कथा -तीन पिढ्यांचा प्रवास

WhatsApp Group Join Now

तीन पिढ्यांचा प्रवास 

कौटुंबिक गेटटुगेदरचे प्रवासवर्णन… 

झुक झुक झुक झुक अगीनगाडी

धुरांच्या रेघा हवेत काढी

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया…

शाळेला ऊन्हाळी सुट्ट्या लागल्यानंतर रेडिओवर बालमैफिल कार्यक्रमात हमखास हे गाणं असतंच. ते गाणं ऐकताना माझ्या बालमनात त्यावेळेस (म्हणजे अजूनही बालमनच आहे माझं )वाटायचं की, ‘ अरे !सगळेच मामाच्या गावाला जात आहेत मग खूप गर्दी असेल ना गाडीला आणि सगळेच मामाच्या गावी गेले मग इथे कोण खेळणार माझ्याबरोबर? मग मी ह्या विचाराने बाबांना सांगे, “बाबा आपण मामाच्या गावी नको जाऊया. तुमच्या गावी जाऊया. ते सुद्धा बस ने जाऊया. कारण सगळेच झुक झुक गाडीने जात आहेत मामाच्या गावी. खूप गर्दी असेल ना त्या गाडीला. त्यापेक्षा तुमचं गाव बरं. बसला गर्दी सुद्धा नाही मिळत.” मग काय आई बाबांबरोबर आम्ही लाल परीतून गावाला. चांगलं महिना दिड महिनाभर राहून शाळा सुरू होण्याआधी यायचं. म्हणजे हा प्रत्येकच घरातील ठरलेला युनिवर्सल प्लॅन. 

आत्ता सगळ्या सुखसुविधा झाल्यावर दर तीन चार महिन्यानी एक लॉंग विकेंड ब्रेक घेऊन कुठे ना कुठे फिरून येतोच. पण अजूनही ऊन्हाळी सुट्टीतील गावाची क्रेझ काही कमी झाली नाही. आधीसारखे दीड महिना नाही; पण निदान आठ पंधरा दिवस तरी जायचंच. (फक्त नवर्‍याच्याच गावी). लग्न झाल्यावर माझ्या गावी जाणं आठ दहा वर्षांनी व्हायला लागलं. ती लालपरी रुसली असेल माझ्यावर. मलाच त्या आठवणींनी भरून आलं. 

मग ठरवलंच ह्यावर्षी ऊन्हाळी सुट्टीत माझ्या गावी जायचं. नवर्‍याला निक्षून विनवणी केली. “ह्यावर्षी तुमच्या गावी मी येणार नाही माझ्यागावी जाणार आहे.” नवर्‍याला माझ्या गावी येण्याचा हट्ट न करण्याच्या अटीवर माझा विनवणीचा अर्ज मान्य झाला. थोडी चलबिचल झाली मनाची. मनात आलंच, ‘हे नाहीत तर सामान कोण ऊचलणार’ ; पण माझ्या लालपरीतून गावच्या वेशीवर गेल्यावर येईल कुणीतरी असा विचार करून, अट मान्य करून अर्ज मंजूर करून घेतला. 

‘पंछी बनू ऊडती फिरू मस्त गगन मे,

आज मै आझाद हू दुनिया के चमन मे…’

अय्या ! सगळ्याच जणींना हेच गाणं कसं आठवतं? मला आश्चर्यच वाटतं . मी सुद्धा हेच गाणं गुणगुणत माझी पेरोल वर झालेल्या सुटकेची बातमी आणि गावी प्रस्थान करण्यास मिळालेली अनुमती आमच्या भावंडांच्या सोशल ग्रुपवर विथ इमोजी पोस्ट केली. ग्रुपवर अभिनंदनाचे आणि “एन्जॉय व्हेकेशन” असे मेसेज येऊ लागले. ऊत्साहात मी त्यांना चिडवण्यासाठी आणि डिवचण्यासाठी मुद्दाम विचारले, “काय मग तुमची पेरोल नामंजूर झाली आहे का? तुम्ही बसा जेलमध्ये.”

‘मै चली मै चली देखो प्यार की गली 

कोई रोकेना मुझे मै चली मै चली… ‘

 हे गाणं पोस्ट करून मी सुट्टीचे प्लॅनिंग करू लागले. मला माहीत होतं माझ्या डिचवण्यामुळे आता फॅमिली पिकनिक होणार. 

