मराठी कथा –   तुझं माझं जमेना

WhatsApp Group Join Now

  मधु जोरात खेकसली,”मॅडी तू इथे काय करतोयस?”

“ए खडूस बाई”, तू कशाला माझ्या मागे आलीस? 

मुर्खा मी तुझ्या आधी इथे आली आहे.

तुझ्या मागे यायला मला काय वेड्या कुत्र्याने चावलय की काय?

“अरे अरे! का भांडताय एकमेकांशी? आणि मधु हा मुलगा कोण आहे? तू चल आत मेधाताई ला बघायला आलेली मंडळी वाट पाहत आहेत”मधुची आई तिला म्हणाली.

मधु आत जाता जाता , अरे यार! हा मॅडी पण का आत येतोय? आईने मधुच्या दंडाला धरून फरफटत तिला रेस्टॉरंट मधे नेले.

मेधा, मधुच्या मोठ्या बहिणीसाठी एक स्थळ सांगून आले होते. मुला मुलींना मन मोकळे बोलता यावे म्हणून पूर्ण कुटुंबीयांनी एका छानशा रेस्टॉरंटची निवड केली होती. रोहन, उच्चशिक्षित तरुण. स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्ट चा व्यवसाय होता.

वडील एका मोठ्या कंपनीतून व्हाइस प्रेसिडेंट म्हणून रिटायर झाले होते. आईचे ब्युटी पार्लर आणि धाकटा भाऊ बारावी सायन्स शिकत होता. मेधाच्या घरी बाबांचा कन्स्ट्रक्शनचा बिजनेस, आई गृहिणी, वयस्कर आजी आजोबा व छोटी बहीण मधु बारावी सायन्स शिकत होती. मधुचा क्लास सुटून ती परस्पर रेस्टॉरंटमध्ये येणार होती. तिला उशीर का झाला म्हणून बघायला तिची आई बाहेर उभी होती, तेवढ्यात मधु एका मुलाशी भांडताना तिने पाहिले होते. मधु अतिशय फटकळ स्वभावाची मुलगी होती.

रोहनच्या घरचे सर्व मंडळी त्यांचा धाकटा मुलगा मकरंदची वाट पाहत होते. मकरंदला घाई घाईने येताना पाहून मकरंदची आई म्हणाली,”या राजे! तरी बरं वेळेत आलात?हा आमचा धाकटा मुलगा मकरंद.”

खुर्ची ओढून घाईघाईत बसता बसता त्याने सगळ्यांना हात वर करून ‘हाय’असे अभिवादन केले. तो एकदम चपापला त्याच्या बाजूला मधु बसली होती.

मधुची आई एकदमच ओशाळली, आत्ता दारात ज्याच्याबरोबर मधु कडाकडा भांडत होती, तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रोहनचा धाकटा भाऊ होता.

आईने मधुच्या पायावर जोरात पाय दिला व तीला गप्प राहण्यासाठी इशारा केला.

रोहनच्या बाबांनी प्रत्येकांसाठी खाण्याची ऑर्डर दिली व मनमोकळ्या गप्पा मारायला सुरुवात केली. मुळगाव कुठले, मुंबईमध्ये कधी स्थायिक झाले, घराण्याच्या चालीरिती काय व दोन्ही मुलांविषयी थोडक्यात माहिती सांगितली.

मेधाच्या बाबांनी त्याच पद्धतीने त्यांच्या कुटुंबाविषयी पूर्ण माहिती सांगितली.

मोठ्यांच्या गप्पांमधे मकरंद व मधु एकमेकांकडे खुन्नस देऊन बघत होते , तर मेधा व रोहन एकमेकांकडे चोरून कटाक्ष टाकत होते.

सगळ्यांचा पोटोबा झाल्यावर कॉफी पिण्यासाठी रोहन व मेधाला मोकळीक मिळावी या हेतूने सर्व कुटुंबीयांनी रेस्टॉरंट मधून काढता पाय घेतला.

मधु आईबाबां बरोबर कार मधून घरी गेली तर मकरंद त्याच्या सायकल वरून घरी निघाला.

मकरंद शेंडेफळ म्हणून सगळ्यांचाच लाडका होता.”राजे सावकाश या! आईने काळजीपोटी त्याला सांगितले.”

घरी आल्यावर मेधाने रोहन विषयी सविस्तर सर्व सांगितले.एकंदरीत त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे विचार, भविष्या विषयीचे त्याचे प्लान्स.

