शास्त्रज्ञ विद्यासागर
विद्यासागर कधीपासून पळत होता. त्या बर्फाच्या अवाढव्य पर्वत रांगांमधून पळताना त्याची पुरती दमछाक झाली होती कारण एक भले मोठ्ठे महाकाय अस्वल त्याचा पाठलाग करत होते. त्याच्या पासून लपत छपत विद्यासागर एका पर्वतावर पोहोचला आणि मागे वळून पाहताच त्याची भितीने गाळण उडाली.अस्वल अगदी त्याच्या जवळ येऊन पोहोचले होते. विद्यासागरचे डोळे भितीने पांढरे पडायची वेळ आली होती.
अस्वल हळूहळू विद्यासागर कडे सरकू लागले. विद्यासागर एक एक पाऊल पाठीमागे सरकत होता. भितीने गाळण उडालेला विद्यासागर अस्वलाकडे पाहता पाहता अचानक पाठीमागच्या खोल दरीत कोसळला आणि एक आर्त किंकाळी वातावरणात घुमली.
विद्यासागर एक विख्यात शास्त्रज्ञ होता. अतिशय बुद्धिमान असलेल्या विद्यासागरला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेल्या विद्यासागरला लहानपणापासूनच विज्ञानाची गोडी लागली होती आणि म्हणूनच नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करणे हा त्याचा आवडता छंद होता.
असाच एक वैज्ञानिक प्रयोग करत असताना त्या निर्मनुष्य बर्फाळ प्रदेशात विद्यासागर अडकला होता. विद्यासागर जाताना सोबत एक कुशल टीम घेऊन गेला होता पण ; मधेच आलेल्या भयानक बर्फवृष्टी मुळे विद्यासागर त्याच्या टीम पासून वेगळा झाला होता.
विद्यासागर खोल दरीत बर्फात बेशुद्ध पडला होता. माहीत नाही गेले कित्येक तास तो या अवस्थेत होता. त्याला हळूहळू जाग येऊ लागली. उंचावरून पडल्या मुळे शरीरात वेदना जाणवत होती. डोळे किलकिले करत त्याने इकडे तिकडे पाहीले. दूरदूर पर्यंत ते अस्वल कुठेच दिसत नव्हते. बारीक बर्फवृष्टी सुरू होती. विद्यासागरने हाताचे मनगट पाहीले आणि त्याही परिस्थितीत तो सुखावला कारण त्याच्या मनगटावर बांधलले घड्याळ अजूनही सुरक्षित होते.
विद्यासागरने घड्याळामार्फत टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. बऱ्याच प्रयत्नाअंती तो हताश झाला कारण टीमशी संपर्क होत नव्हता. त्याने एक सुस्कारा सोडला आणि आजूबाजूला पाहीले. त्याला कळून चुकले आपण एका निर्मनुष्य ठिकाणी अडकलो आहे आणि इथून सुटण्यासाठी त्याला एकट्यानेच प्रयत्न करावे लागणार होते.
विद्यासागरची तिथून सुटण्यासाठी धडपड सुरू झाली. त्याने सर्व प्रथम स्वतःभोवतीचे जॅकेट घट्ट रोवून घेतले. कानटोपीने कान अजूनच बांधून घेतले. आता विद्यासागर वाट दिसेल त्या बाजूने चालू लागला. त्याला चालताना प्रचंड त्रास होत होता पण ; जिवंत रहायचे असेल तर प्रयत्न करावेच लागणार हे त्याला माहिती होते. सावकाश आणि सावधानता बाळगत विद्यासागर पुढे सरकत होता. आजूबाजूला भलेमोठे , उंच वृक्ष पाहून विद्यासागरला धडकी भरत होती.
