उन्हाळ्याचे दिवस चालू झाले. दुपार झाली. जानकी घाईघाई नदीवर पाणी आणण्यासाठी चालली होती.एका हातात घागर आणि दुसऱ्या हातात परकरचा सोगा धरून ती पळतच चालली होती. पायामध्ये चप्पल नव्हती. त्यामुळे दगड टोचून तिचे पाय वाकडे तिकडे पडत होते.जवळच्या माळरानावर काही जनावरे चरत होती.एका झाडाच्या सावलीला आजोबा निवांत बसले होते.त्यांनी जानकीला पाहिले आणि हाक मारली.
” आगं ये जानके …..जरा दमानं पायाला दगड टोचत्यात.एवढ्या उन्हाचं पाणी भरायला येतात व्हय.”

“आजोबा माझी परीक्षा चालू आहे मला वेळ नाही. काम पण खूप आहे.”मला लवकर घरी जायचं आहे.”भरलेली घागर कमरेवर घेत जानकी बोलली.
जानकी ही दहा वर्षाची. जानकीचा जन्म झाला तेव्हा तिची आई देवा घरी गेली. जानकीची आई गेल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले . चांगली बाई आई म्हणून घरात आणली होती परंतु ती एकदम धूर्त निघाली. तिने चांगलं वागून सगळ्यांचा विश्वास संपादन केला. आणि नंतर तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तिच्यापुढे आता जानकीच्या वडिलांचेही काही चालेना. जानकीचे वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे, त्यामुळे जानकीवर तिच्या सावत्र आईचा म्हणजे निर्मलाचा सतत पहारा असायचा. ती जानकीकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची. लहानसं लेकरू भीती पोटी राब राब राबायचं. तरीही तिला कधीही मायेचा पाझर फुटला नाही. घरातील छोटी मोठी सर्व कामे करून जानकी शाळेत जायची. आजही ती शाळेचा पेपर झाल्यावर पाणी आणण्यासाठी नदीवर आली होती.
“किती वेळ लावला गं पाणी आणण्यासाठी. तिकडेच बसली असशील नदीवर टाईमपास करीत.” निर्मला रागला येत बोलली.
जानकी घागर घेऊन तशीच अंगणात उभी होती. तिच्या पायाला चटके बसत होते. हिंदळलेल्या घागरीच्या पाण्याने कपडे ओली होऊन अंगाला चिटकली होती. तिला आता ते घागरीचे ओझे पेलवत नव्हते. ती एक पाय वर एक पाय खाली करत उभी होती.
“आता तिथेच भूतावानी उभी राहणार आहे का?घागर ठेव आणि भांडी घासायला घे. “आदेश सोडत निर्मला बोलली.
“आई मी भांडी घासून झाल्यावर अभ्यास करू का?माझी परीक्षा चालू आहे.”जानकीने घाबरतच विचारले.
“अभ्यास करून काय दिवे लावणार आहे.लग्नच तर करायचं आहे.सगळी कामे आवरली का मग कर अभ्यास संध्याकाळी .”रागावून निर्मला म्हणाली. जानकीने मान हलवली. आणि भांडी घासायला लागली.तेवढ्यात जानकीचे बाबा (केशव) आले.त्यांनी जानकीला भांडी घासताना पाहिले.
” बाळा तुझी परीक्षा चालू आहे ना ? तु का घासते भांडी?अभ्यास करायचा ना?”केशव मायेने बोलला.निर्मला शेंगदाणे खात बाहेर आली.तिने केशवला पाहिले.
“मी म्हणत होते आगं राहूदे मी घासेल नंतर… तर जानकी म्हणाली आई तुला पण किती गं काम असतय.मी करते मदत. नाहीतर तसे काही जास्त काम सांगत नाही मी तिला.”निर्मला रागाने एक कटाक्ष जानकीकडे टाकत बोलली.
केशवला सर्व काही ज्ञात होते. परंतु तो काही तिच्या नादाला लागला नाही.कारण निर्मला खूप भांडखोर बाई .तिला घर डोक्यावर घ्यायला जास्त काही कारण लागत नव्हते.आणि पडत्या काळात निर्मलाच्या माहेरच्यांनी केशवला आर्थिक मदत केली होती. त्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबला गेल्यामुळे केशव निर्मलाला जास्त कधी काही बोलत नसे. केशवचा जानकीवर खूप जीव होता.सतत त्याला तिची काळजी वाटे.जानकीचा स्वभाव तिच्या आईसारखा होता.मनमिळाऊ,प्रेमळ …. जानकी ही शाळेतील गुणवंत आणि सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थी. शिक्षकांना तिच्या घरची परिस्थिती माहिती होती. त्यामुळे तिचे अधिकच कौतुक वाटे. शिकवलेला शब्द न शब्द ती आत्मसात करत असे. कायम तिला शिक्षकांची शाबासकीची थाप मिळत.
