Marathi Love story – सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

WhatsApp Group Join Now

                 ” अरे यार ! ती टवका पुन्हा जॉईन झाली आहे ऑफिसमध्ये तेव्हापासून कामावरच लक्षच उडालं आहे रे.” मनीष विक्रांतशी बोलत होता.

                ” कोण टवका रे ? ती नाविन्या ? निनादची विधवा ?” विक्रांत म्हणाला. 

                                ” हां यार ! इतके दिवस निनाद असायचा तिच्याबरोबर; पण आता निनाद नाही राहिला तर असं वाटलं आरामात तिच्याशी मैत्री करू. बघ ना यार, ती एका पाच वर्षाच्या मुलाची आई असूनसुद्धा तिने काय फिगर मेंटेन केली आहे. असं वाटतं तिच्याकडे नुसतं पाहत राहावं; पण साला ती आपल्याला भावंच देत नाही. बघावं तेव्हा त्या सिद्धेशच्याचं पाठी असते.” मनीषने एक उसासा सोडला.

                  ” हम्म ! मजा आहे बुवा त्या लेकाची. ती एकतर इतकी चिकनी बाई त्यात ते दोघेही अनुभवी.” विक्रांतच्या वाक्यावर मनीषने त्याला टाळी दिली आणि ते दोघे खो खो हसू लागले. 

                   त्या दोघांच्या टेबल जवळून जाताना निनाद आणि नाविन्याची खास मैत्रीण स्नेहाने त्या दोघांचे बोलणे ऐकले. त्यांचे बोलणे ऐकून तिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने त्या दोघांची खरडपट्टी केली, 

               ” शी ! एका स्त्रीबद्दल किती गलिच्छ विचार आहेत तुमचे ? तुमचं दोघांचंही लग्न झालं आहे ना ? मुलंबाळं देखील आहेत तुम्हाला तरी तुम्ही दोघे इतके खालच्या थराचे कसे विचार करू शकता ? तुम्हाला काय वाटलं ? निनाद गेला म्हणजे त्याची बायको एकटी पडली असेल ? तिला आता परपुरुषांची गरज भासेल ? आपण तिला कसंपण पटवू शकतो ? तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊ शकतो ? कि*ळस आली मला तुमच्या विचारांची आणि हो ! नाविन्या आणि सिद्धेश सरांचं नातं माहिती आहे तुम्हाला ? त्या दोघांमध्ये भाऊबहिणीसारखं पवित्र नातं आहे. निनाद गेल्यावर नाविन्याला तिच्या सासरच्यांनी खूप त्रास दिला. निनादचा प्रॉव्हिडंट फंड, त्याने केलेली गुंतवणूक तिच्या सासरची लोकं नाविन्याला मिळवून देणार नव्हते. इतकंच काय तर तिच्या मुलाचा ताबा देखील तिला देणार नव्हते. सिद्धेश सरांनी मोठ्या भावाप्रमाणे नाविन्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून, खटपट करून तिला तिचे सगळे हक्क मिळवून दिले. तिला एक छोटेसे घर घेण्यासाठी मदत केली. निनाद गेल्यावर तुमच्यापैकी कोणीतरी नाविन्याची चौकशी केलीत ? तिला कुठलीतरी मदत केलीत ? शी ! पण मी हे तुम्हाला का सगळं सांगते आहे ? इतक्या नीच विचारांच्या लोकांशी मी का बोलते आहे तेच मला समजत नाही.”

                 स्नेहा रागाने निघून गेल्यावर मनीष आणि विक्रांतचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. स्नेहा तिच्या खुर्चीवर येऊन बसली; पण आज तिचे कामात लक्ष लागत नव्हते. तिच्या डोळ्यांसमोरून नाविन्याचा जीवनपट उभा राहिला.

                  निनाद, नाविन्या आणि स्नेहा एकाच वर्षी, एकत्रच ऑफिसमध्ये जॉईन झाले होते. नाविन्या आणि स्नेहा एकाच डिपार्टमेंट मध्ये होत्या परंतु निनाद दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये होता तरीही नाविन्या, स्नेहा आणि निनाद हे तिघे समवयस्क असल्याने त्यांच्यात चांगलीच गट्टी जमली होती.

                  सिद्धेश विवाहित असून तो निनादच्या डिपार्टमेंट मध्ये सिनिअर होता. निनादचा कामामधील काटेकोरपणा, नम्र स्वभाव, दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती यांनी सिद्धेशला निनाद ज्युनिअर असला तरी त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली होती.

