राम नाम ध्यानी परि किंतु का मनी?.. कथा

WhatsApp Group Join Now

अश्रद्धाळूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कथा!

राम मंदिर उद्घाटन सोहोळा जस जसा जवळ येऊ लागलाय तसा सगळा देशच राममय होऊन गेलाय.  अवघा देशच जेथे रामाच्या भक्ति सागरात डुंबून गेलाय तेथे छोट्याशा जिल्ह्यातल्या छोट्याशा तालुक्यातल्या छोट्याशा गावाची काय कथा!

आमचा रामबाग नावाचा गाव ठाणे जिल्ह्यात पालघर तालुक्यात समुद्र किनारी वसला आहे.  नारळी पोफळीच्या बागा आणि अथांग समुद्र किनारा लाभलेला गाव मुंबई पासून फार दूरही नसल्याने तसा समृद्धच!

नावातच राम असलेल्या गावात श्रीरामाचे प्रशस्त मंदिर तर आहेच पण समुद्र किनारी असल्याने श्रीशंकराचेही भव्य मंदिर आहे.  गावात एकाच वेळी सगळे रामभक्त आणि शिवभक्तही आहेत.  त्यामुळे रामनवमी आणि शिवरात्री दोन्ही उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात. 

यंदा तर दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याचा योग आला आहे.  दि. २२ जानेवारीला अयोध्येला भव्य राममंदिराचे उद्घाटन होणार आहे.  त्यासाठी गावात दिवसभर भजन, कीर्तन, आयोध्येचा थेट प्रक्षेपण सोहळा, फटाके, रोषणाई, भंडारा काय काय म्हणून तयारी सुरू आहे. गेला आठवडाभर अखंड रामनाम जप, रामरक्षा स्तोत्र पठन, हनुमान स्तोत्र पठन घराघरांतून, मंदिरा मंदिरांतून सुरू आहे.  सगळं गाव दिव्यांच्या रोषणाईने आणि रांगोळीने सजलं आहे.   आयोध्येहून अक्षता आणि पत्रिकाही गावात येऊन पोचल्या.  ज्येष्ठांचा एक गट थेट अयोध्येला जायला निघाला.  त्यांना रेल्वे स्टेशन पर्यन्त पोचवायला जंगी मिरवणुकही काढली.  अवघा गाव राममय होऊन गेला.  आता ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त राम, राम आणि रामच!

परंतु जिथे सत्ययुगात रामाला इतके शत्रू होते तिथे कलियुगात का नसावेत?  त्या शिवाय रामकथा पूर्ण कशी होणार? 

एक विघ्नसंतोषीने वादाची ठिणगी पाडलीच. छोटासा गाव आमचा! एक ठिणगीनेही वणवा पेटायला वेळ नाही लागला.  सर्व लहान थोर भावभक्तीने रामरसात डुंबत असताना स्वत:ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या अर्धशिक्षित तरुणांनी गावात रात्रीची सभा घेतली.  त्यात त्यांच्यासारखेच रिकामटेकडे, टवाळ लोकं सहभागी झाली.  त्यांचे नेतृत्व लंकेश पर्वतेकडे होते.  त्याने मुद्दा मांडला, “अहो, हा पौष महिना आहे ना! आतापर्यंत आपण हा महिना कुठल्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानतो.  या महिन्यात कुठलीच शुभ कार्ये करीत नाहीत किंवा कुठल्याही नवीन कार्याची सुरुवातही करीत नसतो अशा वेळी ही दिवाळी मध्येच का आली?  रामाच्या मंदिराचे उद्घाटन या महिन्यात का करायला घेतलेय?  अशा अशुभ महिन्यात उद्घाटन केल्याने राम कोपला तर?  आपल्या गावावर मोठ्ठे संकट येईल.  झाले!!! अवघा गाव स्तब्ध झाला.  संकटाच्या भीतीने सगळ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. अखेर प्रत्येकजण सुखाची आस धरणारा!  रामभक्त काय आणि शिवभक्त काय! आस्तिक काय आणि नास्तिक काय! सगळेच ऐहिक सुखाच्या मागे धावणारे! अशुभाच्या भीतीने सर्वांची गाळण उडाली. जो तो मुक्याने घरी पोचला. 

सर्वांच्याच मनात भीतीची पाल चुकचुकली.  कुणालाच काही कळेना.  देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते   प्राणप्रतिष्ठा होणारी रामलल्लाची मूर्ती! अवघे जग अभिषेक सोहोळयाचे साक्षीदार होणार! आपण काय करायचे?  साथ द्यायची कि नाही?” 

