मराठी कथा- मनाचे खेळ

WhatsApp Group Join Now

                 ” अरे जय ! थोडं खाऊन घे ना बाळा. बाबा ओरडले म्हणून जेवणावर राग कशाला काढायचा ? बघ तुझी आवडती भाजी केली आहे मी भेंडीची. चल उठ पाहू चार घास खाऊन घे. आईचं ऐकणार नाहीस का बाळा ? शहाणं माझं बाळ ना ते ? ये मी तुला भरवते. बघ आईने भरवलं तर कसा जेवतोस ? खूप लबाड आहेस बरं का ! निमित्त लागत ना तुला आईने भरवायला ? मला माहिती आहे.” 

                   पहाटे पहाटे कोण कुजबुजत आहे म्हणून अवीने डोळे किलकिले करून समोर पाहिले तर त्याला प्रचंड धक्का बसला. विजयने साडी नेसली होती. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर मोठी लाल टिकली आणि हातात हिरव्या बांगड्या भरल्या होत्या. खूप प्रेमाने तो अदृश्य व्यक्तीशी बोलत होता. त्याला भरवण्याचा अभिनय करत होता. अवीला पहिलं वाटले की विजय कुठल्यातरी नाटकाची प्रॅक्टिस करत असेल; पण तसे नसून विजय वास्तवात असा विचित्र प्रकार करत होता.  विजयचा हा प्रकार पाहून अवी भयंकर भेदरला. तो एकदम गप्प तसाच पडून राहिला. विजयचा हा खेळ जवळपास पहाटे चारपर्यंत चालला होता. विजय बोलत होता, मधेच हसत होता तर मधेच रडत होता आणि पदराने अश्रू पुसत होता.

                   ह्या प्रसंगाने अवीची तर झोपच उडाली होती. विजय जे काही करत होता त्याचे भान त्याला नव्हते. समोर आपला मित्र झोपला आहे हे देखील त्याला लक्षात नव्हते. एक वेगळ्या विश्वात विजय गेला होता. अवीची तर पाचावर धारण बसली होती. पहाटे चार नंतर विजय तर झोपून गेला; पण अवीला झोप येईना. सकाळी सहानंतर अवीचा डोळा लागला.

                  ” ए उठ मा **** ! किती वेळ झोपून राहिलास रे ? आठ वाजले आहेत. कॉलेजला जायचं नाही का ?” 

                   विजय अवीला उठवत होता. समोर विजयला पाहून अवीची बोबडी वळली होती. विजय आता रोजच्या सारखाच नॉर्मल होता तरीही अवी पटकन उठला आणि तसाच त्याच्या घरी जायला निघाला. 

                   ” अरे ! असा कसा निघालास ? दात बीत तर घास. चहा तरी पी.” विजय अवीला सांगत होता.

                    ” नाही नको. मी घरी जातो आणि येतो आवरून कॉलेजमध्ये.” अवी जवळपास पळतच सुटला. रस्त्यावरील एका सुलभ शौचालयात त्याने त्याचे प्रातर्विधी आटपले आणि त्याच्या घरी जाण्यास त्याने ट्रेन पकडली. 

                    ट्रेनमध्ये बसल्यावर अवीच्या डोळ्यांसमोर सारखा कालच्या रात्रीचा प्रकार येत होता. ‘ विजय असा साडीबिडी नेसून, एखाद्या सवाष्णीसारखा श्रुंगार करून कोणाशी बोलत होता ? किती भयंकर वाटत होता तो प्रकार. सकाळी तर विजय अगदी नॉर्मल होता. नक्की काय आहे हा प्रकार ? कोणाला विचारायचं ?’ अवीच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते. मग त्याला आठवला त्याच्या सोसायटीमधील डॉक्टर मित्र अतिन. अवीने आज कॉलेजमध्ये न जाता घरातून आवरून अतिनकडे जायचे ठरवले. अतिन डॉक्टर असल्यामुळे तो नक्कीच ह्याबाबत आपल्याला मदत करेल असा विश्वास अवीला वाटला.

                     घरी जाऊन अंघोळ आणि नाश्ता वगैरे करून अवी अतिनच्या घरी गेला. अतिन त्याच्या दवाखान्यात जाण्यास निघाला होता म्हणून त्याने अवीला त्याच्याबरोबर दवाखान्यात येण्यास सांगितले. म्हणजे काही महत्त्वाचे बोलायचे आहे तर शांतपणे बोलता येईल. अतिनच्या दवाखान्यात पोहचल्यावर अवीने विजयचा रात्रीचा प्रकार सांगितला. अतिनने सगळा प्रकार व्यवस्थित ऐकला आणि त्याने अवीला सांगितले, ” अवी ! एक काम कर तू पुन्हा केव्हातरी विजयच्या घरी राहायला जा. त्याने पुन्हा तसंच केलं तर आपण समजून जाऊ की तो एक मानसिक रुग्ण असू शकेल.” 

