Marathi Police Katha: इन्स्पेक्टर जयदेव फोनवर बोलताना आपल्यासमोर बसलेल्या मिस्टर अँड मिसेस मेहतांचे बारकाईने निरीक्षण करत होते. मगाशी आत शिरल्यावर त्यांनी स्वतःची ओळख करुन दिली होती.जयदेवांचा हा नेहमीचा खाक्या होता. त्यांना भेटायला जी अनोळखी लोकं यायची, त्यांचं ते पहिले निरीक्षण करायचे. त्यासाठी सतत येणारे फोनकॉल्स त्यांच्या पथ्यावर पडायचे किंवा कसलीतरी महत्त्वाची फाईल चाळत असल्याचा बहाणा करुन ते समोरच्याचा अदमास घ्यायचे. या निरीक्षणातून त्यांच्या लगेच लक्षात यायचं की समोरची व्यक्ती सरावलेली, बेरकी आहे, का अगदी नवखी, पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढलेली आहे.
आत्ता समोर बसलेली दोघंही, साधारण तिशीच्या आसपास होती. मिसेस सेजल मेहता अत्यंत देखण्या होत्या. स्वतःच्या रुपाची पुरेपूर जाणीव असल्याचं त्यांच्याकडे बघून जाणवत होतं. जयेश मेहता पण चांगलेच रुबाबदार आणि वेल बिल्ट होते. यशस्वी बिझनेसमन असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. शिवाय दोघांच्याही एकूण व्यक्तिमत्वात खानदानी श्रीमंतीचं तेज विलसत होतं.
या क्षणी मात्र दोघंही चांगलीच अपसेट दिसत होती. मिस्टर मेहता वारंवार खिशातून रुमाल बाहेर काढून कपाळावरचा घाम पुसत होते. अस्वस्थपणे हातांची चाळवाचाळव करत होते. त्यांच्या महागड्या गोल्डप्लेटेड रिस्टवॉचच्या अगदी खालीच एक पिंपळपान होतं. बहुदा जन्मखूण असावी.मिसेस मेहता, आपल्या सुंदर नक्षीकाम केलेल्या गुलाबी पर्सचा खटका दाबून उगीचच पर्स उघडत होत्या आणि परत फटकन बंद करत होत्या. त्यांची भिरभिरती नजर आजूबाजूला फिरत होती खरी, पण आपण काय पहातो आहोत हे या क्षणी त्यांना अजिबात समजत नसावं, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
आता मात्र जयदेवांनी आपला कॉल आटोपता घेतला आणि ते म्हणाले, “बोला मिस्टर मेहता, मी आपली काय मदत करु शकतो?”
जयदेवांच्या शेजारच्या कपाटात फाईल शोधत असलेल्या सबइन्स्पेक्ट घोडक्यांनी पण कान टवकारले.
मेहता जरासे सावरुन बसत म्हणाले, “मला गेले काही दिवस, म्हणजे साधारण महिना झाला असेल, खंडणी मागण्यासाठी सारखे फोनकॉल्स येत होते. मी त्यांच्या कॉल्सना अजिबात भीक घातली नाही म्हंटल्यावर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. चार दिवसांपूर्वी, मी रात्री साधारण अकराच्या सुमारास काम संपवून घरी यायला निघालो होतो. तेव्हा आमच्या अगदी घराजवळच्या वळणावर अचानक समोरुन एक ट्रक सुसाट वेगाने माझ्या गाडीच्या रोखाने आला. मी अतिशय जलद हालचाल करुन पलिकडच्या फूटपाथच्या बाजूला कार वळवली म्हणून बचावलो. नाही तर काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही.”