सगळ्यांबरोबर राहायचे कि आपलीच शिकली सवरलेली तरुण मुले सांगताहेत ते खरे मानायचे?  सर्व गावकरी पुनः एकत्र आले आणि यावर तोडगा काढण्यासाठी गावाच्या पूजऱ्याकडे जायचे ठरले.  पुजारी सुद्धा पिढ्यान् पिढ्या राम मंदिरात पूजा अर्चा करणारे.  गावात त्यांना भरपूर मान होता.  गावावर नाहीतर गावतल्यांवर  कोणतेही संकट आले तर तोडगा काढण्यासाठी गावच्या पूजाऱ्याकडे जायची प्रथा होती.  तेच कौल घेऊन नाहीतर शास्त्रवचने सांगून उपाययोजना करीत असत.  त्यांच्या पांडित्यावर गावकऱ्यांचा विश्वास होता.  आतापर्यंत तेच गावातल्या प्रत्येकाला कुठल्याही कार्यासाठी शुभ मुहूर्त काढून देत. तेव्हा तेही हेच म्हणत, “पौष महिना अशुभ! कोणतेच कार्य नको! अहो, उगाच का भाकड महिना म्हणतात त्याला! धर्मशास्त्रानुसार या महिन्यात मकर संक्राती शिवाय अन्य कुठलाही सण नाही!”  अशा वेळेस लग्नाळू मुले फार हिरमुसत. परंतु वाडीलधाऱ्यांपूढे ब्र काढायची हिम्मत नसे कुणाची!  निमूटपणे पूजाऱ्याने काढून दिलेला मुहूर्त स्वीकारायची तयारी असे प्रत्येकाची!  आतातर अयोध्येतल्या महंतांनी स्वत:च एव्हढे भव्य कार्य पौषात करायला घेतलेय. “हे कसे?? गावकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्ती पुढे पुजारी महाराजांची बोबडीच वळाली.  ते मूग गिळून गप्प बसले. खरेतर त्यांचे वेदाध्ययन नव्हतेच मुळी.  तरीही त्यांच्या नित्यानेमाच्या पूजाअर्चा आणि थोडेफार ज्योतिषपत्रिका वाचन इतक्या पांडित्यावरही प्रपंच चालत होता. 

पुजारी बुवांचे वयोवृद्ध वडील राघनाथपंत पंडित सामोरे आले.  त्यांचा वेदशास्त्रांचा गाढा अभ्यास होता.  परंतु वयपरत्वे अंथरूणाला खिळल्यामुळे सर्व जबाबदारी आपल्या पढतमूर्ख मुलाला देऊन रामनाम आळवत बसले होते. गावकऱ्यांचे संभाषण ऐकून त्यांच्या मनात फारच विषण्णता दाटून आली.  ते विचार करू लागले, ‘राम नाम ध्यानी परी किंतु का मनी?’ आता रामरायाच सर्वांना योग्य मार्ग दाखवेल.  ते अंथरुणातून उठून बसले.  सर्व गावकऱ्यांना उद्देशून म्हणाले,” मला एक दिवसाची मुदत द्या. मी तुमच्या सर्व प्रश्नाचे निराकरण करेन. तोवर उत्सव थांबवू नका.  तो असाच सुरू असू देत. उद्घाटन दोन दिवसांवर आलेय.  त्यात विघ्न नको!  आपल्या पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय चुकीचा असूच शकत नाही.  तसेच शास्त्रही खोटे नाही.  उदया सकाळी या.  मी तुमचे समाधान करतो.” 

लंकेश पुढे सरसावलाच.  “असे कसे? उदयाच काही विपरीत झाले तर त्याला जबाबदार कोण?? तसे पंत कडाडले,” मूर्ख मुला, मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र आहे.  संपूर्ण महिना भगवंताची उपासना कर असे सांगितले तर करशील का? मग पौष महिन्यात अमुक एक करू नये असे सांगितले असेल तर ते का पाळतोस? चांगले काही घ्यायचे नाही आणि ज्या गोष्टी करायच्या नाही त्यावर लक्ष केंद्रित करून समाजात नकारात्मकता पसरवायची! एव्हढेच येते का तुला?  अरे! भगवंतचीच पूजा होणार आहे ना! मग त्याच्यासाठी सगळे दिवस सारखेच! यात कोणीही घाणेरडे राजकारण करून समाज मन दूषित करू नये!  आपल्या सारख्या सामान्य माणसांनी दिवसभर भगवंताचे नामस्मरण करून पुण्य पदरात पाडून घ्यावे.  बाकी कोण काय करतो, कोण काय म्हणतो ते पहायला भगवंत समर्थ आहेत.  ते आपले काम नाही.  प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळणारच आहे.  त्यामुळे आपला मौल्यवान वेळ चांगल्या गोष्टींसाठी आणि सेवा भक्तीसाठी लावावा. या आता!” 