तिच्या मनातला राजकुमारच जणू तिला मिळाला.  एकूणच हे स्थळ नाकारण्यासारखे नाही असे सगळ्यांचे मत पडले. आई, बाबा ,आजी, आजोबा खूपच खुश झाले. मधु काहीच बोलत नाही म्हटल्यावर सर्वांना वाटले, मेघा आता लग्न करून सासरी जाणार म्हणून मधुला वाईट वाटत असेल. केवढे बहिणीवर प्रेम अजी मायेनी म्हणाली. बराच वेळ शांतपणे ऐकणारी मधु चिडून म्हणाली,”ताई रोहन चांगला आहे, त्याचे घरचे पण चांगले आहेत पण तो खडूस त्याचा भाऊ ‘मॅडी’ मला अजिबात आवडला नाही” आई ने मधुला चापट मारली,” अगं काय हे? रेस्टॉरंटच्या दारात पण त्याच्याशी भांडत होतीस. तो घरी सांगेल मेधाची धाकटी बहीण भांडकुदळ आहे. काय म्हणतील ते मेधाला?”

मधुने ते दोघे एकाच कॉलेजमध्ये व एकाच वर्गात आहेत हे सांगितले. त्या दोघांचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत व  त्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. मधुला प्रश्न पडला ताईच्या लग्नात तिचा ग्रुप आला व मॅडीचा पण ग्रुप आमनेसामने आले तर ताईचे लग्न राहील बाजूलाच व तिथे  तिसरे महायुद्ध नक्की होईल. हे ऐकून सर्वजण खळखळून हसले.

दोन दिवसानंतर मेधाच्या घरचे सर्वजण रोहन चे घर बघायला गेले. दारातच मॅडी स्वागतासाठी उभा होता. वरळीच्या उच्चभ्रू भागात त्यांचे भले मोठे घर होते.

खाणे पिणे झाल्यावर रोहनच्या बाबांनी मेघा ला घर दाखवुन आणा असे रोहनला सांगितले. मधु पण म्हणली मला पण घर बघायचे आहे, मग रोहनच्या आईने ती जबाबदारी मकरंद कडे दिली. मधु खूपच वैतागली तिला मेधाताई बरोबर जायचे होते.

पुढच्या महिन्यात अगदी जवळच्या लोकांना बोलवून साखरपुडा करायचा व मधु व मकरंद ची बारावीच्या सर्व परीक्षा झाल्यावर लग्नाचा बेत करायचा असे सर्वानुमते ठरले. साधारण लग्नाला दहा अकरा महिन्याचा अवधी होता. या काळात मुले पण एकमेकांना चांगली ओळखतील व तयारीलाही वेळ मिळेल.

दोन्ही परिवाराला हे लग्न मान्य होते व आता साखरपुड्याच्या तयारीला ही मंडळी लागली होती. हॉल बघायचा, कपड्यांची, दागिन्यांची खरेदी यानिमित्ताने दोन्ही कुटुंब सारखीच एकत्र येत होती. आता सुरुवातीची भीड चेपून

आपुलकीचे नाते निर्माण झाले होते.

मेधाची आजी सुगरण होती तर रोहनचे बाबा खवय्ये.  रोहनच्या बाबांना आजीने केलेले उपवासाचे लिंबाचे लोणचे खायचे होते. 

अनायसे मधुची व मकरंदची कॉलेजमध्ये भेट होईल असा विचार करून आजीने लोणच्याच्या बरणीची जबाबदारी मधुकडे दिली.

मधुला आजीचा हा आदेश मान्य नव्हता, पण आजी आजोबांना नाही म्हणायची तिची हिंमत नव्हती.

मग काय तिने बहाणा शोधला “माझ्याकडे मॅडीचा फोन नंबर नाहीये, तूच त्याला कळव”

आजीने मकरंदचा फोन नंबर तिला दिला व नाईलाजाने मधुला त्याला फोन करावा लागला. हॅलो कोण बोलताय? बापरे! तू ‘खडूस बाई’ मकरंद जवळ जवळ किंचाळलाच..

 माझी कशी आठवण झाली? “अब आया ना ऊंट पहाड के नीचे”इसे कहते है लडके वाले मकरंद चेष्टेने म्हणाला.

“ए मुर्खा! ते आजीने काकांसाठी लोणच्याची बरणी पाठवली नसती ,तर मी तुझे तोंड पण बघितले नसते” मधु फटाफटा मकरंदला बोलली.

ए बाई! पार्किंग लॉटच्या मागे पाण्याच्या टाकीच्या इथे येऊन मला भेट ,अखीर ग्रुप मे हमारी कुछ इज्जत है!

भेटणार वगैरे नाही.. तुझ्या त्या छडमाड  सायकलवर मी पिशवी लावून जाईन.

