कथा – सय l Marathi Story 2024

WhatsApp Group Join Now

दारावरची बेल वाजताच अभिने  दार उघडले. तोच बाहेर कांचन सामानांच्या पिशव्या घेऊन उभी होती .”काय गं हे आई ..!  किती समान ..किती गडबड .!!”असे म्हणून त्याने आईच्या हातामधील पिशव्या घेतल्या. घरातीलच कांचन सोफ्यावर बसली. दिशाने तिला पाणी आणून दिले..! 

            गणेश चतुर्थी जवळ आली होती .कांचन आणि शिरीष गेल्या दहा वर्षापासून कोल्हापुरातच गणपती बसवत होते .तिचे सासू-सासरे दोघेही निर्वतल्यानंतर ते सर्वच देवकार्य कोल्हापुरातील घरी करत होते. पण गेले वर्षभर कांचनने एका वेगळ्याच गोष्टीचा मनापासून ध्यास घेतला होता .तिला यंदा गणेश चतुर्थीला तांदळाच्या उकडीचे मोदक बनवायचे होते ..तिने वर्षभर अगदी अनेक प्रयोग करून तिच्या मनाला भावतील असे मोदक बनवण्याचा प्रयत्न चालूच ठेवला होता.

               गणेश चतुर्थीच्या निमित्ताने साफसफाई तर झालीच होती .मूर्तीही ठरवून झाली होती. . नैवेद्याचे मेनू मुलांनीच ठरवले होते आणि कांचनने त्यांना मान्यता दिली होती. श्रींची सजावट. लाइटिंग ..पूजेची तयारी इत्यादी बाजूशी शिरीष ने सांभाळल्या होत्या. स्वयंपाकघर, मेनू इत्यादी मध्ये मायलेकी अगदी गुंतून पडल्या होत्या. आतुरतेने वाट बघता बघता  श्रींच्या आगमनाचा दिवस आला ..कांचनच्या मनात हुरहुर साचू लागलेी..यंदा तरी जमतील ना ,आपल्याला मनासारखे मोदक ? तिने मनाचा हिय्या केला आणि मोदक मनापासून करण्याच्या तयारीला लागली ..शुभ्रवासाचा आंबेमोहोर तांदूळ तिने दळून आणला होता .बारीक-सारीक गोष्टी ,वेगवेगळ्या ट्रिक्स यांचा ताळमेळ घालत कांचननेअनेक युट्युब व्हिडिओ पाहून  रेसिपी ठरवल्या होत्या ..शिरीष थट्टेच्या सुरात म्हणाला  सुद्धा, “सुगरण बाई ,एक काहीतरी ठरवा. नाहीतर ‘सतरा सुगरणी आणि कढी अळणी ‘अशी गत व्हायची.!” कांचन यावर फक्त हसायची..पण तिच्या मनातले मोदक कसे असावेत ,याचा अंदाज कुणालाच यायचा नाही.!! 

