आज मल्हार आणि मिताली दोघांचेही पालक मल्हारच्या घरी एकत्र जमणार होते .विषय तसं कौटुंबिक असला तरी गंभीर होता .मल्हारची आई शर्मिलाताई आणि मितालीचे काही केल्या जमत नव्हते .लग्नाला चार वर्षे झाली तरी त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे सामोपचाराचा हा एकच उपाय ,खरे तर शेवटचा पर्याय म्हणून हा सगळा सोपस्कार होता .सगळेच जण बैठकीच्या खोलीत जमले होते .शिरीष ने म्हणजे मल्हार बाबांनी विषयाला सुरुवात केली ,
“हे पहा मिताली आणि शर्मिला, खरे तर कोणताही विशेष त्रास नसताना तुम्हा दोघाींच्या वागण्याने कुटुंबात ही तेढ निर्माण झाली आहे .कुटुंब एकत्र राहावं ,त्यामध्ये सुसंवाद असावा ही सर्वांचीच इच्छा आहे. तेव्हा यावर पर्याय काय हे तुम्हीच सांगा”.
दोन मिनिट शांततेत गेल्यावर मितालीच म्हणाली, “हे बघा बाबा ,माझं कामाचं क्षेत्र कार्पोरेट आहे .तिथल्या जबाबदारी डेडलाईन्स, डेडिकेशन हे सारं माझ्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत .हे सांभाळून मी घर पाहत असते. पण आईंच्या अपेक्षा आता मला पेलवत नाहीत .एखादा मध्य मार्ग त्यांनीही स्वीकारला तर फार बरं होईल. “
तशी शर्मिला ताडकन म्हणाली, “आम्ही काय नोकऱ्या केल्या नाहीत का ? पण घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये आम्ही कधीही पळवाट शोधली नाही. दोन्हीकडे अगदी समान न्याय दिला. मग हिला न जमायला काय झालं आहे ? काय म्हणे वर्कोहोलिक, करिअरिस्टीक असले शब्द फेकले की आपण फार काहीतरी मोठे करतो असे यांना वाटतं. “
शर्मिलाच्या बोलण्यातील कडवटपणा सर्वांना फारच जाणवला .शर्मिलाने वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत बँकेत नोकरी केली . घरच्यांचा भक्कम पाठिंबा आणि नेहमीच्या ठराविक साच्यातील वेळ यामुळे ठराविक प्रसंग सोडले तर कसोटीचे क्षण पण तसे कमीच आले. तिच्या या मानसिकतेमुळे ती सुनेलाही आज त्याच नजरेतून बोलत होती .खरे तर शर्मिलाच्या सासूबाईंमुळेच शर्मिलाने हा संसाराचा गाडा ओढला होता. ती स्वतः हे मान्य करीत होती. पण आता तिच्या सुनेला पाठिंबा देण्याच्या बाबतीत द्विधा मनस्थिती होती. आयुष्यभर काम केले, आता मला सुखाचे चार दिवस हवेत असे तिची धारणा होती .ते काही अंशी बरोबरही होतं. पण काळानुसार बदल जसा जीवनामध्ये अपेक्षित असतो तसा मुल्मयांध्ये ही हवा असतो. नेमके तेथेच शर्मिला गोंधळली होती. सासूबाईंच्या पाठिंब्याची जाण ठेवून ती सासूबाईंची पत मानसन्मान जपत होती .त्यांचा शब्द अंतिमतः ती मान्य करीत होती. तशीच अपेक्षाची सुनेकडून करत होती आणि ते रास्तही होते. शिरीष ने ही ओळखले होते .तोही तिला परोपरीने सांगत होता.
“हे बघ शर्मिला, किमान आपले स्वास्थ्य ठीक हवे यासाठी झेपेल इतका व्याप आपल्याला आताही आवश्यक आहे. मग तो तिच्या मदती करता असेल तर काय हरकत आहे ? तू तुझे दिवस आठवून बघ .घरचे आणि कामाचं बघताना कितीतरी मध्य मार्ग तू काढलेसच ना ? आणि आईने समंजसपणा दाखव त्याला मान्यता दिली .असा विवेक तुम्ही त्याला दाखवत नाहीस ?