गावकरी समाधानाने घरी परतले.  पंतांवर त्यांचा गाढ विश्वास होता.  गावातल्या प्रत्येक ज्येष्ठांची लग्ने, घरची शुभकार्ये, शेतीभातीसाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी मुहूर्त आजपावेतो त्यांनीच तर काढून दिले होते.  सर्वांनी निश्चिंत मनाने त्या दिवसाचे भजन, कीर्तन, स्तोत्र पठन आदि कार्ये ठरल्याप्रमाणे पार पाडली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच गावकरी पंतांच्या ओसरीवर जमले.  सर्वांनाच उत्सुकता होती पंत काय निर्णय देतात याची!  लंकेश आणि त्याचे टोळभैरवही आलेच होते.  पान तंबाखू चघळत बसले होते.  स्वत:ला नास्तिक म्हणवणारे हे  टोळके खरेतर गावाने ओवाळून टाकलेले होते.  त्यांच्या घरच्यांनाही त्यांची मदत कमी  आणि त्रासच जास्त होता.  त्यामुळे ते ही यांना कंटाळलेलेच होते.  ही मुले घरात असण्यापेक्षा घराबाहेरच राहिलेली बरी असाच घरच्यांचा दृष्टिकोन होता.  त्यामुळे दिवसभर उनाडक्या नाहीतर टवळक्या करत फिरायचे हाच यांचा उद्योग.  शिक्षण अर्धवट सोडलेले त्यामुळे तसेही बेकारच होते.  त्यात मोबाइल नावाचे कोलीत या माकडांच्या हातात आले आणि व्हॉट्सॲप बाबालाच गुरु मानले म्हटल्यावर जमेल तेव्हढा उच्छाद मांडायचे. 

मंदिराच्या प्रांगणात पहाटेची काकड आरती झाल्याने धुपाचा गंध दरवळत होता.  हवेत गारवा असला तरी सकाळच्या सूर्यकिरणांनी थोडासा उबदारपणाही आला होता.  एकंदरीत वातावरण आल्हाददायक होते.  पुजारी बुवांच्या बायकोने दिलेला चहा घेत सर्वजण पंतांची वाट पहात बसले. 

नातवाच्या खांद्याचा आधार घेत पंत सावकाश ओसरीत आले.  तेथे त्यांच्यासाठी खास मांडलेल्या आसनावर मांडी घालून बसले.  वयोवृद्ध पंत आपल्या समवेत खाली बसलेले पाहून गावकऱ्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली.  पंत म्हणाले, “काळजी करू नका. माझा रामराया पाहून घेईल.” 

“आज मी येथे आलो आहे तुम्हां सर्वांची मने पुनः निर्मळ करायला.  तर आज मी तुम्हाला सर्वप्रथम एक कथा सांगणार आहे.”  कथा म्हटल्यावर लंकेश आणि त्याचे मित्र सरसावून बसले.  वयाने मोठे झाले तरी मनातला बालिशपणा काही गेला नव्हता.  तसे इतकेही वाईट नव्हतेच ते!  थोडे भरकटले होते इतकेच! 

पंतांनी कथा सांगायला सुरुवात केली. “देवी पार्वती विष्णुसहस्र नामाचा पाठ रोज करायची.  नित्य विष्णु सहस्र नाम पठन करणाऱ्या पर्वतीने भगवान श्रीशंकर यांना विचारले,” विष्णु सहस्र नामाच्या तुलनेत तितकेच प्रभावी असे एकच नाव कोणतं आहे का?” यावर भगवान श्री शंकर श्लोक रूपात उत्तरले.  तोच रामरक्षा स्तोत्रातला ३८ वा श्लोक आहे.  “रामरामेति रामेति, रमे रामे मनोरमे! सहस्रनाम तत्तूल्यं, राम नाम वरानने”!  भगवान शंकर म्हणतात, “हे मनोरमे, राम राम या नामाने मनाला रमविणाऱ्या या रामनामात मी रमून जात आहे.  मनोरमे आणि वरानने ही दोन्ही विशेषणे त्यांनी पार्वतीसाठी म्हटली आहेत.  मनोरम म्हणजे मनाला रमवणारी, आल्हाद देणारी आणि आनन म्हणजे मुख, वरानने म्हणे सुंदर, शुभ वदना! तर ही पार्वती! विष्णूच्या सहस्र नामाच्या तोंडीचे एक आणि एकच नाव आणि ते म्हणजे रामनाम!  त्रैलोक्यनाथ शंकर भगवान सांगतात ही राम नामाची अलौकिक महती. श्रीराम श्रीराम”.  सर्वांनी श्रीरामाचा जयघोष केला.  पंत पुढे म्हणाले, अजूनही तुम्हाला श्रीरामासाठी मुहूर्त हवा आहे? तर हरकत नाही. पुढे ऐका.” 