कामाचा आणि अभ्यासाचा पसारा सावरत जानकी आता मोठी होत होती.परकर पोलक्यातून ती आता साडीत आली. वडिलांच्या छत्राखाली मायेच्या आठवणी ती मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवत होती. जानकी शिक्षणाची मोठी मोठी स्वप्न पाहू लागली. परंतु बापलेकीचं प्रेम हे निर्मलाच्या डोळ्यात सलू लागलं. ती जानकीच्या पुढच्या शिक्षणासाठी विरोध करू लागली. कारण उच्च शिक्षणासाठी जानकी बाहेर पडणार आणि घरातली कामं मग कोण करणार? हा प्रश्न तिला सतावू लागला. पैशांच्या बाबतीत निर्मला खूप लालची होती. माहेर वरून भरपूर आर्थिक मदत मिळत असे. माहेरची गडगंज श्रीमंती होती. परंतु तिला पैशाचा मोह सुटत नव्हता.
जानकीसाठी आता चांगल्या ठिकाणची स्थळे सांगून येऊ लागली. परंतु शिक्षणासाठी जानकी आणि तिचे बाबा सध्या तरी नको म्हणून नाही सांगत. जानकीला उच्चशिक्षणासाठी बाहेर पाठवावे .म्हणजे तिला तिच्या भविष्याची उत्तम प्रकारे तरतूद करता येईल.असे त्यांना वाटत होते.परंतु जानकीच्या सावत्र आईच्या मनामध्ये वेगळेच डाव शिजू लागले. जानकी साठी जवळच्या गावातले स्थळ सांगून आले. माणसे चांगले घरंदाज होती.असे सांगण्यात आले होते.बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलाला मुलगी पसंत पडली. परंतु जानकीचं काही केल्या लग्नासाठी मन तयार होत नव्हतं. हो नाही करत तिनेही लग्नाला होकार दिला. कारण की तिला पुढील शिक्षणासाठी नक्कीच आम्ही पाठिंबा देऊ असा आश्वासन मुलाकडच्यांनी दिलं होतं. हे स्थळ आडून आडून निर्मला ने सुचवले होते. जवळ जानकीला दिले.तर जानकीची वरच्या वर ये जा होईल. माझ्यासाठी ते बरं पडेल. असं तिच्या मनात कपट चालू होतं.
बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. जानकीला बाबांची आणि बाबांना जानकीची काळजी वाटू लागली. शिक्षणासाठी आणि बाबांसाठी तिची ओढ काही केल्या कमी होईना. तिचा राहून राहून अश्रूंचा बांध फुटू लागला.बाबा आणि जानकी गळ्यात पडून खूप रडले. निर्मला मात्र तशीच बघत होती. जानकीची पाठवणी झाली. बाबांचा आशिर्वाद घेऊन जानकी सासरी गेली.जड अंतकरणाने जानकीचे बाबा घरी आले. सगळं घर जानकी शिवायचं सुन – सुन वाटत होतं. घरातील प्रत्येक वस्तूला जानकीची सवय झाली होती .
“आज काही केल्या मन कशातच लागत नाही गं निर्मला.”केशव केविलवाण्या चेहऱ्याने बोलला.
” बर झालं गेली नाहीतर उगाचच वाकडे तिकडे पाय पडले तर आपली नाचक्की!”निर्मला चेहऱ्याच्या हावभाव बदलत बोलली.
“अगं काय बोलते तुझं तुला तरी समजते का? तु जशी घरात आली तशी राबराब राबतय माझं लेकरु .आणि तू म्हणते की बरं झालं.कधीतरी मायेने बोलली का गं तू ? तिला कधी प्रेमाने जवळ घेतले का? कायम तिला दूषणं देत तिच्याकडून काम करून घेतले.”केशवचा पारा आता चढला होता.तो रागानेच बोलू लागला.
“माझ्या पोटाला आली असती तर केले असते की लाड!पण मी सावत्रच ना!कशासाठी करायचं.मला मूलबाळ होईल वाटलं होतं पण…….?” निर्मला बोलता बोलताच थांबली.
” बरच झालं तुझ्या कुशीतून नाही जन्मली .तू कपटी विचारांची … आणि माझी बाई ही पवित्र विचारांची…… ” संतापून केशव बोलत होता.
