मायेची, अनुभवाची, प्रेमाची गोधडी.
स्मिता आज जरा घाईघाईत ऑफिसमध्ये शिरली. येताच ती सगळ्यात आधी पोहोचली ती आपल्या लाडक्या मैत्रीणीकडे. “हाय मेघा. गुडमॉर्निंग. कशी आहेस?”
“अरे वाह! बर्थ डे गर्ल. गुडमॉर्निंग आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज खूप खूष आहे; कारण तू आज तुझ्या वाढदिवसाची पार्टी देणार आहेस ना.” मेघा स्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली.
“हो. तेच सांगायला आले आहे. आज सात वाजता ये पार्टीला. आता जाते काम करते. आधीच ऊशीर झाला आहे. बाकीच्यांना लंच टाईम्सच्या सांगते.” असं म्हणत स्मिता आपल्या डेस्कवर कामासाठी निघून गेली.

लंच टाईम मध्ये सचिन, अजय, रोहिणी, तन्वी, काजल रमेश सर, धनश्री मॅडम ना संध्याकाळच्या पार्टीचं आमंत्रण स्मिता ने दिले. सगळेच आपापली कामे लवकर आटपून पार्टीला जाण्याच्या ऊत्साहात होते. पार्टी तशी छोटीशीच घरातल्या घरात होती. कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्रमंडळीं इतकेच पार्टीसाठी येणार होते.
स्मिता आपले काम आटपून लवकर घरी निघून गेली. थोडी तयारी पार्टीसाठी करायची होती. जेवणात साधा मेन्यू ठरवून बाहेरचं जेवणाची ऑर्डर दिली होती. रिटर्न गिफ्ट पॅक केले होते. सगळी तयारी करून स्मिता छान गुलाबी फुलांच्या प्रिंटची पांढर्या रंगाची ऑरगॅन्झा साडी नेसून मस्त तयार झाली होती.
कुटुंबातील मंडळी आणि ऑफिसमधले मित्रमंडळ जमल्यावर केक कटिंग करून थोडे फोटोज काढून ‘सगळेच भूक लागली जेवायला द्या’, असा कल्ला करू लागले. स्मिताने त्यांचा कल्ला थांबवून त्यांना शांत करत विचारले, “माझ्या वाढदिवसाचे गिफ्ट कुठे आहे? ते आधी द्या मगच जेवण ”
” वाह रे वाह. आधी जेवायला दे . जेवण आवडलं तर गिफ्ट देऊ ” मेघा सुद्धा तिची मस्करी करत म्हणाली.
“बघा बरं. मला तुम्ही गिफ्ट दिलं नाही तर मग रिटर्न गिफ्ट सुद्धा मी देणार नाही. तुम्हाला एकदम भारी रिटर्न गिफ्ट पाहिजे ना. मग आधी मला गिफ्ट द्या.” स्मिता लहान मुलीसारखी लाडात येऊन सगळ्यांना सांगत होती.
स्मिताच्या अश्या लहान मुलीसारखं वागण्याने स्मिताची आई ओशाळून गेली आणि स्मिताला म्हणाली, “अगं काय हे स्मिता आता लहान आहेस का असं गिफ्ट मागायला? आता लग्नच करायचं आहे तुझं ह्या वर्षी. चल तूला त्यांना काय द्यायचं आहे ते दे बघू. लहान मुलीसारखं नको वागूस. “
“अहो स्मिताची आई असू द्या. मुली इथे आहेत तोपर्यंत अशा अल्लड, खोडकर वागाच्याच. एकदा का लग्न होऊन सासरी गेल्या कि फार सुजाण मुलीसारख्या वागतात. आज तिचा दिवस आहे. करू देत मज्जा. ” असं म्हणत धनश्री मॅडम सुद्धा त्यांच्या मस्तीत सामील झाल्या. त्या स्मिताला म्हणाल्या, ” स्मिता मला तर तुझं भारी रिटर्न गिफ्ट पाहिजे बाई; म्हणून मी सगळ्यात आधी तुला तुझं बर्थ डे गिफ्ट देते. हे घे तुझं बर्थ डे गिफ्ट. ” असं म्हणत धनश्री मॅडमनी स्मिताला गिफ्ट दिलं.
आता मॅडम नी गिफ्ट दिल्यावर बाकीच्या सगळ्यांना गिफ्ट देणं क्रमप्राप्त होतंच. सगळ्यांनी गिफ्ट दिल्यावर स्मिताने त्यांना रिटर्न गिफ्ट देत सांगितले, ” गिफ्ट लगेच ऊघडून बघा. आवडलं का लगेच सांगा. ”
सगळ्यांनी आपापली गिफ्ट उघडून बघितली. त्यात सुंदर अशी हातानी शिवलेली मऊ गोधडी होती. सगळ्यांच्या चेहर्यावर गिफ्ट आवडल्याचे हसू होते. धनश्री मॅडम मात्र त्या गोधडीला हातात घेऊन साश्रू नयनांनी बघत बसल्या होत्या. मन आणि डोळे दोन्हीही भरून आलं होते. तिचं अवस्था रमेश सरांची होती. बाकीच्या मुलांना काहीच कळत नव्हते; पण स्मिताचे डोळे ही भरून आले होते.
