चहा आणि खारी
-एका आठवणीची गोष्ट
संध्याकाळची वेळ बाहेर मस्त पाऊस पडून गेलेला. वातावरणात थोडासा गारवा. ती गॅलरीत बसली होती. समोर वाफाळता चहाचा कप आणि खारी. डॉक्टर सिया ओपीडी बंद करून घरी आली आणि तिचा आवडीचा संध्याकाळचा रिफ्रेशमेंटचा कार्यक्रम सुरू झाला.
मुलं अजून शाळेतून यायची आहेत आणि पतीदेव कामावरून हजर व्हायचे आहेत तोपर्यंत स्वतःसाठीचा तिचा जपून ठेवलेला हा तिचा रोजचा वेळ. रिफ्रेश होऊन परत संध्याकाळच्या कामांना लागण्यासाठीची एनर्जी तिला याच कार्यक्रमातून मिळत होती. लहानपणी आईच्या हाताने खाल्लेली चहा खारी. कॉलेजला असताना सकाळी घाई गडबडीत दुसरं काही खायला वेळ नाही म्हणून खाल्लेली चहा खारी आणि आता स्वतःला वेळ द्यायला खाल्लेली चहा खारी. तिचा एक ऋणानुबंध होता चहा आणि खारीशी.
ती लहान असताना घराशेजारीच एक छोटीशी बेकरी होती तिथून रोज संध्याकाळी खारी आणि पावचा खमंग सुवास येत असे. त्या खमंग सुवासाने तिला भूक लागायची पण त्यावेळी म्हणावे असे पैसे नसायचे. कधीतरी आई एक रुपया खाऊसाठी द्यायची त्याच्यातून ती खारी आणून खायची. त्या दिवशी ती प्रचंड खुश असायची. या आठवणी जाग्या झाल्या की उगाच तिच्या डोळ्यात नकळत पाणी येत असे. बाहेरच्या अंगणात पाण्याचे निथळणारे झाडांवरचे ओघळते थेंब बघत बघत तिने चहाचा घोट घेतला आणि खारी संपवली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. टिंगटिंग….
” आई आम्ही घरी आलोय. भूक लागलीय काहीतरी छान पैकी खायला दे.”
” गरम गरम चहा आणि खारी देऊ ?” सियाने मुलांना विचारलं. मुलं आनंदाने हो म्हणाली. तिला स्वतःच्या मुलांमध्ये कुठेतरी स्वतःच लहानपण दिसले आणि ती पटकन उठून घरात गेली. आता ती रिफ्रेश मोडमध्ये आली होती. आता तिची संध्याकाळ अगदी छान जाणार होती आणि याचं श्रेय जात होतं तिच्या आवडत्या चहा खारीला.
इतर वेळेस डॉक्टरांना एवढा वेळ असतो कुठे पण चहा खारीचे नाव काढलं की डॉक्टरीण बाई कुठून तरी कसातरी स्वतःसाठी वेळ काढतातच.
कधीतरी जुन्या आठवणींमध्ये रममाण होण्यात सुद्धा एक प्रकारचा वेगळाच आनंद असतो.
तिला तिची सुरुवातीचे इंटर्नशिप चे दिवस आठवले जेव्हा ती रामला पहिल्यांदा भेटली होती.
ती शहरातील नामवंत डॉक्टर कारखानीस यांच्या हाताखाली सायकॉलॉजिकल ट्रीटमेंटसाठी इंटर्नशिप करत होती. वेगवेगळे पेशंट्स हाताळण्याची सवय व्हावी आणि त्यातून शिकायला मिळावं म्हणून ती मनापासून प्रयत्न करत होती.
एके दिवशी एक मुलगा ओपीडी मध्ये बसला होता. डॉक्टर अजून पोहोचले नव्हते. तो अजिबात एका जागी स्थिर नव्हता. शेजारी कोणीच नसताना कोणीतरी बसले आहे असं समजून तो त्याच्याशी बोलत होता. हाता पायांची त्याची सतत हालचाल चालू होती. त्याला बघून रिसेप्शनिस्ट घाबरली. सिया सुद्धा आधी घाबरलीच पण नंतर थोडं स्वतःला सावरून ती त्या मुलाशी बोलायला गेली तुझं नाव काय कुठून आलाय तुला काही त्रास होतोय का असं तिने त्याच्याशी थोडसं बोलण्याचा प्रयत्न केला.
त्याने असंबद्ध उत्तर दिले. त्यावरून सियाला हा पेशंट स्किझोफ्रेनिया किंवा डबल पर्सनॅलिटी डिसोर्डरचा वाटला.
नंतर थोड्या वेळात डॉक्टर आले आणि त्याने डॉक्टर काही चर्चा केली आणि तो निघून गेला.
सियाला काळजी वाटत होती की हा एकटा घरी कसा जाणार. तिने त्याला तसे विचारले. तेव्हा मात्र तो एकदम ओके वाटला आणि म्हणाला की,” मला काय प्रॉब्लेम नाहीये मी नेहमीच एकटा फिरत असतो.” असे खूप कॉन्फिडंटली तर बोलला आणि निघून सुद्धा गेला. तिला काही कळलं नाही थोड्या वेळापूर्वी अगदी स्थिर नसलेला मुलगा डॉक्टरांशी बोलून आल्यावर एकदम नॉर्मल कसं काय वागू लागला मग त्या पेशंटबद्दल चर्चा करण्यासाठी ती कारखानीस सरांच्या केबिनमध्ये गेली.