घास खाकरून पंतांनी तांब्यातून आधी थोडे पाणी प्यायले.  मग पुढे बोलू लागले. “चैत्र माह वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दूसरा मास म्हणजे पौष महिना.  त्याला तैष आणि साहसी अशी अन्य दोन नावंही आहेत.  अधिक मासाला जसे धोंडा मास म्हणतात तसे याला भाकड मास असे म्हटले जाऊ लागले.  कारण मकरसंक्राती शिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत असा सार्वत्रिक समज!  मात्र निर्णयसिंधू तसेच धर्मसिंधू या ग्रंथांत या महिन्यात करण्याची काही कृत्ये सांगितली आहेत, जसे कि, पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा, पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव शारदीय नवरात्रीसारखाच असतो., पौष शुद्ध अष्टमीला शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम तर्पण, ब्राह्मण भोजन करावं., शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा., शिवापुढे दीप आराधना करावी., पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी., रवी धनू राशीत प्रवास करून मकर राशी मध्ये प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात.  हा श्रावणा सारखाच पवित्र मानला जातो.  या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व आन्हीकं उरकून देवास महानैवेद्य दाखवायची पद्धत आहे.

  आता सांगा इतके सगळे असताना हा महिना धार्मिक कार्यांसाठी निषिद्ध आहे का?  राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा.  पौष महिन्यात रवी धनूत असतात तेव्हा विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते.  मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही.  सोप्या भाषेत सांगायचे तर श्रीखंडोबा आणि श्रीम्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो.  त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी.”  “हुश्श sss” अचानक गर्दीतून आवाज आला.  तशी उपस्थितांमध्ये खसखस पिकली.  पंतांनी डोळे वटारताच पुन्हा पिनड्रॉप सायलेन्स झाला. 

घसा खाकरून पंत पुढे बोलू लागले.  “गृहप्रवेश आणि वास्तुशांतिसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नसतो.  मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये.  पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये.  संपूर्ण महिनाभर घर खरेदी, दागिने खरेदी, प्रवास अशी नैमित्तिक कार्ये निर्धास्तपणे करावीत.  काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून पडले आहे.  या नक्षत्राचा स्वामी शनि आहे.  आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यात विवाह करू नयेत.  परंतु हे ही चुकीचे आहे.  खरेतर पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असते.  त्यामुळे हा ही युक्तिवाद तकलादू ठरतो.”  आपल्याच पुजारी मुलाकडे पाहत पंत पुढे म्हणाले,” पौष महिन्यात शुभ कार्य करीत नाहीत ही रूढी बनली आहे.  म्हणून ती पाळावी.  कारण शास्त्रात रूढी बलियसी असे वचन आहे असा युक्तिवादही काही जण करतात.  परंतु त्या वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रूढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्न झालेली रूढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रूढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य होईल.”  पुजारी बुवांनी आपल्या पित्यापुढे झुकवलेली मान शेवटपर्यंत वर केली नाही.  आपली जागा त्यांच्या पायाशीच.  हे त्या मुलाने पक्के जाणले.  लंकेश आणि टोळ भैरवांनी तर पंतांपुढे साष्टांग लोटांगण घातले.  आणि यापुढे फक्त व्हॉट्सॲप  ज्ञानावर विश्वास ठेवणार नाही अशी शपथ घेतली. 

सर्व गावकरी सुद्धा ‘प्रभू सियावर राम चंद्र कि जय’ म्हणत पंतांपुढे नतमस्तक झाले.  सर्वांच्या मनातील किलमिश दूर झाले होते.  अजून एक अज्ञान रूपी राक्षसाचा आज अंत झाला होता.  आता सर्वांना ओढ लागली सोमवारच्या उत्सवाची.  त्याच ओढीने सर्व घरी परतले. पुन्हा एकदा तन मन रामाच्या चरणी अर्पून.  बोलो सियावर रामचंद्र कि जय !!!!

तुम्हाला माझी कथा कशी वाटली? मला कमेन्ट करून जरूर कळवा. अशाच नवनवीन कथा वाचनासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या.  आपल्या मैत्र परिवारासोबत शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top