माप ओलांडून जानकीचा गृहप्रवेश झाला.रीतिभातीप्रमाने सर्व विधी पार पडले.जानकीचे लेकीच्या भुमिकेबरोबरच बायको आणि सुनेच्या भूमिकेत पदार्पण झाले. सासरच्या लोकांचे प्रेम पाहता जानकीच्या मनात आशेचा किरण चमकून गेला.कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ती सुखावली.तिच्या स्वप्नांना नवे पंख फुटल्यासारखे तिला वाटू लागले. परंतु नव्याचे नऊ दिवस संपले. सुखाच्या दिवसांना दुःखाची दृष्ट लागली. सासुबाईंनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली.पण जानकीने विचार केला की आपल्याला कोणाची नाही तरी नवऱ्याची साथ भेटली तरी मी भरून पावले. पण सगळे फासे हे उलटेच पडत होते.थोड्याच दिवसात जानकीला तिच्या नवऱ्याची म्हणजे सुधीरची चाल, ढंग कळू लागले.नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एक अनामिक ओढ असते,तशी सुधीरला नव्हती.तो त्याच्या वेगळ्याच धुंदीत जगत होता.तो जानकीशी वाईट वागत नव्हता;पण तिला अपेक्षित असाही वागत नव्हता.
पहिल्या बोळवणीचा दिवस आला. सुधीर जानकीला घेवून सासरवाडीला गेला.जानकीचे बाबा डोळ्यात प्राण आणून लाडक्या लेकीची वाट पाहत होते.त्यांनी लेकीचे व जावयाचे मोठ्या कौतुकाने आदरतिथ्य केले.जानकीच्या सावत्र आईने मात्र नाक मुरडले.तिला विशेष असे कौतुक वाटले नाही.जेवढ्या दिवस जानकी राहिली तेवढ्या दिवस निर्मलाने जानकीकडून सगळी रखडलेली कामे करून घेतली.जानकीला महेरपणाचं सुख मिळालं नाही.आता तिची सासरी पाठवणी झाली.बाबांच्या गळ्यात पडून जानकी हमसून हमसून रडू लागली.तिचे बाबा तिला सोडवायला तिच्या सासरी आले.जानकीच्या सासूने त्यांचा पाहुणचार केला नाही . त्यातच त्यांना बरेच काही उमगले.दुःखी मनानं लेकीला निरोप दिला.दोघांच्याही मनाची अवस्था बिकट झाली होती.बाप निघून गेल्यावर सासूबाईंनी बरचं काही सुनावले.
“एवढ्या दिवस माहेरी मुक्काम करायचा आसल तर माहेरीच रहा. ” अशी सासूबाईंनी सक्त ताकीदच दिली . “आता आरमाचे दिवस गेले.कामाला लागायचं.”सासूबाई रोखात बोलल्या.
“आई…. पण माझं शिक्षण “जानकी खाली मान घालून बोलली.
” कसलं शिक्षण ते सगळं विसरायचं आणि काम करायचं . सूनचं काम तेच असतय.आणि आई ,बाई नाय म्हणायचं आत्याबाई म्हणायचं .मान तो मान समजलं का ?” नाकातल्या नथेला झटका देत सासू म्हणाली.
आता मात्र जानकी सुन्न झाली.तिला काहीच कळेना .हे काय चाललंय ? आम्हाला तर काय सांगितलं होतं. आणि हे काय होतंय.आपल्या स्वप्नांचं काय? तिच्या डोक्यात नानाविचार चालू झाले.आपण सुधीर यांना सांगितलं तर…? कदाचित ते करतील मदत . असं म्हणून संध्याकाळी जानकी सुधीरची वाट पाहू लागली.सगळी कामे उरकली .तरी सुधीरचा काही तपास नाही . बारा एक च्या सुमारास सुधीर आला; पण तोही डूलतच. आता मात्र जानकीला धक्क्यावर धक्के बसले.सुधीरची अशी अवस्था पाहून जानकी रडू लागली.
” हे काय तुम्ही दा*रू पिता? “जानकी रडतच बोलली.
“त्यात काय एवढं…तुझ्या आईला माहित होतं की सगळं.एवढं दचकायला काय झालं.”सुधीरला त्याचा तोल सावरत नव्हता.जानकीला काय बोलावे ते कळेचना.
“सुधीरला जेवायला वाढलं का?” सासूबाईचा आवाज आला.
काही जास्त न बोलता जानकीने सुधीरला जेवायला वाढले. तोंडापर्यंत सुद्धा नीट त्याचा हात जात नव्हता अशी त्याची अवस्था होती.रात्रभर जानकीला झोप लागली नाही. ती विचारचक्राच्या तंद्रितून बाहेरच पडत नव्हती.
