आभास:
कॉफीच्या मगवर, अस्वस्थपणे नखांनी टकटक करत बसलेल्या सोनियाकडे, रेश्मा एकटक पहात होती. कॉफी कधीच थंड होऊन गेली होती तरी सोनियाला त्याचं अजिबात भान नव्हतं. आत्ता सोनियाने जे काही सांगितलं होतं, त्यामुळे रेश्माही बेचैन झाली होती. एकतर तिचा त्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता. दुसरं असं की, असला भलताच गैरसमज सोनियाने कसा काय करुन घेतलाय, याच कमालीचं आश्चर्य तिला वाटत होतं.
रेश्मा, सोनिया आणि तिचा नवरा आकाश, तिघेही चेंबूरच्या ‘फॅशन डिझायनिंग अँड इंटिरिअर डिझायनिंग’ कॉलेजमध्ये एकत्र होते. रेश्मा आणि आकाश, इंटिरिअर डिझायनिंगला एकाच क्लासमध्ये होते आणि सोनिया फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला होती. बिल्डिंग वेगळ्या असल्या तरी कॅम्पस एकच होता.
सोनिया आणि रेश्मा शाळेपासूनच्या जिवलग मैत्रिणी. रेश्मामुळेच सोनिया आणि आकाशची ओळख झाली होती. दोघांचं प्रेमही रेश्माच्या साक्षीनेच बहरलं होतं. तीन वर्षं झाली होती, त्यांचा अगदी सुखेनैव संसार सुरु होता, आणि अचानक आज सोनिया तिच्याकडे येऊन काही वेगळंच सुचवू पहात होती.
न राहवून रेश्मा तिला म्हणाली, “सोनिया, तू जे काही मला आत्ता सांगितलं आहेस, त्यात खरंच काही तथ्य आहे असं तुला मनापासून वाटतंय का? हा असा आ*रोप, म्हणजे आकाशसारख्या अगदी जेन्युईन माणसावर अन्याय आहे असं नाही वाटत तुला? त्याचं किती जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर, हे मी अगदी जवळून पहात आले आहे.”
“प्रेम तर आहेच गं, म्हणूनच मला जाणून घ्यायचं आहे की, या थराला गोष्टी पोहोचण्यामागे अशी कोणती गोष्ट कारणीभूत झाली आहे किंवा नजीकच्या काळात होणार आहे? इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ त्याच्यावर का येणार आहे? एवढा पराकोटीचा बेबनाव आमच्यामध्ये कशामुळे निर्माण होणार आहे?”
“एकतर या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत.
तुझ्या स्वप्नाबद्दल म्हणशील तर, त्यात फारसा
काही अर्थ आहे असं नाही वाटत मला. जरी स्वप्नाची पुनरावृत्ती होत असली तरीही ते सत्यात उतरेल असं गृहीत धरुन तुमचं इतकं छान नातं कशाला बिघडवतेस? अजून एक सल्ला विचारशील तर तू सरळ आकाशला याबद्दल सांगून मोकळी हो. अशी किती दिवस डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखी वावरणार आहेस?”
“छे, छे आकाशला कसं सांगू मी हे? त्याला किती वाईट वाटेल? माझ्या स्वप्नांबद्दल म्हणशील तर, आमच्या लग्नानंतर तुला सगळी कल्पना दिली होती रेश्मा. माझ्या आयुष्यात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, मग त्या चांगल्या असोत वा वाईट, त्या मला आधीच स्वप्नांमधून समजल्या होत्या. मी नववीत असताना माझ्या आई-वडिलांचा
झालेला बस अपघात मी पाच-सहा वेळा स्वप्नात पाहिला होता. अशी स्वप्नं पडायची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी खूप घाबरले असले तरी त्या दोघांना काहीच बोलले नव्हते. ही अशी स्वप्नं सत्यात उतरतील ही कल्पनाही तेव्हा कुठे होती? इतकी समजही नव्हती. त्यामुळे तेव्हा गप्पच बसले होते. त्यावेळी तो इतका मोठा शॉक होता की माझं सगळं जगच उलटंपालटं झालं होतं. त्या स्वप्नाचा विचार डोक्यातून निघून गेला होता. नंतर दहावीत असताना बोर्डाच्या परीक्षेत मला छान मार्क्स पडणार आहेत असं तीनदा स्वप्नात दिसलं होतं. चेंबूर कॉलेजची ऍडमिशन, आकाशशी लग्न या सगळया गोष्टी मी स्वप्नात पाहिल्या होत्या. आकाशपासून अगदी छोट्यात-छोटी गोष्टही मी लपवत नाही; पण त्याचा ‘हॅपी गो लकी’ स्वभाव बघता याबद्दल त्याला नाही सांगावसं वाटलं. त्याचा मुळीच विश्वास बसला नसता. तुला मात्र हे सगळं सांगितलं होतं.