                 स्नेहाचं लग्न तर आधीच ठरलेलं असल्याने वर्षभरात स्नेहाचे लग्न देखील झाले होते. दरम्यान नाविन्या आणि निनाद हळूहळू एकमेकांमध्ये गुंतू लागले आहेत असे चाणाक्ष स्नेहाच्या नजरेतून सुटले नव्हते. तिने मध्यस्थी करून दोघांच्या मनात काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला असता निनादने स्नेहाकडे नाविन्या विषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या; पण नाविन्या म्हणाली, ” स्नेहा !  निनाद खूप आवडतो मला. मी त्याच्यात गुंतत चालले आहे हे देखील समजते आहे मला; पण भीती वाटते ग त्याच्याकडे माझं प्रेम व्यक्त करायला. एकतर निनाद उच्चजातीचा, एकुलता एक, सधन आणि मी त्याच्या जातीची नाही. माझ्या घरची परिस्थिती अतिशय गरीब. लहानपणी वडील गेले असल्याने आईने प्रचंड हालअपेष्टा सोसून मला वाढवले. इतके वर्ष आईने कष्ट केले असल्याने आता आई वारंवार आजारी पडत असते. मी अजिबात अनुरूप नाही ग निनादसाठी.”

                    स्नेहाने नाविन्याचे मत निनादला सांगितले. त्यावर निनाद स्नेहाला म्हणाला, ” स्नेहा, मी नाविन्यावर खूप प्रेम करतो. तिच्या रुपापेक्षा, जातीपेक्षा मी तिच्या चांगल्या स्वभावावर, तिच्या चांगुलपणावर प्रेम करतो. त्यामुळे मी तिला मागणी घालणार आहे.” 

                   काही दिवसांनी निनादने नाविन्याला लग्नाची मागणी घातली. तिने निनादला होकार दिला. निनादच्या घरी नाविन्या पसंत नव्हती कारण ती त्यांच्या जातीची नव्हती; पण निनादच्या हट्टापुढे त्याच्या आईवडिलांचे काहीच चालले नाही त्यामुळे त्यांना सून म्हणून नाविन्याचा स्वीकार करावा लागला. कु. नाविन्या शिंदे सौ. नाविन्या निनाद जोशी झाली. 

                   लग्नानंतर नाविन्याने सासुसासऱ्यांना, तिच्या मोठ्या नणंदेला प्रेमाने जिंकून घेतले. निनाद आणि नाविन्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. त्याचे नाव ‘ नकुल ‘ ठेवले.

                    आपली लेक एका चांगल्या कुटुंबात गेली आहे ह्या जाणिवेने नाविन्याच्या आईने समाधानाने डोळे मिटले.

                     आई गेल्यावर नाविन्याला माहेरचे कोणीच उरले नाही; पण निनादच्या प्रेमळ स्वभावामुळे दोघांचा संसार खूप छान सुरू होता. एक दिवस त्या दोघांच्या सुखी संसाराला जणू काही दृष्ट लागली आणि निनादच्या गाडीला एका भरधाव ट्रकने उडवले. घटनास्थळीचं त्याचा मृ*त्यू झाला. 

                    आता मात्र नाविन्याच्या सासरच्यांनी नाविन्याला ‘ पांढऱ्या पायाची ‘ वगैरे दूषणे लावून तिच्या पायगुणाने त्यांचा मुलगा ऐन पस्तिशीत गेला असे तिच्यावर आरोप लावले. नकुलला आपल्याकडे ठेऊन तिला घराबाहेर काढले. नाविन्याला माहेरचा आधार नसल्याने तिने सिद्धेश सरांची मदत मागितली. निनादचा पैसा नाविन्याला मिळू नये ह्यासाठी नाविन्याच्या सासरच्या माणसांनी खूप प्रयत्न केले; पण सिद्धेशने नाविन्याला तिचे सगळे हक्क मिळवून दिले. नकुलचा हक्क देखील मिळवून दिला. नाविन्याला एक छोटेसे घर घेऊन देण्यात सिद्धेशने खूप मदत केली. निनाद गेल्यावर पाच महिन्यांनी नाविन्या पुन्हा ऑफिसमध्ये येऊ लागली.

                   स्नेहा आणि सिद्धेशने नाविन्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग जवळून पाहिले असल्याने त्या दोघांना नाविन्याच्या भविष्याची चिंता कायम भासत असायची. त्या दोघांना वाटायचे की, नाविन्याने पुनर्विवाहाचा विचार करावा; पण नाविन्या ह्या गोष्टीला अजिबात तयार नव्हती. नकुल त्याच्या वडिलांबद्दल तिला विचारत असे त्यावर त्याला नाविन्या ” तुझे बाबा कामासाठी बाहेरगावी गेले आहेत ” असे सांगायची. 

