आज होळी. भैरवीला सकाळपासूनचं खूप उदास वाटत होते; पण द्वीपसाठी आलेला सण साजरा करण्याचे तिने ठरविले. तिच्या मनाची घालमेल तिच्या सासूबाईंना विजयाताईंना समजत होती; पण नशीबापुढे कोणाचे काय चालते ? त्या देखील तशा सुन्नचं होऊन बसल्या होत्या. तिचे सासरे सुद्धा अस्वस्थ झाले होते. भैरवीच्या सासुसासऱ्यांनी तिला आज द्वीप साठी पुरणपोळी करण्यास सांगितले होते.
भैरवीने द्वीप पुरतेच पुरण वाटायला घेतले. पुरण वाटताना भैरवीच्या डोळ्यांतील अश्रू मात्र थांबायचे नाव घेत नव्हते. तरीही द्वीपला त्याच्या वडिलांसारखी पुरणपोळी अतिशय प्रिय म्हणून आलेले अश्रू थोपवून भैरवीने पुरण वाटले. पोळीसाठी कणिक तिंबवत ठेवली. ज्याला पुरणपोळी आवडायची तो तर निघून गेला होता. विकासच्या आठवणीने साहजिकच भैरवी भूतकाळात गेली.
” ए ! चल ग ममता होळी खेळायला. माझ्या बाबांनी किती रंग आणले आहेत बघ. तुला तर माहिती आहे मला किती आवडतात रंग खेळायला.” भैरवी तिच्या मैत्रिणीला ममताला रंग खेळण्यासाठी बोलावत होती.

” अग हो हो आलेच.” ममता घराबाहेर आली आणि म्हणाली, ” अग माझा मामेभाऊ आला आहे माझ्या घरी. त्याच्यासाठी चहा करत होते. त्याच्या गावात ग्रॅज्युएशननंतर शिक्षणाची चांगली सोय नसल्याने तो इथेचं राहणार आहे आमच्या घरी त्याचे सी.ए. होईपर्यंत.”
” हो का ? बरं ! तू आणले आहेस का रंग ?” भैरवीने ममताला विचारले.
” हो तर मी देखील आणले आहेत.” ममता म्हणाली.
दोघी मैत्रिणी रंगात न्हाऊन निघाल्या होत्या. अचानक पाठीमागून भैरवीला कोणीतरी मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर रंग टाकला.
” ए ! कोण आहे ?” भैरवीने रागाने पाठी वळून पाहिले असता एक अनोळखी मुलगा हातात रंग घेऊन उभा होता. भैरवीला पाहून तो घाबरला आणि म्हणाला, ” सॉरी, सॉरी मला वाटलं आमची ममता आहे म्हणून मी तिची गंमत करण्यासाठी तुझ्यावर रंग टाकला. सॉरी सॉरी, मला माफ कर.” असे म्हणून त्या मुलाने घराकडे धूम ठोकली. ममता त्या दोघांना काही अंतरावरून पाहत होती. त्या दोघांची फजिती झाल्यावर हसून हसून तिची पुरेवाट झाली होती.
” गप ग ! माझ्याशी बोलू नकोस. तुला हसायला काय झालं इतकं ? मला तर एक क्षण समजलं देखील नाही की माझ्यापाठी कोण उभे राहिले आहे.” भैरवी रागारागात म्हणाली.
” अग तो माझा विकासदादा आहे. मी मघाशी म्हटलं ना तुला ? तोच तो. खूप लाजाळू आहे. आता घाबरून घरात बसला असेल. आज मला त्याला चिडवण्याची संधी मिळाली नाहीतर नेहमी मला खूप चिडवत असतो तो.” ममता म्हणाली.
रंग खेळून भैरवी घरात आली. आल्या आल्या पहिल्यांदा तिने स्वच्छ अंघोळ केली. अंघोळ करताना तिला विकासचा झालेला स्पर्श आठवत होता. का कोण जाणे तिच्या मनात एक अनामिक हुरहूर जागी झाली होती. विकासचा चेहरा सारखा तिच्या डोळ्यांसमोर येत होता. ममता नसून दुसरी कोणीतरी मुलगी आहे हे समजल्यावर त्याने तिथून काढलेला पळ तिला आठवत होता. सगळं आठवून तिला एकटीला हसू येत होते.
काहीतरी निमित्त काढून संध्याकाळी भैरवी ममताच्या घरी गेली. तिची नजर विकासला शोधत होती. ममताच्या आईकडून समजले की, ममता तिच्या भावंडांबरोबर दादर चौपाटीला गेली आहे. हिरमोड होऊन भैरवी आपल्या घरी आली.
