मराठी कथा – चिमणी दिन 

WhatsApp Group Join Now

कथेचे नाव – चिमणी दिन 

                     ” टिंग sssss टिंग, टिंग sssssssss टिंग ! अग दार उघड ना चिऊताई ! अग मी काऊदादा आहे. अग माझं पावसाने घरटं मोडलं ग ! जरा थोडावेळ तुझ्या घरट्यात बसतो ग पाऊस थांबेस्तोवर.” काऊदादा म्हणाला.

                    ” हे बघ काऊदादा, सगळीकडे हल्ली इतकी फसवणूक होत आहे. कुठला ना कुठला स्कॅम करून लोकांना लुबाडायचे धंदे चालू आहेत. दारात आलेले सेल्समन देखील आता लोकांना फसवू लागले आहेत. कोणावर आणि कसा विश्वास ठेवायचा तेच काही समजत नाही. त्यामुळे मी काही दार उघडणार नाही.” चिऊताई म्हणाली. 

                   ” अग मी खरंच काऊदादा आहे. तुझ्या पणजीने माझ्या पणजोबांना असाच आश्रय दिला होता जेव्हा माझ्या पणजोबांचं घर पावसात वाहून गेले होते. तीच गोष्ट लक्षात ठेवून मी तुझ्याकडे आश्रय मागायला आलो आहे. तुला विश्वास नसेल वाटत तर तुला व्हाट्सएपवर व्हिडिओ कॉल करतो.” काऊदादा म्हणाला. 

                    ” ए बाबा, मला व्हिडीओ कॉल वगैरे करू नकोस हा ! हल्ली व्हाट्सएपवर व्हिडीओ कॉल करून देखील लोकं भयंकर फसवणूक करत आहेत. चांगल्या टेक्नोलॉजिचा गैरव्यवहार, गैरवापर करत आहेत. हे बघ तू कितीही काही बोललास तरी मी काही दार उघडणार नाही.” चिऊताई म्हणाली. 

                   ” तुला कसं सांगू तर तुझा माझ्यावर विश्वास बसेल तेच समजत नाही.” काऊदादा हताशपणे म्हणाला. 

                    ” अरे काऊदादा ! माझा नवरा मला  कामाला जाताना रोज सांगून जातो की, ‘ तू खूपचं भोळी आहेस. आताच्या युगात इतकं भोळं असून चालत नाही. बाहेरची लोकं तुला कशीही फसवू शकतात. इथे आपली माणसे देखील आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात तर बाहेरची माणसे घेणारच म्हणून काहीही झालं तरी कोणासाठी दार उघडू नकोस.’ आणि काऊदादा, माझ्या पणजीच्या वेळी तिचं घरटं फोर बी. एच. के. होतं. अगदी ऐसपैस. एक धान्याचे कोठार देखील होते. त्यात ती किडे, धान्य असा अन्नसाठा करून ठेवायची. बरं ते घरटे उंचीला देखील मोठे होते त्यामुळे तुझे पणजोबा आरामात घरट्यात प्रवेश करू शकले. माझं घरटं तर वन बी.एच. के. त्यात आम्ही दोघे आणि माझ्या तीन मुली राहतो. माझे खुराड्यासारखे बेडरूम आणि किचन म्हणशील तर मी एकटीच कशीबशी उभी राहून स्वयंपाक करते. 

तीन मुलींचे शिक्षण, त्यांची शाळा – कॉलेजची फी भरता भरता नाकीनऊ येते. इतकी महागाई वाढली आहे त्यामुळे माणसांवर डिपेंड राहून चालत नाही म्हणून माझा नवरा आमच्या चौघींचे पोट भरण्यासाठी, मुलींची फी भरण्यासाठी सकाळी  किडे गोळा करण्यासाठी जो बाहेर पडतो ते संध्याकाळी घरी येतो. तीन मुलींना सांभाळण्याची जबाबदारी माझी. मग मी माझ्या तरण्याताठ्या तीन मुली घरात असताना तुझ्यासारख्या आगंतुकाला कशी काय घरात घेऊ ?” चिऊताई म्हणाली. 

