रात्रीचे बारा वाजून गेले होते. ती अतिशय उद्विग्न होऊन एकटक शून्यात नजर लावून बसली होती. तिला काहीच सुचत नव्हत. तिला हा एवढा मोठा धक्का पचवावा लागेल असं तिला स्वप्नात देखील वाटल नसेल.
ती आतून तुटली होती वैतागली होती. समोर आता तिला फक्त अंधार आणि अंधारच दिसत होता. अशा वेळेस कोणीच जवळ नसावं. एकटच बसून रहावं असं वाटतं. मनाच्या जखमा भरून येण्यासाठी शांतता आणि एकांत याशिवाय दुसरा उपाय नाही.
तिची इच्छा नसतानाही तिचा भूतकाळ तिच्या समोर येत होता होता. डोळ्यासमोरून झरझर आयुष्याच्या डायरीची पाने मागे गेली आणि दहा वर्षापूर्वीच्या आयुष्यात पोहोचली.
अतिशय शांत सौम्य स्वभावाची सुशील मुलगी म्हणून सगळ्यांना परिचयाची असलेली निशिगंधा नावाप्रमाणेच अतिशय नाजूक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेली गोरी गोमटी हुशार मुलगी होती. नुकतीच दहावी च वर्ष संपलं होत. गाव छोटे असल्यामुळे पुढच्या शिक्षणाची तिथे सोय नव्हती तिचे वडील अगदीच मागासलेल्या विचारांचे नव्हते त्यामुळे त्यांनी तिला तालुक्याच्या ठिकाणी पुढच्या शिक्षणासाठी पाठवायचे ठरवले आणि गावातल्या मोजक्याच मुलींच्या पालकांना पुढील शिक्षणाचे महत्व पटलेले होते आणि आर्थिक दृष्ट्या हे सगळ्यांना झेपतही नव्हते त्यामुळे ठराविकच भाग्यवान मुलींना ही परवानगी मिळत असे. निशिगंधा अतिशय आनंदित झाली जेव्हा तिला तालुक्याच्या ठिकाणी अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळाला.
मनापासून अभ्यास करून या संधीच तिने सोनं करायच ठरवलं. पहिल्याच तिमाही परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून तिने जोरदार सुरुवात केली. पाच सहा मैत्रिणींचा घोळका बस ने कॉलेजला सोबत येत जात असे. हसत खिदळत त्यांचा प्रवास खुपच छान होई. कॉलेजच्या बाहेर बसून चिंचा, आवळे, बोर, पेरु विकणार्या मावशींकडून खाऊ घेऊन तो खात खात त्या येत असत.
कधीतरी टपरीवर कटींग चहा घेऊन मग घरी जात असत. या टपरीवरच तिची दिपक नावाच्या मुलाशी ओळख झाली. आणि मग तो तिच्या आयुष्यात शिरला. हळूच तिच्याकडे बघत बसणार. तिच्यासाठी बसमध्ये जागा पकडून ठेवणार. असं करुन दिपक ने तिच्या मनात जागा मिळवली. तो तिचा पेक्षा चार वर्षांनी मोठा होता आणि पुन्हा पुन्हा नापास होऊन तो तिसऱ्यांदा बारावीची परीक्षा देत होता.
ते वयही तसं हळवं असतं. तिचा अभ्यासातील रस कमी होऊ लागला. दिवसभर कॉलेजचे तास बुडवून त्याच्या बरोबर फिरायचं आणि उरलेल्या वेळात त्याच्या आठवणीत रमायचं हेच तिचं आयुष्य होऊन बसलं. मैत्रिणी तिची वाट बघून घरी निघून जात. असं नाही की हे चुकीच आहे हे तिला कळत नव्हतं. पण अडनिडय़ा वयात या गोष्टी कळल्या तरी वळत मात्र नाहीत.
अकरावीत काठावर पास झाल्यानंतर घरी सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं एवढी हुशार मुलगी अचानक एवढे कमी मार्क घेऊन कशी काय बरं पास झाली. तेव्हा घरच्यांनी शोध घेतला आणि कुठून तरी घरात बातमी पोहचली.
आता मात्र आईवडील तिचे जणू वैरी झाले होते. तिला घराबाहेर जायला बंदी घालण्यात आली. त्यातल्या त्यात एखाद बरं स्थळ बघून तिच लग्न उरकून टाकू असं ठरलं. काही स्थळ बघुन झाली आणि एवढ्यात शेजारच्याच गावातल्या सरपंचांच्या मुलाच स्थळ चालून आलं. हे तर सोन्याहून पिवळ झालं. असच निशिगंधाच्या घरच्यांना वाटलं.मुलगा कसा आहे आणि तिला आवडला की नाही हे सुद्धा कुणी विचारलं नाही.
निशिगंधा सौ. निशिगंधा मल्लारराव पाटील झाली. नव्याचे नऊ दिवस छान गेले. एका गोड कन्यारत्नाची नाजूक पावले घरात दुडूदुडू धावू लागली. लग्नाला चार पाच वर्ष झाली असतील नसतील तर कुठून तरी दीपक बद्दल मल्हाररावांना समजले. गवतावर निखारा पडल्या सारख निशिगंधाच आयुष्य बदलून गेल.
मल्हारराव सतत तिच्यावर संशय घेऊ लागले तीला थोडी सुद्धा हसत खेळत राहाण्याची मुभा नव्हती. ती घराबाहेर एकटी जाऊ शकत नव्हती. कायम आपण काहीतरी मोठं पाप केलं आहे. आणि त्याच्यामुळे तिने नेहमीच अपराधी पणाच्या भावनेमध्ये राहायला हवं अशी तरी त्यांची अपेक्षा होती.