भैरवी आणि ममता एकदम खास मैत्रिणी. लहानपणापासून एकाच वर्गात, एकाच बेंचवर त्या बसत असत. राहत देखील होत्या एकाच बिल्डिंगमध्ये म्हणजे भैरवी तिसऱ्या मजल्यावर राहायची तर ममता दुसऱ्या मजल्यावर राहायची. त्या अगदी ‘ लंगोटीयार ‘ होत्या असे म्हटले तरी त्यात वावगे काही नव्हते. भैरवीला एक लहान बहीण होती तर ममताला एक मोठा भाऊ होता. भैरवी आणि ममता नुकत्याच कॉलेजमध्ये जाऊ लागल्या होत्या त्यामुळे साहजिकच दोघींनी तारुण्यात प्रवेश केला होता. त्यात विकाससारख्या राजबिंड्या मुलाला पाहून भैरवीच्या मनात खळबळ माजली होती.
इथे विकासची अवस्था भैरवीपेक्षा काही वेगळी नव्हती. दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले होते. दोघेही एकमेकांशी पहिल्यांदा तर नजरेनेच बोलायचे. नंतर हळूहळू ते दोघे समरसून बोलायला लागले. भैरवी आणि ममता त्याच्याकडे गणित किंवा सायन्समधील प्रॉब्लेम विचारायच्या. विकास देखील त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करत असे. दोघांच्या मनातले प्रेम ममताला समजत होते; पण अजूनही दोघांनी प्रेमाची कबुली एकमेकांना दिली नव्हती. विकासने त्याचे शिक्षण पूर्ण केले. इथे भैरवी आणि ममताचे देखील ग्रॅज्युएशन पूर्ण झाले.
दरम्यान ममताच्या मोठ्या भावाचे लग्न झाले आणि घर अपुरे पडू लागले म्हणून ममताचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. ममताच्या दादाने मोठे घर घेतले होते. आता विकास देखील चांगल्या ठिकाणी जॉबला जात होता त्यामुळे तो त्याच्या ऑफिसजवळ एका भाड्याच्या खोलीत राहू लागला होता. ममताला तिच्या वहिनीच्या माहेरून चांगले स्थळ आले म्हणून तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न लावून दिले.
इथे भैरवी आणि विकास एकमेकांना विसरले नव्हते त्यामुळे विकासने पुढाकार घेऊन ममताच्या मदतीने भैरवीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांकडे लग्नाची मागणी घातली. दोन्ही घरांमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नसल्याने भैरवी आणि विकासचे लग्न झाले. विकासने आता स्वतःचे घर घेतले होते. विकासचे आईवडील गावीच राहत असल्याने भैरवी आणि विकासचा राजाराणीचा संसार सुरू झाला. भैरवी देखील एका बँकेत नोकरी करत असल्याने भैरवीची थोडी ओढाताण होत होती; पण विकासच्या प्रेमळ स्वभावाने तिचा दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळून जात असे. भैरवीच्या गोड स्वभावाने तिने तिच्या सासुसासऱ्यांची मने जिंकली होती. त्यामुळे अधूनमधून भैरवीचे सासुसासरे तिच्याकडे राहायला येत असत. भैरवी कुठलाही सणवार असला तरी तो आपल्या सासुसासऱ्यांसोबत साजरा करत असे.
लग्नानंतर दोन वर्षांनी भैरवी आणि विकासच्या संसारवेलीवर फूल उमलले. त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव ‘ द्वीप ‘ ठेवले.
द्वीप तीन वर्षांचा झाला. होळीचा सण जवळ येऊन ठेपल्यामुळे भैरवीचे सासुसासरे गावावरून त्यांच्याकडे राहायला आले. विकासला आवडते म्हणून भैरवीने होळीच्या दिवशी पुरणपोळीचा घाट घातला होता. भैरवीने तिच्या आईवडिलांना देखील जेवायला बोलावले होते. सगळेजण आनंदात गप्पा मारत होते. भैरवी सर्वांसाठी जेवणाची तयारी करत होती. इतक्यात एक फोन वाजला म्हणून विकासने फोन घेतला. समोरच्याशी काहीतरी बोलून तो लगेचच घरातून निघाला.
” अरे ! एक पुरणपोळी तरी खाऊन निघ.” भैरवी विकासला म्हणाली.
” अग मी येतो लगेच. तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल तर तुम्ही जेऊन घ्या. मी आल्यावर जेवतो.” असे म्हणून विकास घराबाहेर पडला.