हे ऐकताना आत्तासुध्दा मिसेस मेहतांचा चेहरा अगदी पांढराफटक पडला होता. त्या जयदेवांना म्हणाल्या, “काल रात्रीचा प्रसंग तर यापेक्षा भयानक होता. काल ऑफिसच्या पार्किंग लॉटमधून गाडी काढण्यासाठी जयेश गाडीत बसले. उजवीकडची खिडकीची काच खाली केली आणि तेव्हाच कोणीतरी त्यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने जयेश ग्लव्ह कंपार्टमेंट उघडण्यासाठी वाकले होते म्हणून ती बुलेट डावीकडच्या बंद काचेवर आपटून आरपार गेली. लगेचच मोटरसायकल तिथून वेगाने जात असल्याचा आवाज आला. देवाची कृपा म्हणूनच जयेश दोन्ही जीवघेण्या प्रसंगातून सहीसलामत वाचले. पण आता अजून रिस्क आम्ही नाही घेऊ शकत. हा संपूर्ण महिना आम्ही किती दडपणाखाली वावरतोय याची तुम्हाला कल्पनापण येणार नाही.”
जयेश मेहता आपल्या बायकोची री ओढत म्हणाले, “सर, मी पोलीस प्रोटेक्शन मागायला आलोय. आता माझं बाहेर पडणं, दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललंय.”
जयदेवांनी जरासं चिडूनच विचारलं, “तुम्हाला पहिला, खंडणी मागणाऱ्याचा फोन आला होता, तेव्हाच तुम्ही आमच्याकडे का नाही आलात?
तेव्हाच आम्ही त्या इनकमिंग नंबरवरुन ट्रेस लावला असता. महिनाभर कशाची वाट बघत होतात?”
“सर, खरं सांगायचं तर मी त्या कॉल्सना फारसं महत्त्वच दिलं नाही. आम्हाला नेहमीच अश्या बिझनेस रायव्हल्सना तोंड द्यावं लागतं. त्यातल्याच कोणीतरी असा खोडसाळपणा केला असेल असं मला तेव्हा वाटलं होतं. हा ट्रकचा प्रसंग घडेपर्यंत, प्रत्यक्ष इजा करण्याचा प्रयत्नही अजिबात झाला नव्हता. फक्त एक दडपण मात्र सतत आम्हाला जाणवत होतं.”
“तुमच्यासारख्या सुजाण नागरिकांनी किमान थोडा सुज्ञपणा दाखवला, तरी गुन्ह्यांचं प्रमाण बरंच कमी होईल. पण पोलिसांत तक्रार करायला लोकं इतकी का घाबरतात तेच समजत नाही. आमचा ससेमिरा मागे लागेल अशी भीती वाटायचं काय कारण? बरं..मिसेस मेहता, मला सांगा, हे दोन्ही प्रसंग घडले तेव्हा तुम्ही पण यांच्याबरोबर गाडीत होतात का?”
“नाही, जयेश दोन्ही वेळा ऑफिसमधून घरी परतत होते. एकटेच होते आणि हां, गाडी ते स्वतःच ड्राईव्ह करतात. आम्हाला दोघांना कारड्रायव्हिंग खूप आवडतं. त्यामुळे आमच्याकडे ड्रायव्हर नाही. रात्री फक्त बंगल्याच्या गेटवर एक गुरखा असतो. बाकी दिवसभर नोकरमाणसं येऊन आपापली कामं करुन निघून जातात. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे प्रोटेक्शन मागायला आलो आहोत. निदान थोडे दिवस तरी तुमच्या दोन माणसांना आमच्या बंगल्यावर आमच्या सुरक्षेसाठी पाठवा.”
मिसेस मेहता, अगदी पाठ करुन डायलॉग म्हणावेत तश्या एका दमात सगळं बोलल्या.
जयदेवांनी मेहतांना विचारलं, “काल तुमच्यावर झाडलेली गोळी आरपार काचेतून गेली म्हणालात, तर काच नक्कीच तडकली असणार. लगेच नवी काच बसवून घेण्याएवढा वेळ नव्हताच तुमच्याकडे.”
“हो ना,” मेहता मध्येच बोलले, “रात्री ही घटना घडली, आणि सकाळी आम्ही इथेच आलोय. आता या गंभीर प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला की मग गाडीच्या काचेकडे बघीन.”