झालं ही तसंच अगदीच. दुसर्‍याच दिवशी बहिणींनी आपल्याला मिळालेली सुट्टी जाहीर करून माझ्याबरोबर गावी येण्याचा प्लॅन बनवला. मग दिवसभर मेसेजेसचा पाऊस ग्रुपवर पडत होता. चार पाच दिवसाचे ड्रेसकोड ठरले, त्यासाठी शॉपिंग करण्याचा दिवस ठरला, मुलांचा सुद्धा ड्रेसकोड , त्याचे शॉपिंग, नेण्यासाठी खेळ, खाऊ सगळं ठरवण्यात दिवस निघून गेला. हुश्श ! दमलो बुवा !! किती परफेक्ट प्लॅनिंग आम्हा बहिणींचं. 

अरे पण दुसर्‍याच दिवशी संध्याकाळपर्यंत भावांनी सुद्धा ‘स्वातंत्र्याचे दिवस आमचेही’ असं ग्रुपवर जाहिर करत आमच्याबरोबर गावी येत असल्याचे जाहिर केले. मग काय ग्रुपवर जल्लोषच जल्लोष. काकू, काका, आईबाबांबरोबर फॅमिली टूर ठरवून टाकली. एक बस बुक करायची ठरली. अहो,बस का म्हणून काय विचारता? माझं माहेर फार मोठं. तीन पिढ्या मिळून सत्तर एक माणसं होतात. मग बस नको का? कारण चौथी पिढी सुद्धा आहेच. लहान असली म्हणून काय झालं. 

ठरल्याप्रमाणे शॉपिंगची जबाबदारी आम्ही बहिणींनी घेतली. बस बुकिंग, खाण्या पिण्याची सोय, आगमन निर्गमनाची वेळ ठरवणे ही सगळी सोप्पी कामे भावांना दिली. खाऊचे डब्बे भरणं आई आणि काकू कडे; कारण साक्षात अन्नपूर्णाच त्या. पैशांचे नियोजन काकांकडे दिले, कारण त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे आमचे बालपण सुखकर झाले होते. ‘ दोन चार छान कॅमेरा घेणे’ ही सख्त ताकिद ग्रुपवर टाकण्यात आली होती. फोटोज काढणे आणि रिल्स बनवणे शास्त्र असतं. फिरण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली. असं भन्नाट प्लॅनिंग करून सहलीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो.

निर्गमनाच्या ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेस आम्हा बालमनाच्या भावंडांचा मुलांसोबतचा ताफा बसमध्ये ठरलेल्या जागी  स्थानापन्न झाला. पुढल्या सीटवर आजीआजोबा नातवंडांबरोबर बसले. म्हणजे आम्हीच बसवलं आणि आम्ही फूल टू धम्माल करत जाण्यासाठी मागच्या बाजूस बसलो. गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत आमचा कारवा निघाला. हसत, खेळत, गाणी गात पाच ते सहा तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या गावी श्रीवर्धन ला पोहोचलो. सामानाची लावालावी, जेवणाची व्यवस्था करण्यात तो दिवस निघून गेला. 

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळीच निघून आत्याकडे हरिहरेश्वरला निघालो. आत्याकडे सामान ठेवून आत्याला सोबत घेऊन श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात गेलो. इथे आधी श्री काळभैरव आणि श्री योगेश्वरीथचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे आणि परत काळभैरव आणि योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. त्याप्रमाणे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील अन्य मंदिरात दर्शन करून मंदिराच्या मागील बाजूने प्रदक्षिणा करण्यासाठी निघालो. प्रदक्षिणा डोंगर आणि समुद्राच्या मार्गे पूर्ण करावी लागते. साधारण १५० पायर्‍या चढून ऊतरून मग आम्ही समुद्राच्या खडकाळ मार्गावर आलो. ब्रम्हदेवाच्या पावलांचे ठसे इथे पहायला मिळतात. खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेल्या खडकांमध्ये असलेल्या गोड्या पाण्याच्या गायत्री तीर्थाचे तसेच कामधेनू तीर्थाचे दर्शन घेतले.  समुद्राच्या लाटा आपटून तयार झालेल्या ब्रम्हगिरी टेकडीच्या खडकांवर ऊभं राहून ऊसळलेल्या लाटांचे पाणी दगडावर आपटून अंगावर ऊडणारं पाणी, बेधुंद उडणारे केस सावरताना होणारा गोंधळ अगदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं परफेक्ट फोटोशूट केले. 

