‘व्यस्त रहा,स्वस्थ रहा’ या उक्तीचा मार्मिक अर्थ उकलणारी कौटुंबिक कथा
गेले काही दिवस आईंची मानसिक अवस्था खूपच ढासळली. प्रमिलाला वाटलं कि परदेशात पहिल्यांदाच आल्यामुळे अस होत असावं ,कदाचित इथे रुळायला त्यांना वेळ लागेल. पण आईचं रुळण दूरच राहीलं, हळूहळू त्या पाणी न मिळालेल्या रोपट्यासारखं कोमेजून जाऊ लागल्या. प्रमिलाला नेमकं कारण समजत नव्हतं. इथे तर सर्व सुखसुविधा त्यांच्या पायाशी लोळण घेत होत्या. खर तर आईचं जीवन खूप कष्टप्रद गेलेलं. अविनाशच्या बाबाचं अकाली निधन झालं आणि दोन कोवळ्या वयातील मुलांच्या पालन पोषणाची जवाबदारी आईवर पडली. हि जवाबदारी आईंनी मोठ्या कष्टाने निभावली. गावी असलेल्या स्वतःच्या तीन एक्कराच्या वावरात त्यांनी अपार कष्ट उपसले, कोंड्याचा मांडा करून मुलांना वाढवलं. मुलांनीही त्यांच्या कष्टाचं चीज केलं. मोठा अविनाश आज US मध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्यावर आणि मोठ्या गलेलठ्ठ पगारावर काम करत होता. अलिशान अपार्टमेंट,गाडी,सुख-सुविधांची सर्व साधनं होती.
अविनाशची बहिण अर्थात आईंची मुलगी भारतात यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलेली. तीही लग्न करून तिच्या आयुष्यात सुखी होती. काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं. अपार कष्ट भोगलेल्या आईला खुप सुखात ठेवायचं म्हणून अविनाश तीला आपल्या सोबत अमेरिकेला घेऊन आला. अविनाशची बायको प्रमिला तीच्या या सासूची अगदी मुलीसारखी काळजी घेत. पण तरीही आईची प्रकृती अस्वस्थ राहु लागली. शेवटी तीला तिच्या मुलीकडे पाठवलं पण परिस्थिती तरीही बदलली नाही. आईची तब्येत वरचेवर ढासळतच होती. अनेक डॉक्टर झाले. पण तपासणीचे रिपोर्ट तर नॉर्मलच येत. शेवटी अविनाश परत आईला अमेरिकेला घेऊन आला. असेच दिवस पुढे सरकत होते. प्रमिला सगळ्या जवाबदाऱ्या एकखांबी सांभाळत होती.अविनाश इच्छा असूनही तीला थोडीफारच मदत करू शके. मुळातच त्याच्यावर कंपनीच्या एवढ्या जवाबदाऱ्या होत्या कि त्यातून त्याला रिकामा असा वेळ मिळत नसे. प्रमिला सगळ एकट्यानेच सांभाळी, छोट्या पिहुचा अभ्यास, तीचं जेवण-खाणे, येणारा पै-पाहुणा, मित्र-मंडळी. त्यातून ती आठवड्यातून दोन दिवस युनिव्हर्सिटीत लेक्चर घेत असत, त्याचीहि तयारी तीला करावीच लागे, घरचं काय संपलय, काय आणायाचं, देणी- घेणी अश्या कितीतरी गोष्टी ती एकटी सांभाळत होती. आईना थोड बर वाटलं तर,घरकामात अधेमध्ये त्या मदत करू पाहत. पण इथल्या इलेक्ट्रोनिक वस्तू आणि आटोमेटीक साधानांशी त्यांचा मेळ काही जमत नसे. त्या मग नादच सोडून देत. त्यामुळे त्यांचा बराच दिवस रीकामाच जात. पिहुचा थोडाबहुत विरंगुळा होता, पण ती हि बराचवेळ शाळेतच असे. टीव्ही त्यांना आवडत नसे आणि पुस्तकं तरी किती वाचणार. एकूण काय आई एकट्या पडत होत्या,आणि म्हणूनच कदाचित त्या उदास राहू लागल्या. आपण आवडीने लावलेलं रोपट जर जळून चाललं तर ते पाहताना ज्या यातना मनाला होतात त्याच यातनां अविनाश आणि प्रमिला आता आईंच्या बाबतीत अनुभवत होते.
