मराठी कथा -अपूर्ण प्रेम

WhatsApp Group Join Now

    प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकरांनी म्हटलं जरी असलं तरी प्रत्येकाच प्रेम काही सारखं नसतं. प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट वेगळीच असते. स्वत:च प्रेम खासच असतं. प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम मिळतंच असंही काही नसतं. आज आपण अशीच एक गोष्ट, प्रेमाची गोष्ट वाचणार आहोत.

अपर्णा तशी फार सुंदर, देखणी वगैरे नव्हती. आपली चारचौघांत उठून दिसेल अशीच होती. डोळ्यात व चेहऱ्यावर आत्मविश्वास मात्र ठळक जाणवत होता. सुंदर नृत्य सादर करणे, कविता करणे, आपले विचार मांडणे हे फारच छान जमतं होत तिला. खेडेगावातून शिक्षणासाठी शहरात आलेली ही अपर्णा.

काॅलेजमध्ये आज पहिला दिवस. अगदी पहिल्याच दिवशी सिनीयरने अडवणूक करून तिची चौकशी सुरू केली. सगळ्यांना वाटलं आता हिची जाम मजा घेवू; पण ही आपली धिटाई धिटुकली न घाबरता सगळ्या प्रश्नांची उत्तरे पटापट देत राहिली. तिथून पुढे येत असताना तिची नजर सगळीकडे फिरत होती अगदी निरखून पाहत होती. एका बाजूला मित्र-मैत्रिणींचा घोळका, दुसरी कडे उनाडक्या करणारे मुले देखील होती. आता तिची नजर काॅलेजच्या एका बाजूला जी हिरवळ होती तिकडे गेली. मनातच पुटपुटत होती. सगळं बघत बघत ती तिच्या क्लासरूमच्या दिशेने निघून गेली. आजचा पहिला दिवस तसा छानच गेला. खूप छान मित्र मैत्रिणी झालेल्या. अभ्यास, प्रोजेक्ट, गॅदरींग असे करत करत पहिलं वर्ष संपलं. पहिलं वर्ष फारच पटकन निघून गेलं होतं.

आता दुसऱ्या वर्षी काॅलेज सुरु झाले. ती नेहमी एका मुलाला काॅलेजच्या हिरवळीवर पुस्तक वाचतांना बघत होती .हा काय एवढ्या गोंधळात वाचन करतो काय माहित; पण पहिल्यावर्षी तिने फार विचार नाही केला.ती फक्त त्याला पहायची; पण आता तिला त्या मुलांविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. तिने एकदिवस ठरवलं की नक्की काय वाचत असतो हा ? तिने माहिती काढली तेव्हा तिला समजले की,त्याला साहित्याची , विविध कथा वाचायची सवय आहे. ती सतत त्याचा विचार करू लागली. थोडक्यात काय तर ती त्याच्यामध्ये गुंतू लागली होती. त्याच्या प्रेमात पडू लागली. 

एक दिवस ती काॅमनरूम मध्ये गेली तेव्हा तिला समजले की आपल्या काॅलेजच गॅदरींग आहे आणि ॲंकरिंगसाठी ऑडिशन द्यायचे आहे. अपर्णाने तिचे नाव दिले. दुसऱ्याच दिवशी ऑडिशन द्यायचे होते. ती स्टेजवर गेली तेव्हा तिला समजले की परीक्षक तर अजित ! हो तोच मुलगा ज्याला ती रोजच पाहत होती. त्याला बघून तिला आनंद तर झालाच पण थोडी नर्वस पण झाली. स्टेजवर सगळं अवसान एकवटून तिने ऑडिशन दिले. दुसऱ्याच दिवशी तिला समजले की तिचे सलेक्शन झाले आहे; पण तयारीसाठी तिला अजितसोबत बराच वेळ थांबावे लागेल. तिने तशी तयारी केली. मग काय रोजच्या तयारीमुळे ती अजितच्या जवळ जास्त वेळ घालवू लागली. यामुळे ती अजितवर अधिकाधिक प्रेम करू लागली. अजित तसा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण त्याला साहित्याची आवड होती तशीच तिला देखील साहित्याची आवड होतीच. 

काॅलेजच गॅदरिंग खूपच छान झाले. अजितने सगळा कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर जावून अपर्णाचे अभिनंदन केले. तिचा हात आपल्या हातात घेतला होता. ती आज फारच खूष होती. आता काय रोजच अपर्णा आणि अजित मस्त गप्पा मारत बसायचे. कधी लेखकांवर चर्चा असायची तर कधी विषय कोणता असावा यावर चर्चा सुरू झाली. विचारांची देवाणघेवाण होता होता फोन नंबर पण देण्यात आले. एकमेकांना ते दोघे सुखदुःख सांगू लागले. या सगळ्यामध्ये अपर्णा तिचं प्रेम लपवत असे. कधी डोळ्यात पाणी येई तर कधी मन भरून येई ; पण आपलं प्रेम आहे हे सांगू की नको या विचारात ती असायची. कॅम्पस मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि तो नोकरीनिमित्त बाहेरगावी गेला.