सकाळ झाली.रात्रभर रडून जानकीचे डोळे लाल झाले होते.सुधीर अजूनही झोपला होता.बराच वेळ झाला सुधीर उठला नाही.जानकीने त्याला उठवले.
“झोपू दे त्याला कशाला उठवती.” सासुबाईंचा आदेश आला.
“आत्याबाई हे रात्री दा*रू पिऊन आले होते .” भीतचं जानकी म्हणाली.
“मगं काय झालं ? त्यात एवढं रडण्या सारखं काय आहे ? मला माहित आहे .आणि तू काय मोठ्या राजेशाही थाटात होती ते .मला लागली सांगायला.”आत्याबाई मनावर शब्दांचा घाव घालत बोलल्या. जानकीने तोंडातून एक चकारही काढला नाही.आहे ती परिस्थिती मुकाट्यान सहन करत राहिली.
दिवसामागून दिवस गेले.शेजारच्या बायकांसोबत जानकी मोलमजुरी करू लागली.तिची अवस्था “आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली.” सासरी राहायची सोय नाही की माहेरी जायची.तिला दोन्ही घरे परकेपणाची जाणीव करून देऊ लागली.
एक दिवस जानकी माहेरच्याच गावाला कामासाठी गेली.ही बातमी तिच्या बाबांना समजली .ते तिच्या भेटीसाठी लगोलग आले.जानकीची आणि बाबांची भेट झाली.दोघांचेही डोळे काठोकाठ अश्रुंनी भरून वाहू लागले.आता बाबांना तिची अवस्था न सांगताच समजली. तिच्या चेहऱ्यावरचं तेज निस्तेज झालं होतं,त्वचा कोरडी पडली होती,पायांना भेगा पडल्या होत्या,हाताची बोटे उकलली होती,तिच्या चेहऱ्यावरचे भाव असंख्य प्रश्न विचारत होते.
“जानकी….. बाळा कशी आहेस नाही विचारणार.तुझा चेहरा सगळं सांगत आहे.मला माझीच लाज वाटत आहे.आयुष्यात दोन मोठ्या चुका मी केल्या आहेत.दोन्ही निर्णय माझे चुकले माझ्या सोन्या .एक माझं लग्न आणि एक तुझं लग्न.ह्या अशा चुका केल्या आहेत की त्या मी बदलू शकत नाही .कारण आता वेळ खूप पुढे निघून गेली.पण बाळा आपण ती सुधारू .
“बाबा”…… एवढंच ती म्हणाली .कारण फक्त दाटलेल्या कंठाने ती रडत होती.
” बोल बाळा”बाबांनी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला.
“बाबा मला पण यातून बाहेर पडायचं होतं.पण मी आता यात पुरती अडकले. कारण मी आता आई होणार आहे. ” हुंदके देत जानकी बोलत होती.
” नको काळजी करू काढू यातून मार्ग .” बाबा धीर देत बोलले.आणि दोघांनीही निरोप घेतला.
बरेच दिवस जानकीचे डोके खूप दुखत होते.परंतु तिच्याकडे कोणी लक्ष देत नव्हते.डोकेदुखीने ती पार बेजार झाली होती . बरेच दिवस गेले.जानकीचे बाळंतपण जवळ आले पण तीचं करणार कोण? असा प्रश्न उभा राहिला. सासूबाईकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे होते. आणि माहेरी सावत्र आई करणार नाही.परंतु रडत कढत बाबांनी जानकीचं बाळंतपण पार पाडले . जानकीला कन्यारत्न झाले. बाबा आणि जानकी सुखावले.परंतु सासरची तोंड मारून बसले.
ओली बाळंतीण होती तेच जानकी सासरी आली.तिची कोणी विचारपूस केली नाही की खुशाली विचारली नाही .मुली भोवतीच तिचा जीव घुटमळू लागला .मुलीचे नाव तिने मुक्ता ठेवले . मुक्ता हळूहळू मोठी होऊ लागली.ती तीन वर्षाची झाली.जानकीच्या डोकेदुखीच्या आजार पुन्हा डोकवू लागला . ती सुधीरला म्हणाली ; परंतु तो त्याच्या न*शेतून बाहेरच येत नव्हता.आता तर मुलगी झाली म्हणून तो जानकीचा आणि बाळाचा राग करू लागला. आत्याबाई तर रुसवा धरूनच होत्या.नशेमध्ये सुधीर जानकीला खूप मारत.दररोजची कामे ,घरच्यांचा तिरस्कार , मुक्ताची काळजी या सगळ्या गोष्टीने जानकीला अर्धमे*ले केले होते.तिला जीव नकोसा झाला.किती वेळा तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.पण फिरून पुन्हा जीव बाळापाशी अडकून बसायचा.
