कथा-झाले मोकळे आकाश

WhatsApp Group Join Now

संथ पाण्यात कोणीतरी जोरात दगड भिरकावावा व त्यामुळे पाण्यातून बुडबुडे यावेत व तरंग उठून शांत पाणी अगदी तळापासून ढवळून निघावे तसेच काहीतरी सुनिधीच्या आयुष्यात घडले.

कोण होती ती? का आली ती? आणि परत तीच जखम… खपली भरतच नाहीये आतून. जखम ओलीच आहे अजून… सुनिधी स्वतःच्याच मनात विचार करत होती.

गेली दहा वर्ष ते दुःख उराशी बाळगत ती व तिचा नवरा ‘रोहीत’ जगत होते. अर्थात हे दुःख त्या दोघांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तसेच राहणार होते. आज सुनिधीला ‘दहा वर्ष’ हा काळ खूप मोठा आहे असे जाणवले, कारण ही तसेच घडले होते ना? एरवी तिला ही घटना कालच घडली असे वाटायचे, पण आज अचानक तिच्या मनाने हिशोब केला व तब्बल दहा वर्षाचा काळ लोटला हे तिच्या ध्यानी आले.

आज कधी नव्हे ते सुनिधी ने स्वतःला आरशात निरखून पाहिले. ते चंदेरी केस, डोळ्याखालची काळी काळी वर्तुळे, चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्यांचे जाळे ….बापरे! कोण तू? तिने घाबरून स्वतःच्या प्रतिबिंबाला प्रश्न विचारला…

बऱ्याच वेळा लोकांच्या तोंडी तिने शब्द ऐकले होते “दिवस किती भराभरा गेले काही समजलेच नाही?”

आज खरंच दिवस खूपच भराभरा गेले होते याची तिला इतके वर्षांनी प्रथमच जाणीव झाली होती.

घरी पेपर येत होता.. तो ती वाचत होती.. त्यावर असलेली तारीख ती बघतही होती ..पण हे सर्व यंत्रवत पद्धतीने सुरू होते. दिवस, तारखा,वर्ष संपत होती पण या सर्वाच्या जाणीवा म्हणाव्यात तश्या तिला होत नव्हत्या. 

पण आज मात्र अचानक तिने अगदी लक्ष देऊन कॅलेंडर उघडून तारीख पाहिली आणि अचानक तिच्या छातीत धडधडू लागले.

तेवढ्यात बेल वाजली व दार उघडून पाहिले तर तिच्या सासूबाई दारात उभ्या होत्या.

सुनिधीला थोडे हायसे झाले, तिने लगबगीने त्यांच्या हातातली पिशवी घेतली त्यांना थंड पाण्याचा ग्लास पुढे केला व ती त्यांच्यासमोर बसली. दाराकडे बघत तिने विचारले, बाबा.. बाबा नाही आले का? येत आहेत ते, खाली बिल्डिंगमध्ये त्यांचे मित्र त्यांना भेटले त्यांच्याशी बोलून ते वर येतील.

गेली दहा वर्षे या दिवशी संध्याकाळी सुनिधीचे सासू-सासरे तिच्याकडे राहायला येत असत.

दुसरा अख्खा दिवस राहून रात्री ते परत त्यांच्या घरी जात. जणू हा वार्षिक नियमच होता त्यांच्या घराचा.

सुनिधी सासूबाईंना म्हणाली, आई आज ‘नक्षत्रा’ कशी दिसली असती? सुनिधीच्या सासुबाई एकदम गोंधळून  सुनिधी कडे बघू लागल्या. काय बोलावे तेच त्यांना समजेना. पाण्याचा घोट घशात अडकला व जोरात ठसका येऊ लागला. सुनिधी एकदम घाबरून व गोंधळूनच धावत धावत  सासऱ्यांना बोलवायला खाली गेली. 

सुनिधीच्या सासुबाई थोड्या सावरल्या व त्यांनी लगोलग शैलजा ला फोन केला.

