सोनेरी कमळ
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बदकपूर नावाचे एक गाव होते. गाव तसे छोटे होते पण ; निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण या गावावरती केली होती. त्यामुळे गाव अतिशय सुंदर होते.
गावाला लागूनच एक जंगल होते आणि या जंगलात राहत होता एक क्रुर राक्षस बदकासुर. जंगलाच्या बरोबर मध्यभागी एक विशाल तळे होते. या तळ्यात बदकांनी आपले चांगलेच बस्तान बसवले होते. हे बदक सतत या तळ्यात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फेऱ्या मारत असायचे. याला कारण होते या तळ्यात असणारे सोनेरी कमळ. जगातील सर्वात सुंदर कमळ होते ते. कमलदल सोनेरी रंगात न्हाऊन निघाले होते. उन्हात तर हे सोनेरी कमळ अतिशय चमकदार दिसत असे.
तळ्यात फिरणारे बदक जादूई होते. बदकासुरने या जादूई बदकांना सोनेरी कमळाच्या रक्षणार्थ तळ्यात तैनात केले होते. जो कोणी या कमळाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असे तो जादूई बदकांच्या हल्ल्यातून वाचणे कठीण होते. जादूई बदकांना पार करून त्या कमळापर्यंत जाणे म्हणजे दिव्यच ! बदकासुर त्या सोनेरी कमळाला सुरक्षित ठेवण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत होता.
बदकासुर अतिशय क्रुर राक्षस होता. बदकपूर गावातील लोकांना त्रास देणे. जंगलातून ये जा करणाऱ्या वाटसरूंना त्रास देणे. गावातील लोकांच्या जनावरांना पळवून नेणे , गावातील लोकांना गायब करणे असे नाना प्रकारचे त्रास हा बदकासुर लोकांना देत असे. ग्रामस्थ बदकासुराच्या त्रासाला कंटाळून गेले होते.
आज बदकपूर गावातील ग्रामस्थांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत बदकासुर राक्षसाचा बंदोबस्त कसा करावा याबद्दल बरीच खलबते झाली पण ; उपाय काही मिळाला नाही. सगळे गावकरी हतबल झाले होते. शेवटी जो कोणी या राक्षसाचा बंदोबस्त करेल त्याला कायमस्वरूपी गावचा सरपंच घोषित करण्यात येईल असे ठरले. तरीही कोणाचे धाडस होत नव्हते.
ग्रामसभेत वडाच्या झाडाच्या पारावर बसून शिवानंद सगळे ऐकत होता. शेवटी सरपंच पद मिळणार आहे हे ऐकताच तो उठून उभा राहिला आणि मी मारेन त्या राक्षसाला असे जाहीर करून टाकले. सगळ्या ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून शिवानंदच्या निर्णयाचे स्वागत केले.
शिवानंद घरी आल्यापासून एकाच गोष्टीचा विचार करत होता. बदकासुराला कसे मारायचे आणि सरपंच पद कसे हस्तगत करायचे या विचारात तो रात्रभर जागाच राहीला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून तो जंगलात गेला. एका डेरेदार , भल्या मोठ्या वृक्षावर लपून बसला. थोड्याच वेळात सकाळ झाली आणि त्या झाडाला लागून असणाऱ्या त्या तळ्यातील बदके इकडून तिकडून फिरताना शिवानंदच्या नजरेस पडली. त्याला फार गंमत वाटली. तो एकटक त्या बदकांकडे पाहू लागला. ते बदक एका लयीत फिरत होते जसे की कोणाचे सैनिक असावेत. पहारेकरी गस्त घालत फिरत असावेत असेच ते दृश्य दिसत होते.
शिवानंद त्या बदकांना पाहत असताना त्याचे लक्ष अचानक तळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या सोनेरी कमळावर स्थिरावले आणि त्याच्या डोळ्यात चमक आली. त्याची नजर त्या सुंदर कमळावरुन हटत नव्हती. तो आता एकटक त्या कमळाला पाहत होता की अचानक त्याला चाहूल लागली आणि तो समजून गेला की बदकासुर इथेच आसपास आहे. शिवानंद घाबरला. त्या घनदाट वृक्षांच्या गडद हिरव्या पानांमध्ये त्याने स्वतःला अधिक सुरक्षित लपवून घेतले आणि तो बदकासुराच्या येण्याची वाट पाहू लागला.