   त्यानंतर दोन वर्षे अशीच गेली. एक दिवस अचानक तिला तो भेटला. ध्यानीमनी नसतानाही तो भेटला ह्याचा आनंद ती लपवू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिपला होता, ” मी परत इथे आलो तर नक्कीच तुला भेटेन.” असं सांगून तो गेला होता. ते दोन – तीन तास आणि पुढचे दोन  दिवस ती त्या अनामिक गुलाबी विश्वात होती. त्याच असं अचानक भेटणं, बोलणं काहीच समजत नव्हतं पण हो ह्या दोन वर्षांत तो खूपच बदलला होता. जरा जास्तच छान दिसू लागला होता. तो आता तिला जास्त जपू लागला होता. त्यांच्या भेटी वाढू लागल्या.

तो जेव्हा जेव्हा शहरात येई तेव्हा तेव्हा तो तिला भेटायचा. काॅफीवरून सुरु झालेली भेट डिनरपर्यंत कशी गेली हे त्यांना पण समजलं नाही. त्याला आपल्या मनातलं सांगावं की नको या संभ्रमात ती आजही होती. ते सांगून आपण आपले प्रेम तर गमावून बसणार नाही ना ? ह्याची चिंता तिला वाटत होती म्हणून मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून ती वेळ मारून नेत होती शिवाय त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाजही लावता येत नव्हता.

एक दिवस तो असाच सकाळीच भेटायला आला पण न सांगताच. तिच्या होस्टेलच्या बाहेर येऊन त्याने तिला फोन केला की,” मी आलो आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे. पटकन आवरून ये. मी वाट पाहतो.” तिला विचार पण करायला वेळ नव्हता आणि तिने आवरलं आणि ती त्याच्या सोबत गेली. दिवसभर फिरून ,रात्री जेवण करून दोघेही एकमेकांशी एक शब्दही न बोलता चालत होते.

पौर्णिमेची ती रात्र होती . आकाशात पूर्ण चंद्र होता. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसुम होती. अचानक त्याने शांतता भंग केली व म्हणाला, ” आकाशात पूर्ण चंद्र, ही थंडी, ही शांतता, आयुष्य जगायला अजून काय लागतं ?” अपर्णाने हे ऐकलं आणि ती चमकून अजितकडे  बघू लागली. अजित मात्र त्यांच्या तंद्रीत होता. ह्या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तिचं होस्टेल आलं, निरोपाची वेळ आली; आणि न राहवून तिने त्याला घट्ट मिठी मारली.

अचानक तिच्या मिठी मारण्याने तो भांबावून गेला होता पण त्यानेही तिला मिठीत घेतलं. काही क्षणांचा खेळ. एकमेकांच्या मिठीत काही क्षणच गेले असतील पण तिला ते जन्मासारखे वाटले. शेवटी अजितने मिठी सैल केली आणि तिला म्हणाला,” खूप उशीर झाला आहे तुला आता गेलं पाहिजे.” असे बोलून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तिच्याकडे पाठ करून तो त्याची वाट चालू लागला. त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. ती पण सरळ आपल्या रूमकडे गेली. रडत रडत तिला कधी झोप लागली समजलंच नाही.

 सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा ती काल घडलेल्या घटनेमुळे खूपच खुश होती. तिला वाटले कि,खरच अजित पण आपल्यावर प्रेम करू लागला आहे.या विचारानेच ती लाजेने लाल झाली होती..ती आवरून काॅलेजला जाण्यासाठी तयार झाली.तेवढ्यात  तिला तिच्या मोबाईलवर अजितचा मेसेज आला आहे हे दिसले. तिने तो मेसेज वाचायला सुरुवात केली, ” अपर्णा काल जे घडलं ते घडायला नको होतं. तू माझ्यावर प्रेम करते हे मी जाणून होतो.