आई-बाबा गेल्यावर माझ्या काकांकडे मी रहात होते हे तर तुला माहितीच आहे. त्यांचा अतिशय सुंदर बंगला हा त्यांचा अभिमान होता. खूप बिल्डर्सनी तो विकत घेण्याची ऑफर त्यांना दिली होती; पण ते कधीही बधले नाहीत. ‘मी असेपर्यंत, तो बंगला विकणार नाही’, असं त्यांनी ठणकावून सगळ्यांना सांगितलं होतं. मागच्या वर्षी ते गेले तेव्हा त्यांनी तो बंगला माझ्या नावावर केला होता. हेसुद्धा मला स्वप्नात दिसलं होतं.
त्यामुळेच आता जे स्वप्न मला सतत पडतंय ते खरं होणार याची मला खात्री आहे. ते टाळता येणार नाही याची जाणीवही आहे. फक्त त्यामागचं कारण मला जाणून घ्यायचं आहे.
मला स्वप्नात दिसतं, आम्ही दोघं आमच्या लाडक्या सनसेट पॉईंटला, महाबळेश्वरला गेलो आहोत. सूर्यास्ताची वेळ आहे.
जाता-जाता तो दिनमणी नारिंगी रंगांच्या विविध छटांची मनमोहक उधळण करत दिमाखात जायला निघालाय. मदहोश करणारं वातावरण असलं तरी माझ्या मनात त्याचा मागमूसही नाही. एक अनाम भीती मनात दाटली आहे. आजूबाजूला चिटपाखरुही नाही. मी कड्याच्या टोकाशी उभी आहे. अचानक मला जोरदार धक्का बसून मी खाली कोस*ळते आहे. त्याक्षणी मला दिसतं, मला धक्का देणारी व्यक्ती हात पुढे करुन माझ्या दिशेने पळत पुढे येतीये. ती व्यक्ती म्हणजे…आकाश आहे.
माझं स्वतःचं म*रण मी इतके वेळा जगले आहे, की त्यातली तीव्रता आता संपून गेली आहे. एका त्रयस्थाच्या नजरेतून पाहिल्यासारखी ती घटना आता मला वाटते.
हां, गेल्या दोन वेळच्या स्वप्नांत अजून एक घटना मला यापुढे दिसली होती. स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या त्या प्रसन्न सकाळी, माझ्यासमोरच माझ्या आवडीच्या सूर्यफुलांनी डवरलेली बाग आहे. तिथे मी अगदी निवांत फेरफटका मारत आहे.
आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेल्या मनःशांतीची आणि समाधानाची अनुभूती मला येत आहे, कुठलीही खंत, रुखरुख मनात नाही.”
“खरंच त्रयस्थ होऊन सांगत आहेस. दुसऱ्या कोणाच्यातरी बाबतीतली चर्चा चालावी, अगदी तसंच. यावर एकच उपाय मला दिसतोय. तो म्हणजे, जेव्हा कधी आकाश तिकडे जायचा प्लॅन बनवेल तेव्हा त्याला सपशेल नकार द्यायचा.”
