जीर्ण संपून अंकुराची रुजवात करणारी, चैतन्याचे प्रतीक असणारी आनंदी गुढी.
“अगं ए आजी लवकर ये ना. नेसवं ना ही नऊवारी साडी. ही नथ सुद्धा घालून दे आणि हो ती चंद्रकोर सुद्धा लाव. केसांचा बाजीराव मस्तानी स्टाईल आंबाडा आणि त्यात ती गुलाबाची फुले खोवून दे. आज एकदम काशीबाई सारखं दिसायचं आहे आणि बुलेटवर स्वार होऊन जायचं आहे. सात वाजता बोलावलं आहे प्रभातफेरीसाठी आणि मी अजून तयार नाही. ए आजी ये ना गं लवकर.” आज सकाळीच दांडेकर आजींच्या नातीने आपल्या घाई गडबडीने आणि गोंधळाने दांडेकरांचे घर दणाणून सोडले होते.
“अगं काय गं रेशमा तुझा हा गोंधळ. किती घाई करशील. जरा ऊशीरा गेलीस तरी चालणार आहे तुमच्या त्या प्रभातफेरीला. दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षीसुद्धा घरची गुढी ऊभारल्याशिवाय तुला बाहेर जाऊ देणार नाही.” दांडेकर आजीने रेशमाला घरच्या नियमाची आठवण करून दिली.
नऊवारी पैठणी साडी, रेशीम शेला, केसांचा खोपा, त्यात गुलाबांची दोन खोवलेली फुले, नाकात छोटी नथ, गळ्यात मोत्यांची चिंचपेठ, हातात मोत्यांच्या बांगड्या, कानात मोत्यांचे झुमके, कपाळावर चंद्रकोर, डोळ्यात काजळाची हलकी रेघ, ओठांवर हलका गुलाबी रंग असा साजशृंगार करून रेश्मा तयार झाली.
ह्या सगळ्यात आजीचा लाडका नातू रोहन मात्र शांत शांत होता. कदाचित दोन शिफ्टमध्ये काम करून दमला असेल, झोप पूर्ण झाली नसेल म्हणून तो शांत आहे असं आई बाबांना वाटले. रेशमावर आपल्या बहिणीवर त्याचा खूप जीव. तिच्याबरोबर प्रत्येक सणाला, कार्यक्रमाला फोटो काढायचाच असा त्याचा हट्ट असे. पण आज तो हट्टसुद्धा रेशमाला दिसत नव्हता. रोहन नुसता लोळत होता. फोनमध्ये काहीतरी बघत होता. फोनमध्ये बघता बघताच म्हणाला,” मला रात्रपाळीसाठी जायचं आहे. मी जाऊन झोपतो.”
“पण दाद्या आज सगळ्यांना सुट्टी आहे. मग तू का जात आहे कामावर? हे बघ तू आता आलास म्हणून तुला प्रभातफेरीला येण्यासाठी फोर्स करत नाही आहे. आता दुपारचे जेवण होईपर्यंत झोप काढ. मग जेवण आणि परत झोप. पण संध्याकाळी आपण मावशीकडे जायचे आहे.” रेशमाने त्याला कामावर जाण्याचे ऐकल्यानंतर आपला ठरवलेला बेत सांगितला.
“ठिक आहे ना. मावशीकडे जाऊन आल्यावर कामाला जाईन. इथे थांबून काय करू. तिकडे काम आहे.” असं सांगून रोहन घराबाहेर निघून गेला. त्याच्या वागण्यातील तो दाखवत असलेला सहजपणा खोटा आहे आणि त्याच्या मनात खूप काही साठलेलं आहे हे रेशमाला कळतं होतं. पण तो सहज खरं सांगणार नाही हे तिला माहित होतं. म्हणूनच तिने मावशीकडे जाण्याचा प्लॅन केला होता.