ते पण तू काॅलेजमध्ये असल्यापासून मी ते तुझ्या नजरेत पाहिलं होतं, ओळखलं होतं; पण मी या आयुष्यात प्रेम करून बसलो आहे. या जन्माचं प्रेम मला मिळालं होतं. नियतीने जरी माझ्याकडून तिला हिरावून घेतलं तरी पण  मी आजही  तिच्यावर प्रेम करतो आणि या जन्मात तरी मी कोणावरही प्रेम करू शकत नाही. मला आता माझ्या आयुष्यात कोणीच नको आहे. आपलं मैत्रीपूर्ण नातं मला टिकवायचं होतं; पण काल जे घडलं त्यामुळे ते पूर्णपणे गळून पडलं. तुला एक सांगतो तू मला विसरुन जा आणि काल जे घडलं त्यासाठी तू स्वत:ला दोष देऊ नको. आयुष्यात खूप मेहनत कर, तुझं आयुष्य घडव, तुझ्या इच्छा पूर्ण कर. मी तुला पुन्हा कधीच भेटणार  नाही. काही प्रेम कहाणी अपूर्ण असलेल्या चांगल्या असतात. अपूर्णतेतही पूर्णत्व शोधावं लागतं.” हे वाचता वाचता तिचे डोळे भरून आले होते.

रडत रडत तिने डोळे पुसत  तो मेसेज आणि त्याचा नंबर डिलीट करून टाकला. तिला त्याचा राग आला होता.खूपवेळ रडून झाल्यावर तिच्या लक्षात आले कि त्यांच्यावर राग करून काय उपयोग.आपल्या नशिबात त्याच प्रेमच मिळणार नसेल तर,या विचारात तिचं मन आणि बुद्धी यांच्यात युद्ध सुरु होत.ती मैत्रिणी मध्ये असं काही जाणवून देत नव्हती.तिची जिवलग मैत्रीण वैशु तिला मात्र सगळं समजतं होतं.शेवटी न राहवून वैशु तिला म्हणाली,”अपर्णा तुझ्यात झालेला बदल फक्त मीच ओळखू शकते.तु वरून कितीही नाॅर्मल आहे असं दाखवत असली तरी तु आतुन खूप तुटली आहेस.हे काय ग तु का सारखा विचार करते त्याचा.माझ एक तो आयुष्यात नाही म्हणून रडत बसणार आहेस का??उलट तु त्याच्या प्रेमाला तुझी ताकद बनव .तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे.

त्याने जे स्वप्न पाहीली किंवा तुला जे सांगितले आहे त्याचा विचार करून आयुष्यात पुढे जा.”त्यावर अपर्णा म्हणाली,”काय करू मन तयार झालं तर बुद्धी तयार होत नाही.सगळ समजतं पण उमजत काही नाही.”शेवटी ती तिचे स्वत:चे डोळे पुसत एक निर्णय घेते.आता काही झाले तरी आपण रडायचं नाही.आयुष्यात नक्की मोठं होऊन दाखवायचं.

त्या दिवसानंतर तिने त्याचा कधीच विचार केला नाही. खूप मेहनत केली अभ्यास केला ,आज ती खूप प्रतिष्ठीत व्यक्ती आहे. मोठ्या पदावर आहे. तिने आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने ऐकलं.आज तिला नाही माहित तो कुठे आहे,कसा आहे ,त्याने लग्न केलं कि नाही,नविन काही वाचलं कि नाही..काहिही माहित नाही.तीने त्याची माहिती पण काढली नाही.अधूनमधून काही मित्र मैत्रिणी कडून येत कानावर त्यांच्याबद्दल पण ती पूर्ण दुर्लक्ष करते.

आज तिने तिच्या  वयात आलेल्या मुलीला हेच  सांगितले की  ‘पहिल प्रेम’ म्हणजे काय हे सगळं आठवून गेलं.सवयीप्रमाणे तिने पाणी डोळ्यातच आठवलं.शेवटी मात्र लेकीला हे सांगायला विसरली नाही कि,’छकुली,अगं  काहीं प्रेमकथा अपूर्णच असलेले छान असतात. तेच प्रेम आपली ताकद बनून आयुष्यात आपण पुढे जात असतो.

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

4 thoughts on “मराठी कथा -अपूर्ण प्रेम”

  1. खूप छान..अप्रतिम..कथा..’ अपूर्ण प्रेम
    ‘ अपूर्ण प्रेमाला अपर्णा ने एक ऊर्जा बनऊन..अजित ने सांगितल्या पेक्षा ही मोठं होऊन दाखवल..! ..अपूर्ण प्रेमाचा सुधा आदर्श घेता येतो..अस आहे या कथे मध्ये

  2. सारंग कुलकर्णी

    खूप छान कथा…
    पहिलं प्रेम मिळालं नाही तरी त्यांच्याच आठवणीत रूंजी घालणं सोपं नसतं आणि दुसरं प्रेम मिळालं तरी पहिल्या प्रेमासोबत प्रतारणा होईल म्हणून दुसरं प्रेम नाकारणे पण सोपं नसतं

  3. Very nice story. I think both have made their love completely by devotion to their loved ones. Ultimately true love is only giving and not taking. So this is Not incomplete Love Story but truly Complete Love.
    Kavita Keep posting many stories we will be waiting for it.
    Thanks

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top