परीक्षा संपल्या होत्या आणि उन्हाळी सुट्टया सुरू झाल्या होत्या. सोहम आणि त्याच्या मित्रांचा मोबाईल गेम आणि टिव्ही पाहणे यातच दिवस सरत होता. आई – बाबा , आजी – आजोबा देखील लहानांबरोबर लहान होत होते आणि परत बालपण अनुभवत होते. अशाच सुट्टया आनंदात व्यतित होत होत्या.
आजोबा सकाळी सकाळी चहाचा कप हातात घेऊन सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. इतक्यात सोहम आणि त्याचे मित्र एकच गलका करत आजोबांसमोर येऊन उभे राहिले. आजोबांना समजेना की नक्की झाले तरी काय ?
“आजोबा आम्हाला खूप कंटाळा आला आहे. आम्हाला आता मोबाईल वरती गेम खेळायची नाही. आम्हाला टिव्ही पण नाही बघायचा आहे. बाहेर खूप उन्हे आहेत तर आता आम्ही घरातच बसणार .आम्ही आता काय करु ? ” आजोबा शांतपणे सोहमची तक्रार ऐकून घेत होते . बाहेर उन्हाचा तडाखा जाणवत होता म्हणून सोहमचे म्हणणे तर आजोबांना पटत होते.
” सोहम, तेच तेच खेळ खेळून कंटाळा आला आहे ना ? हमम् मग आता आपण जुने काही तरी खेळ खेळूया “. आजोबांच्या या वाक्यासरशी सोहम फिदीफिदी हसू लागला. सोबत त्याचे इतर मित्रही हसू लागले.
” आजोबा, जुने नाही नवे काही तरी खेळू असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? ” सोहम अजूनही हसतच होता. त्याच्या या प्रश्नावर आजोबा देखील हसले.
“सोहम, मी जुने काही तरी खेळू असेच म्हणालो बरं का ? आणि आता बाहेर खूप उन्हे आहेत तर दुपारची थोडी विश्रांती घ्या. सायंकाळी आपण सगळे मिळून खेळू “. आजोबांच्या म्हणण्याला सगळ्या मुलांनी मान डोलावून दुजोरा दिला आणि सगळे आंब्याचे पन्हे पिण्यासाठी निघून गेले.
सायंकाळचे साडेपाच वाजत आले होते आणि आजोबा एका हातात मोठी काठी आणि एका हातात छोटी काठी घेऊन बसले होते. सोहम आणि त्याचे मित्र आजोबांना शोधत अंगणात आले आणि आजोबा काय करत आहेत म्हणून निरखून पाहू लागले.
आजोबा छोटी काठी हातात घेऊन तिला दोन्ही बाजूंनी तासत होते. दोन्ही बाजूंनी छान टोकदार काठी तासून आजोबांनी मोठी काठी हाती घेतली. आता दोन्ही काठ्या घेऊन आजोबा अंगणात मध्यभागी जाऊन उभे राहिले आणि त्यांनी ती छोटी काठी बरोबर जमिनीवर ठेऊन दिली . मुले कुतूहलाने पाहत होती. आजोबांनी मोठ्या काठीने छोटी काठी जशी उडवली तशी मुले डोळे मोठ्ठे करुन पाहू लागली. हे कसं घडलं ? मुलांना प्रश्न पडला होता . उत्सुकता ही वाटू लागली. सगळी मुले धावत आजोबांकडे गेली आणि विचारु लागली.
“आजोबा हा कोणता खेळ आहे ? आजोबा काय केले तुम्ही ? कसे खेळला तुम्ही ? आम्हाला खेळायचे आहे. आम्हाला परत दाखवा कसे खेळायचे ? ” मुले एकामागोमाग एक प्रश्न उत्साहाने विचारत होती.
” हो हो हो सांगतो. या खेळाला विठी दांडू म्हणतात. यासारखे अजून बरेच खेळ आहेत जे आम्ही आमच्या लहानपणी खेळायचो. आता तुमच्या कडे खेळणी तर आहेत सोबत मोबाईल नावाचा जादूगार आहे. तुम्हाला एका जागी बसून कसे खेळायचे हे शिकवणारा जादूगार. आमच्या काळी नव्हता बरं हा जादूगार आणि इतकी खेळणीही नव्हती. मग काय आमच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन बनवायचो आम्ही आमची खेळणी. जसे की छोट्या छोट्या काट्याकुट्यांनी बैलगाडी तयार करणे , चिंचोके गोळा करून खेळणे , खड्यांनी खेळणे, दगडाचा सपाट तुकडा जिबली म्हणून वापरुन खेळणे , भोवरा , लगोरी , साखळी , लपाछपी आणखीही बरेच खेळ खेळायचो आम्ही ” . आजोबा सांगत होते आणि सगळी मुले कान देऊन ऐकत होती.
“आजोबा आम्हा सगळ्यांना शिकवा ना हे सारे खेळ. आम्हाला पण खेळायचे आहेत हे खेळ “. छोट्या कृतीने हट्टाने आजोबांना सांगितले आणि आजोबा हसू लागले. आता दररोजच सगळी मुले अंगणात जुने खेळ नव्याने खेळू लागली होती आणि मोबाईल नावाचा जादूगार मात्र कोपऱ्यात बसून त्याची जादू कशी ओसरली याचा विचार करत बसला होता.
सगळी मुले आनंदाने सगळे खेळ खेळत होती आणि या सर्व बाल चमूला पाहून त्यांचे आई – बाबा आपल्या बालपणात हरवले होते. प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जायचे काम या जुन्या खेळांनी आणि या बाल चमूने अगदी चोख पार पाडले होते.
अशाच एका रविवारी मुले विष अमृत खेळत होते की सगळ्यांचे आई – बाबा तिथे हजर झाले आणि लहानग्यांसोबत लहान होऊन खेळू लागले. रविवार आहे म्हणून सुद्धा उसंत किंवा निवांतपणा न मिळणाऱ्या आजच्या या आई – बाबांच्या पिढीला आज भरभरुन आनंद मिळाला होता.
रात्रीचे जेवण आटोपून आजोबा अंगणात शतपावली करायला गेले तसे सोहमचे आई- बाबा आणि त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे आई – बाबा तिथे जमले.
” बाबा , सगळे तुम्हाला धन्यवाद द्यायला आले आहेत. आज तुमच्यामुळे ही सगळी लहान मुले सुट्टीचा खरा आनंद अनुभवू शकली ” . सोहमच्या बाबांनी आपल्या वडिलांचे आभार मानले.
” काका , मुले तर मुले आम्हीही आज इतक्या वर्षांनंतर बालपण पुन्हा अनुभवले ते केवळ तुमच्यामुळे. या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात आम्ही आमच्या आत असणारे लहान मूल हरवून बसलो होतो पण ; आज आम्हाला आयुष्याचा खरा आनंद पुन्हा गवसला “. कृतीच्या बाबांनीही आजोबांचे आभार मानले तसे आजोबा प्रसन्न हसले . आता एक गोष्ट मात्र नक्की होती की सगळ्यांचा प्रत्येक रविवार असाच आनंदात जाणार होता.
समाप्त :
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा आणि अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.👌
धन्यवाद