श्रीखंड, बासुंदी, पुरी, बटाट्याची भाजी, वरण, भात, मसालेभात, ताक, काकडीची कोशिंबीर, कैरीची चटणी असा रेश्मा आणि रोहनच्या आवडीचा खास बेत आईने आणि आजीने केला होता. पण नेहमी श्रीखंड आणि बासुंदी वरून रेशमाबरोबर भांडणारा रोहन आज शांतपणे जेवण करून ऊठला आणि त्याच्या खोलीत गेला.
रेशमाचे जेवण झाल्यानंतर रोहनने मावशीकडे जाण्यासाठी लगेच निघण्याचे रेशमाला सुचवले आणि तयारी करून निघाले. मावशीकडे जाईपर्यंत रेशमा रोहनला खूप काही सांगत होती. तो सुद्धा मस्करी करत होता. परंतू हे सगळंच सुरळीत नाही हे रेशमाने जाणले होते. रेशमाने मावशीला वाटेत असतानाच रोहनच्या बदललेल्या वागण्याबद्दल मेसेज करून कळवले होते. रोहन मावशीकडे मोकळेपणाने बोलू शकेल असे रेशमाला वाटले म्हणून तिने मावशीकडे येण्याचा प्लॅन बनवला होता.
बोलता बोलता एका तासाच्या प्रवासानंतर ते मावशीकडे पोहोचले. मावशी रेशमाला म्हणाली, “चल रेश्मा आज तुला कैरीचं पन्ह करायला शिकवते. तोपर्यंत रोहन हे कलिंगड जरा कापून ठेव. मग निवांत गप्पा मारू.” मावशीने कलिंगड स्वच्छ धुवून कापायला रोहनकडे दिला. मग ती आणि रेश्मा स्वयंपाकघरात पन्हं करण्यासाठी गेल्या. त्यावेळेस मावशीने रेशमाला सगळं परत एकदा सविस्तर विचारले. मावशीने त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
मावशी व रेश्मा पन्हं घेऊन बाहेर आल्या. रोहनने कलिंगडाच्या फोडी ताटामध्ये ठेवल्या होत्या. कलिंगड आणि पन्ह्याचा आस्वाद घेत गप्पा सुरू झाल्या. थोडी मस्करी, काही कौतुक करून झाल्यावर मावशीने हळूहळू रोहनकडे आपला मोर्चा वळवला. त्याने मनमोकळे बोलण्याची गरज आहे हे जाणून तिने रेशमाला खूण केली आणि ठरल्याप्रमाणे झोप येण्याचे नाटक करून रेश्मा आतील खोलीत निघून गेली.
मावशीने रोहनबरोबर गप्पा सुरू केल्या. “काय रोहन काय म्हणतोय? कस सुरू आहे ऑफिस? काही बढती वगैरे मिळणार आहे का?” मावशीने रोहनला विचारले.
“ऑफिस छान सुरू आहे. नवीन नवीन शिकायला मिळत आहे. माझ्या वरिष्ठांना माझे काम आणि नवीन काही शिकण्याची वृत्ती आवडत आहे. ते मला खूप सांभाळून घेतात. पण बढतीचे अजून काही बोलत नाही. पगारवाढ करत राहिले असते तर इथेच राहिलो असतो. पण तसं नाही करत आहेत. म्हणून अजून चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी शोधत आहे. आता इथून लांब दुसरीकडे कुठेतरी जाईन नोकरीसाठी. तिकडे थोडा जास्त पगार मिळेल. शोधतो आहे. बघू कुठे काय जमते आहे ते.” रोहनने मावशीला त्याचे सुरू असलेले प्रयत्न सांगितले.
“अरे वाह. छान विचार आहे. तू चांगल्या संधीसाठी, चांगल्या बढतीसाठी प्रयत्न करत आहेस ते कौतुकास्पद आहे. तुझं ध्येय तू निश्चित केलं आहेस का? म्हणजे नक्की तुला कुठल्या हुद्द्यावर काम करायचं आहे? लांब म्हणजे कुठल्या प्रदेशात जाणार आहेस. ह्याबद्दल जरा सविस्तर सांगशील का? म्हणजे मी काही मदत करू शकेन.” मावशीने त्याचे विचार जाणून घेण्यासाठी विचारले.