Marathi Story 2024

            पहाटे लवकर उठून कांचनने मोदकाच्या नैवेद्याचा घाट घातला .पांढरीशुभ्र सुवासिक  पिठी पाहून तिला उत्साह आला ..चांगली  कडक   उकड काढून तिने एक दमदमीत वाफ आणली ..थोड्यावेळाने तिने ती पिठी मळायला  घेतली..अगदी लोण्यासारखी मऊसर पिठी मळून झाली..हे सर्व करतानाच, तिचे मन ,तिचे डोळे भलतीकडेच हरवले होते ..कुठल्यातरी दुखऱ्या कोपऱ्याने ती मोदक बनवत होती ..शेवटी उकड तयार झाल्यानंतर तिने मोदक करायला घेतले. पारी तयार करताना तिला त्या गतीचा सुरच  गवसेना ..कधी जाड पारी व्हायची तर कधी पातळ व्हायची..तरी बरं..!सारण मनासारखे जमले होते. गडद पिवळे..मऊ .लुसलुशीत ..गोडसर सारण अगदी फक्कड जमले होते. पण पारी चे गणित काही केलं जुळेना..पारी जाड झाली तर सारण कमी बसत होते..पारी पातळ झाली तर ती चिरत होती …तिच्या मनाचा अगदी हिरमोड झाला ..शेवटी पारीचा गोळा लाटून बघायचा तिने प्रयत्न केला ..पारी थोडीफार लाटली गेली ,पण तिच्या पाकळ्या करताना तिथे तारांबळ उडाली..शेवटी मोदकाचा आकार देऊन त्या पारीला तिने चमच्याने चिमटे काढले आणि कसाबसा मोदक तयार केला …पण एवढी यातायात करूनही तिला समाधान मिळाले नाही .””आई ,जमलेत हो मोदक ! जरासं नाक जास्त बाहेर आले तेवढेच…”अतिशय चवीची जीभ असणारी  कन्या दिशाने अभिप्राय  दिला..तिचे डोळे पाण्याने भरले ..ते शिरीषच्या लक्षात आले. पण तो तेव्हा काहीही म्हणाला नाही.. 

            रात्री बाहेर अंगणात कांचन रुसव्या चेहऱ्याने बसली होती. तोच  शिरीष आला..”कांचन, काय झाले ?एवढी नाराज का आहेस? काय ते मोदकाचे एवढे.! कशाला म्हणायला लावून घेतेस !  “कांचन अगदी कळवळून म्हणाली,,”अरे ,माझ्या मनाच्या अगदी तळाशी रुतून बसले आहेत रे हे मोदक..!! जोपर्यंत ते जमणार नाही तोपर्यंत एक कोपरा कायमच हळवा आणि  दुखरा  राहील..! “”

              “कांचन काहीतरी सांगशील का ?  असं किती दिवस एकटीच झुरत बसणार आहेस..??थोडी मनाने मोकळी झालीस की काहीतरी नवीन सुचेल बघ.!! “

                शिरीष चे हे आश्वासक शब्द ऐकून कांचनला  थोडा धीर आला..एक दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली. 

               “शिरीष ,तुला माहिती आहे माझं बालपण कोकणात अगदी गरिबीत गेलं ..रोज भात  रांधायचा

आणि आमसुलाच्या सारा सोबत संपवायचा..आमच्याकडे गणपतीही  जोरात साजरे करतात…पण आम्ही अतिशय सामान्य ..आम्ही जे चार घास खायचं त्यातलाच एखादा घास नैवेद्य म्हणून साजरा व्हायचा…पण आम्हाला त्याचे काहीच वाटायचे नाही ..कारण आजूबाजूलाही सगळे आमच्यासारखेच ..त्यामुळे फार कमीपणाची हालाखीची भावना कधीच मनात आली नाही.. 

                   पण एकदा गणपती दर्शनाला म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणी एकमेकींच्या घरी निघालो. प्रत्येक घरातील गणपतीचे दर्शन करता करता आम्ही साने काकूंच्या घरी आलो .सानेकाकू अतिशय धार्मिक वृत्तीच्या, ,सुगरण होत्या..आम्हा मुलींवर फार मायाही करायच्या..त्यांच्या घरी गेल्यावर आमचे मन असे काही खुलले  सांगायची सोय नाही ..रानातल्या सुंदर फुलांची नाजुक आरास,, ताजीतवानी फळे ..सोन्यासारख्या पितळेच्या समयांतील मंद ठेवणारे दिवे ..ताज्या ताज्या,,हिरव्यागार दुर्वांनी सजलेली  श्रींची मूर्ती ..!!  अगदी मन भरून पावले..इतक्यात माझे लक्ष गेले ते पितळेच्या मोठ्या  ताम्हणातील, पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत मोदकांकडे..!!त्यांचा मंद वेलचीचा सुवास आणि नजाकतीने पाडलेल्या एकसारख्या पाकळ्या…वा ..अगदी मन मोहून गेले माझे..!!आणि अगदी माझ्याही न कळत मी त्यातला एक मोदक उचलला आणि पटकन तोंडात टाकला .वा !काय अप्रतिम होती त्याची .!!मऊशार ,मोकळे ,खोबऱ्याचे सारण आणि कणाकणाने वाफवलेला मोदक..!!मी अगदी भान हरपून खात होते ..इतक्यात माझ्या कानाला  आरडाओरडा ऐकू आला…बरोबर .!!तो  आवाज सानेकाकांचाच.!! 