एके दिवशी प्रमिला खूप थकली. रात्री गादिवर अंग टाकताना स्वर्गसुख ते काय वेगळे अस तिला क्षणभर वाटून गेल. पण स्वर्गसुख हे क्षणभरच असत, याची तिला लवकरच जाणीव झाली जेव्हा पीहू तिच्याकडे ‘’मम्मा झोप येत नाहीये गोष्ट सांग ना’’, म्हणत आली. कंटाळलेली प्रमिला पिहुला म्हणाली, ’’पिलू आज मम्मा खूप थकली रे.आज गोष्टी शिवायच झोपुयात का?’’ ‘’ओके मम्मा’’. आपल बाळ किती शहाणे आहे याचं तीला अप्रूप वाटलं. ’’मम्मा मी सांगू का तुला गोष्ट ?. मी सांगते तू झोप.ओके’’ आता प्रमिलाला अगदी भरून आलं. असे काही क्षणच तिच्या थकलेल्या मनाचा आणि शरीराचा निचरा करण्यास पुरेसे होते. ’’ओके बाळा आज आपण पिहुची गोष्ट ऐकत झोपूया.ये इकडे’’, अस म्हणून तिने पिहुला जवळ ओढून कुशीत घेतलं. त्यानंतर मग पीहूच्या गोष्टीची गाडी झोपेच्या मुक्कामाला निघाली.
सकाळी अविनाशला घरात प्रमिला सामानाची बांधाबांध करत असलेली दिसली. ‘’कुठे निघाली आहेस का पमू?’’. त्याने विचारलं. आपलं काम न थांबवता प्रमिला म्हणाली, ‘’माझी नाही; आईंची बॅग भरतेय मी’’. ’’आईची ! आई कुठे निघाली ?’’. ’’परत भारतात’’. ‘’कुठे दिदिकडे ?’’. ’’नाही.आईंना मी वापस त्यांच्या त्यांच्या गावी पाठवत आहे’’. ‘’गावी?’’ अविनाश पुरता गोंधळला. ‘’पण का?’’ .’’कारण मला त्या इथे नको आहेत’’. अविनशचा त्याच्या कानावर विश्वासच बसेना, तीला थांबवत तो म्हणाला, ‘’काय बोलतेस तू; तुला काही समजतंय का. तू माझ्या आईला माझ्याच घरातून काढत आहेस ?’’. हे ऐकल्यावर प्रमिला थांबली. ‘’तुझं घर ! हे माझं घर नाही? या घरासाठी मी काहीच केलं नाही ?’’. आपलं बोलणं विसंवादाच्या बाजूने झुकू लागलं आहे हे लक्षात येताच अविनाश शांत होऊन बोलू लागला. ‘’पण ती माझी आई आहे पमू !’’. प्रमिलाने क्षणभर त्याच्या नजरेत नजर मिसळून पाहिलं आणि शांतपणे म्हणाली. ‘’त्या माझ्याही आई आहेत अवि.आणि म्हणूनच मी हे करतेय, त्याचं नेमक दुखनं मला आता समजल आहे. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव आणि मी जे काही करतेय ते शांतपणे पहा’’. प्रश्नचिन्हांनी भरलेल्या त्याच्या नजरेकडे दुर्लक्ष करत प्रमिला परत बॅग भरू लागली.
आई गावी परतून आता तीन महिने झाले होते.आज इतक्या दिवसांनी त्यांची दोन्ही मुले सहपरिवार चार दिवसाच्या सुट्टीला गावी आली होती.आईना तर जणू आकाश ठेंगण झालं. त्यांच्या स्वागतात जुंपलेल्या आईंचा उत्साह भरभरून वाहु लागला. आपल्या आईच्या प्रकृतीतील सुधारणा आणि तिचा इतका फळफळता उत्साह पाहून अविनाश आश्चर्यचकित झाला. हि प्रमिलाचीच काहीतरी किमया आहे याची त्याला जाणीव झाली. त्याने याबद्दल तिला विचारलं तेव्हा खळखळून हसत प्रमिला म्हणाली. हि किमया माझी नाही आपल्या पिहुची आहे. तीने त्यादिवशी मला एक छानशी गोष्ट सांगितली आणि मला आईंच्या आजाराचं खरं कारण सापडलं. तुला ऐकायची ती गोष्ट. अविनाशच्या उत्तराची वाट न पाहताच प्रमिला ती गोष्ट सांगू लागली.
