यह तेरा घर यह मेरा घर
किसी को देखना हो गर
तो पहले आके माँग ले
मेरी नज़र तेरी नज़र
आज हॅप्पी कॉलनीमध्ये सुवर्ण महोत्सव साजरा होत होता. बँकेच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बांधलेल्या कॉलनीमध्ये टुमदार बंगले सजले होते.
सोसायटीच्या दारात श्रीनिवास ,गीतांजली ,धनंजय यांचे हितगुज सुरू होते. पन्नाशीचा धनंजय आपल्यापेक्षा दोन-तीन वर्ष लहान श्रीनिवास व गीतांजलीची टिंगल करत होता. धनंजय मोठा असून अजून रुबाबदार दिसत होता, पण त्या मानाने श्रीनिवास अगदीच थकला होता व हल्ली हल्ली गीतांजली कळाहीन दिसत होती.
त्यांच्या मागे उभा असलेला ओम धनंजय एवढाच होता, पण अगदी चिरतरुण दिसत होता.
गप्पांचा ओघ सुरू झाला व जुन्या आठवणी दाटून आल्या. ७३-७४ सालचे जुने दिवस सगळ्यांना आठवले. थोडे गावाच्या बाहेर पण शांत निवांत आयुष्य, पाहुण्यांची ये जा, घरात मुलांचा दंगा….
गीतांजली कडे सुट्टीत चार चार माहेरवाशीणी यायच्या, अगदी सुट्ट्या लागल्या की दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या वेळेला चार रिक्षा दारात हजर ते थेट शाळा सुरू व्हायच्या आधी दोन दिवस सगळी मंडळी परत जात. दीड दोन महिने नुसता कल्ला असायचा, मग श्रीनिवास, धनंजय, ओम सगळ्यांचे पाहुणे एकत्र पर्वती दर्शन, सारसबाग सहल, रात्री नाचगाण्याचे कार्यक्रम, मुलांचे क्रिकेट व मोकळ्या जागेत विषामृत, लंगडी, डबडा ऐसपाईस सोसायटीत नुसता दंगा असायचा.
हळूहळू मुले मोठी झाली व का कुणास ठाऊक नात्यातले प्रेम आटून गेले. पाहुण्यांचे येणे पण अनियमित झाले. घरोघरी फोन आले व ख्याली खुशाली साठी आपापल्या घराचे फोन खणखणू लागले.
त्यामानाने धनंजय लकी म्हणायचा, अजून नात्याचा ओघ आहे. आबा अजूनही सगळ्यांना धरून आहेत. वर्षाकाठी एक दोन वेळा चार दिवसासाठी सगळे एकत्र येतात दिवाळी व मे महिना जगाच्या पाठीवर कुठेही असा, पण आबांसाठी सगळे धावून येतात आणि म्हणूनच धनंजय अजूनही रुबाबदार दिसतो.
गीतांजलीच्या माहेरवाशीणी काळाच्या पडद्याआड गेल्या. पुढची पिढी एवढी धरून नसल्यामुळे ,वर्षाकाठी डिसेंबरमध्ये सोमण काकू ना भेटायला सगळा परिवार येतो. सोमण काकू वर्षभर डिसेंबर महिन्याची चातकासारखी वाट बघत बसलेल्या असतात.
श्रीनिवास त्यामानाने लवकर थकला. “हम दो हमारा एक”म्हणत उच्च शिक्षणासाठी व पुढे परदेशात स्थायिक झालेल्या मुलाला सारखे सारखे येणे जमत नव्हते . सुरुवातीला सहा सहा महिने रानडे काका काकू जाऊन येऊन करायचे ,आता ७५ ओलांडलेल्या काकांना प्रवासाची दगदग सहन होत नाही व अचानक काकू गेल्यामुळे अगदीच एकटे पडलेले काका आता खूपच थकले आहेत.
श्रीनिवास व ओम एकाच वयाचे पण ओमकडे बघून अजिबात त्याचे वय एवढे आहे वाटत नाही. चिनू ,सोनी मुलांचा दंगा…बापरे कसे झेपते यांना…घरभर पसारा असतो. पाऊल ठेवायला जागा नसते. काळे काकू, छे! आता पणजी झाल्यात की त्या…. नातीच्या जुळ्या मुलांना अगदी प्रेमाने सांभाळतात ,परवा पडता पडता वाचल्या पण खुश होत्या म्हणाल्या,”नशीबवान आहे मी, माझं घर भरलेल आहे .अजूनही घरात चिवचीवाट आहे, डबेच्या डबे दाण्याच्या लाडूंनी भरले आहेत, इवली इवली भातुकली खोटा खोटा संसार दोन खुर्च्यांच्या बाजूला साडीचा आडोसा व सोनीचा संसार पाहिला मिळतो आहे. चिनूच्या बॉल मुळे देवघरात देवांना कधी कधी बॉलचा फटका बसतो, पण ठीक आहे मुले म्हणजे देवाचेच रूप ना?”