           सानेकाकांचा रुद्रावतार पाहून माझे पाय लटपटू लागले ..मला काय बोलायचे सूचेना..काकांचे ओरडणे माझ्या कानावर पडत होते..पण माझ्या मेंदूपर्यंत जात नव्हते ..अगदी बधिर झाले होते माझे मन आणि डोके.!!तितक्यात सानेकाकू आल्या आणि  म्हणाल्या .”असू दे हो..पोरीने नकळतपणे घेतला असेल ..मी करीन उद्या पुन्हा…तुम्ही काळजी करू नका..आज  खोबऱ्याच्या वड्यांचा  नैवेद्य दाखवा “

पण काकांपुढे त्यांची काही मात्रा चालेना …तितक्यात हा दंगा ऐकून आई आली ..तिच्याही कानावर गेले होतेच..ती आलीच संतापाने फणफणत …काहीही न बोलता तिने माझ्या गालावर एक जोरात कानशिलात लगावली..माझ्यासह सगळेच कळवळले…मी मात्र भरल्या पाण्याचे  डोळे पुसत निघून गेले …घरी काय वाढून ठेवले असेल याची कल्पना मला आलीच होतीच.! 

            आई-बाबांनी दोन दिवस बोलणे टाकले .आईच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. “मेलीला मोदक खायचे आहेत म्हणे .!  इथे काय उपाशी होतीस काय..एवढी कसली खाण्याची चाड आहे ग तुला..?? जरा दम धरवत नाही..” आईचा हा चढलेला पारा ऐकून सानेकाकू आल्या आणि मला जवळ घेत म्हणाल्या,,” असुदे हो  कांचनची आई..!!!तशी चांगली मुलगी आहे हो. कांचन…होते मुलांच्या हातून नकळतपणे अशी चूक .””  “”अहो पण मुलगी आहे ती…!! ही  असली कसली वळण हो ताई ..!!!खाण्यावरच ताबा नाही तर बाकीच्या गोष्टींचे काय सांगायचे ..””शेवटी अगं  गूगल..अरे तुरे ..असे होऊन विषय मिटला..मग  काकू जवळ   आल्या आणि म्हणाल्या ,”हे  बघ कांचन,  ज्या गोष्टी आपल्या नाहीत त्यांचा मोह होणे चुकीचेच …! पण पुन्हा ही चूक करू नकोस बाळा ..!!बघ, मी तुझ्यासाठी मोदक आणले आहेत ..ते खा बघू “”..””काकू मला नकोत ते मोदक..ज्या  दिवशी मी माझ्या घरात बनवेन तेव्हाच खाईन..”” साने काकूंनी  हरेक प्रकारे माझी समजूत घातली पण मोदक खाण्याची माझी इच्छाच मरून गेली होती. . “”

          “नंतर माझी बारावी झाल्यानंतर माझे लग्न झाले तेव्हा कोल्हापुरात आले. दरवर्षी गणपतीला मला   साने काकू आणि त्यांच्या मोदकांची  आठवण यायची ..तो दिवस आठवायचा आणि जखम पुन्हा ओली व्हायची..आई बाबा गेले .दादा मुंबईत राहायला गेला..पण मोदक काही माझ्या हातून झाले नाही ..शेवटी मीच ठरवले किती वर्ष हा  दुखऱ्या कोपऱ्याचा सल सांभाळायचा. ?एकदा करून तर बघू तांदळाच्या उकडीचे मोदक ..!आज साने काकूही नाहीत पण त्यांचा मायेचा स्पर्श आणि त्यांच्या निष्पाप चवीचा मोदक आजही माझ्या मनात रेंगाळतो आहे .. काकूंची  इच्छा किंवा मायेच्या  विश्वासाची परतफेड म्हणून तरी मला हे मोदक करायलाच हवेत..! 