जयदेवांच्या मनात आलं, ‘प्रकरण गंभीर होईपर्यंत निवांत बसायचं आणि मग गळ्याला तात लागायची वेळ आली की यायचं प्रोटेक्शन मागायला.’
वरकरणी मात्र ते मेहतांना धीर देत म्हणाले, “चला, आपण तुमच्या गाडीच्या काचेची हालत बघून घेऊ. घोडके, तुम्ही पण या.”
मेहतांनी स्टेशनच्या बाहेरच गाडी पार्क केली होती. जयदेव आणि घोडके त्या फुटलेल्या काचेचं बारकाईने निरीक्षण करायला लागले. घोडके काहीतरी बोलणार एवढ्यात जयदेवांनी त्यांना हातानेच ‘आत्ता बोलू नका’ अशी खूण केली.
सगळे पुन्हा आत येऊन बसल्यावर जयदेव म्हणाले, “मिस्टर मेहता, आजच संध्याकाळपर्यंत मी तुमच्या बंगल्यावर दोन माणसं पाठवतो. तुम्ही अगदी निश्चिन्त रहा. मला असं वाटतंय, हे जे कोण धमकी देणारे लोक आहेत, त्यांचा उद्देश तुम्हाला फक्त घाबरवण्याचा आहे, मारण्याचा नाही. नाहीतर दोनदा असा असफल प्रयत्न त्यांच्याकडून झालाच नसता.
तुम्हाला सध्यातरी धोका नाही. तरीही आमची माणसं येईपर्यंत तुम्ही अजिबात घराबाहेर पडू नका. आत्ताही तुमच्या गाडीच्यामागे आमचा माणूस येईल.
घोडकेंना तुमचा घराचा आणि ऑफिसचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा. मी इथला नंबरही देतो तुम्हाला. कधीही वाटलं तरी, कुठल्याही वेळी कॉल करा.”
मेहता पती-पत्नींच्या चेहऱ्यावर, मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं प्रसन्न हसू उमटलं. सुटकेचा निश्वास टाकत,
पुन्हा-पुन्हा जयदेवांचे आभार मानत दोघं तिथून गेली.
घोडके लगेच जयदेवांना म्हणाले, “सर, गाडीच्या खिडकीची काच मुद्दाम गोल कापून
काढल्यासारखी दिसत होती. गोळी आपटून काच फुटली असती तर गोळीच्या वेगामुळे काचेला आजूबाजूला तडे गेले असते. इथे बाकी काच अगदी सुस्थितीत होती.”
“परफेक्ट ऑबझर्व्हेशन घोडके, आणि म्हणूनच मी जयेशला ‘सध्यातरी धोका नाही’ असं इतक्या ठामपणे सांगितलं. सुरुवातीला मला सेजलचा संशय आला होता. तिचा कोणी प्रियकर असला तर दोघं मिळून अशी खेळी खेळत आहेत का? किंवा जयेशचा मोठ्या रकमेचा विमा वगैरे असेल तरी तो मिळवण्यासाठी सेजल त्याचा काटा तर काढत नाही ना, अशीही शंका मला आली होती. पण गोळीबाराची गोष्ट स्वतः जयेशने सांगितली आणि ती मुद्दाम कापून काढलेली काच बघून तर सेजल आपोआपच संशयितांच्या यादीतून बाद झाली.
मला असं वाटतंय, जयेश सेजलपासून काहीतरी लपवतोय आणि तिची सहानुभूती मिळवण्यासाठी हे धमकीचं खोटं नाट्य त्याने उभं केलंय. कदाचित त्याच्या बिझनेसच्या दृष्टीने, अशी अफवा पसरवण्यामागे त्याचा काही हेतू असेल. काहीतरी रहस्य यामागे नक्कीच आहे. पण ही जी बालीश कथा त्याने रचून सांगितली आहे, त्यावर सेजलचा विश्वास बसला असेलही, पण आपलाही बसेल असं वाटलं तरी कसं त्याला? गुन्हेगार जर इतक्या ढिसाळपणे गुन्हे करायला लागले तर आपली गरजच उरणार नाही.