                 ” हो ग चिऊताई, तू खरंच साधीभोळी आहेस. माझ्यासारख्या आगंतुकाला न पाहता कितीतरी गोष्टी शेअर केल्यास. मला माहिती आहे चिऊताई, तुझी व्यथा मला समजली. माझी व्यथा काही तुझ्यापेक्षा वेगळी नाही. सध्या मी एकटा जीव सदाशिव आहे. हल्लीच लेकीचे लग्न लावून दिले. ती तिच्या संसारात सुखी आहे. तिला सासरी जाच नको म्हणून लेकीला वेल फर्निश घरटे बांधून दिले. लग्नाचा सगळा खर्च मी केला. लग्नाच्या जेवणासाठी किडे, धान्य, चिकन – मटणाची हाडे ठेवली होती. दोन वर्षांपूर्वी माझ्या लेकाने लग्न केले आणि लग्नानंतर लगेचच तो बायकोला घेऊन वेगळा झाला. त्या धक्क्याने माझी बायको मला सोडून गेली. तिला खूप दुःख झाले ग. मुलांना चांगलं खाऊपिऊ घालायचं, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं, मोठं करायचं आणि ही मुलं मोठी झाल्यावर भुर्रकन उडून जातात.

 तुला सांगतो चिऊताई, माझा लेक बहिणीच्या लग्नाला एखाद्या पाहुण्यासारखा आला. मला कुठलीही शारीरिक मदत तर केलीच नाही पण आर्थिक मदत म्हणून एक रुपया देखील दिला नाही ग. आपला म्हातारा बाप कष्ट करतो आहे याचे त्याला काहीच वावगे वाटले नाही.” काऊदादा अतिशय नाराजीच्या स्वरात बोलत होता. 

                इतका वेळ दाराआडून बोलणारी चिऊताई कावळेदादाच्या बोलण्याने अतिशय व्यथित झाली आणि तिने न राहून दार उघडले. समोर पावसामुळे भिजून अगतिक झालेल्या काऊदादाला पाहून चिऊताईचे मन द्रवले. काऊदादा काहीही झालं तरी तिच्या घरट्यात जाऊ शकणार नव्हता म्हणून चिऊताईने त्याला व्हरांड्यात बसायला खुर्ची दिली आणि गरमागरम आले घालून चहा दिला. 

                चहा पिऊन काऊदादाला तरतरी आली आणि तो बोलू लागला, ” चिऊताई ! तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. मला माहिती आहे हल्ली कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. सगळा जमाना बदलला आहे. हे बघ चिऊताई, मी येताना रिकाम्या हाताने आलो नाही. ह्या पिशवीत किडे आणि उकडलेल्या अंड्याचा पिवळा बलक आहे. माझ्या भाचवंडांसाठी मामाने खाऊ आणला आहे असे समज. तुला कधीही कुठलीही गरज भासली तर तुझा दादा तुझ्यापाठीशी असेल. कधीही मदत मागितलीस तरी तुझ्या मदतीला मी धावून येईन हा माझा शब्द आहे. तुझ्या पणजीने जी माझ्या पणजोबांना मदत केली ती गोष्ट आम्ही कावळे मंडळी अजूनही विसरलेलो नाही म्हणजे निदान आमच्या आतापर्यंतच्या पिढीपर्यंत. पुढची पिढी काय करेल, कशी वागेल हे मी तुला सांगू शकत नाही; पण एक गोष्ट आपण केली पाहिजे की आपण एकमेकांच्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला आपली चिऊताई आणि काऊदादाची गोष्ट सांगितली पाहिजे. त्यांनाही समजले पाहिजे की खरी माणुसकी काय असते. 

आपण हल्ली मुलांना गोष्टी सांगायचं विसरून गेलो त्यामुळे मुलांना चांगले – वाईट कसे कळणार ? त्यांच्यावर कसे संस्कार होणार ?