शैलजा ने फोन उचलून आश्चर्याने विचारले सगळे ठीक आहे ना? सुनिधी च्या सासूबाईंनी  सुनिधीने नक्षत्राचा काढलेला विषय सांगताच शैलजा म्हणाली , काकू बोलू दे तिला, गेली दहा वर्ष आपण याच क्षणाची वाट पाहत होतो ना? आज तिला फक्त दोन कान हवेत ऐकायला, तुम्ही काही बोलू नका, मोकळं होऊ दे तिला आज.. अगदीच काही वाटलं तर फोन करा रात्री मी येऊन जाईन.

सुनिधी व तिचे सासरे धापा टाकत घराच शिरले. सुनिधीच्या सासूबाई तिला म्हणाल्या अग बस.. आता काहीतरी बोलत होतीस ना नक्षत्रा विषयी?एवढी का घाबरलीस बाळा! मी ठीक आहे ठसका लागला फक्त तेवढा मला.

सुनिधीचे सासरे बायकोच्या अंगावर खेकसत म्हणाले ,पाणी सुद्धा नीट पिता येत नाही का तुला? केवढी घाबरून पोर खाली आली मला बोलवायला. आता मात्र सुनिधीला खूपच अपराधी वाटू लागले. आपल्यामुळे सासू-सासर्‍यांमध्ये भांडण सुरू झाले. विषय बदलण्यासाठी तिने सासऱ्यांना सरबत आणू का म्हणून विचारले व उत्तराची वाट न बघताच ती चटकन आत निघून गेली.

सुनिधीच्या सासूबाईंना थोडे अपराधी वाटू लागले. सुनिधीने आपणहून इतके वर्षात प्रथमच काढलेला नक्षत्राचा विषय आपल्या गोंधळामुळे, ही संधी आपण गमावली.

तेवढ्यात सुनिधी सरबताचे ग्लास घेऊन बाहेर आली. सासूबाईंनी परत एकदा रेटून नक्षत्राचा विषय सुनिधी कडे काढला. आता मात्र सुनिधीच्या सासर्‍यांचा पारा खूपच चढला ते बायकोवर जोरात ओरडले.

खुणेने त्यांना गप्प करत सुनिधीच्या सासूबाई परत तिच्याशी बोलू लागल्या. आता मात्र सुनिधीला राहवले नाही. तिने आज सकाळी घडलेला प्रकार सासू-सासर्‍यांना सांगून टाकला.

साधारण सकाळी दहाच्या सुमारास बेल वाजली व एक पंधरा सोळा वर्षाची गोड मुलगी दारात येऊन थांबली. ‘रिद्धीमा’तिचे नाव.आत येऊ का मावशी म्हणत तिने बिनधास्तपणे घरात प्रवेश केला. अगदी ओळखीच्या नजरेने ती पूर्ण घर निहाळत होती. सुनिधी एकदम गडबडूनच गेली. कोण आहेस तु? कोणाकडे आली आहेस बाळा? तर ती चक्क म्हणाली, मावशी हे नक्षत्राचे घर ना? सुनिधी सासूबाईंच्या मांडीवर डोके ठेवून सकाळी घडलेला प्रकार सांगत होती.

 तिचे सासू-सासरे सुन्न होऊन ऐकत होते.  आज रिद्धीमाचा म्हणजे आपल्या नक्षत्राच्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो आणि उद्या आपल्या नक्षत्राचा…. त्या दोघेही एकाच शाळेत एकाच बाकावर बसायच्या.. अगदी त्यांची मिनी केजी पासून छान गट्टी होती. रिद्धीमा आपल्या पलीकडच्या चार पाच बिल्डिंग सोडून राहते.

उद्या ती सकाळी येणार आहे भेटायला.सुनिधी मधे  काहीतरी बोलत होती , पण आज शब्दांच्या पलीकडे जाऊन अंतर्मनातला ज्वालामुखीचा उद्रेक डोळ्यावाटे वाहत होता.

सुनिधीच्या सासूबाईंची मांडी उष्ण ओलसर झाली होती….

दुसऱ्या दिवशी सकाळी सुनिधी, रोहित व सुनिधीचे सासू-सासरे रिद्धीमाची चातकासारखी वाट पाहत होते. आज का कोण जाणे घड्याळाचे काटे पुढे सरकत नव्हते.