“नाही रेश्मा, मी जे सांगायचा प्रयत्न करते आहे ते तुला समजलेलंच नाही. मला मर*णाची अजिबात भीती वाटत नाहीये. किंबहुना ते टाळता येणार नाही याची मला खात्री आहे. जे अटळ आहे, ते पुढे ढकलायचा निष्फळ प्रयत्न तरी कशाला करायचा?
गेली तीन वर्षं आकाशच्या सहवासात मी अगदी भरभरुन जगले आहे, अगदी संपूर्ण आयुष्यच जगले असं म्हण ना. मला फक्त आकाश असं का वागला ते कारण जाणून घेण्याची इच्छा आहे. माझ्या मर*णाने त्याला आर्थिक लाभ म्हणावा तर फक्त काकांचा बंगला मिळेल.
त्यासाठी या थराला तो जाईल? मी त्याच्या ऑफिसमध्ये, आडून-आडून त्याचं कोणाशी अफेअर चालू आहे का ती चौकशी केली; पण तसंही अजिबात काही नाही. त्याच्या वर्तनात कोणतीही खोट नाही. उलट सगळे त्याच्या स्वभावावर खूप खूश आहेत. मग असं का? हा विचार मला प्रचंड त्रासदायक ठरतोय. याचं उत्तरच सापडत नाही. ते तुला शोधता आलं तर बघ, ही रिक्वेस्ट तुला करायला आले आहे. कामाच्या निमित्ताने तुमच्या गाठीभेटी होत असतात. त्यावेळेस तुला, या संदर्भात काही जाणवतंय का याकडे प्लीज लक्ष ठेव.”
रेश्मा यावर काही बोलणार एवढ्यात डोअरबेल वाजली. तिने दार उघडल्यावर आकाश झंझावातासारखा आज घुसला. समोर सोनियाला बघून आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “अरे, तू इथे कधी आलीस? तुझा फोन मी ट्राय करत होतो. बंद आहे का? मला बोलली असतीस तर आपण दोघं बरोबरच आलो असतो ना. तुम्ही दोघी एवढया गंभीर का दिसताय? सोनिया, काही प्रॉब्लेम आहे? ऑफिसमध्ये काही झालंय का? कसलं टेन्शन आलंय का? बोल ना काहीतरी.”
आकाश असाच होता. उत्साहाचा धबधबा नुसता. मुक्या माणसालाही बोलायला लावेल असा.
सोनिया त्याला म्हणाली, “तू बोलायची संधी कुठे देतो आहेस. माझं इथे यायचं अचानक ठरलं. खूप दिवसांत निवांत भेट झाली नव्हती आणि ऑफीसच्या कामाचं लोड आज कमी होतं; म्हणून इकडे आले.
तू इथे येणार आहेस असं कुठे बोलला होतास मला?”
“अगं, कामाच्या संदर्भात काही चर्चा करायची असेल तर मी रेश्मालासुद्धा कळवत नाही, डायरेक्ट येतो इथे. आमची काही जॉईंट प्रोजेक्ट्स आहेत, त्याबद्दल तुला माहिती आहेच. त्यासंदर्भात काही अर्जंट काम असेल तेव्हा येतो इथे.
बरं, एक गुड न्यूज द्यायची आहे मला. महाबळेश्वरच्या एका मोठ्या रिसॉर्टचं इंटिरिअरचं संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं आहे. काम सुरु करण्यापूर्वी ती जागा डोळ्यांखालून घालण्यासाठी मला तिथे जावं लागणार आहे. सोनिया, आपण या शनिवारी तिथे जाऊया. आपल्या आवडत्या सनसेट पॉईंटलाही खूप दिवसांत गेलो नाही.
अर्थात आता वरचेवर जावं लागणार तिथे; पण सनसेट पॉईंट रिसॉर्टपासून जरा लांब आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी आपण दोघं नाही जाऊ शकणार. रेश्मा, आत्ता ही न्यूज सांगायचं कारण म्हणजे मी तुला माझी पार्टनर म्हणून या प्रोजेक्टसाठी घेणार आहे. शनिवारी मात्र आम्ही दोघंच जाणार आहोत.”