बदकासुर तळ्याजवळ पोहोचला. शिवानंद डोळे फाडून बदकासुरला पाहत होता. कपाळावरुन घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आज प्रथमच तो बदकासुराला इतक्या जवळून पाहत होता. अतिशय क्रुर म्हणून ज्याची ख्याती शिवानंदने ऐकली होती त्याचा क्रुर चेहरा आज प्रत्यक्ष त्याच्या समोर होता.
बदकासुर त्या तळ्याकाठी जाऊन उभा राहिला आणि त्याने डाव्या हाताची मूठ करून हात सरळ रेषेत पुढे धरला. त्यासरशी सगळ्या बदकांचे माणसांमध्ये रुपांतर झाले आणि ते सगळे त्या पाण्यावर हात जोडून आणि खाली मान घालून बदकासुर समोर उभे राहिले. ही सगळी तिच माणसे होती ज्यांना बदकासुराने बदकापूर मधून पळवून आणले होते. आपल्या जादूई शक्तीने त्यांना बदक बनवले होते. जादूई शक्ती मुळे बदक झालेली माणसे बदकासुराचे सगळे म्हणणे निमूटपणे ऐकत होती.
बदकासुर सगळ्यांकडे पाहून जोरजोरात हसू लागला आणि पुढे चालू लागला तसे त्या पाण्यावर रस्ता तयार झाला आणि तो सोनेरी कमळा जवळ पोहोचला. त्याने कमळाला निरखून पाहीले. कमळ व्यवस्थित होते. बदकासुराने परत एकदा डाव्या हाताची मूठ करून हात सरळ रेषेत पुढे धरला. त्यासरशी त्या सोनेरी कमळातून सोनेरी प्रकाश बाहेर पडू लागला जो सरळ बदकासुराच्या डोळ्यांमध्ये शिरत होता. थोड्या वेळाने तो प्रकाश येणे बंद झाले आणि बदकासुरने हाताची मूठ सोडवली. परत एकदा बदकासुर गडगडाटी हसला आणि झटकन मागे फिरत तिथून निघून गेला. बदकासुर जाताच तिथल्या माणसांचे परत बदकात रुपांतर झाले.
इतका वेळ हा सगळा प्रकार पाहणारा शिवानंद सुन्न झाला होता. घाबरून बोबडी वळली होती. कसेबसे स्वतःला सावरत तो झाडावरून खाली उतरला. बदकांचे लक्ष नाही हे पाहून तिथून बाहेर पडला. घरी पोहोचताच त्याने सुटकेचा निश्वास टाकला. आता तो शांतपणे घडलेल्या सगळ्या घडामोडींचा विचार करु लागला.
शिवानंद दिवसभर बदकासुराच्याच विचारात होता. ती बदक झालेली माणसे , ते सोनेरी कमळ , तो सोनेरी प्रकाश , त्या सोनेरी प्रकाशाचे त्या राक्षसाच्या डोळ्यात जाणे या सगळ्या घडामोडींचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न तो करत होता.
शिवानंद दुसऱ्या दिवशी पहाटे परत त्या तळ्याजवळ पोहोचला. झाडावर बसून तो बदकासुराची वाट पाहू लागला. आज परत तोच सगळा प्रकार घडला. पुढचे काही दिवस शिवानंद रोज पहाटे उठून त्या तळ्याजवळ पोहोचत होता आणि रोज सगळी घटना टिपत होता पण ; त्याला समजत नव्हते की पुढे काय करावे ?
दुपारची वेळ होती. शिवानंद घराच्या अंगणात आंब्याच्या सावलीत बसून विचार करत होता. विचार करता करता अचानक त्याच्या चेहऱ्यावर चमक आली .
” सोनेरी कमळ , हो नक्कीच त्या सोनेरी कमळाचे काही तरी गुपित असणार. तेच मला शोधून काढावे लागेल. का तो बदकासुर रोजच त्या तळ्यात जातो आणि तो प्रकाश त्याच्या साठी महत्त्वाचा असणार आहे. मला सत्य शोधावे लागेल ” . शिवानंद स्वतःशीच बडबड करत होता.
आज शिवानंद रात्रीच्या वेळीच बाहेर पडला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तो तळ्याजवळ पोहोचला. आता त्याने लपण्याची जागा बदलली. तो तळ्याजवळ असणाऱ्या गवतात लपून बसला. तळ्याच्या अगदी काठावर कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी बसला.
रात्रीचे साधारण दोन वाजले होते. शिवानंदला झोप लागली होती. अचानक त्याच्या कानावर काही आवाज पडू लागले आणि तो जागा झाला. कान टवकारुन तो आवाज ऐकू लागला तर आवाज तळ्यातून येत होता.