         कांचन बोलता-बोलता कासावीस झाली..शिरीष ने तिला शांत होऊ दिले..थोडा वेळ गेल्यानंतर तो समजावून सांगू लागला. “हे बघ कांचन .गोष्ट अगदी साधी सोपी सरळ आहे ..पण तुझ्या कोवळ्या वयात ती घडल्याने तुझ्या मनात खोलवर तो घाव    रूतून बसला आहे..आणि या गोष्टींची तुला इतकी मनापासून असा आहे ना..ती तुला अगदी जमणार म्हणजे जमणारच…एखाद्या गोष्टीपासून आपण जितके लांब जाऊ तितकी ती गोष्ट मिळवणे कठीण होते…एकदा मनापासून ,मोकळ्या, प्रसन्न मनाने त्या गोष्टीला सामोरे जा..ती गोष्ट आपोआपच आपलीशी होते..बघ .तू नक्की   साने काकूंच्या विश्वासाला सार्थ ठरवशील. !! “

            असा बराच वेळ बोलत बसल्यानंतर कांचन शांत झाली ।। तिच्या मनातील कढ हलका झाला..सल बाजूला सारला  गेला..दोन दिवसानंतर तिने पुन्हा मोदक करायला घेतले..पांढरी शुभ्र पिठी.. पिवळे धमक सारण पाहून तिला काकूच आठवल्या … आज अगदी मनापासून  तिने मोदक करायला घेतले …लोण्यासारखी, मऊसूत ,शुभ्र उकड घेऊन तिने पारी करायला घेतली …आज अगदी मध्यम पातळ गोलाकार पारी जमली…काकूंच्या घरातला मोदक आठवत आठवत तिने नाजूक पाकळ्या करायला सुरुवात केली..नंतर तिने सारण  भरलेली    उकडीची पारी गोलाकार फिरवून तिचे तोंड बंद केले आणि कांचनच्या चेहऱ्यावर हसू फुटले …अगदी  सानेकाकूं सारखा नाही पण त्यांच्या मोदकाची आठवण करून देणारा मोदक आज तिच्या पुढ्यात होता..!! 

              आज कांचनने  समाधानाने नैवेद्याचे ताट भरले..जेवायला बसताना सर्वांनी आवर्जून पहिल्यांदा मोदक घेतला .कांचनच्या चेहऱ्यावरील समाधान पाहूनच सर्वांना आनंद झाला…पहिलाच घास खाल्ल्यानंतर सर्वांनी ‘अप्रतिम ..!’ अशी  दाद दिली ..कांचनला खूप बरे वाटले..सगळ्यांनी चव पाहिल्यानंतर तिनेही मोदक खायला घेतला …तिला पहिला घास घेता क्षणी  सानेकाकूंचे प्रेमळ शब्द आठवले ..”   कांचन तू ही करशील हो सुरेखा मोदक. .!!  ”  मोदक खाताना तिला   शुभ्र पारी ..गोड पिवळसर..खोबऱ्याचे सारण..वेलचीच सुगंध..याची कशाचीही चव लागत नव्हती…जिभेवर घोळत होता तो फक्त काकूंचा उबदार स्पर्श…मायेची चव…त्यांचा  कांचन बद्दलचा विश्वास…आईची कडक  शिस्त आणि नकळत्या वयात केलेल्या तिने वेडसर निर्धाराची पूर्तता..!!! 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

9 thoughts on “कथा – सय l Marathi Story 2024”

  1. खूप मस्त.
    लहानपणी नकळत घडलेल्या काही गोष्टी मनात खोल रुतून राहतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top