 तेवढ्यात बेल वाजली व सुनिधी जवळजवळ पळतच दार उघडायला गेली. रिद्धीमाला आलेले पाहून तिला हायसे झाले. रिद्धीमा पण खुशीत आत आली. अनेक वर्षांनी तिने नक्षत्राच्या आजी, आजोबा व बाबांना पाहिले. काही क्षणासाठी पूर्ण घर शांत होते. मग सुनिधीनेच विषयाला हात घातला. 

कशी आहेस रिद्धीमा? काल तू अचानक आलीस मला काहीच सुचले नाही. केतकी तुझी आई कशी आहे? मला तर आता ती आठवत पण नाही . तिला का नाही घेऊन आलीस? सुनिधीने अक्षरशः प्रश्नांची सरबत्तीच केली. रोहित ने सुनिधीला थांबवत रिद्धीमा साठी आणलेला खाऊ दिला.

परत काही क्षणांसाठी भयाण शांतता झाली.

आता रिद्धीमा बोलू लागली,मावशी त्यादिवशी फक्त तुझी नक्षत्रा नाही तर माझी आई पण गेली. अर्थात मला हे काहीच आठवत नाही कारण माझे वय अवघे सहा वर्ष होते. त्यादिवशी तू मुलगी व मी आई गमावली.

रोहित एकदम मटकन खाली बसला.

सुनिधीला एकदम गुदमरल्यासारखे होऊन घाम फुटला. सुनिधीच्या सासूबाईंनी पटकन पाण्याचे ग्लास आणून सुनिधी व रोहित च्या हातात दिले. सुनिधीच्या सासर्‍यांनी रोहितला म्हणजे स्वतःच्या मुलाला सांभाळत खुर्चीवर बसवले. त्रयस्थाच्या भूमिकेतून रिद्धीमा प्रत्येकाच्या बारीक हालचाली टिपत होती.

मोठा उसासा टाकून रिद्धीमा परत बोलायला लागली. माझा व नक्षत्राचा वाढदिवस मागे पुढे असल्यामुळे तू व माझी आई वाढदिवसाचा मेन्यू , मित्र-मैत्रिणींना रिटर्न गिफ्ट काय द्यायचे या सगळ्या गोष्टी ठरवायच्या.

प्रत्येक वाढदिवसाचे, सहा वर्षाचे फोटो माझे व नक्षत्राचे आमच्याकडे आहेत. अनेक वेळा ते फोटो मी बघते.

मावशी आत्ता माझी दहावीची परीक्षा संपली आणि त्याबरोबर  शाळा पण संपली, आणि म्हणूनच काल शेवटचा पेपर झाल्यावर मी थोडं धाडस करून तुझ्या घरी आले.

गेली दहा वर्ष तू लपून तुझ्या स्वयंपाक घराच्या खिडकीतून शाळेची व्हॅन तुमच्या सोसायटीत येताना बघायची व मी तुमच्या घराकडे…अनेक वेळा आईच्या आठवणीने मला रडू यायचे, तेव्हा आजी समजावून सांगायची नक्षत्रा तर देवबाप्पाच्या घरी एकटीच गेली आहे. इथे तर तुझा बाबा, आजोबा, मी सगळे आहोत ना ? 

तू मोठी झाली की तुला आई भेटेल.  हळूहळू मला सत्य परिस्थिती समजू लागली. आईची आठवण येत होती पण आता कसे सावरायचे हेही समजत होते. मागच्या वर्षी आजी गेली आणि मग खूपच एकटं एकटं वाटू लागले.

सुनिधीला रोहितला एकदम अपराधी वाटू लागले , आपण आपल्या दुःखात एवढे गुरफटलो की त्यादिवशी केतकी गेली हे सुद्धा आपल्या ध्यानात आले नाही.

रिद्धीमा सांगत होती सुरुवातीला काही वर्षे तीला ,डॉक्टर शैलजा ट्रीटमेंट देत होत्या. त्या मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांच्यामुळे रिद्धीमाला  खूप बरे वाटले.