एनिवेज्, त्याला काही धोका नाही हे नक्की. दोन दिवसांत, आपली ही शर्माची केस हातावेगळी झाली की जयेशची पाळंमुळं खणायला सुरुवात करु. चला, जरा पोटपूजा करून घेऊ.”
तासाभरात जेवण आटोपून जयदेव आणि घोडके पुन्हा कामाला लागले होते. तेवढ्यात फोन वाजला. जयदेवांनी तो उचलला. पलीकडून अतिशय घाबरलेला सेजलचा आवाज ऐकून जयदेव सतर्क झाले. ती काही बोलूच शकत नव्हती. शेवटी जयदेवांनी, ‘आम्ही तिकडे येतो’ असं बोलून फोन ठेवला आणि घोडक्यांबरोबर ते लगेच मेहतांच्या बंगल्यावर जाऊन पोचले.त्यांनी हॉलमध्ये प्रवेश केला आणि समोरचं दृश्य बघून त्यांना कमालीचा धक्का बसला.जयेश जमिनीवर वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेला होता. तो जिवंत नाही हे लगेचच समजून येत होतं. तरीही जयदेवांनी पुढे होऊन जयेशची पल्स वगैरे चेक केली. पण आता कशाचाच उपयोग नव्हता.कित्येक खूनप्रकरणं जयदेवांनी यशस्वीपणे हाताळली होती. तरीही ज्या जयेशला,आपण इतक्या छातीठोकपणे निश्चिन्त रहायला सांगितलं होतं, जो आपल्या शब्दावर विसंबून काळजीमुक्त होऊन घरी गेला होता त्याचा तासाभरात खून?
या सर्वस्वी अनपेक्षित घटनेवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आत्तापर्यंतच्या, त्यांच्या अखत्यारीतल्या कुठल्याच केसमध्ये त्यांना अपयश आलं नव्हतं. ते त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ‘डेअरडेव्हिल’ म्हणूनच ओळखले जात होते. त्यांची अचूक निरीक्षणपद्धती आणि तर्कचातुर्य यांच्या जोरावर कित्येक गुन्ह्यांचा छडा लागला होता.धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर, बुलंद आवाज, यामुळे गुन्हेगारही त्यांना टरकून असायचे. आपल्या स्टाफशी मात्र ते अगदी प्रेमाने वागायचे. त्यांची चेष्टामस्करी करायचे, वेळप्रसंगी लागेल ती सर्व मदत करायचे. घोडके तर त्यांना आपला आदर्श मानायचे.
थोड्याच वेळात जयदेवांनी स्वतःला सावरुन सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली. फॉरेन्सिक टीमला इथे बोलवून घेतलं. मग ते मृतदेहाचं बारकाईने निरीक्षण करायला लागले. कुठल्यातरी जड वस्तूचा आघात डोक्याच्या मागच्या बाजूला केलेला दिसत होता. रक्ताचे ओघळ चेहऱ्यावर, मानेवर आले होते. जयेशच्या हातावरचं पिंपळपान ठसठशीत उठून दिसत होतं आणि त्याच्या हातातलं घड्याळ…त्याची टिकटिक चालूच होती. जणू ते म्हणत असावं, ‘काही झालं तरी काळाची गती कोणीही थांबवू शकत नाही. कालचक्र अव्याहत चालूच रहाणार.’
सेजलकडे जयदेवांनी आता मोर्चा वळवला.तिची अवस्था फारच वाईट झाली होती.जयदेव तिच्याशी बोलायला सुरुवात करणार एवढ्यात ती उसळून म्हणाली, “तुम्ही तर म्हणाला होतात, काही धोका नाही, मग लगेच हे असं, कसं काय झालं?” आणि ती स्फुंदून-स्फुंदून रडायला लागली.