                एके दिवशी नकुलला सणसणून ताप भरला. जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तिने लगेच त्याच्यासाठी औषध आणले परंतु त्याचा ताप उतरायची चिन्हे काही दिसत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी नकुलला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा तिला सल्ला दिला. 

               घरापासून थोडया दूर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये नाविन्याने नकुलला ऍडमिट केले. नकुलचे ब्लड टेस्ट केल्यावर त्याला टायफॉईडचे निदान झाले. नाविन्याने ऑफिसमध्ये सुट्टी टाकली आणि पूर्णवेळ नकुलच्या शुश्रूषेसाठी व्यस्त झाली. 

               नकुलच्या बेडच्या शेजारच्या बेडवर एक मनुष्य ऍडमिट झाला होता. त्याची वयस्कर आई त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये ये – जा करत होती. मधे मधे एक लहान तीन वर्षांची मुलगी तिला सांभाळणाऱ्या दीदी सोबत आपल्या वडिलांना पाहायला यायची. मुलगी अतिशय गोड, बडबडी असल्याने नाविन्या तिचे लाड करू लागली. ती छोटी मुलगी देखील नकुलशी ‘ दादा दादा ‘ करत आपल्या बोबड्या शब्दांनी गप्पा मारत असे. त्या मनुष्याची आई देखील आता नाविन्याशी बोलू लागली होती. डॉक्टरांनी त्या इसमासाठी काही औषधे लिहून दिली असता त्याच्या आईला त्रास होऊ नये म्हणून नाविन्या स्वतः केमिस्टकडे जाऊन औषधे आणून देत असे त्यामुळे त्या इसमाच्या आईला नाविन्याबद्दल आपुलकी निर्माण झाली होती. तो इसम देखील दोन दिवस नाविन्याशी बोलत नव्हता तो देखील तिच्याशी थोडे थोडे बोलू लागला होता.

                बोलण्या बोलण्यात नाविन्याला त्याच्या आईकडून समजले की, तो इसम म्हणजे विनय बांदेकर. एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करतो. त्याच्या बायकोचे बाळंतपणात तापाचे निमित्त होऊन तिचे निधन झाले होते. त्यामुळे विनय तिच्या मृ*त्यूला स्वतःलाच दोषी समजत होता. त्याला वाटायचे की त्याच्याकडून बायकोकडे पाहिजे तसे लक्ष दिले गेले नाही त्यामुळे बायको गेल्यापासून हसताखेळता माणूस एकदम दुर्मुख झाला होता. आता छोट्या ऋतासाठी लग्न कर म्हणून विनयच्या आईने घोष लावला होता परंतु विनय दुसरे लग्न करण्यास तयार नव्हता.

              विनयच्या आईने नाविन्याला तिच्या जीवनाविषयी विचारले असता नाविन्याने सारे काही कथन केले. जवळपास पाच दिवसांनी विनयला डिस्चार्ज मिळाला. ह्या पाच दिवसांत विनय, त्याची आई आणि नाविन्यामध्ये बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण झाली होती. दोन छोटी मुले देखील एकमेकांमध्ये चांगली मिसळली होती. एकमेकांचा फोन नंबर शेअर केला गेला. नकुलला अजून तीन दिवस तरी डिस्चार्ज मिळणार नव्हता. का कोण जाणे विनय हॉस्पिटलमधून गेल्यापासून नाविन्याला खूप उदास वाटू लागले होते. तीच परिस्थिती विनयची देखील झाली होती. 

           विनयच्या आईने विनयच्या मनातले ओळखले आणि तिने त्याच्यापुढे नाविन्याबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. 

             नकुलला आज डिस्चार्ज मिळणार होता त्याआधीच विनय त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. विनयला पाहून नाविन्या मनातून खुश झाली. हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण झाल्यावर विनयने सगळ्यांना त्याच्या गाडीमध्ये बसवून नाविन्याला घरी सोडले. घरी गेल्यावर विनयने आणि त्याच्या आईने नाविन्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. 