आई गेली म्हणजे नक्की काय झाले हे कळण्याचे वयच नव्हते गं माझे, शाळेमध्ये प्रत्येक मुलांना आई आहे, मग मला का नाही म्हणून मी अनेक वेळा आकांडतांडव करायचे, मग हळूहळू परिस्थिती स्वीकारू लागले. त्या दिवशी नक्की काय घडले याचा शोध घेता घेता मला तुझ्याविषयी समजले.

 तुझ्या आयुष्यात तू तुझ्या मनाची दारे पूर्णपणे घट्ट बंद करून  अंधारात एकटीच बसली आहेस. मावशी बाहेर पड माझ्यासारख्या असंख्य लोकांना तुझी खरच खूप गरज आहे गं!…रिद्धीमा एखाद्या मोठ्या माणसासारखे बोलत होती. सुनिधी, रोहित व सुनिधीचे सासू-सासरे त्या चिमुरडीकडे पहातच बसले. 

केवढी ही समज आणि या वयात .. १००% बरोबर तर बोलत होती ती. रिद्धीमा जशी आली तशी निघूनही गेली.

हे चौघे मात्र विचार करत सुन्न मनस्थितीत तसेच बसून होते. अनेक नवीन प्रश्न डोक्यात घोळत ..

आई बाबा आज जाऊ नका ना. आज आम्हाला तुमची गरज आहे, रोहित म्हणाला.

नक्षत्रा झाल्यापासून तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आजीआजोबा राहायला येत असत. दिवसभर नातीचे लाड करून संध्याकाळी तिच्या मित्र-मैत्रिणींची पार्टी झाली की ते जात  हा अनेक वर्षांचा नेम नक्षत्रा गेली तरी तसाच चालू होता…

रिद्धीमा घरी गेली पण प्रत्येकाची विचार चक्र सुरू झालं. सुनिधीच्या सासूबाईंनी शैलजा म्हणजेच रिद्धीमाच्या डॉक्टरकडे सुनिधीला व रोहितला घेऊन जायच्या. या दोघांची पण अनेक वर्षे ट्रीटमेंट चालू होती. रोहित बऱ्यापैकी सावरला होता, पण सुनिधीने स्वतःला एका कोषात बंद करून घेतले होते.

सुनिधीच्या सासूबाईंनी रात्री डॉक्टर शैलजा ला फोन केला, रिद्धीमा येऊन गेली व ती काय बोलली हे सविस्तर तिला सांगितले. शैलजा ऐकून खुश झाली. तिच्या बोलण्यात सुनिधीला बरे करण्यासाठी रिद्धीमा ची मदत घेणे सर्वात श्रेयस्कर होते.

आता वरचेवर रिद्धीमा सुनिधीला भेटायला येऊ लागली. त्या दोघींची छानच गट्टी जमली.तशीही दहावीची परीक्षा संपल्यामुळे खूप मोठी सुट्टी होती. गप्पांच्या ओघात रिद्धीमाने ती वकील होणार आहे असे सांगितले. आता रोहित पण रिद्धीमाची वाट पाहू लागला. ही दोन्ही कुटुंबे आता एकत्र वेळ घालवू लागली.

दहावीचा रिझल्ट आणायला रिद्धीमा बरोबर जायला तिच्या बाबांना वेळ नव्हता आणि आजोबा थकले असल्यामुळे सध्या ते बाहेर पडत नव्हते. रिद्धीमा मनातून खूपच खट्टू झाली. सुनिधीला व रोहितला हे समजल्यावर त्यांनी सर्व धीर एकवटून रिद्धीमाच्या बरोबर शाळेत जायची तयारी दाखवली. तब्बल दहा-साडेदहा वर्षांनी हे दोघे शाळेत पाऊल टाकणार होते.

त्यादिवशी दुपारी शाळेची व्हॅन मुलांना सोडायला सोसायटी गेटपाशी थांबली.