” हे पहा बाबा ,मला कोणाची सहानुभूती नकोच. घर आपल्या सर्वांचं आहे ,सर्वांची जबाबदारी आहे. मी माझ्या जबाबदारीतून पळवाट शोधणार नाहीच, पण आईने त्याचा मुद्दाम जास्त रेटा लावू नये, असे मला वाटते “
मिताली.
“अगं हो मिताली ,पण सणवार ,कर्म ,कार्य इत्यादी तरी पार पाडली पाहिजेतच ना ? त्यामध्ये कशी तडजोड चालेल ? ते व्यवस्थित झालेच पाहिजे” शर्मिला.
“हो आई ,पण माझ्या कामाच्या वेळेत हे कसे शक्य आहे ? इतका वेळ काम करताना मला उपास तपास कसे शक्य आहे ? पूजा विधींसाठींचे आचार मला कसे तंतोतंत पाळता येतील ? त्यापेक्षा इतरही काही मार्ग शोधता येतीलच ना! “
न राहवून शेवटी मितालीचे बाबा म्हणाले, “मिताली एक सांगू का? तुमची पिढी प्रॅक्टिकल, व्यवहार पाळते, ते योग्यही आहे. पण तुमची गती आम्हाला पकडता येणार नाही हेही तितकेच सत्य आहे. शेवटी आजच्या काळात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत. ते प्रत्येकाला मिळतीलच. पण कुटुंबाची स्थिरता, त्यामधील संवेदनशीलता ,आपुलकी आपल्या जीवनातील मूल्य ही रुजवावी लागतात .वाढवावी लागतात .हे कुटुंबातील सदस्यच करू शकतील .तेव्हा दोघींनीही आपापले दुराग्रह सोडावा आणि समंजस भूमिका घ्यावी एवढीच आमची इच्छा आहे”.
तरीही शर्मिला आणि मिताली चा वाद वाढतच गेला. आणि सगळे पहात बसले .शिरीष , आतापर्यंत एकही शब्द न बोललेला मल्हार आणि मितालीचे वडील अक्षरशः हतबल होऊन पाहत बसले होते. घर ,कुटुंब एकत्र टिकावं ही सामान्य, साधीअपेक्षा होती या तिघांची. पण केवळ घरातील दोन सदस्य या समजूतदारपणा दाखवू शकत नव्हते. चूक एकीचीच आहे अशातला भाग नाही. पण दोघींनीही थोडासा हट्ट बाजूला ठेवून ही घडी पुन्हा नीट केली असती. नक्की आज काय घडतंय या घरात? आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही शर्मिला आणि शिरीष च्या मध्यम पिढीकडून काय चुकतंय आणि मल्हार आणि मिताली कोणता सो कॉल्ड प्रॅक्टिकल ठेवून जगत होते हेच कोणाला कळत नव्हते. त्या सगळ्या सोयी सुविधांनी युक्त घरामध्ये एक निराशेची छाया पसरली होती .आणि तीन पिढ्यांचे जगणं पाहिलेल्या त्या घराच्या भिंती मात्र मूकपणे पाहत होत्या ….त्या घरातील मल्हार आणि शिरीष हतबल होणं आणि जगणं हरवलेली माणसं….!!!
लेखिका ….गौरी संतोष जंगम. मिरज.
वाचक मित्र हो कशी वाटली तुम्हाला ही कथा अशाच नवनवीन कथा आणि लेखांसाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या. वाचा ,शेअर करा आणि कमेंट करा. . धन्यवाद. .!!
दोन पिढीतील संघर्ष प्रत्येक पिढीत पहायला मिळतो. सुंदर कथा
सध्याचं वास्तव छान मांडलं आहे👌👌
खूप छान
दोन पिढ्यांचा संघर्ष मांडला हे ठीक आहे पण ही एक कथा आहे तर अपूर्ण वाटली. काहीतरी उपाय किंवा सुवर्ण मध्य मांडून कथा संपवायला हवी होती.
हा फक्त एक विचार एक स्थिती आणि गोंधळ मांडला आहे