नातीचा संसार तिची लगबग “आजी बघ ना मुलांना”म्हणून या मेल्या म्हातारीला दिलेली जबाबदारी…. पोटात गॅस झाला तर आजीचा तवा व ओव्याची पुरचुंडी…..५० शी ओलांडलेली सून, “आई सांगा ना आता काय व कसे करू ?”म्हणून विचारते…. नातजावई “आजी आजी करत” उश्या पायथ्याशी बसतो तर नातवाचे मित्र-मैत्रिणी येऊन आजी “cool का?”म्हणतात…मुलगा आजोबा झाला तरी वेळप्रसंगी चार शब्द सुनावल्याशिवाय मी बरी राहीन त्याला….
नाहीतर बाकीच्यांकडे पाहिले की जाणवते त्यांच्याकडे धुळी शिवाय कोणाचे येणे जाणे नाही, आमच्यासारखी ऑफिसची ,शाळेची कॉलेजची गडबड नाही.. तो चिऊचीवाट नाही… मोठ्यादा गाणी, गोष्टी, रडण्याचे आवाज नाहीत… गोष्ट सांगाना चा हट्ट नाही… की मातीच्या पायाचे इवले इवलेसे ठसे नाहीत…खडूचे रंगीबिरंगी रेघोटे नाहीत की प्राणी पक्षांची चित्रे नाहीत…सोफ्यावर पसारा बाजूला करून बसणे नाही… की कपाटातून लाव्हारस यावा तसा दार उघडल्यावर कपड्यांचा ढीग अंगावर येत नाही…. घर कमी आणि गॅरेज जास्त वाटावे एवढी खेळण्यातली सायकल, कार, तीनचाकी स्कुटर ,बाबा गाडी…. पाच खोल्या पण आठ नऊ माणसे कोंबून राहतात व पै पाहुणा आहेच… इथे एवढ्ढा कलकलाट आहे पण मन:स्वास्थ्य,शांतता ,आनंद व समाधान भरभरून आहे…. चार पिढ्या एका छताखाली आनंदाने व गुण्यागोविंदाने राहत आहेत…. Life is Good….
ओम भडाभडा बोलत होता. श्रीनिवास शांता ऐकत होता “काय चुकले? कुठे चुकले?चा विचार मनात घोळत होता. दोन मजली प्रशस्त घर, चकाचक मार्बल टाईल्स, लस्टर लावलेल्या भिंती, अद्यावत सोयींनी युक्त प्रशस्त आठ रूम मध्ये एकट्याचा गुदमरणारा श्वास…. कोणाचे येणे जाणे नाही अगदीच रितेरिते…सगळेच वैभव गेल्यासारखे वाटते….
सगळ्यांची वेगळीच कहाणी .
अंधार पडला आणि लाइटिंग बंद झाले.
ओम अजून जागाच होता लख्खप्रकाशात…..
बाकी सगळे धुसरं, क्षीण, थकलेले…..
माणसांचे वैभव हरवलेले हे हॅप्पी कॉलनीतले बंगले ……
श्रीनिवास आणि गीतांजली आता आतून व बाहेरून वाकले होते. धनंजय थोडा टिकून होता. सगळ्यांनी एकदा मोठा श्वास घेतला आणि ओमच्या भाग्याचा हेवा करत भविष्याच्या चिंतेत मग्न झाले…
वृषाली पुराणिक.पुणे.
अनेक वेळा आपण माणसांची मनोगते ऐकली आहेत, पण कधी विचार केला का घराला पण भावना असतात आणि त्यांना पण खूप काही बोलायचे असते. असेच चार बंगल्यांचे मनोगत आपल्याला कसे वाटले?ही कथा तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा.
आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
धन्यवाद !
खूप मस्त👌👌
खूप छान 👌
गोष्ट छान जमली आहे. काही कॅरेक्टर्स आपल्या परीचायातल्या व्यक्तींशी साधर्म्य दाखवतात.
एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व अधोरेखित केले आहे.नात्यांना बांधून ठेवणारे कुणीतरी असल्याशिवाय हॅप्पी होम किंवओम कसा दिसणार?
असेच प्रयत्न चालू राहू द्या.