तू म्हणतेस ना चिऊताई की, जिथे तिथे हल्ली फसवणूक चालली आहे तर आजकालच्या पालकांना आपल्या मुलांशी बोलायला वेळ कुठे आहे ? त्यामुळे मुले वेगळा मार्ग निवडतात. असे झाले नाही पाहिजे. आपल्याला वाटत की, आपण त्यांच्या गरजा पुरवल्या म्हणजे आपण आपले पालकांचे कर्तव्य पार पाडले तर तसे नाही. चिऊताई ! आपण आपल्या मुलांशी संवाद साधला पाहिजे. माझा मुलगा भले वेगळा झाला; पण तो त्याचा संसार सरळमार्गी तर करतो आहे ह्याचा मला अभिमान आहे. पालकांनी मुलांना चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्याचं पाहिजेत त्यामुळे भ्रष्टाचार, गैरव्यवहार नक्कीच थांबतील असे मला वाटते. देवाच्या कृपेने तू गृहिणी आहेस तर तुला तुझ्या मुलींबरोबर संवाद साधण्यास बराच वेळ मिळत असेल त्याचा फायदा करून घे. गेलेली वेळ ही परत येत नाही म्हणून वेळेचा योग्य वेळी फायदा करून घेतला पाहिजे.” काऊदादा पोटतिडकीने बोलत होता.

                 ” काऊदादा ! किती छान सांगितलंस रे. आज मी तुला माझ्या पणजीसारखी मदत माझ्या छोट्याश्या घरामुळे करू शकले नाही याचे मला खूप वाईट वाटले तरीही तू मोठ्या मनाने मला बहिणीचा मान दिलास ह्याबद्दल मी तुझे कसे उपकार मानू ते समजत नाही.” चिऊताई म्हणाली. 

               ” अग ! मी बोलण्याच्या नादात विसरूनचं गेलो. चिऊताई तुला ‘ जागतिक चिमणी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ‘ बरं का ? शहरीकरणामुळे तुमच्या चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे म्हणून आज तुमचा दिन साजरा करण्यात येतो. मानवाला म्हणावं नुसतेच पक्षांच्या जाती – जमातीसाठी दिन साजरे करू नका तर त्यांच्या रक्षणासाठी झाडे तसेच जंगले तोडू नका. ठिकठिकाणी मोबाईल टॉवर्सच्या अतिरिक्त जाळ्यांमुळे आम्हा पक्ष्यांची संख्या घटते आहे, पुरेसे पाणथळ उपलब्ध नाहीत मग आमच्या संख्येत वाढ कशी होईल ? मानवा जर तुला वाटत असेल की तुझ्या मुलांना पक्षी हा फक्त चित्रातच दाखवायला लागेल तर मानवा आताच जागा हो आणि आम्हा पक्ष्यांचे ऱ्हासापासून संरक्षण कर. आणि हो ! सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे तर आम्हा लोकांना तुझ्या बाल्कनीत, अंगणात एक छोटा पाण्याचा बाउल किंवा छोटे वाडगे पाण्याने भरून ठेव म्हणजे आम्हाला पाण्यासाठी दहा दिशा फिरायला नको.” काऊदादा म्हणाला.

                ” हो काऊदादा ! तू एकदम योग्य बोललास. काऊदादा, तुझ्या बोलण्याचा समस्त मानवाने विचार करावा. तुझे खरंच खूप खूप आभार.” चिऊताई म्हणाली. 

                ” चिऊताई ! हा बघ पाऊस थांबला. मी जातो आणि माझी राहण्याची सोय करतो. चल बाय बाय.” एवढे बोलून काऊदादा भुर्रकन उडून गेला.

( समाप्त )

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhtsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

11 thoughts on “मराठी कथा – चिमणी दिन ”

  1. काऊ चिऊ घ्या गोष्टीतून, आताच्या सामाजिक परिस्थिती चे कथन खूप छान झाले आहे.

  2. काऊ चिऊ च्या गोष्टीतून, आताच्या सामाजिक परिस्थिती चे कथन खूप छान झाले आहे.

  3. सौ. राधिका जोशी

    वा! नव्या-जुन्याची सांगड घालत, कथेतून छान संदेश दिला आहे

  4. मीना महिंद्रकर

    नव्या जुन्या चा सुंदर संगम. छान आहे कथा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top