रोहन स्वतः ह्याबाबतीत खूप गोंधळून गेला होता. तो म्हणाला, “ मावशी मी काहीच ठरवले नाही. आता फक्त मला पैसे कमवून स्वतःला सिद्ध करायचे आहे. माझ्या कमी पगाराची लाज वाटते काही जणांना. माझी लायकी दाखवतात. इतकं की मला सोडून जातात ह्या कारणांमुळे. मी आयुष्यात काहीच करू शकत नाही हे माझ्या कमी पगारावरून ठरवले जाते आणि म्हणूनच मला लवकरात लवकर खूप पैसा कमवून स्वतःला सिद्ध करायचे आहे. परंतू त्यासाठी मी कुठलाही चुकीचा मार्ग अवलंबणार नाही.”
मावशीने त्याला अजून मनमोकळं करण्यासाठी त्याच्याशी संवाद साधण्यासाठी विचारले. “ म्हणूनच तू दोन दोन शिफ्ट करतोस. किती जास्त पैसे मिळतात रे मग.”
रोहन म्हणाला,” अगं मावशी त्या शिफ्ट केल्यावर मला कधीतरी सुट्टी घ्यायला मिळते जास्त. आमच्या इथे ओव्हरटाईम करत नाहीत. त्याचे पैसे मिळत नाहीत. फक्त माझा कामात वेळ जातो आणि नवीन काहीतरी शिकायला मिळत म्हणूनच मी जातो. आज सुद्धा जाणार आहे. ऑफिसमध्ये कुणीही नसतं. मग मला नवीन काहीतरी करायला मिळत. “
“अच्छा असं आहे. तुझ्या काही लक्षात येत आहे का रोहन तू नक्की काय करत आहेस ते.”, मावशीने रोहनला विचारले.
“रोहन तू माणसांपासून दूर राहत आहेस. स्वतःला कामात जुंपून घेत आहेस जेणेकरून तुला तिची आठवण येऊ नये. काय बरोबर आहे ना. रोहन जे आहे ते मोकळेपणाने सांग. तुला माहित आहे ना तू माझ्याशी जे हवं ते बोलू शकतोस.”
मावशीने असं म्हणताच तो म्हणाला, “मावशी तुला कसं गं कळतं माझ्या मनात काय सुरू आहे.” आणि असं म्हणतच रोहन मावशीच्या कुशीत शिरून रडून घेतो.
थोडा शांत झाल्यावर तो मावशीला म्हणतो, “ मावशी ह्या पैशामुळे माझी लायकी काढली गं. पैशासाठी सोडून गेली ती. वाटलं होतं मैत्री आहे. तिला सगळंच माहित आहे. समजून घेऊ शकते. म्हणून तिने तिचे प्रेम माझ्यावर आहे सांगितल्यावर मी होकार देत लगेच घरी सांगितले आणि लग्न ठरवले. लग्नाची तयारी सुरू केली आणि मग तिला जाणवलं की ती माझ्याबरोबर राहू शकत नाही. कारण काय तर पगार कमी.
मी कमी का प्रयत्न केले मावशी. साधा बारावी पास मी. कॉम्प्युटर क्लासेस मध्ये शिकत शिकत तिथेच शिकवायला लागलो. पाच हजारात क्लासेसची काम करत होतो. तिथे वेगवेगळे कोर्सेस शिकून मी एका कंपनीत लागलो. दोन वर्षांत पाच हजारावरून पंधरा ते वीस हजारच्या पगारावर आलो. वीस हजारावरून वरून चाळीस हजारावर जायला मला वेळ नको का? मी सुद्धा धडपड करत आहेच; पण त्यासाठी मी कुणाचीही हुजूरी नाही केली. मला ते पटत नाही. माझ्या कार्यक्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. पण तिने एका वाक्यात माझी लायकी काढली. तिचे ते वाक्य माझ्या मनात खोलवर जखम करून गेले आहे. म्हणूनच मी आता फक्त पैसा कमावणार. पैशाशिवाय दुसरं काहीच महत्वाचे नाही. ना प्रेम, ना आपुलकी, ना काळजी. “
रोहनने सगळं खूप खोलवर दडवून ठेवलेले बाहेर आले होते. मावशीने त्याचे बोलणे झाल्यावर त्याला शांत होण्यास अजून थोडा वेळ दिला. थोडा शांत झाल्यावर त्याने मावशीकडे बघितले.