स्मिता धनश्री मॅडम आणि रमेश सरांजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, “तुम्हाला आवडलं ना रिटर्न गिफ्ट. “
धनश्री मॅडम स्मिताच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या,” आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू मला स्मरणीय गिफ्ट दिलं आहेस. ही गोधडी म्हणजे माझ्या आजीची माया दिली आहेस. इतकं छान रिटर्न गिफ्ट दिलं आहेस की काही शब्दच नाही त्यासाठी. “
“हो स्मिता. धनश्री मॅडम म्हणतायत ते अगदी खरं आहे. तू आज जिव्हाळ्याचं, मायेचं पांघरूण दिलं आहेस. आज माझी आई माझ्याजवळ परत आली आहे ह्या गोधडीतून . तुझे आभार नाही मानणार मी. कारण मग ती ह्या मायेची किंमत केल्यासारखी होईल. पण ह्या रिटर्न गिफ्टचे रिटर्न गिफ्ट मात्र मी तुला देणार आहे. आजपासून तू माझी मुलगी आहेस. माझ्या मुलीचा हक्क मी तुला देत आहे. खूप सुखी रहा बाळा. खूप सुखी रहा.” ऑफिसमध्ये कायम कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या रमेश सरांना आज इतकं भावनिक झालेलं पाहून बाकीचे सगळेच आश्चर्यचकित झाले. स्मिताने दिलेल्या रिटर्न गिफ्टमुळे इतकं भावनिक होण्यामागचे कारण त्यांना काहीच कळतं नव्हते.
आपल्या सहकाऱ्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्मिता बोलू लागली. ” तुम्हा सगळ्यांकडून तुमच्या प्रिय व्यक्तीचे एखादे वापरलेले कापड आणा म्हणून मी सांगितले होते. आठवते आहे का? कुणी आई, आजी, मावशी, काकूंची साडी आणली. कुणी बाबांनी, काकांनी वापरलेले सदरे, आजोबांनी नेसलेले धोतर दिले. त्यापासूनच शिवलेली गोधडी तुम्हाला दिलेली आहे. रमेश सर, धनश्री मॅडमची आई आणि आजी ह्या गोधडीच्या स्वरूपात त्यांच्या जवळ आली आहे; तसचं तुम्हाला दिलेल्या गोधडीमधून तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याजवळ आली आहे.” हे ऐकल्यानंतर प्रत्येक जण आपल्याला दिलेल्या गोधडीकडे निरखून बघू लागले आणि त्या गोधडीत त्यांना त्यांची प्रिय व्यक्ती भेटली. कुणाला काका भेटले, कुणाला मावशी. कुणाला आजोबा भेटले तर कुणाला काकू. आता सगळेच जण भावनिक झाले होते. तिथल्या प्रत्येकाचे डोळे आणि मन भरून आले होते.
भारावलेले भावनिक क्षण सरल्यावर रोहिणीने स्मिताला विचारले,” स्मिता खरंच स्मरणात राहणारे रिटर्न गिफ्ट दिले आहेस. ह्या गोधडीत आमची प्रिय व्यक्ती आमच्या जवळ आली. पण तुला आम्हाला हे गिफ्ट देण्याचं सुचलं कसं?”
स्मिताला हा प्रश्न अपेक्षित होताच. तिने सांगितले, “अगं ह्या गोडीची जादू मला लहानपणापासून आईने सांगितली. माझे बाबा कायम एक गोधडी घेऊन झोपत असतात. मी लहान होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्या गोधडीत झोपत होते. खूप छान ऊब मिळत होती त्या गोधडीत. पण मग नंतर मी मोठी झाल्यावर बाबा स्वतः एकटाच ही गोधडी घेऊन झोपतो. माझी ऊबदार झोप त्याच्यामुळे मला मिळत नव्हती. एक दिवस मी खूप भांडले बाबा बरोबर त्या गोधडीसाठी; पण तरीही बाबा मला ती गोधडी द्यायला तयार नव्हता. मग मात्र मी खूप चिडले बाबावर. त्यावेळेस आईने त्या गोधडीची जादू मला सांगितली. आई म्हणाली, ती गोधडी माझ्या आजीने स्वतःच्या हाताने बाबासाठी शिवली होती. बाबा ज्यावेळेस नोकरीसाठी इथे शहरात आला त्यावेळेस आजीने त्याला ती दिली होती. बाबा मला म्हणाला, ‘कितीही कष्टाचे, निराशेचे, धडपडीचे, अपयशाचे दिवस असले तरीही ह्या गोधडीत शांत झोप लागते.’ कदाचित मायेची ऊब मिळते म्हणून तो अजूनही ती गोधडी घेऊन झोपतो. त्याला त्या गोधडीत त्याची आई मिळते.