“मॅडम, मी जो अंदाज बांधला होता त्यावरुन मेहतांना मुळीच धोका दिसत नव्हता. माझ्यासाठीही हा मोठा शॉक आहे.
आता आपल्याला गुन्हेगाराला शोधून काढायचं असेल तर तुमचं थोडं सहकार्य लागेल.”
सेजल जरा सावरुन बसत म्हणाली,
“तुम्हाला काय विचारायचं आहे ते विचारा.”
“मॅडम, तुम्ही घरी परत आल्यावर काय काय झालं, ते जरा सविस्तर सांगाल का?
मेहता कुठे बाहेर निघाले होते का? त्यांच्या अंगावर सकाळचाच सूट दिसतोय. एकटे कुठे जाऊ नका असं मी सांगितलं होतं.”
“नाही, ते बाहेर नव्हते निघाले. ऑफिसस्टाफपैकी एकजण, अर्जंट डॉक्युमेंट्सवर त्यांच्या सह्या घेण्यासाठी येणार होता. स्टाफसमोर त्यांचा कधीच इन्फॉर्मल ड्रेसकोड नसायचा, म्हणून आम्ही घरी आल्यावर त्यांनी सूट बदलला नव्हता.
कालच्या गोळीबाराच्या घटनेमुळे, रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. त्यामुळे मी वरच्या मजल्यावरच्या आमच्या बेडरुममध्ये जरा पडले होते. जयेश खाली हॉलमध्ये, आपल्या कर्मचाऱ्याची वाट बघत बसले होते. साधारण अर्ध्या तासाने, खालून जयेश ओरडल्यासारखा मला आवाज आला. मी ताबडतोब धावत इथे आले आणि..आणि, जयेशना..”
पुढचं वाक्य सेजल पूर्ण नाही बोलू शकली.”मॅडम, तुम्ही कोणाला पळत जाताना वगैरे बघितलंत का? हॉलचा दरवाजा बंद होता की उघडा? जयेश काही बोलले का तुमच्याशी?”
“हॉलचा दरवाजा..मला वाटतं उघडाच होता. मला कोणाचीच चाहूल लागली नाही. खरं सांगू का, जयेशना अश्या अवस्थेत बघून माझं लक्ष दुसरीकडे नाही गेलं. मी त्यांना खूप हाका मारल्या, जोरजोरात हलवलं, पण काहीच रिस्पॉन्स नाही आला. त्यांची पल्सपण लागली नाही. मग मी तुम्हाला फोन केला.”
हे ऐकून जयदेवांनी नुसतीच मान डोलवली.दुसऱ्या कोणाचा जबाब घ्यायचा प्रश्नच नव्हता कारण घरात कोणी नव्हतंच. आत्तातरी सेजलचा जबाब ग्राह्य धरावा लागणार होता. डोक्यावर एवढा घणाघाती आघात करणं तिला शक्यच नव्हतं. आघात करणारी व्यक्ती, किमान जयेशएवढी उंच आणि मजबूत होती हे त्याच्या जखमेवरुन सहज लक्षात येत होतं. एकच घाव, पण अगदी वर्मी लागला होता इतक्या ताकदीने मारला होता.पुढच्या सगळ्या सोपस्कारात जयदेवांना आता स्वारस्य उरलं नव्हतं. घोडक्यांवर पुढची जबाबदारी सोपवून ते घरी परतले.
आपला सपशेल चुकलेला अंदाज त्यांना अस्वस्थ करत होता. ते घरी आले, तेव्हा त्यांचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा, रोहित टीव्हीवर कोणतातरी पिक्चर बघत होता. आपल्या वडिलांचा चेहरा बघून तो टीव्ही बंद करायला लागला. पण जयदेव त्याला म्हणाले, “अरे, असू दे, बघ तू. लगेच बंद करायला नको.”