विकास घराबाहेर पडल्यावर भैरवीने तिच्या सासुसासऱ्यांना तसेच तिच्या आईवडिलांना जबरदस्तीने जेवायला लावले. ते चौघे वेळेवर जेवले नाही तर त्यांची उगीचच शुगर वाढायला नको यासाठी. छोट्या द्वीपला तिने पुरणपोळी भरवली. जेऊन झाल्यावर भैरवीचे आईवडील त्यांच्या घरी निघून गेले. भैरवी विकासची वाट पहात राहिली होती. संध्याकाळचे सहा वाजत आले. आता मात्र भैरवीचा धीर सुटू लागला होता. तिचे सासुसासरे देखील डोळ्यांत प्राण आणून आपल्या लेकाची वाट पाहत होते. इतक्यात एक फोन आला. फोनवर बोलल्यावर भैरवीचे सासरे मटकन खाली बसले. भैरवी आणि तिच्या सासूबाईंना काही समजत नव्हते की काय झाले आहे. विजयाताईंनी त्यांच्या पतीला गदागदा हलवले तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला की, आपला विकास आपल्याला सोडून गेला. भैरवी एकदम शून्यात हरवली.
विकास त्याच्या ऑफिसमधील एका कामगाराची सत्याची बाजू मांडून त्याच्यासाठी लढला होता त्यामुळे त्या कामगाराच्या प्रतिस्पर्ध्याने विकासवर राग ठेवला आणि त्याचा प्रतिशोध घेतला. विकास गेल्यावर भैरवीच्या जीवनात काही अर्थच उरला नव्हता. आईवडील, सासुसासरे आणि छोट्या द्वीपसाठी ती पुन्हा कशीतरी उभी राहिली. छोट्या बहिणीचे देखील नुकतेच लग्न झाले असल्याने ती नवऱ्याबरोबर कायमची परदेशात गेली होती त्यामुळे आता भैरवीच्या आईवडिलांना हवं नको ते पाहण्याची जबाबदारी भैरवीवर आली होती. भैरवीसाठी गावाकडील सगळी प्रॉपर्टी विकून तिचे सासुसासरे तिच्याकडे कायमचे आले. त्यांना भैरवी आणि द्वीपची अतिशय काळजी वाटत असे. द्वीप आपल्या बाबांविषयी घरात विचारायचा की, ‘ माझे बाबा कुठे आहेत ?’ त्या छोट्याश्या जीवाला उत्तर मिळायचे की, ‘ तुझे बाबा कामासाठी फॉरेनला गेले आहेत.’
द्वीप आता सात वर्षांचा झाला होता. विकास जाऊन चार वर्षे झाली होती. दरवर्षी होळी आली की सगळ्यांच्याच मनाला भयंकर त्रास होत असे. द्वीपला आपल्या बाबांसारखीच पुरणपोळी खूप आवडायची. शेजारच्या काकूंनी केली की त्या द्वीपला खायला द्यायच्या. द्वीपने भैरवीकडे पुरणपोळीचा हट्ट धरल्याने आज शेवटी लेकासाठी भैरवीने पुरणपोळी केली. बाकीच्यांच्या घशाखाली पुरणपोळी ह्यापुढे कधीच उतरणार नव्हती. ऐन होळीच्या दिवशी पुरणपोळी न खाता विकास चालू पडला होता.
रंगपंचमीच्या दिवशी द्वीप त्याच्या सोसायटीमधील मित्रांसोबत रंग खेळायला बाहेर पडला. बराच वेळ झाला द्वीप घरी आला नाही म्हणून भैरवी त्याला शोधायला घराबाहेर पडली. बाहेर खूपच उत्साहाचे वातावरण होते. सगळीच छोटी मोठी मंडळी रंगाची उधळण करत होती. भैरवी द्वीपला शोधत होती. सोसायटीतील लहान मुले रंगानी इतकी माखली होती की त्यांना ओळखणे कठीण होऊन बसले होते. भैरवी द्वीपला शोधत होती इतक्यात एक तरुण तिच्यामागून आला आणि तिचे डोळे झाकून तिच्यावर रंगाची उधळण केली. भैरवीने झटकन मागे वळून पाहिले असता तो तरुण थोडा गोंधळला, ” सॉरी सॉरी ! मला वाटलं आमची प्रियांका आहे. तिची गंमत करण्यासाठी मी चुकून तुमच्यावर रंग टाकला. सॉरी, प्लिज राग मानू नका.” असे म्हणून त्या तरुणाने त्याच्या घरी पळ काढला.
