मराठी कथा –    आरसा

WhatsApp Group Join Now

निराली सध्याची टॉपची टीव्ही ॲक्ट्रेस होती.

एकाच वेळी तीन वेगवेगळ्या टीव्ही चॅनल वर तिच्या सीरियल चालू होत्या.गेले दोन वर्ष लागोपाठ तिला लीड रोलचे बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळत होते.सगळ्या प्राईम टाईम ला तिच्याच मालिका सुरू होत्या.

दिसायला अतिशय सुंदर आणि तेवढीच मुजोर स्वभावाची. यशस्वी होण्यासाठी वाटेतल्या थराला जाण्याची तिची तयारी.  जेमतेम बावीस तेवीस वय पण माणसांची चांगलीच समज होती.आपल्या फायद्यासाठी लोकांचा योग्य वापर कसा करायचा व काम झाल्यावर लाथ मारायची हे तिच्या कडून शिकावे. 

पुण्याच्या जवळच असलेल्या वेल्हे गावातून स्वप्नाची दुनिया मुंबई पर्यंत तिचा प्रवास नक्कीच खडतर होता.आता तिला वेध लागले होते ते मराठी फिल्म,  एखादा रिॲलिटी शो आणि मग टाॅलीवूड, बॉलीवूड .एक प्रकारे वेगळीच नशा चढली होती तिच्यावर . सध्या तिच्या सहा वर्षाच्या तारखा बुक होत्या, त्यामुळे वेगळाच माज होता तिच्या वागण्यात. पंधरव्या वर्षीच शाळेतून पळून मुंबई गाठले होते. 

वेल्ह्याला ‘प्रतापरावांचे’ जुने थेटर होते.ते निरालीचे आजोबा. घरची श्रीमंती अनेक व्यवसाय. ‘कमला’ निरालीची आजी, तिला मुळात नाटकांची आवड. ती दिसायला सुरेख होती, पण प्रतापरावांची शिस्त त्यामुळे तिला मन मारून धाकात जीवन जगावे लागले. ‘नीलू’ निरालीची आई दिसायला रूपवती. अभिनयाचा उपजत गुण कमलाकडून नीलू मध्ये आला होता पण प्रतापरावांच्या धाकामुळे तिलाही या क्षेत्रात काम करता आले नाही.

 सिनेमाचे डिस्ट्रीब्यूटर  प्रतापरावांकडे  यायचे. कुठला सिनेमा लावायचा, किती दिवस चालवायचा आणि पैश्याची गणित ते मांडून बसायचे.अनेक लोकांची ऊठबस कमला करायची खरी, पण ती कायम एका स्वप्नांच्या दुनियेत जगायची .

 प्रतापरावांकडे सी राघव म्हणून  ‘आर डिस्ट्रीब्यूटर’ कंपनीचा माणूस मुंबई होऊन यायचा. त्याच्या सल्ल्यानी प्रतापराव पिक्चर लावायचे आणि त्यांना खूपच नफा व्हायचा. तो प्रतापरावांचा विश्वासू झाला होता आणि अनेकदा त्याचा मुक्काम घरीच असायचा. इतर व्यवसाय असल्यामुळे प्रतापराव बरेच वेळा पुण्याला जायचे आणि कमला तिच्या कल्पना विश्वात रमली असायची.

पुढे नीलू  वयात आली आणि तरुण सुलभ भावना जागृत झाल्या.नीलू साधारण अठरा वर्षाची असताना तिचे प्रेम सी राघव शी जुळले ,तसा तो वयानी मोठा होता आणि त्याला दोन लहान मुले होती. नीलूला त्याच्याबरोबर मुंबई गाठायची होती . 

एका बेसावध क्षणी ती गरोदर राहिली आणि सी राघव पळून गेला . प्रतापरावांनी खूप शोधायचा प्रयत्न केला पण तो मुंबई सोडून मद्रासला गेला. प्रतापराव खचून गेले गावात खूपच छी थू झाली. या सगळ्याचा परिणाम नीलूच्या डोक्यावर परिणाम झाला.पुढे तिला जुळी मुले झाली. ‘ललित’ आणि ‘निराली’ 

प्रतापराव ललित व निरालीचे  पालक व आजोबा या दुहेरी भूमिका निभावत होते. थेटर आता म्हणावे तसे चालत न्हवते. जे जुने विश्वासू नोकर होते त्यांना हाताशी धरून प्रतापराव जीवन रेटत होते.आता पूर्वीसारखी ताकद, रूबाब राहिली नव्हता .मनात एकच काळजी होती की नीलूची मुले चांगली निपजावित.’ललित’ आई व आजी सारखा स्वमग्न झाला.निराली एकदम स्वार्थी आणि आपमतलबी होती.

लहानवयात मिळालेले यश पचवयाला आणि टिकवायला जेवढा अनुभव,नम्र स्वभाव पाहिजे तेवढा नसल्यामुळे तिचे वागणे आता बेताल होत चालले होते.

 ती आता आजोबाना अजिबात जुमानत नव्हती. तरुण आणि बेफिकिर स्वभाव वाढत होता. ज्यांच्याबरोबर काम करत होती त्यांच्याशीच भांडून शत्रुत्व घेत होती.

हळूहळू तिच्या वागण्याचा परिणाम तिच्या कामावर होऊ लागला. एका झटक्यात यशाच्या शिखरावरून ती एकदम खाली आली.

आता पैश्याची चणचण भासू लागली.नको ती संगत व व्यसने जडली. 

मनोरंजन क्षेत्रात कुख्यात गुंडांचा व राजकारणी लोकांचा असलेला वावर आणि त्यांनी केलेला तिचा वापर प्रतापरावांना मनस्ताप देऊ लागला. 

एकंदर परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली होती. ज्या प्रतापरावांनी आपली सुंदर बायको कमला व मुलगी नीलू यांना या घाणीतून वाचवायचा प्रयत्न केला होता तिथेच आज त्यांच्या नातीचे पाय घाणीत गाळात रुतले होते.

दिवस-रात्र त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. सतत कुठली तरी भीती व दडपण यामुळे त्यांची ढासळत चाललेली तब्येत काळजीचे कारण होते. 

घरामध्ये वेडी मुलगी, नातू आणि डोक्यावर परिणाम झालेली बायको हे काय कमी होतं म्हणून आता नातीची सुरू असलेली बदनामी आणि तिचे बेताल वागणे. 

थेटर बँकेकडे गहाण होते.अनेक व्यवसाय बुडीत खात्यात चालले होते. डोक्यावर  कर्जाचा डोंगर वाढतच होता….. 

निराली मुंबई सोडून घरी आली होती. तिच्यामागे देणेकरी लागले होते.व्यसनांनी तिची रयाच गेली होती. 

 एक दिवस पहाटे एक जोरदार आवाज झाला व प्रतापराव उठले.ते धावतच  निरालीच्या खोलीकडे पोचले आणि त्यांना आरसा फुटल्याचा आवाज आला सगळीकडे काचांचे तुकडे पसरले होते “निराली दार उघड काय झाले ?” ते दार ठोठावत होते… 

आजूबाजूच्या लोकांना बोलावून त्यांनी दार तोडले आणि त्यांना एकदम चक्करच आली . निराली ने घरातला आरसा फोडून धारधार काचेनी स्वतःचे मनगट चिरले होते. काही क्षणात सगळा खेळ संपला होता.

आरशाचे असंख्य तुकडे इतरस्त्र विखुरले होते.

प्रत्येक आरशाच्या तुकड्यात प्रतापराव स्वतःचा चेहरा न्याहाळत होते…प्रतापराव विचारांमध्ये गढुन गेले काय चुकले? कुठे चुकले? 

त्यांना त्यांचे तरुणपणाचे दिवस आठवू लागले. प्रचंड गरिबीतून जेव्हा त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी घर सोडले. त्यांच्या पाठीमागे पाच भावंडे व विधवा आई.घराची,आई व भावांची जबाबदारी नको म्हणून त्यांनी थेट वेल्हे गाठले.

कमला त्यांची बायको.माहेरची खूपच श्रीमंत.तिच्या वडिलांचा विश्वास संपादन करून सुरुवातीला पडेल ती कामे करता करता हळूहळू त्यांनी कमलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पुढे यथावकाश कमलाच्या वडिलांच्या सर्व इस्टेटीवर कब्जा करून त्यांना हाकलून दिले. कट रचून कमलाच्या भावाला विहिरीत ढकलून दिले. 

प्रतापरावांचे प्रताप सगळ्या गावाला माहित होते. कमलाला त्यांनी असेच फसवून तिच्या वडिलांची सगळी संपत्ती हडपली होती.गावात त्यांच्या चारित्र्याविषयी पण अनेक किस्से ऐकायला मिळायचे.पैशाच्या व बळाच्या जोरावर त्यांनी अनेकांचे संसार उध्वस्त केले होते. गावातल्या अनेक तरुण मुलींना त्यांच्या वासनांना बळी पडावे लागले होते. अनेक जीवांचे तळतळाट त्यांना लागले होते.

आज प्रतापरावांना आपण केलेल्या कर्माचे जणू प्रतिबिंब निरालीच्या वागण्यात दिसत होतं.कालचक्र फिरून परत त्यांच्या नशिबी गरीबी, लाचारी आली होती.कोणीतरी पोलिसांना फोन केला.

आ*त्महत्या का खू*न? याच्या चौकशीसाठी प्रतापरावांना पोलीस स्टेशनमध्ये आता खेटे घालावे लागणार होते…..

आरशातील त्यांचीच प्रतिमा आता भेसूर दिसत होती.

6 thoughts on “    मराठी कथा –    आरसा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top