ते पण त्याच्या शेजारीच बसले. त्यांना स्वतःला चित्रपटांमध्ये अजिबात गम्य नव्हतं. आत्ताही ते समोर स्क्रीनवर जे चालू आहे ते बघत तर होते, पण डोक्यात विचारचक्र चालूच होतं.अचानक, त्यांच्या पत्नीने आणून दिलेला चहा पिताना ते ताडकन उठले. रोहितच्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या बुलेटला किक मारुन गेलेही.बरोब्बर पंधरा दिवसांनी, साध्या वेशातले दोन पोलीस, घोडके आणि ते स्वतः त्यांच्याच कारमध्ये बसलेले होते.पोलिस स्टेशनपासून थोडया अंतरावर त्यांची कार उभी होती. काचा वर केल्या होत्या. बाकी कोणालाही काय घडतंय, कुठे जायचं आहे, काहीही माहीत नव्हतं.
तेवढ्यात जयदेवांनी गाडी सुरु केली. दहाच मिनिटांत एका भपकेबाज हॉटेलसमोर ते थांबले, पण लगेच बाहेर उतरले नाहीत. पाच मिनिटांनी बाहेर आल्यावर रिसेप्शनवर जाऊन त्यांनी काहीतरी विचारलं. बाकीचे आपले मुकाट्याने त्यांच्या मागोमाग जात होते. आता जयदेव पहिल्या मजल्यावर पोचले, पण ते लगेच पुढे झाले नाहीत. पिलरच्या मागे लपूनच, थोडया अंतरावर असलेल्या, समोरच्या दारावर नॉक करणाऱ्या स्त्रीकडे ते बघत होते. आत्ता घोडक्यांना ती दिसली. एका हातात नक्षीकाम केलेली, गुलाबी पर्स झुलवत ती उभी होती. सेजल…घोडकेंना काही कळेना, ही इथे कशी?
तेवढ्यात बंद दार उघडलं. दारात…जयेश उभा होता. कल्पना असूनही जयदेवांच्या अंगावर सरसरुन काटा आला. पण अजिबात वेळ न दवडता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोटानेच इशारा केला, आणि त्या दोघांना काही समजायच्या आत अटकसुद्धा केली.सगळी रीतसर चौकशी होऊन त्या दोघांवर कारवाई होईपर्यंत त्यांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं.
इकडे घोडक्यांची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. जयदेवांनी सांगायला सुरुवात केली, “मी जयेशच्या बंगल्यावरुन जेव्हा घरी पोचलो तेव्हा चांगलाच अपसेट होतो. रोहित एक पिक्चर बघत होता. तेव्हा मला तो पिक्चर कोणता ते मुळीच ठाऊक नव्हतं. पण नंतर मी रोहितला विचारलं. आमिर खानचा धूम-३ होता तो. त्यामध्ये आमिरचा डबल रोल होता. तो बघताना मला अचानक जाणवलं, जयेशच्या केसमध्ये डबल रोलची तर भानगड नसेल? खूप विचारांती मला ही थिअरीच बरोबर वाटायला लागली. मग मी तडक फॉरेन्सिक डिपार्टमेंटला गेलो. तिथल्या डॉक्टरांनी डेडबॉडीचा ब्लडग्रुप सांगितला. मी त्या पिंपळपानाची तपासणी त्यांना करायला सांगितली, तेव्हा ती जन्मखूण नसून काळया रंगाच्या शाईने तो मार्क काढल्याचं स्पष्ट झालं. शिवाय डेडबॉडीच्या एका मागच्या दाढेत चांदी भरलेली असल्याचं मला समजलं.
मग माझा पुढचा मोर्चा मी जयेशच्या ऑफिसकडे वळवला. दोन्ही पत्ते आपण घेतले होते ते किती उपयोगी पडले. ऑफिसमध्ये मला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या. जयेशचा एक बिझनेस पार्टनर पण आहे, नवीन शहा त्याचं नाव. दोघांची पर्सनल सेक्रेटरी एकच आहे. तिच्या सांगण्यानुसार जयेश आणि नवीनच्या चेहऱ्यात खूप साम्य आहे. पिंपळपानाची जन्मखूण नवीनच्या हातावर आहे, जयेशच्या नाही. जयेशची सध्या दाताची ट्रीटमेंट चालली होती आणि त्याच्या दाढेत चांदी भरली होती. त्यांच्या ऑफिसच्या डेटाबेसमध्ये जयेश आणि नवीनसकट प्रत्येक एम्प्लॉयीचं पर्सनल रेकॉर्ड आहे. तिथे मला ब्लडग्रुप समजले. त्यावरुन ती डेडबॉडी जयेशची होती हे स्पष्ट झालं.