भैरवी एकदम स्तब्ध झाली. तिच्या बेरंग आयुष्यात आज कोणीतरी रंग उधळला होता. गतायुष्यातील पुनरावृत्ती झाली होती. विकास जे काही त्यावेळेस बोलला आणि वागला होता तसेच तंतोतंत ह्या तरुणाने कृत्य केले होते. त्याच्या अशा वागण्याने भैरवीच्या चेहऱ्यावर हसू उमलले; पण दुसऱ्या क्षणात विकासची आठवण येऊन तिच्या चेहऱ्यावरचे हसू लोपले. द्वीपला घेऊन भैरवी घरी आली. आल्या आल्या पहिली तिने अंघोळ केली. अंघोळ करता करता तो तरुण मुलगा आणि विकास यांचा ताळमेळ जुळवण्याचा उगीचच प्रयत्न करत राहिली. नंतर तिला तिचा स्वतःचाच राग आला. विकास गेल्यावर पहिल्यांदा तिचं मन घसरलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी कुंड्यांतील झाडांना पाणी घालायला म्हणून ती बाल्कनीत गेली असता तिचे सहज समोरच्या बिल्डिंगमध्ये गेले तर तो कालचाच तरुण त्याच्या बाल्कनीत उभा राहून चहा पीत होता. दोघांची एकदम नजरानजर झाली आणि विजेचा झटका बसावा तशी भैरवीने किचनमध्ये धाव घेतली. त्यानंतर कितीतरी दिवस तिने ती वेळ डावलून दुसऱ्या वेळी झाडांना पाणी घालायला सुरुवात केली. आज खूप दिवसांनी पुन्हा ती सकाळी झाडांना पाणी घालण्यासाठी बाल्कनीत गेली असता तो तरुण पुन्हा तिला त्याच्या बाल्कनीत दिसला. भैरवीच्या काळजात उगीचच चर्रर्र झालं.
ऐन तारुण्यात वयाच्या सव्वीसाव्या वर्षी वैधव्य आल्याने भैरवीचे मन त्या तरुणाला पाहून भरकटू लागले होते. कितीही मनावर ताबा ठेवला तरीही त्या तरुणाचा विचार दिवसातून एकदा तरी तिच्या मनात येऊ लागला. उगीचच चोरून पडद्याआडून समोरच्या बाल्कनीत तो उभा आहे का हे ती पाहू लागली. तो पडद्याआडून कधी दिसला की भैरवीच्या हृदयाची धडधड वाढू लागायची.
एका रविवारी घरातले सामान आणायला म्हणून भैरवी घराबाहेर पडली तर तो तरुण तिला सोसायटीमधील लहान मुलांशी क्रिकेट खेळताना दिसला. त्या मुलांमध्ये द्वीप देखील होता. भैरवीने त्याला पाहिले नाही असे दाखवून ती झपझप पावले उचलू लागली. मार्केटमध्ये सामान घेऊन परतत असताना सोसायटीच्या गेटजवळ तिला तो तरुण तिची वाट पाहत उभा असलेला दिसला.
” हाय, हॅलो ! मी प्रवीण. प्रवीण काळे. द्वीप तुमचाच मुलगा आहे ना ? मला हे सांगायचं होतं की तो क्रिकेट अतिशय सुंदर खेळतो. त्याला जर योग्य प्रशिक्षण दिलेत तर तो कुठच्या कुठे जाऊ शकतो. त्याच्या बाबांशी बोलून तुम्ही त्याला कोचिंगसाठी माझ्याकडे पाठवले तर बरे होईल. मी क्रिकेट कोच आहे.”
” द्वीपचे बाबा ह्या जगात नाहीत.” भैरवी म्हणाली. तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.
” पण द्वीप तर म्हणाला की त्याचे बाबा फॉरेनला कामासाठी गेले आहेत.” प्रवीणने विचारले.
” त्याला आम्ही तसेच सांगितले आहे. त्याचे बाबा तो तीन वर्षांचा असताना गेले. मी माझ्या सासूसासऱ्यांशी द्वीपच्या कोचिंग विषयी बोलते आणि तुम्हाला सांगते.” इतकं बोलून भैरवी झपझप तिच्या बिल्डींगमध्ये निघून गेली. पाठमोऱ्या भैरवीकडे प्रवीण पाहत राहिला होता. इतक्या लहान वयात द्वीपच्या आईने काय सोसले असेल याचा तो विचार करू लागला.