बाहेरच्या लोकांसाठी ते दोघे नवराबायको होते. सार सुखाने चाललं होता फक्त जगाला तमाशा नको म्हणुन ते दोघे मुलीला घेऊन कुटुंबांसारखे राहत होते. अशीच अजून काही वर्ष निघून गेली. त्यांची कन्या मोठी होऊ लागली तसं आताशा सगळं पुन्हा नॉर्मल आहे असं वाटतय तोच एकं मोठ्ठ वादळ दारात येऊन उभं राहिल.
तिला आज अचानक एक मोठ्ठा धक्का बसला होता. मल्लारराव आणि लीना तिची शाळेतली मैत्रीण हे दोघे अगदी लग्नापूर्वीपासून गेले कितीतरी वर्ष एकत्र होते आणि हे सगळ तिच्या नाकाखालून तिची फसवणूक करून चालू होत. लीना मल्हार रावांच्या पक्षकार्यालयात हिशेब तपासनीस म्हणून कामाला होती. निशिगंधा तिला शाळेपासून ओळखत होती. ती तिची वर्गमैत्रीण होती. एकदा तीने मल्हाररावांचा फोन चुकून उचलला आणि समोरच बोलणे ऐकून ती जागच्या जागीच थबकली.
मग तिला एक एक संदर्भ लागले, का मल्हारराव एवढ्या वेळ घराबाहेर असतात पक्षकार्यालयात जास्तीत जास्त वेळ का घालवतात याचे सगळे संदर्भ लक्षात येताच ती बिथरली. तिला एवढ्या बंधनात का ठेवण्यात आलं हे आता तिच्या लक्षात येत होत. स्वतःच्या भोळेपणावर चिडाव की नवऱ्याच्या ना*लायकपणावर ठोस पावले उचलावी हेच तिला कळत नव्हते. तिला सासर माहेर दोन्हीकडून दबाव टाकण्यात येत होता की तू सगळ झाल गेलं विसरून जा. मोठ्या मनानं संसार सांभाळून घे.
सगळ्यात जास्त वाईट तिला या गोष्टीच वाटत होत. कि लग्नानंतर तिची काहीच चुक नसताना तिला या गोष्टीवर आयुष्यभर ऐकवलं गेलं. त्यासाठी तिने स्वतःलाच शिक्षा करून घ्यायची. आणि आता जेव्हा त्याची चूक आहे तेव्हाही तिने स्वतःलाच शिक्षा करून घ्यायची. हा कोणता न्याय आहे का तिने हे सगळ सहन करायचं?
जेव्हा निशिगंधाने हा भयंकर गु*न्हा स्विकार न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला समाजाने जणू वाळीत टाकल. माहेरी ती आश्रितासारखी रहात होती. कुणाचाच मानसिक आधार नव्हता. ती एकटी पडली होती.कुठेतरी समाजातील या मान्यते ला विरोध व्हायलाच हवा. संसार जर दोघांचा आहे तर तो सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरच का स्वतःची चूक असेल तरी आणि त्याची चूक असेल तरी तडजोड फक्त तिच्याच वाटय़ाला असं का….
निशिगंधाच्या डोक्यातून हे विचार जातच नव्हते. विचार करून डोक फुटेल कि काय असं झाल होत तिला.
इकडे लीना तिचं पितळ उघडं पडताच जी गायब झाली, ते गावात कोणालाच कळले नाही. हळुहळू मल्हाररावांना कळाले की, घरात हाताखाली कितीही नोकर चाकर असले चांगलं चांगलं खायला असलं तरी घरच्या लक्ष्मीची सर कशालाच येत नाही. तिच्याशिवाय घराला घरपण नाही. तिच्या इतका जीव आपल्याला कोणीही लावू शकत नाही. आईविना मुलीचे होणारे हाल सुदधा त्यांना बघवत नव्हते. पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघाल्यावर त्यांनी निशिगंधाला समजावून आपल्या घरी आणले.
निशिगंधानेही मुलीच्या काळजी पोटी का होईना स्वाभिमान थोडासा बाजूला ठेऊन मोठ्या मनाने मल्हाररावांना माफ केले. आई वडील आणि घरच्यांना आनंदात पाहून त्यातच तिने स्वतःचा आनंद मानला.अशा कितीतरी निशिगंधा आज समाजात असतील ज्या कुटुंबाच्या आनंदासाठी आयुष्यभर तडजोड करत असतील.
आपल्या संस्कृतीने काही अलिखित नियम मान्य केले आहेत. लग्नसंस्था त्यातलाच महत्त्वपूर्ण नियम आहे. सर्वानी मिळून या नियमानुसार रहाण्यातच समाजातील सर्वांचे हित आहे. हे जेव्हा सगळ्यांना कळेल तेव्हाच स्त्री पुरुष दोघेही सुखी होतील.
पण शेवटी काही प्रश्न अनुत्तरितच राहिले जसं स्त्रीनेच नेहमी सांभाळून घेत राहणं. तडजोङ करण या गोष्टी जरी खऱ्या असतील तरी काही स्त्रिया या सहानुभूती चा गैरवापर करताना देखील दिसतात.
यासाठी एकुणच सामाजिक मुल्ये लहानपणापासून पुढच्या पिढीत रुजवण्याची वेळ आली आहे.
लेखिका- सौ. माधुरी शेलार, नवी मुंबई
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Khup sundar katha ahe.