सरांना तिने विचारले की हा जो मुलगा आता गेला तो मला त्याची लक्षणे थोडी स्किझोफ्रेनिया आणि थोडी ड्युअल पर्सनॅलिटी डिसऑर्डर सारखी वाटत आहेत. पण थोडे मिक्स सिमटम्समुळे मला कळले नाही. मला असे पेशंट हँडल करून थोडे शिकायला मिळेल म्हणून मी तुमच्याशी चर्चा करायला आले आहे.
डॉक्टर फक्त हसले आणि तिला म्हणाले,” तुझा रिसर्च चालू ठेव. अजून थोडे रीडिंग कर. त्यातून काही वेगळी लक्षण दिसतात का त्याला ऑब्झर्व्ह कर. तो पुन्हा ट्रीटमेंटसाठी आला की त्याच्याशी बोल आणि मला सांग.”
ती ठीक आहे म्हणाली आणि तिच्या डोक्यातून मात्र हा विषय गेला नव्हता. तिने घरी जाऊन या विषयावर आधारित मेडिकलच्या पुस्तकांचा अभ्यास सुरू केला त्यातून ते खूप शिकली पण या पेशंटबद्दल तिला थोडे वेगळे अनुभव येत होते. ती सरांशी डिस्कस करत होती तसेच तिचे वाचनही चालू होते.
दोन एक महिन्यांनी तिच्या कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होतं तेव्हा प्रमुख अतिथी म्हणून एक नवोदित कलाकार आमंत्रित केला होता. सिया कल्चरल सेक्रेटरी असल्यामुळे त्यांच्या आदरसत्काराची जबाबदारी तिच्यावर होती. जेव्हा तिने प्रमुख पाहुण्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती आश्चर्याने बघतच राहिली. राम तिथे एक नवोदित कलाकार म्हणून आलेला होता. त्याला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेलं होतं तर तिला काही सुचेनाच की हा आता काय बोलणार स्टेजवर ? हा घाबरला तर याचे हातपाय लटपटायला लागले तर ? पण असं काही झालं नाही. त्याने त्याच्या भाषणाने कॉलेज स्टूडेंटसची मने जिंकून घेतली आणि इनडायरेक्टली सियाचंही.
त्याने त्याच्या भाषणात मी कसा तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे आणि कसं असामान्य होण्यासाठी स्वतःला झोकून देऊन प्रयत्न करावे लागतात हे सांगितले. ते सुद्धा अगदी खुमासदार शैलीत. टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली त्याला.
त्याने आज तर सियाला अवाक् व्हायला भाग पाडले होते.
जवळजवळ सहा महिने ट्रीटमेंट झाल्यानंतर हा मुलगा अगदी छान नॉर्मल माणसासारखं वागू लागला होता. एके दिवशी सिया प्रॅक्टिसला यायच्या आधीच हा तिथे हजर झाला आणि सरांच्या केबिनमध्ये जाऊन बसला. जोरात एकमेकांना टाळ्या वगैरे देऊन सर आणि तो बोलत होते. सर इतर वेळेस एवढे फ्रँकली कधी कोणाशी बोलताना सियाने बघितलं नव्हतं.
ती त्या दोघांकडे बघतच राहिली. तिने सरांना विचारलं की,” काय झालं आहे ? तुम्ही दोघे इतके का हसत आहात ?” तेव्हा एक मोठं सत्य तिच्या समोर आलं आणि आता तिला हसावं का रडावं हेच कळत नव्हते. हा जो मुलगा आहे हा कोणी पेशंट नव्हता तर एक कलाकार होता आणि त्याला स्वतःच्या एका रोलसाठी अशा पेशंटची भुमिका करायची होती. त्याच्यामुळे तो मेहनत घेऊन पेशंटची एक्टिंग करून ती खरी वठते आहे का नाही ते चेक करायला त्याने सियाचा वापर करून घेतला होता. सियाला रागही येत होता. परंतु या निमित्ताने तिचं नॉलेज वाढलं आणि तिला वेगवेगळे अनुभव पण मिळाले म्हणून चांगलं पण वाटत होतं; पण अशा पद्धतीने मला फसवलं हे काही तिच्या डोक्यातून जायला तयार नव्हते. ती रागाने तिथून निघून गेली.
राम सुद्धा धावत तिच्या मागे गेला. त्याने तिला नीट समजावून सांगितले की कसं हे सगळं तिला माहीत नसणं फायद्याचे होते. तिने डॉक्टर म्हणून असे अनुभव घेणं आणि त्यातून शिकणं तिच्या सरांना अपेक्षित होते.
हळूहळू तिचा राग गेला. दोघेही महाविद्यालया जवळ चहा खारी च्या निमित्ताने भेटत असत.स्पष्ट कोणी काही बोललं नाही तरीही ते एकमेकांचे मन ओळखायला लागले होते. आपआपल्या कार्यक्षेत्रात सेट झाल्यावर दोघांनी लग्न केलं आणि सुखात नांदू लागले.
हा सगळा तिचा प्रवास जणू काही क्षणात ती पुन्हा एकदा जगली आणि भानावर आली तेव्हा रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती.
सिया लगबगीने आत निघून गेली. तिच्या गोड आठवणी अजूनही मनात रुंजी घालत होत्या.
लेखिका – माधुरी शेलार
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)