घरी आल्यावर भैरवीने सगळा वृत्तांत आपल्या सासुसासऱ्यांच्या कानावर घातला. अर्थातच द्वीपला क्रिकेट कोचिंगसाठी परवानगी मिळाली होती. द्वीपचे कोचिंग चालू झाले आणि साहजिकच भैरवी आणि प्रवीण यांचे एकमेकांसोबत संवाद वाढले. प्रवीणच्या कुटुंबाशी तिची ओळख झाली. द्वीप त्यांच्या घरी हक्काने जाऊ येऊ लागला होता. प्रवीणला भैरवीचा भूतकाळ समजल्यावर त्याला खूप दुःख झाले. भैरवीबद्दल त्याला आपुलकी निर्माण होऊ लागली होती. खूप विचारांती त्याने एके दिवशी भैरवीला लग्नाची मागणी घातली, ” भैरवी ! माझ्याशी लग्न करशील ? मी तुला कुठल्याही उपकाराच्या किंवा दयेच्या भावनेने विचारत नाही. माझं प्रेम बसलं आहे तुझ्यावर.”
” नाही प्रवीण नाही. माझ्यासारख्या एका मुलाची आई असलेल्या स्त्रीशी तुम्ही का लग्न करायला पाहत आहात ? तुम्हाला चांगली कुमारिका मुलगी मिळू शकते. माझ्या नशिबात सुख नसेल तर तुम्हाला देखील मला दुःखात पाडायचे नाही. मी कोणाला कशासाठी माझ्या दुर्दैवी नशिबात गुंतवून ठेऊ ? तुम्ही माझा विचार मनातून काढून टाका. तुम्हाला खूप चांगली मुलगी मिळेल. माझ्या नशिबावर मला सोडा. शेवटी मी आणि माझं नशीब.” भैरवी अतिशय दुःखाने म्हणाली.
” भैरवी ! एका दिवसात नशीब बदलत नाही; पण नशीब बदलणारा एक दिवस येतो. आजचा दिवस तुझं नशीब बदलायला आला आहे असे समज. विचार करून निर्णय दे. माझी कुठलीही जबरदस्ती नाही.” प्रवीण म्हणाला.
” पण तुमच्या घरातील लोक मला आणि द्वीपला स्वीकारतील का ?” भैरवी म्हणाली.
” आमच्या घरात काही प्रॉब्लेम होईल असे वाटत नाही कारण द्वीप आमच्या घरी आल्यावर माझे आईबाबा, माझी बहिण त्याचे प्रचंड लाड करतात. त्याच्याविषयी तसेच तुझ्याविषयी मी माझ्या घरी बोललो आहे. तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा सुद्धा मी माझ्या घरी बोलून दाखविली तर माझ्या घरचे लोक म्हणाले की पहिलं भैरवीला विचार जर ती तयार असेल तर आमची काहीच हरकत नाही.” प्रवीण म्हणाला.
प्रवीणचे बोलणे ऐकून भैरवीच्या डोळ्यांत पाणी आले. घरी जाऊन तिने तिच्या सासुसासऱ्यांच्या कानावर प्रवीणचे बोलणे घातले. भैरवीच्या सासुसासऱ्यांना अत्यानंद झाला होता. भैरवीच्या उजाड आयुष्यात कोणीतरी प्रेमाचे रंग भरायला आला होता. भैरवीचे आईवडील तसेच तिच्या सासुसासऱ्यांनी प्रवीणच्या आईवडिलांची भेट घेतली. चांगला मुहूर्त पाहून भैरवीचे प्रवीणसोबत लग्न झाले. भैरवीच्या सासुसासऱ्यांनी तिचे कन्यादान करून आपल्या लेकीची पाठवणी केली. प्रवीणसारखा चांगला साथीदार आपल्या लेकीला लाभला म्हणून भैरवीचे आईवडील तसेच सासुसासरे अतिशय समाधानी झाले होते.
( समाप्त )
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
सौ. नेहा उजाळे ,ठाणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप सुंदर कथा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात रंग असायलाच पाहिजे. भैरवीने ते रंग मिळाले. खूप छान.
मनःपूर्वक आभार 😊🙏
छान मांडणी
छान आहे कथा. रंगपंचमीचे रंग तिच्या आयुष्यात आले आणि तिचं आयुष्य उजळलं. खूप छान .
मनःपूर्वक आभार 😊🙏
Mast 👌
मनःपूर्वक आभार 😊🙏
प्रेमाचा सुंदर गहिरा रंग कथेत मांडलाय👌👌
मनःपूर्वक आभार 😊🙏