पहिला बदक रडवेला होऊन बोलत होता, ” कधी सुटका होणार आपली इथून , मला माझ्या घरी जायचे आहे. कोणीतरी येऊन आपल्याला इथून मुक्त करेल तर आपण आपल्या घरी जाऊ शकू “.
” रडतोस कशाला ? आपण इथून कधीही बाहेर जाऊ शकणार नाही हे सत्य स्विकार ” . दुसरा बदक रागाने म्हणाला.
“आपण इथून बाहेर पडू शकतो “. तिसरा बदक म्हणाला आणि बाकी सगळेच बदक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.
” हो , जर कोणी येऊन हे कमळ तोडले तर तो बदकासुर मरुन जाईल कारण त्याचा जीव त्याने या कमळात सुरक्षित ठेवला आहे. आता आपण हे कमळ नाही तोडू शकत कारण आपण त्या राक्षसाच्या कैदेत आहोत पण ; बाहेरुन कोणी आले तर तो आपल्याला मदत करु शकतो ” . हे ऐकताच शिवानंद ताडकन उठून उभा राहिला.
” मी करेन तुमची मदत. मी शिवानंद आहे. बदकपूरचा रहिवासी. मी तयार आहे तुम्हाला मदत करायला”. शिवानंद बोलत होता तर सगळे बदक आश्चर्याने त्याच्या कडे पाहत होते. बदकासुराला मारणे इतके सोपे नव्हते पण ; आज कोणीतरी आपल्या मदतीला आलेले पाहून बदक खुश झाले.
एवढ्यात सकाळ होत आली आणि बदकांना रात्री परत येण्याचे आश्वासन देऊन शिवानंद परतला. दुसऱ्या रात्री शिवानंद परत तळ्याजवळ पोहोचला. बदक त्याचीच वाट पाहत होते. बदकांनी शिवानंद येताच पाण्यात रस्ता तयार केला . शिवानंद हैराण होऊन पाहतच राहिला. बदकांनी सांगितल्याप्रमाणे तो त्या रस्त्यावर चालणार इतक्यात गडगडाटी हास्य कानावर पडले आणि शिवानंदचे पाय लटपट कापू लागले. बदक ही घाबरले कारण अचानक बदकासुर तेथे येऊन पोहोचला होता. त्याने हाताची मूठ करताच बदक सावध झाले आणि शिवानंदला पळत येऊन कमळ तोडायला सांगू लागले.
बदकासुराने मात्र शिवानंदला तोपर्यंत मुठीत पकडले होते. शिवानंद बदकासुराच्या मुठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. बदकासुराने शिवानंदला मुठीत घट्ट आवळायला सुरुवात केली आणि शिवानंद जास्तच धडपडू लागला. बदकासुराने रागाने शिवानंदला फेकून दिले पण ; आश्चर्य घडले आणि शिवानंद थेट त्या सोनेरी कमळावर जाऊन पडला. रागाच्या भरात आपण चूक केली हे बदकासुराच्या लक्षात येताच तो अजूनच चिडला. त्याने परत हाताची मूठ केली तोपर्यंत शिवानंदने कमळ तोडायचा प्रयत्न सुरू केला होता. बदकासुराच्या जादू मुळे शिवानंद कमळापासून दूर फेकला गेला आणि बदकांनी नाराजीचा सूर आळवला.
बदक हताश होऊन सोनेरी कमळाकडे पाहू लागले आणि सगळ्या बदकांच्या चेहऱ्यावर हसू पसरले कारण तिथे कमळ नव्हतेच. शिवानंद कमळापासून दूर फेकला जाण्याआधीच ते कमळ तुटून शिवानंदच्या हातात आले होते. बदकांनी बदकासुर कडे पाहीले तर बदकासुर जमिनीवर गतप्राण होऊन पडला होता. बदकांनी एकच जल्लोष केला आणि क्षणार्धात बदकांचे माणसांमध्ये रुपांतर झाले.
आज परत एकदा ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. शिवानंद आज खूप खुश होता. आज त्याच्या धाडसाचे कौतुक केले गेले. त्याला कायमस्वरूपी बदकपूरचा सरपंच म्हणून घोषित करण्यात आले आणि सगळीकडे टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
समाप्त :
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील.
खूप छान आहे कथा 👌
धन्यवाद
छान
धन्यवाद
खूप सुंदर
छान कथा👌👌