तुमच्या वेळी परिस्थिती वेगळी होती……अगदी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक देखील. तुम्हाला स्वयंपाकघरा व्यतिरिक्त दुसरं जगच नव्हते. म्हणून तुम्ही नवनवीन पदार्थ करणं,नैवेद्य यात तुमचा आनंद शोधला. पण आमच्या पिढीला हे आवडेलच असे नाही आई. आम्हाला कितीतरी नवनवीन गोष्टीत आमचा आनंद सापडला आहे. आजच्या शिकलेल्या, स्वतंत्र अन पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे असणाऱ्या मुलींना केवळ स्वयंपाकघरात अडकवून ठेवणं कितपत योग्य आहे सांगा.”
रिया अगदी मनापासून बोलत होती. सासूबाईंना आज आपल्या सुनेची जणू नव्याने ओळख होत होती. सासूबाईंच्या प्रत्येक इच्छेला होकार देणारी रिया आज तिची स्वतःची इच्छा पहिल्यांदाच बोलून दाखवत होती.
“आई,आमच्या ग्रुपमधील प्रत्येकीकडे कोणती ना कोणती कला आहे. कोणाला गोड आवाजाची देणगी मिळाली आहे तर कोणी नृत्यात पारंगत आहे. कोणी सुंदर रांगोळ्या काढते तर कोणी सुगरण आहे. एकमेकींच्या कलेचा आदर करत आम्ही नवीन काही करतो आहोत. आणि हे सगळं करताना घराकडे जराही दुर्लक्ष होणार नाही याची नक्की काळजी घेऊ बरं का. तुम्ही अगदी निर्धास्त रहा.
अहो, व्यक्तीगणिक आनंदाची संकल्पना बदलत जाते. प्रत्येकीला एकाच गोष्टीत रस असेल असे नाही. त्यामुळे ज्याला ज्यातून आनंद मिळतो ते ते ज्याने त्याने केलं तर काय बिघडलं?”
सासूबाई शांत बसून रियाचे बोलणे ऐकत होत्या. वरून दाखवत नसल्या तरी आतून कुठेतरी त्यांना तिचे बोलणे पटत होते. पण इतक्या वर्षांच्या रूढी परंपरा अशा एकदम बंद करणे त्यांना अवघड वाटत होते.
“आई…..”रियाच्या हाकेसरशी भानावर येत त्या म्हणाल्या,”काही म्हणालीस का मला?”
त्यांच्याकडे बघत गोड हसून रिया म्हणाली,”आई,मला कळतंय तुमच्या मनात काय चालू आहे.पण उगाच टेन्शन घेऊ नका. मी श्रावणातील सगळी व्रतवैकल्ये करणार आहे पण थोड्या नवीन प्रकारे. अहो मला आता इतक्या वर्षात सवय झालीये तुमच्या सोबत हे सगळं करण्याची. अचानक मी सगळं बंद कसं करेन. मलाही घरात धार्मिक वातावरण आवडतं बरं का.”
“म्हणजे तू नक्की काय करणार आहेस रिया?”
सासूबाईंच्या या प्रश्नावर शांतपणे रिया म्हणाली,”अहो रोज गोडाधोडाचा स्वयंपाक करून नैवेद्य तर मी दाखवेनच पण या श्रावण महिन्यात मी नवनवीन स्तोत्रं शिकावी म्हणतीये. आमच्या भिशी ग्रुपने यावेळी श्री सूक्त पाठ करायचे ठरवले आहे. म्हणजे मग आम्ही नवरात्रात रोज त्याचे पठण करू शकू. आणि बरं का आई…यंदा मी शुक्रवारी सवाष्ण म्हणून आपल्या कामाच्या मावशीनाच जेवायला वाढणार आहे. त्यादिवशी त्यांना साडी देवून ओटी भरेन त्यांची. त्याही खुश होतील ना? त्या घरकामात मदत करतात म्हणून तर मी थोडंफार बाहेर पडून काही करू शकते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे एक निमित्त म्हणा ना.”
रिया भरभरून बोलत होती. तिच्या बोलण्यातील उत्साह आणि श्रावण महिन्यातील तिचे प्लॅन्स ऐकून आत्ताच तिच्या मनात श्रावण फुलायला सुरुवात झाल्याचे त्यांना जाणवले. काही क्षण विचार करून त्या रियाला म्हणाल्या,”बरं का रिया,तुझ्या त्या मंगळागौरीच्या खेळाच्या प्रॅक्टिसच्या वेळी मी पण येते ह. तुम्हाला माहिती नसलेले काही खेळ मी शिकवेन तुम्हाला. अग माझी आणि माझ्या कितीतरी मैत्रिणींची मंगळागौर आम्ही रात्र रात्र जागवली होती. किती वेगवेगळे खेळ खेळत असू आम्ही. अगदी लग्नापूर्वी देखील गल्लीत कोणाची मंगळागौर असली तरी आम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत असू.”
स्वयंपाकघराकडे जात असलेल्या रियाने झटक्यात वळून मागे पाहिले. सासूबाई जुन्या आठवणीत हरवलेल्या बघून तिला गंमत वाटली. “काय म्हणालात तुम्ही आई?”…असे काहीसे अविश्वासाने तिने विचारले.
गालातल्या गालात हसत सासूबाई म्हणाल्या,”तू जे ऐकलस ना तेच म्हणाले मी.”
दोघीही एकमेकींकडे बघून प्रसन्न हसल्या. दोघींच्याही मनात सुंदर,साजीरा श्रावण आनंदाच्या पावलांनी प्रवेश करता झाला होता.
लेखिका -स्मिता मुंगळे,कोल्हापूर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद !
वा! छान👌
मनात बहरलेल्या या श्रावणमासाला पानगळीची धास्ती नाही.