असं म्हणून सोनियाला हलकेच जवळ घेत आकाशने विचारलं, “आता तरी मूड ठीक झाला का नाही? इतकी छान बातमी सांगितली मी.”
वरकरणी हसून सोनियाने त्याचं अभिनंदन केलं. रेश्मा मात्र हरवलेली वाटत होती. इतकं लगेच सोनियाच्या स्वप्नाचं प्रत्यंतर येईल असं तिला वाटलं नव्हतं. मग जरा निर्धारपूर्वक स्वरात ती आकाशला म्हणाली, “आकाश, तू या प्रोजेक्टसाठी मला अपॉईंट केलं म्हणतो आहेस तर आत्ताच मी पण येते तुमच्याबरोबर. माझीही क्लायंटबरोबर ओळख होईल. मी येते खरंच तुमच्याबरोबर.”
तेवढा मोकळेपणा त्यांच्या मैत्रीमध्ये असल्यामुळेच रेश्मा असं बोलू शकली होती. तिचा हेतू लगेचच सोनियाच्या लक्षात आला आणि तिच्या मनात विचार आला,
‘खरंच वेडी आहे. तिच्या येण्यामुळे, जे घडणार आहे ते बदलणार नाही हे कळत कसं नाहीये तिला?’
आकाश काही बोलायच्या आत ती रेश्माला म्हणाली, “नाही, या वेळेस आम्ही दोघंच जाऊ. नंतर कामासाठी तुझ्या फेऱ्या होणारच आहेत. आत्ता तू येऊन काहीही उपयोग होणार नाही.”
आकाश म्हणाला, “चला, तुझ्या मैत्रिणीनेच सांगितलं ते बरं झालं, नाहीतर उगाच मला वाईटपणा घ्यावा लागला असता. बरं,
आता जरा गंभीरपणे विचारतोय, सोनिया, मी आल्यापासून पहातोय, तुम्ही दोघी काहीतरी लपवताय असा फील येतोय मला. कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याच्या आनंदात मी जरा दुर्लक्ष केलं याचा अर्थ माझ्या ते ध्यानी आलं नाही, असा नाही. काय झालंय? मला सांगणार नाहीस का? तुझ्यापुढे मला कुठल्याही कॉन्ट्रॅक्टची फिकीर नाही. तुझी मनःस्थिती ठीक नसेल तर तुला चेंज म्हणून कुठे ट्रीपला वगैरे जाऊया का? तू म्हणशील तिथे जाऊ. मला फक्त, तू आनंदात रहावीस एवढीच अपेक्षा आहे.”
आकाशच्या शब्दांतून, नजरेतून, स्पर्शातून पदोपदी जाणवणारं तिच्याविषयीचं प्रेम, आत्ताही तिला जाणवलं. त्यामुळेच तर ती संभ्रमात पडली होती. असं स्वप्न का पडावं त्याच्या बाबतीत? विचार करुन तिचं डोकं ठणकायला लागलं होतं. ती दोघंही मग घरी जायला निघाली.
गाडीत बसल्यावरही सोनियाचं विचारचक्र चालू होतं.
अचानक…एक शक्यता तिच्या मनात आली आणि ती मुळापासून हादरली. क्षणभर तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आली.
रेश्मा आणि आकाश..
त्यांचं एकमेकांवर प्रेम तर नसेल? ते दोघं एकाच वर्गात होते, कामाच्या निमित्ताने सतत भेटतात. आजही आकाश आपल्याला न सांगता तिच्या घरी आला होता, बरेचदा येतो हे त्यानेच सांगितलं. रेश्मा अजून अविवाहित आहे. त्यामुळे घरी ही दोघंच. पाऊल घसरायला कितीसा वेळ लागतोय? शिवाय राजरोस भेटत असल्यामुळे संशयाला जागाच नाही. रेश्मा आणि काकांचा बंगला, या दोन गोष्टी एकत्र मिळवण्यासाठी तर आपल्याशी लग्न केलं नसेल त्याने? हाच तर प्लॅन नसेल ना दोघांचा? काका जायची वाट बघत तर थांबले नसतील दोघं?