त्यादिवशी ऑफिसमध्ये बोलता बोलता प्रत्येकाने आपल्या मायेच्या माणसांविषयी आपल्या भावना मांडल्या. त्यातून मला असं वाटलं जसं बाबा त्याच्या आईच्या गोधडीत झोपून मायेची ऊब मिळवतो तशी तुमच्या मायेच्या माणसांची ऊब तुम्हाला द्यावी; म्हणून मी तुम्हा सगळ्यांकडून तुमच्या प्रिय व्यक्तीचे एखादे वापरलेले कापड मागून घेतले. माझ्या आईने माझ्या दोन्ही आजीकडून ऊबदार गोधडी शिकण्याची कला आत्मसात केली आहे. मग तिच्याकडूनच मी तुम्हाला दिलेली गोधडी शिवून घेतली आहे.”
स्मिताची आई पुढे येऊन म्हणाली,” आज स्मिताने फक्त तुम्हालाच नाही तर मला सुद्धा रिटर्न गिफ्ट दिले आहे. तिने तुमच्याकडून आणलेले कापड, साड्या आणून मला दिले आणि फर्मानच सोडला कि ह्याच्या गोधड्या शिवून पाहिजेत ; ते ही माझ्या वाढदिवसाच्या आधी. मी आईबरोबर गोधडी शिवायला बसत होते. पण ती गोधडी आकर्षक आणि ऊबदार कशी करायची ह्याचे कौशल्य आईलाच माहित होते. मी फक्त ती सांगेल ते करत होती; पण तुम्हाला देण्यासाठी गोधडी बनवण्याची जबाबदारी माझ्या एकटीला कशी पेलवेल ह्याचाच विचार मी करत होते.
म्हणतात ना एक टाका घातल्यावर दुसरा टाका आपोआप घातला जातो. तसंच झालं माझ्याकडून. आई जशी गोधडी आकर्षक आणि ऊबदार करायची तशी करायला सुरूवात केली आणि मग आईच माझ्याकडून ती शिवून घेत असल्याप्रमाणे मी शिवत गेले. आई गोधडी शिवताना नेहमी मला सांगायची फाटलेलं, उसवलेलं, नावडतं कापडं सुरेख, सुबक दिसेल असं धाग्याने हळूहळू एक एक टाका घालत आकर्षक जोडायचं. मग त्याला ऊबदार करण्यासाठी मायेची अजून कापडं जोडायची आणि तयार करायची प्रेमाची, सुंदर गोधडी.
गोधडी शिवताना आजी, आई, काकू बर्याचदा गाणी, ओवी म्हणायच्या. त्यात संसाराच्या गुजगोष्टी, शहाणपणाचे धडे, काटकसरीचा नियम, अशा बर्याच गोष्टी सहज सांगून जात होत्या. म्हणूनच गोधडी शिवताना आजी, आई आणि मुली एकत्र बसतात. गोधडी शिवताना त्यात आपलेपणाचा, मायेचा घट्ट टाका घातला जातो म्हणून ती गोधडी ऊबदार होते असं माझी आजी म्हणायची. ही गोधडी सगळ्यांनी जपली पाहिजे. स्मिताने ती गोधडी जपण्यासाठी मला मदत केली हेच माझे रिटर्न गिफ्ट आहे. तिला हे सुचणं, त्या भावना कळणं माझ्यासाठी खूप मोठं रिटर्न गिफ्ट आहे. थॅंक्यू स्मितू.”
आईच्या बोलण्याने स्मिता थोडी हळवी झाली. तिला म्हणाली, ” आई तू मला म्हणून गोधडी शिवायला मदत कर म्हणालीस ना. तुला तुझ्या आजीने, आईने जे काही शिकवले ते मला शिकवायचे होते म्हणून टाके घालून दे म्हणालीस. न आवडणार्या गोष्टी कापून हव्या त्या गोष्टींनी सुबक, मायेचे आयुष्य बनवायची शिकवण मला ह्या गोधडीतून मिळाली. थॅन्क्स आई मला खूप काही शिकवण्यासाठी.”
“फक्त स्मितालाच नाही तर आम्हाला ही ह्या गोधडीने जपणं शिकवलं आहे. ही गोधडी सुदूधा आम्ही जपणार आहोत. थॅंक्यू काकू आणि स्मिता. आता गोधडीचं रूप बदलून ग्लोबल झाली आहे. नुसतीच गोधडी न राहता परदेशात क्वील्ट झाली आहे. फॅशन ब्रँड झाली आहे. इतकंच कशाला प्लेन कॉटन साडीवर गोधडीसारखंच पॅचवर्क करून घेतात. एकूण काय गोधडीने सुबकतेने, सुंदरतेने आपलेपण जपणं शिकवलं आहे संपूर्ण जगाला. मला अभिमान आहे आपल्या महाराष्ट्राच्या ह्या मायेच्या ऊबदार गोधडीचा.” सचिनच्या ह्या म्हणण्याला सगळ्यांनीच दुजोरा दिला.
जोडते एक चिंधी चिंधी
घालते एक टाका टाका
शिवते एक ऊबेची गोधडी
पांघरते मी आईआजीची ही माया.
__पुजा सारंग, मुंबई
खूप छान कथा..👌👌
खूप सुंदर👌👌
खूप छान मायेने विणलेली गोधडी…
सुरेख