मध्यरात्रीचा सुमार जानकी मुक्ताला घेऊन झोपली होती.सुधीर रोजच्या प्रमाणे दा*रूच्या धुंदितच घरी आला.जेवायला दे म्हणून आरडा ओरडा करायला सुरुवात केली.त्या आवाजाने मुक्ता रडू लागली.मुक्ता रडते म्हणून तो जानकीलाच हातात येईल त्याने मा*रा*य*ला लागला .जानकी गरबड्या लोळू लागली. सर्व पाहून मुक्ता अजूनच मोठ्याने रडू लागली. आत्याबाईला जाग आली .तिचाही जानकीवरच पट्टा फिरला.प्रचंड डोकेदुखीने जानकी चक्कर येऊन पडली.तरीही सुधीर तिला लाथा घालत होता.
सकाळी जाग आली.तेव्हा जानकीला असह्य वेदना होत होत्या. त्याच मनःस्थितीत जानकीने मुक्ताला घेवून घर सोडले.नको सासर आणि नको माहेर म्हणून दोन्हींचा मध्य साधत जानकी मळ्यातल्या विहिरीवर गेली.बाळाला घेवून उडी मारणार तेच तिला शेतात पाणी भरणाऱ्या रामू तात्याने खाली खेचले. दोन गोष्टी प्रेमाने सांगून तिला घरी पाठवले.आणि मोठे या नात्याने घरच्या माणसांची कानउघडणी केली.सुधीरला धक्का बसला.सुधीरनेही प्रेमाने जानकीला जवळ घेतले.जानकी त्याच्या प्रेमाच्या स्पर्शाने सुखावली.
डोकं खूप दुखतंय का?आपण उद्याच डॉक्टरकडे जाऊया .मी आता कधी दा*रू पिणार नाही असे वचन त्याने दिले.कधी नव्हे ते आज खूप आपुलकीने सुधीर विचारत होता.जानकी भारावून गेली.आता संसाराची नव्याने सुरुवात होईल या विचारत रमून गेली.सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागली.
दुसऱ्या दिवशी जानकीचा उत्साह ओसंडून वाहत होता. दिवसभर तिने आनंदाने काम केलं.रात्र झाली. सोसलेली सगळी दुःखे बाजूला सारून ती सुधीरची वाट पाहू लागली. परंतु जानकीच्या नशिबात सुख फक्त पाहुणा म्हणूनच येत होतं.आज पुन्हा सुधीर दा*रू पिऊन धुंद होऊन डूलतच घरी आला.जानकीच्या डोक्यात शिणक उठली.डोकेदुखीनं थैमान घातलं. दा*रू पिऊन येण्याचे कारण विचारलं.सुधीर पूर्व स्वभावावर आला.त्याने जोरात जानकीच्या कानशिलात लावली.तिचा गाल लाल झाला.त्याने पूर्ण ताकतीने तिच्या तोंडावर बुक्की मा*र*ली तसे दोन दात पडले.तोंडातून रक्त वाहू लागले.जानकी धाडकन खाली पडली.सुधीर न*शेत झिंगून झोपी गेला.
सकाळ झाली. सूनबाई का उठली नाही म्हणून आत्याबाई जाब विचारायला आल्या.तर जानकी निपचित पडली होती.तोंडातून रक्त वाहून सुकले होते . तिच्या जवळ मुक्ता रडत होती.त्या घाबरल्या .त्यांनी सुधीरला उठवले. त्याची तर बोलती बंद झाली. त्याला सगळा प्रकार अंधुकसा आठवू लागला. जानकीला दवाखान्यात नेले.तर ती मृ*त म्हणून सांगितले.डॉक्टरांनी ब्रे*न ट्युमर असल्याचे सांगितले.आणि शरीर कमकुवत झाले आहे त्यामुळे तिच्या जिव्हारी मा*र बसला. ही बातमी सगळीकडे पसरली.जानकीचे बाबा धायमोकलून रडू लागले. सुधीरला आणि त्याच्या आईला पोलिस घेऊन गेले.
सगळ्या दुःखातून जानकी मुक्त झाली. पहिला वनवास राम सीतेला होता. मात्र हा वनवास फक्त सीतेलाच होता. आयुष्यभर तिचा वैशाखवणवा कधी विझलाच नाही.आज मात्र जानकीचा वनवास कायमचा संपला.
तुम्हाला ही मराठी कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू .याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र ” या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “WhtsApp ” ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – शितल औटी, जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
भयंकर