“मला माहीत आहे रोहन तू खूप दुखावला गेला आहेस ते. आम्ही सगळेच तुला समजू शकतो. पण ह्याचा अर्थ असा नाही ना कि तू स्वतःला आमच्यापासून दूर ठेवशील. तुला काय वाटलं, तूझं हे दोन शिफ्टमध्ये काम करणं, स्वतःच्या शरीराला थकवून घेणं, तूझं मी किती नॉर्मल आहे हे दाखवणं हे सगळंच आम्हाला समजत नाही आहे का? तुझ्या ह्या वागण्याचा आम्हाला त्रास होत नसेल का? तुझी काळजी आम्हाला वाटणार नाही का?
बरं आता थोड वेगळं बोलू या. दरवर्षी तू गुढी ऊभारतोस. पण कधी तू विचार केला आहेस गुढी ऊभारताना त्यात काय संदेश आहे तो? तू गुढी कशी ऊभारतोस सांग.” मावशीने रोहनला विचारले.
रोहन सांगतो, “ वेळूच्या काठीला रेशीम वस्त्र बांधतो. त्यावर कलश, कडुलिंब आणि आंब्याच्या डहाळ्या, साखरेच्या आणि फुलांच्या माळा घालतो. मग ती गुढी पाटावर ऊभी करतो. पानावर सुपारी ठेवून गणपतीला आवाहन करून गुढीची पूजा करतो. पण मावशी ह्याचा आणि माझ्या वागण्याचा काय संबंध. मला काहीच कळत नाही आहे.”
“सांगते. गुढीची वेळूची काठी म्हणजे सामर्थ्याचे प्रतिक आहे. त्याच सामर्थ्यावर रेशमी वस्त्र (वैभव)परिधान करून मांगल्याचा कलश यश, आरोग्य, सिद्धी, सौभाग्याचे लेणे लेऊन, गुढी सजून फार ऊंचावर ऊभी असते. आकाशाला गवसणी घालते.
शिशिरातील पानझडीनंतर पर्णहीन वृक्षांना पालवी फुटते. सुगंधित फुलांनी वृक्ष बहरून जातो. कुठेतरी दूर कोकिळेचे ”राग वसंत” गुणगुणणे ऐकू येते. हा ऋतूचक्रातील बदल सांगणारा सण म्हणजे गुढीपाडवा. जीर्ण संपून अंकुराची रुजवात करणारा हा दिवस. चैतन्याचे प्रतीक असणारा गुढीपाडवा.
कळतंय का तुला काही. तुझ्या आयुष्यातील शिशिर संपून वसंत ऋतूला सुरूवात होत आहे. तुझ्या आयुष्यातील पानझड झाली आहे. नवीन पालवी फुटत आहे. तू नकारात्मक बघतो आहेस आणि मी सकारात्मक. जर तू पाच हजारांवरून वीस हजारांवर जाऊ शकतोस ह्याचा अर्थ तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे नवीन काहीतरी करण्याचे हे तुला माहीत आहे ना. मग हाच आत्मविश्वास म्हणजे वेळूची काठी आहे आणि ह्या काठीवर तुला तुझ्या आयुष्याची आनंदी, समृद्ध गुढी ऊभारायची आहे.
तू नकारात्मक विचार सोडून दे. कुणीतरी काहीतरी बोलणारच. ज्यांना वीस हजार कमी वाटतात त्यांना लाख सुद्धा कमीच वाटतील. त्यांचा विचार सोड. ती पानगळ होऊन गेली आहे. नवीन शिकायला घे. दोन शिफ्ट ऐवजी तूझी नेहमीची शिफ्ट एकच शिफ्ट कर. ऊरलेला वेळेत नवीन कोर्सेस कर ज्यामुळे तुला नवीन चांगल्या नोकरीची संधी मिळेल. तुझ्या व्यक्तिमत्त्व विकासावर विचार कर. आज जशी गुढी ऊभारून निसर्गाच्या वसंताचे स्वागत करतो आहेस त्याप्रमाणेच आयुष्यातील वसंताचे स्वागत करायला सज्ज हो.