             ” हे बघ नाविन्या, तुझंही अजून वय झालेले नाही का विनयचं. तुम्ही दोघे असंच तुमचं आयुष्य एकाकी घालवणार आहात का ? तुम्हा दोघांना एका चांगल्या साथीदाराची गरज आहे. तुला आणि नकुलला एक प्रेमाचे घरटे मिळेल. एक भक्कम आधार मिळेल. तुमच्या मुलांना आईवडील मिळतील. सगळा सारासार विचार करून निर्णय दे. तुझा दुसऱ्यांना मदत करण्याचा लाघवी स्वभाव आम्हाला आवडला. तू नक्कीच ऋताला आईचे प्रेम देशील तसेच विनय नकुलला बाबांचे प्रेम देईल. आता मी म्हातारी ह्या दोघांसाठी किती वर्षे जगणार आहे ? विनय संसाराला लागला की मी समाधानाने मरायला मोकळी.” विनयची आई तळमळीने नाविन्याला सांगत होती.

            विनयच्या आईचे म्हणणे ऐकून घेतल्यावर नाविन्या म्हणाली, ” आई, मर*णाची भाषा करू नका; आई गमावण्याचं दुःखं काय असतं ते मला माहित आहे. मी तयार आहे लग्नासाठी; पण मला माझ्या मानलेल्या भावाला आणि माझ्या खास मैत्रिणीला सारे सांगावे लागेल.”

            नाविन्याने सिद्धेश सर आणि स्नेहाच्या कानावर सारे वृत्त घातले असता दोघांना अतिशय आनंद झाला. मोठ्या भावाप्रमाणे कर्तव्य पार पाडत सिद्धेशने विनयच्या घरी जाऊन पुढची बोलणी केली आणि आपल्या बहिणीचे कन्यादान करून तिची पाठवणी केली. नाविन्या आणि विनयच्या आयुष्यातील सुन्या मैफिलीत एकमेकांचे सूर मिसळले होते.

समाप्त

तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा. आपले अभिप्राय हे आम्हा लेखकांसाठी लिखाणास हुरूप मिळतो.  आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

      धन्यवाद !

14 thoughts on “Marathi Love story – सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या”

  1. कविता पांडे

    खूपच छान असा समाज तयार झाला पाहीजे.समंजस वागणारा.

  2. अरुण समेळ

    नुकतीच एक कथा “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” फेसबुक पाहण्यात आली व लेखिकेचे नांव सौ. नेहा उजाळे असे वाचल्यावर ती कथा अगदी अधिरतेने वाचुन काढली. आतापर्यंत त्यांच्या वाचलेल्या कथा मला फारच आवडल्या असल्यामुळे मी जरा जास्तच घाई केली वाचण्याची. नेहमीप्रमाणे ही कथा देखील फार आवडली. निनाद, नाविन्य, नकुल, विनय यांच्या भोवती ही कथा फिरते व शेवटी आपल्याला एक छान संदेश देते. नाविन्याचा अनेक अडथळ्यांवर मात करून निनाद बरोबर विवाह होणे, नंतर निनादचा अपघातामुळे मृत्यू होणे व तिचा विनय बरोबर पुनर्विवाह होणे हे सर्व लेखिकेने अतिशय सुंदरपणे मांडले आहे. त्याचबरोबर समाजांत सिध्देश सारखी चांगली व मनीष आणि विक्रांत सारखी दुष्ट माणसे सुध्दा असतात हे दाखविले आहे. कथा खुपच छान आहे. लेखिका नक्कीच कौतुक करण्यास पात्र आहे. एका ठिकाणी नजर चुकीने नकुल ऐवजी कुणाल लिहीले गेले आहे व टायफॉइड ऐवजी टायफड झाले आहे ते दुरुस्त करावे.

    1. हो काका, मी खूप घाईघाईत कथा लिहून काढली त्यामुळे तिच्यावर पुन्हा नजर टाकू शकले नाही. तुम्ही कायम सुंदर अभिप्राय देता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि मुख्य म्हणजे लिखाणातील चुका माझ्या निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🏻

  3. खूप छान कथा. सामाजिक
    प्रबोधनपर. लेखिकेचे अभिनंदन.

  4. खूपच ह्रदयस्पर्शी कथा आहे. नवरा गेल्यावर समाजाचा बदलणारा दृष्टिकोन आणि तिला निर्मळ मनाने साथ देणारा व्यक्ती ह्यालाही समाज किती गलिच्छ नजरेने पाहतो. नायिकेची मैत्रीण त्यांना ज्या पद्धतीने सूनवते ते योग्यच. असो अंत भला तो सब भला. कथेची गुंफण छान केली आहे ताई👌👌

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top