आईची माया
सुषमाला लग्न करून घरी येऊन सहा वर्षे झाली होती तरी तिच्या सासूचा तिच्यावर विश्वास नव्हता. तरीही सुषमा काहीही मनावर न घेता रवीचा मनापासून सांभाळ करत होती. रवी आता आठ वर्षांचा झाला होता. ती जेव्हा लग्न करून आली होती तेव्हा चिमुकला अवघ्या दोन वर्षांचा होता. सुरुवातीस जमवून घ्यायला थोडा दोघांनाही वेळ लागला. पण आता दोघे इतके एकमेकांना जीव लावत होते की त्यांचे मायलेकाचे नाते रक्ताचेच वाटे.
राजेशची पहिली बायको विणा रवी दोन वर्षाचा असताना आजारपणाने वारली. तेव्हा रवीचे हाल होऊ नयेत म्हणून सरसाने म्हणजेच राजेशच्या आईने त्याचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने आजूबाजूच्यांना एखादे स्थळ सुचवण्यास सांगितले. बाजूच्या चंद्राने सुषमाचे स्थळ सुचवले होते. तसे सुषमाचेही पहिले लग्न झाले होते पण मुलं होत नाहीत म्हणून तिच्या नवऱ्याने तिला सोडचिठ्ठी दिली होती. सुषमा स्वभावाने मनमिळाऊ होती. पण या गोष्टीमुळे ती खूप दुःखी होती. चंद्राच्या सांगण्यावरून सुषमाचे आईवडील तिचे दुसरे लग्न लावण्यास तयार झाले. तसे चंद्रा व त्यांच्यात लांबचे नातेसंबंध होते. सुषमाची ती लांबची चुलत आत्या होती. माहेरी गेल्यावर सुषमाच्या आईवडिलांना भेटायला ती जात असे .
तेव्हा तिला सुषमाही भेटत असे. सुषमाचा स्वभाव तिला माहीत होता. याच साठी तिने सरसाला तिचेच नाव सुचवले होते. आईवडिलांच्या सांगण्यावरून सुषमा लग्नाला तयार झाली होती. राजेशलाही रवीसाठी दुसरे लग्न करणे गरजेचे होते. त्याला कामावर जावे लागत होते. आणि आईचेही गुडघे दुखत असल्यामुळे तिला सर्व जबाबदाऱ्या सांभाळणे अवघड होते.त्यामुळे त्यानेही दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. चंद्राने सुषमाबद्दलची सर्व माहिती सरसाला व राजेशला आधीच दिली होती. त्यांनाही त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांना रवीला सांभाळण्यासाठी आई हवी होती. सुषमा लग्न करून घरी आली. सुरुवातीस अवघडलेली सुषमा हळूहळू रूळली होती. फक्त रवीचच नाही तर घरातील सर्व कामेही ती मनापासून करत होती.
राजेश व सरसाचेही ती मनापासून करत होती. सरसाला कोणत्याही कमाल हात लावू देत नव्हती. व रवीला ही तिने सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला होता. तिचा हा स्वभाव राजेशला खूप आवडायचा. पण सरसाला तिच्याबद्दल कधी जिव्हाळा वाटला नाही. तिला वाटायचे सुषमा सावत्र आई आहे. त्यात तिला मुलंच होत नाही म्हंटल्यावर तिला मायेचा पाझरच फुटत नसेल. ती फक्त वरवर आपल्याला दाखवत असेल. त्यासाठी ती नेहमी रवीला तिच्यापासून थोडे लांबच ठेवण्याचा प्रयत्न करायची. पण रवीलाही तिचा लळा लागला होता. त्याची सख्खी आई वारली तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते. तो आई आई करत सुषमाच्याच मागून फिरायचा. तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी हट्ट करायचा. झोपताना अंगाई म्हणायला लावायचा.