                   ” मी नाही जाणार बाबा पुन्हा त्याच्या घरी. त्याने मला काही केलं तर ?” अवी घाबरून म्हणाला.

                    ” तो तुला काही करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तुला वाटत ना की तुझा मित्र ह्या आजारातून बाहेर पडावा ? बाय द वे ! त्या विजयच्या घरी कोणकोण असत ?” अतिन म्हणाला. 

                   ” तो सध्या एकटाच त्याच्या मामाच्या छोट्याश्या  खोलीत राहतो. त्याची आई तो दहा वर्षांचा होता तेव्हा गेली. तो बारा वर्षांचा झाल्यावर त्याच्या बाबांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई त्याला खूप त्रास द्यायची म्हणून मुंबईमध्ये मामाकडे येऊन मुंबईच्या कॉलेजमध्ये त्याने ऍडमिशन घेतली. दोन वर्षांपूर्वी त्याच्या मामाची बदली नागपूरला झाल्यामुळे तो त्याच्या फॅमिलीला घेऊन जॉब करण्यासाठी तिथे गेला आहे.” अवीने माहिती पुरवली. 

                   ” ओके ! ठीक आहे. आपण बघू पुढे काय करायचं. त्याआधी तू पुन्हा एकदा त्याच्या घरी जा. तो पुन्हा तसाच प्रकार करतो का ते पहा.” अतिन म्हणाला. 

                    ” तू म्हणतोस तर जातो बाबा. विजय खूप चांगला मुलगा आहे रे. सगळ्यांना मदत करतो. तो ह्यातून बाहेर पडला पाहिजे.” अवी म्हणाला.

                      अवीने विजयला फोन करून सांगितले की, ‘ मी आज कॉलेजमध्ये येत नाही तर आज तूच जरा मुलांच्या नाटकाच्या तालमी घे.’

                       अवी बसल्या बसल्या विचार करत होता की, ‘ अतिन म्हणतो की विजय एक मानसिक रुग्ण असू शकतो. नेमकं काय प्रकार झाला असेल विजयच्या आयुष्यात की ज्याने तो मानसिक रुग्ण झाला ? काल रात्री नाटकाच्या प्रॅक्टिसमुळे शेवटची ट्रेन चुकली म्हणून आपल्याला विजयच्या घरी राहावे लागले म्हणजे मी जर विजयच्या घरी गेलो नसतो तर विजय कुठल्या प्रसंगातून जातो आहे हे कधीच कोणालाच समजले नसते. विजयला ह्यातून बाहेर काढलेचं पाहिजे.’

                     अवी आणि विजय एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. दोघांना नाटकाचे प्रचंड वेड असल्याने दोघांनी कॉलेजमधील नाट्यसंस्थेत प्रवेश घेतला. दोघेही कॉलेजच्या नाटकासाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय करत असत. त्यांच्या नाटकांना आंतर महाविद्यालय स्पर्धेत बक्षीस देखील मिळत असे. 

                    अवी पुन्हा एकदा मुद्दामहून विजयच्या घरी गेला. दोघांनी गाडीवरून चायनीज पदार्थ आणले होते ते खाल्ले आणि दोघे झोपी गेले. अवीने झोपेचे सोंग घेतले होते. रात्रीचा एक – दीड वाजला असेल विजयने एका बॅगमधून साडी, बांगडया, मंगळसूत्र काढले. साडी नेसून, दागिने घालून, कपाळावर मोठी लाल टिकली लावून त्याने पुन्हा तसाच प्रकार केला. अवी डोक्यावर पांघरूण घेऊन गुपचूप सारे काही बघत होता. खरंतर अवी मनातून खूप घाबरला होता; पण विजय नक्की काय करतो हे त्याने व्यवस्थितपणे पाहिले. पहाटेचे चार वाजले. विजयने साडी सोडली, अंगावरचे दागिने उतरवले आणि पुन्हा व्यवस्थित बॅगमध्ये भरून ठेवले आणि तो झोपी गेला. सकाळी उठल्यावर विजय एकदम नॉर्मल होता. अवीने त्याला काही दाखवले नाही. अवी विजयच्या घरातून निघाला तो तडक अतिनकडे गेला. अतिनच्या कानावर त्याने सगळा प्रकार घातला. आता अतिनला खात्री पटली होती की विजय हा एक मानसिक रुग्ण आहे.

                   अतिनचा एक डॉक्टर मित्र मानसोपचारतज्ञ असल्याने विजयची त्याच्याकडे ट्रीटमेंट चालू झाली. विजय ट्रीटमेंट घेण्यास नाखूष होता; पण अवीने त्याला तो काय प्रकार करतो हे सांगितल्यामुळे विजय ट्रीटमेंट साठी तयार झाला. ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि विजय पूर्णपणे बरा झाला. 