रिद्धीमाची आई, केतकी व सुनिधी गेटपाशीच गप्पा मारत उभ्या होत्या. व्हॅनवाल्या काकांना पैसे देण्यासाठी सुनिधी यांच्या उजव्या बाजूला गेली. नक्षत्राला उतरवून घेताना केतकीने हात पुढे केला व तिला उतरवून घेतले, तेवढ्यात रस्त्याच्या उलट्या बाजूने भरधाव वेगाने एक कार आली व तीने नक्षत्राला व केतकीला उडवले. काही क्षणात ही घटना घडली सुदैवाने रिद्धीमा व्हॅन मध्येच असल्यामुळे वाचली. हा धक्का सुनिधीला इतक्या मोठ्या प्रमाणात बसला कि,ती त्या क्षणातच  गोठून गेली. 

ज्या मुलाने  बेफाम वेगाने गाडी चालवली होती, तो वयाने लहान असल्यामुळे त्याला फारशी शिक्षा झाली नाही आणि तो नगरसेवकाचा मुलगा असल्यामुळे पोलिसांनी ही केस बंद केली.

त्यादिवशी प्रत्येक्षात दोन जीव गेले, पण आठ जणांचे आयुष्य उध्वस्त झाले.

आज अनेक वर्षानंतर शाळेत आल्यावर शाळेच्या व्हॅन बघितल्यावर परत त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या.

 जुन्यापैकी जे शिक्षक नक्षत्राला व सुनिधीला ओळखत होते ते येऊन रोहितला व सुनिधीला भेटले.

शाळेमध्ये रिद्धीमा चा नंबर पहिल्या पाच मध्ये आल्यामुळे तिचे नाव शाळेच्या बोर्डावर लावले होते. सर्व शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी रिद्धीमाचे खूप कौतुक केले.  

छोट्या रिद्धीमाने ठरवले होते की अन्यायाविरुद्ध लढावयाचे असेल तर आपल्याला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

आज ती तिच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार होती.

 रिद्धीमाशी बोलता बोलता सुनिधीला मुलींच्या अपेक्षा काय असतात हे हळूहळू समजू लागले. ‘आज आई असती तर मी तिला हे सांगितले असते’.. ‘तिने ते केले असते’…अशी वाक्य सुनिधीच्या मनात घोळू लागली. 

मग तिच्याही मनात विचार येऊ लागले की, नक्षत्रा पण अशीच असती का? तिच्या पण काही अपेक्षा असतील का आपल्याकडं….

हळूहळू रिद्धीमाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुनिधी व रोहित झटू लागले. कदाचित मनातल्या मनात त्यांनी रिद्धीमाला नक्षत्राचे स्थान दिले होते…. एका वेगळ्या नात्याची सुरुवात होत होती. सुनिधीच्या सासूबाईंनी परत एकदा डॉक्टर शैलजांशी बोलून बंद पडलेली सुनिधी ची ट्रीटमेंट सुरू केली. या खेपेला त्या एकट्या नसून त्यांच्याबरोबर रिद्धीमा पण होती.

वर्ष भराभर संपत होती आता रिद्धीमा पण वकिलीच्या शेवटच्या वर्षाला होती. तब्बल पाच सहा वर्षात सुनिधीच्या वागण्यात खूपच फरक पडू लागला. 

तिचा गेलेला आत्मविश्वास, स्वतः विषयी अपराधी भावना, नीरस आयुष्याचे मळभ आता हळूहळू उतरू लागले.

सुनिधीला रोहितला रिद्धीमाचे हे स्वप्न खूपच आवडले. दुःख कवटाळण्यापेक्षा त्या दुःखातून बाहेर येऊन गरजूंना मदत करूयात असे त्या दोघांनी ठरवले.

सुनिधीने प्रत्येक शाळांमध्ये जाऊन रहदारीचे नियम पाळा, लहान मुलांना गाडी चालवायला देऊ नका ही जागृती करायचा वसा घेतला.

रिद्धीमाने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कायद्याच्या ज्ञानाचा वापर गरजूंसाठी करायचे ठरवले.

आज खऱ्या अर्थाने नक्षत्राला व केतकीला न्याय मिळण्यासाठी रिद्धीमा व सुनिधी हातात हात घालून काम करू लागल्या, जणू त्या मायलेकीच…

आज रिद्धीमाला आजीचे वाक्य आठवले ,”तू मोठी झालीस की तुला आई भेटेल.”

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

2 thoughts on “कथा-झाले मोकळे आकाश”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top