आज रवी शाळेतून घरी आला. हातपाय धुऊन झाल्यावर सुषमाने दिलेले दूध प्यायला. आणि मग शेतातून आंबे घेऊन येण्यासाठी तो सुषमाकडे हट्ट करू लागला. सायंकाळची वेळ होती. “आत्ता नको मला जेवण बनवायचे आहे. सुट्टीदिवशी पप्पांबरोबर जाऊ” असे सुषमा रवीला समजावत होती. पण तो ऐकेल तर शपथ! मग सुषमा त्याला घेऊन शेतावर गेली सोबत पाय मोकळे करण्याचे निमित्त काढून सरसाही गेली. त्यांच्या शेतामध्ये एक भले मोठे आंब्याचे झाड होते. नुकतेच आंबे पिकायला सुरुवात झाली होती. आंबे बघून रवी खूप खुश झाला. आंबे काढण्यासाठी लांब बांबू सुषमाने शोधून आणला. येतानाच सोबत खुरपे, दोरी आणि आंबे भरण्यासाठी गोणी आणली होती. बांबूला दोरीच्या साहाय्याने खुरपे बांधले व ती आंबे काढू लागली. सरसा आणि रवी आंबे गोळा करून एका ठिकाणी ठेवत होते. दहा -बारा आंबे काढून झाले. तेवढ्यात शेतातील जोंधळ्याच्या पिकातून कसला तरी आवाज आला.
सरसा व रवी आंबे गोळा करण्यात गुंग होते. पिकातून भला मोठा कोल्हा बाहेर आला. नेमका रवी त्याच बाजूला होता. रवी घाबरला तो गोंधळून गेला. सरसा कोल्ह्याला पाहून आरडाओरडा करू लागली. आजूबाजूला कोणीच नव्हते. सुरुवातीस सुषमाही घाबरली पण रवीला पाहून तिची भीती निघून गेली. रवी हा तिचा जीव होता. त्याला वाचवणे हे तिचे कर्तव्य होते. कोल्हा रवीवर झेप घेणार तेवढ्यात सुषमा आपल्या हातातील बांबू घेऊन मोठ्याने ओरडत कोल्ह्यापुढे धावत गेली. आणि कोल्ह्यावर जमेल त्या पद्धतीने बांबूच्या पुढे बांधलेल्या खुरप्याने वार करु लागली. कोल्हाही तिच्या अंगावर येण्यासाठी धडपडत होता. खूप वेळ त्यांची झटापट सुरु होती. बांबू उंच आणि ओला असल्यामुळे त्याचे वजन खुपच होते. पण कोण जाणे एवढी ताकत तिच्यात कोठून संचारली होती.
कदाचित ममतेची ही ताकत असावी. तिने सरसाल रवीला घेऊन लांब उभे राहण्यास सांगितले. लांबूनच सरसा हे सर्व पाहत होती. सुषमाला तिने पहिल्यांदाच अशा अवतारात पहिले होते. सुषमा जाणू दुर्गाचा अवतारच भासत होती. शेवटी कोल्ह्याला खूपच दुखापत झाली आणि हार मानून त्याने तेथून धूम ठोकली. सुषमाचे हात बांबू उचलल्यामुळे खूपच दुखत होते. पळताना तिच्या पायालाही जखम झाली होती. सर्व आंबे गोणीत भरून सुषमा रवीला व सरसाला घेऊन धावतच घरी आली.
आता मात्र सरसाचे डोळे उघडले. तिचा सुषमाबद्दलचा गैरसमज दूर झाला. तिने सुषमाच्या पायाला औषध लावले. राजेश घरी आल्यावर झालेला सर्व प्रकार रवी व सरसाने अगदी रंगवून सांगितला. ऐकताना राजेशच्याही अंगावरती काटा उभा राहात होता. सुषमाचे धाडस पाहून त्याला तिचे खूपच कौतुक वाटले. तसेच आईचा गैरसमज दूर झाल्यामुळे त्याला आनंदही झाला.
लेखिका -प्राजक्ता मेंगाणे,बदलापूर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
Very nice story
Thank you
Chhan बोध कथा