त्या सेक्रेटरीने अजून एक गोष्ट सांगितली. जयेश आपला बिझनेस वाढवण्यासाठी खूप मेहनत घेत होता. नवीन जरा चालढकलंच करायचा. जयेश आपल्या कामात इतका बिझी होता, की सेजल आणि नवीनचं हळूहळू जुळलेलं सूत बाकी स्टाफच्या लक्षात आलं, पण जयेशला नाही समजलं. मग काय, जिगसॉ पझलचे सगळे तुकडे आपापल्या जागी फिट् बसल्यावर जसं संपूर्ण चित्र क्लिअर होतं, तसा हा सगळा बनाव माझ्या लक्षात आला.
त्या दिवशी नवीनने साधारण दहाच्या सुमारास जयेशचा खून केला. सेजलची साथ होतीच. डॉक्टरांनी जयेशच्या मृत्यूची वेळ ‘दहा’ सांगितली होती. म्हणजे ती दोघं त्याचा खून करुन साळसूदपणे आपल्याकडे आली होती. किती उलट्या काळजाचे असतील, विचार करा. ती आपल्याला रचून सांगितलेली कथा, तद्दन खोटी होती. जयेशच्या हातावर पिंपळपान काढायला पण ते विसरले नाहीत. कारण नवीनच्या हातावरची ती खूण आपल्या नजरेतून सुटणार नाही याची खात्री होती त्यांना. एकदम परफेक्ट नाट्य आपल्यासमोर उभं करून आपल्या डोळ्यात धूळ फेकण्यात ते यशस्वी झाले होते. पण प्रत्येक गुन्ह्यात काहीतरी लूपहोल्स असतातच आणि मग तो गुन्हेगार अलगद जाळ्यात सापडतो.
पंधरा दिवस झाल्यावर आणि कोणाला कसलाच संशय आलेला नाही हे पाहिल्यावर आज सेजल, नवीनला भेटायला हॉटेलमध्ये गेली होती. ही गोष्ट मला रात्री गेटवर पहारा देणाऱ्या गुरख्याने सांगितली. सेजल पोर्चमध्ये फोनवर नवीनशी बोलत असताना त्याने आजच्या भेटीबद्दल सगळं ऐकलं होतं. जयेश रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्येच काम करत बसायचा, तेव्हा हा नवीन इथे बंगल्यावर बरेचदा यायचा, ही आतल्या गोटातली बातमीपण मला गुरख्याकडून कळली. सुदैवाने डेडबॉडी आपल्या ताब्यात असतानाच या अदलाबदलीची भानगड आपल्या निदर्शनास आली म्हणून आपण ह्या गुन्ह्याचं माप नवीन आणि सेजलच्या पदरात टाकू शकलो.
पण या केसमधल्या माझ्या बेपर्वाईची शिक्षा मी स्वतःला करुन घ्यायची ठरवली आहे. ती म्हणजे, मी आता नियमित चित्रपट बघायचं ठरवलं आहे.”या जयदेवांच्या विधानाला, घोडक्यांनी दिलखुलास हसून दाद दिली.
-समाप्त
लेखिका -सौ. राधिका जोशी, पुणे
नैतिक मूल्यांची घसरण झाली की अविचार, अविवेकाची ही कीड माणसाच्या
तनामनाला व्यापते आणि त्याचं आयुष्य पोखरते. याचं उदाहरण म्हणजे ही कथा.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरु नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपसुद्धा जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप सुरेख ….मांडणी उत्कृष्ट
धन्यवाद👍
sundar likhan