मलाही हौस नाही दिवसाच्या सुरुवातीला माकड तोंड्याला बघायची मधु तावातवाने म्हणाली.

छडमाड सायकल ? तुला कल्पना तरी आहे का आज-काल स्पोर्ट सायकलची किंमत काय असते?आणि माझी सायकल world मधली बेस्ट आहे.

अर्थात! तुला एवढे जनरल नॉलेज नसेलच, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो माझी सायकल giant या ब्रँडची आहे , मकरंद मधुला म्हणाला.

 लोणचं, खरवस तर कधी गव्हाचा चीक आजी खाऊचे डबे पाठवत होती आणि मधु व मकरंदाची खाऊच्या डब्यांबरोबर शाब्दिक देवाणघेवाण दररोजच होत होती. मधु व मकरंद एकमेकांना कॉलेजमध्ये लपून-छपून भेटत होते. या सगळ्याचा सुगावा ग्रुपमध्ये कोणाला तरी लागला. मग दोघांच्याही ग्रुप मधल्या मित्रांनी दोघांनाही खोदून खोदून विचारले.

आज सगळेजण साखरपुड्याच्या तयारीसाठी जमले होते. आता खाऊचे डबे बंद. दोघांनी ठरवले की घरी सांगायचे आता देवाण घेवाण होणार नाही.

आम्ही असे काही करणार नाही.

मधु म्हणाली आजी तर माझे काही ऐकणार नाही, तूच तुझ्या बाबांना सांग. मकरंद म्हणाला बघतो ,एरवी खडूस सारखा वागणारा हा आत्ता एकदम ‘जंटलमन’ सारखा कसा वागतो आहे हे मधुला कळले नाही, न राहून तिने मकरंदला डिवचले तरी हा शांतच. तेवढ्यात रोहन व मेधा तिथे आले. बघ ना ताई! हा मला त्रास देतोय असे मधु ने खोटे सांगितले.

रोहनला खूपच हसू आले. त्याला मकरंदचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तो आपणहून कोणाशी वाद घालत नसे.”तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, मकरंद असा मुलगा नाहीये”रोहन म्हणाला. 

मधु म्हणाली ,”हा मला खडूस बाई म्हणतो, कॉलेजमध्ये पण हा व याचा ग्रुप मला खूप त्रास देतात. तुमच्या लग्नात याच्या ग्रुपला अजिबात बोलवायचे नाही.”

आता मात्र बराच वेळ गप्प बसलेला मकरंद पण चवताळून उठला,”अरे! वा बरीच दादागिरी आहे की? दादा वहिनी मी अजिबात हे खपवून घेणार नाही, आता तर मी तुमच्या लग्नात माझे मित्र मंडळींना  घरीच राहायला बोलवणार आहे.”

मधु आजुनच तावातवाने बोलू लागली,”नाही म्हणजे नाही माझी मेधाताई अजिबात खपवून घेणार नाही”

आता मात्र रोहन म्हणाला,”लग्न आमचे आहे, कोणाला बोलवायचे व कोणाला नाही याचा निर्णय आम्ही घेऊ. मकरंदाचे कॉलेजमधले सर्व मित्र-मैत्रिणी आमच्या लग्नाला नक्की येणार आहेत व त्यांनी मकरंदला टाळी दिली.”

आता मात्र मेधा पण चिडली,”मधुला त्रास होईल असे मी काहीही खपवुन घेणार नाही”

हॉलमध्ये बसलेल्या मंडळींना जोर जोरात भांडण्याचे आवाज येऊ लागले. सगळी मंडळी आत गेली आणि बघताय तर काय चक्क रोहन व मेधा भांडत होते. आजोबा समजुतीच्या स्वरात म्हणाले,”अरे बाळांनो का भांडत आहात? बाहेर आम्ही तुमच्या साखरपुड्याची तयारी करत आहोत व आत हे काय चालू आहे? मेधा रोहन नक्की काय ते आत्ताच ठरवा नसेल जमत तर साखरपुड्याच्या आधीच आपण हे लग्न मोडू.

येतो आम्ही, परत एकदा  विचार करू आणि कळवू” असे म्हणून मधुकडचे सर्वजण घरी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या पार्किंग मधे मकरंद व मधु एकमेकांना भेटले. दोघं मनातून खूपच खजील झाले होते. आपल्या मूर्खपणामुळे रोहन व मेधा मध्ये भांडण झाले. मकरंद म्हणाला मी काल दादाशी बोललो त्याला तुझी मेधाताई खूपच आवडली आहे. आता मोठ्यांनी भांडायला सुरुवात केली तर काही खरे नाही. हा सगळा घोळ आपल्यामुळे झालाय आता आपणच निस्तरले पाहिजे.