                   अवीने अतिनला विचारले, ” नक्की काय घडले होते विजयच्या आयुष्यात की तो असा विचित्र वागत होता ?”

                     ” अरे ! ह्या विकाराला स्प्लिट पर्सनॅलिटी असे म्हणतात. म्हणजेच मराठीमध्ये त्या विकाराला म्हणतात विभाजित व्यक्तिमत्त्व. एकच माणूस जरी असला तरी तो वेगवेगळ्या भूमिकेत शिरतो. ह्याचे अनेक प्रकार आहेत, अनेक कारणे आहेत.

 विजयची आई त्याच्या लहानपणी गेली. त्याच्या आईचं त्याच्यावर खूप प्रेम होतं तसंच विजयच त्याच्या आईवर खूप प्रेम होतं. आई गेल्यावर बाबांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आईने आईची माया दिली नाही. तो जेव्हापासून एकटा राहायला लागला तेव्हा त्याच्या मनात जे सुप्त आईविषयी प्रेम होते ते अशाप्रकारे तो व्यक्त करू लागला. रात्री तो आईची साडी, तिचे मंगळसूत्र, बांगड्या घालून त्याच्या आईच्या रुपात जायचा आणि समोर छोटा विजय आहे असे समजून तो त्याच्याशी बोलायचा, हसायचा, रडायचा. त्याला त्याची आई लाडाने ‘ जय ‘ हाक मारत असेल. आई जशी त्याच्याशी बोलायची, वागायची तसे तो आई बनून आईचे अनुकरण करत होता. ह्या लोकांना आपण काय करतो आहोत हे समजत नसते त्यामुळे अशा प्रकारचे रुग्ण रात्री वेगळे वागतात आणि सकाळी एकदम नॉर्मल असतात. त्यांना आपण रात्री काय काय प्रकार करतो ते ठाऊक नसते. तू त्याच्याकडे राहायला गेल्यामुळे तुला समजले नाहीतर विजयच्या लग्नानंतर त्याच्या बायकोला समजले असते आणि आपला नवरा वेडसर आहे किंवा त्याला भूतबाधा झाली आहे असे समजून त्याच्या संसारात बाधा निर्माण झाली असती.” अतिन म्हणाला.

                    ” किती भयंकर आहे हे सगळं ? म्हणजे मनातली सुप्त इच्छा अशाप्रकारे बाहेर येते हे ऐकूनच भयानक वाटतं. अतिन तुझे आभार मानावे तेवढे थोडे आहे. खूप मदत केलीस मित्रा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. तू जर पैशांची मदत केली नसतीस तर विजयची ट्रीटमेंट कशी झाली असती ? एका चांगल्या मुलाला तू ह्या व्याधीतून बाहेर काढलेस.” अवीने कृतज्ञता व्यक्त केली. 

                    ” अरे ! पेशंटला मदत करणे हे डॉक्टर म्हणून माझे कर्तव्यच आहे. मी फक्त मार्ग दाखवला. खरंतर तुझा आणि माझ्या मानसोपचार तज्ञ मित्राचा देखील हातभार आहेच ना ? तुला तुझा मित्र ह्यातून बाहेर पडावा असे मनापासून वाटले आणि माझ्या मित्राने त्याच्या ट्रीटमेंटने त्याला पूर्णपणे बरे केले.” अतिन म्हणाला.

                    ” हो हे खरंच आहे म्हणा. अतिन, आता मी विजयच्या घरी जातो आहे. नाटकासाठी चर्चा करायची आहे.” अवी म्हणाला.

                     अवी विजयच्या घरी गेल्यावर विजय अवीला घट्ट मिठी मारून रडू लागला. विजय सतत  अवीचे आभार मानत होता. अवीला समाधान मिळाले होते की त्याच्या मित्राची एका मानसिक आजारातून सुटका झाली होती.

( समाप्त )

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhaApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

10 thoughts on “मराठी कथा- मनाचे खेळ”

  1. Jyotj Kulharni.

    छान कथा. पूर्णत: वेगळा व समाजोपयोगी विषय.

  2. संतोष उदमले

    विभाजित व्यक्तीमत्व यावर खूप छान आणि मार्गदर्शक कथा आहेत

    1. वेगळा व महत्त्वाचा विषय थोडक्यात पण सुरेख वर्णन.

  3. सीमा प्रकाश गंगाधरे

    व्वा वेगळ्या विषयावरची खूप सुंदर कथा. लहानपणी मनावर बिंबलेल्या भावना मोठेपणी अशा व्यक्त होऊ शकतात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top