विचार..विचार.. फक्त विचार. कुठल्याही दिशेने धावणारे, मनाला, बुद्धीला न पटणारे, अतर्क्य विचार.
याच विचारांच्या आवर्तनात सोनिया अडकली असताना शनिवार कधी येऊन ठेपला, तिला कळलंच नाही.
दोघंही सकाळी अकराच्या सुमारास तिथे पोहोचले. डिसेंबरची गुलाबी थंडी, महाबळेश्वरचं अगदी मदहोश करणारं वातावरण, हवाहवासा एकांत..
आकाशला तर जणू स्वर्ग दोन बोटं उरला होता. सोनिया मात्र बधीर अवस्थेत होती. समोरच्या कुठल्याच घटनेचा अर्थ तिच्या मनापर्यंत पोचत नव्हता, शिवाय हे आकाशला समजू न देण्याची धडपडही करावी लागत होती.
संध्याकाळी आकाश नाईलाज म्हणून त्या क्लायंटला भेटायला गेला. जाताना तिला दहावेळा बजावून गेला, ‘तासाभरात परत येतो.’ सोनियाला मात्र आता रुमवर बसवेना. तिला प्रचंड अस्वस्थ वाटायला लागलं होतं. तिने आकाशला ‘ सनसेट पॉइंटवर जाते’ असा मेसेज केला. आज तिथे अगदी तुरळक गर्दी होती. त्यांच्या नेहमीच्या जागी ती पोचली तेव्हा तिथे फक्त दूर अंतरावर एक जोडपं तिला दिसलं, स्वतःच्याच दुनियेत मश्गुल झालेलं. ते बघून ती हसली. स्वतः ती दोघं अशीच तर होती, अगदी एकरुप झालेली,
आत्ता-आत्तापर्यंत.
एक सुस्कारा टाकून ती कड्यावरुन खाली दिसणाऱ्या खोल दरीकडे पहात उभी होती. मधूनच तिची नजर नकळत त्या जोडप्यावर स्थिरावत होती, आणि अचानक, त्या जोडप्यातील माणसाने आपल्याबरोबर असलेल्या स्त्रीला जोरदार धक्का दिला. ती बेसावध असल्यामुळे एक जोरदार किंकाळी मारुन त्या समोरच्या खोल दरीत भिरकावली गेली. क्षणभर सोनियाला काही समजेनाच. मग भानावर आली तेव्हा तिच्याही नकळत तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. त्यामुळे त्या माणसाचं आता सोनियाकडे लक्ष गेलं. ही आपल्या कृष्णकृत्याची साक्षीदार आहे हे त्याच्या ध्यानात आल्यावर तो तिच्या दिशेने धावला. एका झेपेतच तिला त्याने पकडलं आणि तिला धक्का मारुन कड्यावरुन ढकललं, खाली
पडता-पडता, तिच्या दिशेने हात पुढे करुन धावत तिला वाचवायला येणारा आकाश तिला दिसला आणि त्याक्षणी तिच्या स्वप्नाचा खरा अर्थ तिच्या ध्यानी आला. बास! हीच तिची शेवटची जाणीव.
आज सोनियाला जाऊन एक आठवडा झाला होता. बेडरुममध्ये भिंतीवर लावलेल्या तिच्या मोठया फोटोसमोर आकाश खिन्नपणे उभा होता. सोनियाच्या आवडीच्या सूर्यफुलांचा वॉलपेपर त्याने फोटोमागच्या भिंतीवर लावला होता. त्या फुलांइतकीच,
फोटोतली सोनिया प्रसन्न, टवटवीत दिसत होती. अतीव समाधानाने तिचा चेहरा झळाळून निघाला होता.
-समाप्त
-सौ. राधिका जोशी, पुणे
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप सुंदर आभास.. खूप गूढ आभास
अप्रतिम….
जबरदस्त खिळवून ठेवणारी अफलातून लिहिली आहे कथा, मस्तच.
खूप विविध विषयांवर तुमचे लिखाण व प्रत्येक खेपेला एक जबरदस्त विषय… खूप सुरेख