‘’आटपाट नगरीत एक खुप मोठा पराक्रमी राजा राहत होता.तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करीत. त्यांची काळजी घेत. तो एक आदर्श राजा होता. पण त्याला शिकारीची खूप आवड होती. एकदा काही सैनिकांनी बातमी आणली कि दूरवरच्या घनदाट जंगलात एक उडणारा घोडा राहतो. त्याला कुणीच पकडू शकत नाही. मोठ-मोठ्या पराक्रमी राजांनी त्याच्यासमोर हार मानली. हे ऐकून आटपाट नगरीच्या राजाला त्या उडणाऱ्या घोड्याला पकडण्याची प्रचंड इच्छा झाली. तो त्या घोड्याच्या मागावर निघाला. तो रानोमाळ हिंडला. घनदाट जंगले फिरला, तो घोडा त्याला अधेमध्ये दिसेही परंतु विजेच्या चपळाईने तो गायब होई. राजा त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करे पण तो घोडा कधीच त्याच्या हाती लागायचा नाही. असे वर्षानुवर्ष गेले. अर्थात यादरम्यान राजाने आपल्या प्रजेकडे आणि राज्याकडे कधीच दुर्लक्ष केल नाही. एके दिवशी मात्र राजाला त्या घोड्याला पकडण्यात यश आल. त्या उडत्या घोड्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. राजाच्या या पराक्रमाच सर्वत्र कौतुक झालं. असेच काही दिवस गेले. एके दिवशी राजा अचानक आजारी पडला. देशोदेशीचे वैद्य झाले, अनेक औषोधोपचार झाले; पण राजाचा आजार काही केल्या कमी होईना. राजाने खाणे-पिणे सोडले. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावू लागली. सगळ्यांनीच अशा सोडली. राणी आणि राजकुमारही खूप दुखी झाले. पण राजाची राणी हुशार होती. एके दिवशी लपतछपत जाऊन तिने पिंजऱ्यातील त्या उडणाऱ्या घोड्याला सोडून दिलं. असं करताना तिला राजकुमाराने पाहिलं. याचा जाब विचरताच राणी म्हणाली. राजाच्या आजारावर हाच खरा उपचार आहे. आणि काय आश्चर्य जेव्हा पिंजऱ्यातील घोडा उडून गेला आहे हे राजाला समजलं तेव्हा त्याच्यात पुन्हा जोश संचारला. आणि अगदी आठवड्याभरातच राजा ठणठणीत बरा होऊन; पुन्हा त्या उडणाऱ्या घोड्याला पकडण्याच्या कामगीरीवर निघाला’’.
गोष्ट संपताच प्रमिलाने अविनाशकडे प्रश्नार्थक पाहिलं.जणू ती त्याला ‘मॉरल ऑफ द स्टोरी’ विचारत होती. प्रमिला राणीचा हा अविनाश राजा देखील हुशार होता. त्याने मॉरल ऑफ द स्टोरी सांगितली. ’’नेहमी कष्ट करणारा आणि नेहमी कामात व्यग्र असणारा जर रिकामा राहू लागला तर तो मनाने अतिशय आजारी पडतो. आयुष्यातील ‘ध्येय’ संपली कि आयुष्यातील गोडवा संपतो, कारण आनंदाची-सुखाची खरी चव हि ध्येय मिळण्यात नसून ते ध्येय मिळवण्यासाठी केलेल्या ‘कष्टात’ आहे. जन्मभर कष्टालाच आपलं सुख मानणारी आई जेव्हा रिकामी बसून सुखी होण्यःचा प्रयत्न करू लागली; तेव्हा ती मनाने आजारी पडू लागली आणि म्हणूनच प्रकृतीनेही ती आजारी पडली. पण परत गावी येऊन आपल्या शेताची, कष्टाची आणि आपल्या आवडीची कामे ती जेव्हा करू लागली; तेव्हा ती परत मनाने आणि प्रकृतीनेही ताजीतवानी झाली’’.
आपल्या नवऱ्याच्या या निष्कर्षाला प्रमिलाने सहमती दर्शक हसून दाद दिली. त्यानंतर अविनाशने पिहुला जवळ घेतलं आणि तिला विचारलं, ’’तुला हि गोष्ट कोणी सांगितली होती’’. तेव्हा पीहू म्हणाली, ’’आज्जीने!’’. हे ऐकून अविनाश समाधानाने हसला. जे काम मोठमोठ्या डॉक्टरांना जमलं नाही ते काम पिहुच्या एका गोष्टीने केलं. आईने तिला सांगितलेल्या गोष्टीतच,आईंच्या आजारावरचा ‘रामबाण उपाय’ सापडला होता.
समाप्त…
( माझ्या लेखकमित्र कुटुंबातील सर्व वाचक सदस्यांना सविनय नमस्कार !. वाचकहो हि कथा कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय. सोबतच आपल्या सूचना,आणि सल्ल्यांचही स्वागत आहे.अश्याच रंजक कथा आणि माहितीपर लेख वाचण्यासाठी आमच्या वेब साईटला जरूर भेट द्या.धन्यवाद Marathi Story 2024 for family!.)
लेखिका -सौ.शिवलीला शिवपूजे,धाराशिव.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Nice story..!!
धन्यवाद !🙏
खरंच रामबाण उपाय आहे👌
धन्यवाद ! 😊🙏
छान कथा 👌👌
धन्यवाद 😊🙏
👌👌
Thank You 🙏
खुपचं सुंदर कथा .. 👌👌👌
Thank you🙏
खूप छान कथा
खूप खूप धन्यवाद 🙏