मधु पण म्हणाली मेधाताईला पण तुझा रोहन दादा आवडला आहे. आता आजोबा काय म्हणतील तसेच होईल आमच्या घरात. मकरंदनी एक युक्ती मधुला सांगितली. “ताई माझ्याबरोबर मॉलमध्ये शॉपिंगला येशील का? तुझा मूड ठीक होईल”मधु ने अक्षरशः मेधाला ओढतच घराबाहेर काढले.

इकडे रोहनला घेऊन मकरंद पण मॉलमध्ये आला. त्या दोघांना एकमेकांच्या समोर बसवत मकरंद व मधुने दोघांची माफी मागितली. आमच्यामुळे तुम्ही भांडलात तुम्ही असे करू नका. मधु म्हणाली ,”मेधाताई हवेतर आजोबांना काय खरं आहे ते मी सांगते. तुम्ही दोघं ‘made for each other’ आहात. 

मेधा म्हणाली “मधु तुझे व मकरंदाचे जर पटत नसेल तर आम्ही दोघं एकत्र संसार कसा करणार?”

 रोहन म्हणाला,”तुम्ही एवढे गब्बर आणि ठाकूर सारखे का भांडता?”

मधु विचारात पडली तसे काही ठोस कारण तिलाही आठवेना. रोहन म्हणाला, “मला पण नक्की काय झाले ते आता आठवत नाही पण somehow we don’t like each other maybe our wavelengths are different.

आणि तसेही आमचा ग्रुप पण एकमेकांबरोबर कम्फर्टेबल नाहीये.”

तेवढ्यात मॉलमध्ये आजी आजोबा पण आले. मधु एकदम गोंधळूनच गेली. मकरंदला पण काय बोलावे सुचेना.

आजोबा म्हणाले,”तुम्ही कोणत्या कारणासाठी भांडता आहात हेच लक्षात नसेल ,तर गोष्टी सोडून द्यायला शिका. तुम्ही मैत्री करा असे मी म्हणत नाही, पण काहीच कारण नसताना जाता येता एकमेकांबरोबर भांडून नवीन नात्यांमध्ये तेढ तरी निर्माण करू नका. आजोबांचा मोर्चा रोहन व मेधाकडे वळाला.

हे दोघे लहान आहेत पण तुम्ही तर समजूतदार आहात ना? कुठल्याही नात्यांमध्ये एकमेकांवर विश्वास, एकमेकांचा आदर व सत्य गोष्टी जाणून घेऊन मग बोलावे. लग्न म्हणजे पोरखेळ नाही.”

चौघेही मुले खजील झाली प्रत्येकाला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.

रोहन म्हणाला,”आम्हाला एकत्र आणण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काहीतरी छोट्या गैरसमजामुळे जर आमचे नाते तुटले असते तर आम्हाला खूपच पश्चाताप झाला असता,पण आम्ही इथे आहोत हे तुम्हाला कसे समजले?”

आजी म्हणाली,”खाऊचे डबे हा एक बहाणा होता. मधु व मकरंद यांचे का पटत नाही हे आम्हाला बघायचे होते. मधुच्या मैत्रिणीला मी तिच्यावर लक्ष ठेव म्हणून सांगितले होते आणि मकरंदच्या बाबांनी मकरंदच्या मित्रांनाही…

मग काय मुलांना विचारल्यावर असे समजले की, हे दोघे कुठल्या कारणासाठी भांडतात हेच माहीत नाही आणि आता मात्र त्यांचा ego मध्ये येतो आहे.

आजींनी मागे वळून बघितले व  मधुच्या मैत्रिणी व मकरंदचे मित्र एकत्र येताना दिसले.

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आनंदाने व प्रेमाने करायची असते. नवीन नाती निर्माण करताना जुनी नाती जपतच पुढे जायचे असते मग ते मैत्रीचे नाते का असेना?

आजोबांनी मधु व मकरंदला जवळ बोलावून सांगितले की, त्यांनी या दोन्ही ग्रुपला साखरपुड्यासाठी आमंत्रण दिले आहे कुठलेही तिसरे महायुद्ध होणार नाही…

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

नात्यांमधला विश्वास,आदर व सत्याचा शोध याच आधारावर नवीन नाते टिकते.नात्यांवर गुंफलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा.                  

आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

   धन्यवाद !

5 thoughts on “मराठी कथा –   तुझं माझं जमेना”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: