उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या.पावसाळ्याची चाहूल लागली.सगळीकडे ओसाड पडलेले रान आता हळूहळू हिरवी होऊ लागली.आजोळी , नातेवाईकांकडे गेलेली पोरं परतून आपापल्या गावी आली. शाळा सुरू होण्यासाठी दोनच दिवस बाकी होते.
“सीता मावशी शिल्पी कधी येणार आहे ?”धापा टाकत आलेल्या कल्पनाने विचारले.
“अगं येतोय तिचा मामा घेऊन संध्याकाळपर्यंत येईन.”शिल्पाची आई वाळवणं गोळा करत बोलली.
“आली का कल्पी ? झाली यांची आता उदळायला सुरुवात. खरं यांना यगयगल्या शाळेतच घालायला पाहिजे.म्हणजे तालाबाहेर जायच्या नाय.नायतर नुसता धागडधिंगा . ताप नुसता डोक्याला .पार त्यांना आता एकमेकींशिवाय करमत नसलं.”शिल्पाची आजी चेहऱ्यावरचे हावभाव बदलत बोलली.
गाडीचे हॉर्न वाजले.शिल्पा गाडीवरून खाली उतरली. आईला भेटली नाही ,आजीला भेटली नाही.सरळ कल्पना उभी होती तिला मिठी मारली. मामा,आई,आजी तर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले.
“काय गं कल्पना तू कधी आली तुझ्या मामाच्या घरून ? मला तर तुझी खुप आठवण येत होती ; पण मामा मला घेऊनच येत नव्हता. तू घेतली का गं सातवीची पुस्तके ? मी तर मामाच्या मुलाचीच आणली आहेत.” एकापाठोपाठ एक शिल्पाची प्रश्न उत्तरांची सरबत्ती चालू झाली.
” अगं शिल्पे ती कल्पी कवा धरण आली हाय. एका पायावच उभी हाय तुझी वाट बघत. कल्पी आनं शिल्पी नावं बी कशी मोडीवं ठेवल्यात तुमच्या आई बा न . एकाच आईच्या पोटाला यायचं की ? ” शिल्पाच्या आजीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.
शिल्पा आणि कल्पना दोघीही एकमेकींसोबत गप्पांमध्ये रंगून गेल्या. सुट्ट्यांमध्ये काय काय केले हे सर्व एकमेकींना सांगू लागल्या. संध्याकाळ झाली तेव्हा त्या आपापल्या घरी निघून गेल्या.
शाळेचा दिवस उजाडला. कल्पना पंधरा मिनीटे आधीच शिल्पाकडे आली होती. जणू दोघी ही शाळेत जाण्यासाठी खूप आतुर झाल्या होत्या. आजी आणि आई म्हणत होत्या की आज शाळेत जाऊ नका आज तुमचा मास्तर तुम्हाला फक्त कचराच उचलायला लावणार आहेत. पण त्या दोघींनी कोणाचही ऐकलं नाही. आज शाळेत लवकर जायचं, पहिला बाक पकडायचा याच गप्पांमध्ये त्या रंगून गेल्या होत्या.
शिल्पा आणि कल्पना शाळेत पोहोचल्या. आपण सगळ्यांपेक्षा लवकर आलो असणार म्हटल्यावर पहिला बाक आपल्यालाच मिळणार अशी त्यांची आशा होती. त्यांचा वर्ग बदलला होता. सहावीचा वर्ग सोडून आता सातवीच्या वर्गात बसावे लागणार होते. त्या दोघींनीही शाळेत प्रवेश केला. बघितले तर दोघींनाही आश्चर्य वाटले. कारण आधीपासूनच सर्व वर्ग गच्च भरून गेला होता. एकही बाक रिकामा नव्हता. दोघींनी एकमेकींकडे पाहिले. पुन्हा एकदा वर्गात नजर फिरवली. शेवटच्या ओळीत सर्वात शेवटचा मोडका बाक त्यांना दिसला. नाईलाजाने त्यांना त्यावर बसावे लागले. दोघीही तब्येतीने बारीक आणि दोघींची उंची कमी असल्यामुळे त्यांना फळ्यावरचं काही दिसेना. नंतर सरांनी सर्वांना उंचीनुसार बसवले. कल्पना आणि शिल्पाला दोन नंबरचा बाक मिळाला . दोघीही खुश झाल्या.
वर्गात एकच गोंधळ उडाला. सुट्ट्यांमध्ये मारलेली मज्जा, लुटलेला आनंद एकमेकांसोबत वाटू लागले.पाखरांच्या चिवचिवाटानं रान गजबजून जावं तसे वर्गाचे वातावरण भासू लागले. कुणाचं कोणाला काही कळत नव्हते.
चालताना पायाच्या घर्षणाने पायजम्याचा होणारा आवाज कानी येताच सगळ्या वर्गात स्मशान शांतता पसरली.आणि रुबाबात पवार सरांनी प्रवेश केला.
“उन्हाळ्याच्या सुट्टीचा अभ्यास कोणी कोणी केला ? चला वह्या आणा ?” कोणतीही खुशाली न विचारता पवार सरांनी विषयालाच हात घातला.तसे शिल्पाने कल्पनाकडे दचकून पाहिले.दोघींनीही अभ्यास केला नव्हता. “वाटलं सुट्टीत सर विसरून जातील पण त्यांच्या लक्षात आहे.” .शिल्पा कल्पनाला म्हणाली.सगळ्यांनी गृहपाठ दाखवला.
“शिल्पे , कल्पे सुट्टीत उनाडक्या करत फिरल्या का ग ? कुठं आहे अभ्यास? “दात ओठ खात सर बोलले.
“सर ते…… आम्ही दोघी मामाच्या गावाला गेलो होतो.”शिल्पा खाली मान घालून घाबरतच बोलली.
“लाज नाही वाटत हे कारण द्यायला ? बाकीच्या मुलांना आजोळच नाही का ?
मला कारण आवडतं नाही.” पवार सर विज्ञान विषय शिकवत. त्यामुळे ते मुलांना शिकवताना विज्ञानाला शोभेल अशीच भाषा वापरत.
” जर मी सांगितलेला अभ्यास नीटनेटका केला नाही तर मी असा प्राणी आहे ना मुलांनो सोडणार नाही तुम्हाला .”असे सर सांगत असताना मुलांच्या दोन नंबरच्या ओळीतून आवाज आला. “सर तुम्ही प्राणी आहे मग तुम्हाला शेपूट कुठं आहे ?” असे चुकीचे प्रतिउत्तर आल्यामुळे सर खूप चिडले.आणि कोण बोललं त्या मुलाला शोधू लागले. वाढलेल्या मिशीवरून हात फिरवत ,नाकावर आलेल्या चष्म्या मधून त्यांनी सर्व वर्गावर नजर टाकली. कोण बोललं हे त्यांना कळलं नाही. मात्र शिल्पा आणि कल्पना फीदी-फिदी हसताना त्यांना दिसल्या. रागाने त्यांच्याकडे नजर वळवत बोटाने खुणावत त्यांना उभे केले. सरांना बिनकामाच्या हसण्याचा खूप राग येई. त्यांनी शिल्पा आणि कल्पनाला प्रश्न विचारला. ” मला सांगा द्रव्याचे प्रकार किती ? ” कल्पनाला काही सांगता आले नाही. शिल्पा थोडी कल्पना पेक्षा अभ्यासात बरी असल्यामुळे तिने धातू आणि अधातू हे दोन प्रकार सांगितले. परंतु हसण्याच्या कारणामुळे त्या दोघींच्या वेण्या पकडून डोक्यात दोन दोन फटके दिले. थोड्यावेळापूर्वी हसणाऱ्या कल्पना आणि शिल्पा एकमेकींकडे पाहू लागल्या.
शाळेचा दुसरा दिवस उजाडला. कल्पना नाचत नाचत शिल्पाकडे आली. “शिल्पे ss अगं ये शिल्पेss हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले ?” कल्पना आनंदाने बोलू लागली.
“काय गं कल्पे काय आणलं माझ्यासाठी ? ” शिल्पा आतुर होऊन पाहू लागली. कल्पनाने छान असे दोन मोगऱ्याचे गजरे दोघींना बनवून आणले होते. त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. आजूबाजूचे वातावरण प्रसन्न झाले होते. शिल्पाने खूप आवडीने गजरा वेणीला लावला. दोघींनीही एका एका वेणीला गजरा लावून शाळेत गेल्या.सगळेजण त्या दोघीकडे आश्चर्याने पाहू लागले. सगळ्या वर्गामध्ये फक्त मोगऱ्याचा सुगंध पसरला होता. पहिल्या दोन तासांमध्ये आलेले शिक्षकांनी या दोघींचे खूप कौतुक केले. किती छान सुगंध आहे ? किती छान फुले आहेत ? तुमच्या घरी आहेत का ? असे प्रश्न विचारले. आपले गजरे सरांना आवडले म्हणून दोघींनाही खूप आनंद झाला.
आता तिसऱ्या तासाला पवार सर वर्गात आले. मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध येताच त्यांनी एक नजर त्या दोघींवरती फिरवली. आणि म्हणाले. ” शिल्पा कल्पना उभ्या राहा. किती छान गं तुमचा गजरा . कोणाच्या घरी याचे झाड आहे ? कोणी गजरा बनवला ?” असे प्रश्न पवार सरांनी विचारले. पवार सर आपल्याशी छान बोलत आहेत हे बघून दोघींनाही खूप आनंद झाला. शिल्पा उत्साहाने सांगू लागली की.” सर हे झाड कल्पनाच्या घरी आहे आणि गजरा ही तिनेच बनवला आहे. एवढे बोलून ती खाली बसली.
” एवढे मोठे मोठे गजरे घालण्यापेक्षा अख्खी कुंडीच डोक्यात घालून यायची की मूर्खांनो …. ही शाळा आहे लग्न मंडप नाही नट्टापट्टा करून यायला . निघा वर्गाच्या बाहेर… सर मोठ्याने ओरडले. तसे त्या दोघींच्याही आनंदावरती विरजण पडले.
असे बरेच दिवस लोटले.शाळेचे दिवस बरे चालले होते. परीक्षेचा काळ जवळ आला. सराव चालू झाला.शिल्पा आणि कल्पनाच्या अभ्यासात चांगली सुधारणा होऊ लागली. शिक्षक प्रश्न उत्तरांचा सराव घेऊ लागले. पवार सरांनी काही प्रश्न विचारले. परंतु पहिल्या एक दोन बाकावरचेच विद्यार्थी उत्तर देत होते. सगळे विद्यार्थी जमतील तशी प्रश्नांची उत्तरे देत होते. परंतु संगीता नावाची शेवटच्या बाकावर बसणारी मुलगी तिने कधीही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पवार सरांचे लक्ष तिच्याकडे गेले. आणि ते म्हणाले “कधीही प्रश्नांची उत्तर द्यायला तू उठत नाही. तुझ्या खाली उधई लागली असेल. कधीतरी हालचाल करत जा .” पवार सर रागाने बोलू लागले.
” सर उधई नाही आता वारूळच तयार होऊ लागले आहे.” असा उद्धट आवाज आल्यावर ते पवार सर चवताळून उभे राहिले..” मला उलट उत्तरं देता. असे म्हणून पवार सरांनी शिल्पा आणि कल्पनाला उभे केले. त्यांची काहीही चूक नसताना आज पुन्हा त्या सरांच्या रागाच्या शिकार झाल्या.
त्यांच्या मुख्याध्यापकांनी सर्व मुलांना प्रेरणादायी काही गोष्टी सांगितल्या.सगळी मुले भारावून गेली.शिल्पा आणि कल्पना या दोघींनी संकल्प केला .आता सरांचा ओरडा खायचा नाही.प्रत्येकाला विचारल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापली मते व्यक्त केली.या दोघींनीही स्वतःची मते सर्वांसमोर मांडली.की मन लावून अभ्यास करायचा .खूप पुढे जायचं . सर्व शिक्षकांना मुलांचा अभिमान वाटला.
दोन चार शाळेचे दिवस शिल्पा आणि कल्पनाचे खूप छान गेले.एक दिवस दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर वर्गातील सर्वात मागच्या बाकावर बसणारी सरली म्हणाली “कल्पे, शिल्पे आमच्या चिंचा खूप पिकल्या आहेत. जायचं का चिंच काढायला ? ” असे म्हटल्यानंतर दोघींच्याही तोंडाला पाणी सुटले. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सरळ सरलीचं घर गाठलं. भरपूर चिंचा तोडल्या, मनसोक्त खाल्ल्या. आणि जेव्हा शाळेमध्ये परत आल्या तेव्हा पवार सरांचा तास चालू होता. घाबरतच तिघीजणी वर्गाच्या दरवाज्यापाशी आल्या.
” या …या…. भविष्यामध्ये मोठी स्वप्न पाहणाऱ्या आपल्या वर्गातील दोन हुशार मुली आल्या आहेत. टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करा. आणि तुम्हाला माहिती आहे का मुलांनो या मुली पुढे जाऊन खूप मोठा उद्योग धंदा करणार आहेत. कसला आहे विचारा ? अरे मुलांनो त्या चिंच बोरं विकण्याचा धंदा करणार आहेत.” असे सांगताना सरांचे डोळे लाल झाले होते. वर्गातील सर्व मुले हसू लागली.
“अगं दोघी नाही तर एक जण तरी सुधारा. एकीच्या सोबतीने दुसरीही शहाणी होईल. पण तुम्हाला एकमेकींची सोबत सोडायची नाही का?” पवार सर त्या दोघींकडेही पाहून बोलत होते परंतु शिल्पा आणि कल्पना सरांच्या नजरेला नजर देत नव्हत्या. काहीही झाले तरी चालणार होते परंतु त्या एकमेकींची सोबत कधीही सोडणार नव्हत्या. असे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. त्या दोघींची मैत्री ही जरा वेगळीच होती.
समाप्त !
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र ” या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा “WhatsApp” ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
– शितल औटी, जुन्नर