विद्यासागर किती तरी वेळ वाट शोधत होता पण ; अजूनही त्याला टीमचा किंवा योग्य मार्गाचा कोणताही मागमूस लागत नव्हता. अचानक त्याला पाठीमागे कशाची तरी चाहूल लागली तसा तो जागीच खिळला . परत मनात भिती दाटून आली. पाठीमागे न पाहताच तो सरळ धावत सुटला. बरेच अंतर कापल्यानंतर त्याने थांबून पाठीमागे वळून पाहीले. पळल्यामुळे त्याला दम भरला होता. मोठमोठे श्वास घेत तो कानोसा घेऊ लागला पण ; काहीच नव्हते. बहुतेक भितीने आपल्याला भास झाला असे समजून त्याने उसासा टाकला.
विद्यासागर आता चालून चालून थकला होता. भूकही लागली होती आणि इथून बाहेर पडण्याची धडपड काहीही सुचू देत नव्हती. विद्यासागरने परत एकदा घड्याळ पाहीले पण ; अजूनही संपर्क होत नव्हता. इकडे त्याची टीमही त्याला शोधून बेजार झाली होती. आतापर्यंत प्रसिद्ध शास्त्रज्ञ बर्फाळ प्रदेशात हरवल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती . मुख्य टीमच्या मदतीसाठी अजून दोन निष्णात टीम दाखल झाल्या होत्या. विद्यासागरचा मात्र काहीच मागमूस मिळत नव्हता.
दोन दिवस उलटून गेले होते. विद्यासागरची आशा आता मावळू लागली. विद्यासागर एक निष्णात शास्त्रज्ञ होता. गेले दोन दिवस त्याने त्या बर्फाळ वृक्षांचा अभ्यास केला होता. प्रतिकूल परिस्थितीतही तो आपल्या कामाशी एकनिष्ठ होता. वृक्षांच्या अभ्यासामुळे त्याला काही खाण्यायोग्य वस्तू मिळाल्या होत्या आणि त्यामुळेच दोन दिवस त्याने कसेबसे ढकलले होते. आता मात्र त्याचा धीर सुटत चालला होता. त्याने मनगटावरील घड्याळात दोन दिवस घडलेला सगळा घटनाक्रम रेकाॅर्ड करून ठेवला आणि खिन्न मनाने पुढे वाटचाल करु लागला. पायाला झालेली जखम त्याने झाडपाल्याने बांधली होती पण ; दोन दिवस त्याला योग्य उपचार न मिळाल्याने जखम आता ठसठसत होती.
विद्यासागर त्राण हरवून चालला होता इतक्यात त्याला त्याच्या पासून काही अंतरावर परत एक अस्वल दबा धरून बसलेले दिसले आणि त्याच्या तोंडचे पाणी पळाले. शरीरातील सगळे बळ एकवटून जिवाच्या आकांताने विद्यासागर परत एकदा धावत सुटला. मागे वळून पाहताना तो पुढे पळत होता आणि अचानक तो धडकला. धाडकन जमिनीवर कोसळला.
विद्यासागरच्या टीमचा सदस्य नवलला तो धडकला होता. शरीरात त्राण नव्हता आणि जोरात नवलला धडकल्या मुळे जमिनीवर आपटला होता. नवल लगबगीने पुढे आला. विद्यासागरला आधार देत उठवले. विद्यासागरने समोर पाहीले तर त्याच्या टीम मधील नवल आणि तेजस उभे होते. त्यांना पाहून विद्यासागर समाधानाने हसला आणि पुन्हा बेशुद्ध झाला.
आज दोन दिवसांनंतर विद्यासागर शुद्धीवर आला होता. हाॅस्पिटलच्या त्या रुममध्ये छताकडे टक लावून आपल्या सोबत घडलेल्या प्रसंगाचा लेखाजोखा मांडत होता. या दोन दिवसांच्या भयानक प्रसंगातही त्याच्या मधला शास्त्रज्ञ जागा होता. या दोन दिवसांत त्याने तिथल्या वृक्षांची माहिती तर मिळवली होती पण ; आता त्याचे लक्ष्य होते ते बर्फाळी अस्वल ! विद्यासागर आता पुढील वैज्ञानिक प्रयोगासाठी तयार होता.
समाप्त :
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप छान कथा, अजून पुढे वाचायला आवडेल.
धन्यवाद