ध्येयाच्या पाटावर विश्वासाची सुपारी ठेवून संकल्प करायचा. प्रयत्नांच्या काठीवर अनुभवांची भरजरी वस्त्रे नेसायची. त्याला समाधानाच्या गोड गाठींची माळ आणि संयमाची पुष्प माळ घालून सजवायची. कडू अनुभवाच्या पानांची झालर असणारच थोडीफार. पण गोड सुखद आठवणींची माळ त्या कडू अनुभवांची तीव्रता कमी करते. आणि मग त्यावर यशाचा कलश चढवून आयुष्याची आनंदी गुढी उभारायची..
काय तयार आहेस ना आयुष्याची गुढी ऊभारायला.” मावशीने रोहनकडे बघत विचारले.
रोहन अगदी भारावून मावशीकडे बघत म्हणाला, “हो मावशी. माझ्या आयुष्यातील पानगळ कुठली आहे हे मला कळलं अहे. नकारात्मकतेची पानगळ झाली आहे. आता मी तयार आहे आयुष्यातील सकारात्मकतेची गुढी ऊभारायला. खरंच तुझ्यासारखी आणि आईबाबा, आजीआजोबां सारखी प्रेम करणारी, मला समजून घेणारी माणसं माझ्या आयुष्यात असताना मी असं हरणं चुकीच आहे. आता मी जोमाने ऊभा राहीन. तुम्हाला तुमचा आधीचा प्रेमळ, हळवा रोहन परत मिळणार. हा शब्द आहे माझा.”
“अरे वाह छान. मला हाच रोहन अपेक्षित होता. मला तर माझा भाचा आजपासूनच मिळाला आहे.”, आपले प्रयत्न सफल झाल्याच्या समाधानात मावशी रोहनला कौतुकाने म्हणाली.
“ मावशी फक्त तुलाच तुझा भाचा नाही मिळाला. तर मगापासून त्या स्वयंपाकघरात लपून आपलं बोलणं ऐकणार्या माझ्या लाडोबाला सुद्धा तिचा दाद्या मिळणार आहे. चल ये बाहेर आता. झालं आहे बोलणं. निघू या.” रोहन लपून ऐकणार्या रेशमाला म्हणाला. त्याने असं म्हणताच रेश्माने डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा पुसत रोहनला मिठी मारली.
“अरे हो थांबा जरा मी तुमच्यासाठी केलेला आमरस तर खाऊन जा. घरी न्यायला सुद्धा देते तो ही घेऊन जा.” मावशी असं म्हणत आत निघून गेली. आमरस खाऊन आपल्या आयुष्यातील वसंताच्या स्वागताची तयारी करण्यासाठी रोहन सुद्धा सज्ज झाला.
शिशीराचे झाले गमन
वसंताने केले आगमन
सृष्टी नेसली चैत्रपालवी
करण्या नूतन वर्षाभिनंदन…
रोहन तर सज्ज झाला आहे आयुष्याची आनंदी गुढी ऊभारण्यासाठी. तुमच्या आयुष्यातही वसंताचे आगमन होत असेल. त्याच्या स्वागतासाठी, आयष्याच्ची आनंदी गुढी ऊभारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
__पुजा सारंग, मुंबई.
छान
Thank you 😊 🙏🏻
Khuup Sundar..very positive and motivational story…
Thank you Madam 😊 🙏🏻
Khuup Sundar..very positive and motivational story…
Its very heart touching story…
There is a lot to learn from this story This story will inspire someone…. Really Thank you so much….
वा!! कथेची खूप सुंदर मांडणी👌👌
Thank you so much 😊 🙏🏻
मस्तच👌
धन्यवाद मॅडम 🙏🏻