दुपारी जेवण झाल्यावर नारळ सुपारीच्या हिरव्यागार बागेत झाडाखालीच चटई अंथरून तिथेच लहानपणाच्या खोड्या, मस्ती आठवत गप्पा मारत होतो. संध्याकाळ होताच तिथूनच बागेच्या मागच्या बाजुला असलेल्या समुद्रावर जाऊन लहानपणाचे लाटांसोबतचे खेळ खेळू लागलो. लाटांसोबत धावण्याचा आणि पाठशिवणीचा खेळ खेळून दमल्यावर वाळूत बसून सगळ्यांनी वाळूचा किल्ला बनवला. मग सुर्यास्त होत असताना पाण्यात ऊभं राहून मनातल्या मनात त्या मावळतीच्या सूर्याला आणि त्या खळाळत्या लाटांना आपापली गुपितं सांगितली. पाण्यातील छोटे छोटे मासे, किडे पायाला गुदगुल्या करून आम्हांला हसवू फसवू पाहत होते. पण पायाखालची सरकणारी वाळू आयुष्यात खूप काही करायचं आहे पण क्षण निघून जात असल्याची जाणीव करून देत होती.  निघून जाणाऱ्या प्रत्येक क्षणांमध्ये  अनंत पसरलेल्या आभाळा एवढे आनंद आणि सुख मिळवण्याचा निर्धार करून आत्याच्या घरी परत आलो. 

दुसर्‍या दिवशी सकाळीच लवकर कोस्टल रोडने दिवेआगरला निघालो.  एका बाजूला हिरवेगार डोंगर आणि एक बाजूस निळेशार पाणी असा नयनरम्य नजारा बघत, फोटोज काढत आम्ही दिवेआगर ला पोहोचलो. १९९७ साली नारळाच्या बागेत तांब्याच्या पेटीत साधारण एका किलोपेक्षा जास्त वजनाची गणपती मुर्ती सापडली आणि ती मंदिरात प्रस्थापित करण्यात आली. तेच गणपती सुवर्ण मंदिर. तिथे दर्शन घेऊन समुद्राच्या दिशेने जात असताना रूप नारायण मंदिरात आणि सुंदर नारायणाच्या मंदिरात दर्शन घेऊन समुद्र गाठला. शुभ्र सोनेरी वाळूच्या  स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त बागडलो. कॅमल सफारी आणि घोड्यांची सफारी करून श्रीवर्धन ला परत यायला निघालो. परतीच्या वाटेवर गर्द वनराईच्या सानिध्यात असलेल्या कुसुमादेवीच्या दर्शनासाठी गेलो. अर्धा रस्ता गाडीने आणि पुढील रस्ता  हसत खेळत, आंब्याच्या झाडाच्या सावलीतून , नारळाच्या झाडांचा वारा झेलत, रंगबेरंगी फुलं गोळा करत पायी चालत पार केला. मंदिरात प्रवेश केल्यावर खूप शांत, सुंदर वाटलं. देवीचं दर्शन घेऊन आंब्याच्या झाडाखाली बसून आराम करून श्रीवर्धन गाठलं.

शेवटचा दिवस सुट्टीचा श्रीवर्धन फिरण्यासाठी ठेवला. सकाळी ऊठून सोमजाई देवीचं दर्शन केलं. नगारा, झांजेच्या नादात मन हरखून आरती केली. गणपती मंदिर आणि लक्ष्मीनारायणाचे दर्शन केले आणि मग काही काळ वास्तव्यास असलेल्या पेशव्यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो. पेशव्यांना मानाचा मुजरा करतानाचा आमचा फोटो भावाने अचूक टिपला. आणि मग त्याच भारावलेल्या अवस्थेत घरी परत येऊन  आपण ही पेशव्यांचे एक शूर सरदार आहोत ह्या अविर्भावात वावरत होतो; पण थोड्याच वेळात जेष्ठांनी आमचा कान पिरगळून आम्हाला वठणीवर आणले. हास्य विनोदात अस्सल पारंपारिक स्वादिष्ट भोजनावर, विशेषतः तुपाची धार सढळ हस्ते सोडलेल्या ऊकडीच्या गरम गरम मोदकांवर ऊभा आडवा ताव मारला आणि मग वामकुक्षी जरा जास्तच वेळ घेऊन संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आलो. मावळतीच्या सूर्याचा निरोप घेऊन केशरी मोहक रंगछंटांना डोळ्यात आणि कॅमेर्‍यात कैद करून, शुभ्र वाळूवर आमच्या पाऊल खुणा सोडून घरी परतलो. 

सहलीची शेवटची रात्र जागवण्याचा कार्यक्रम आम्ही ठरवला होता. आमच्या मुलांना, नवीन पिढीला नाईट आऊट ही संकल्पना आमच्या काळापासूनच आहे हे दाखवण्यासाठी.  फुगड्या, झिम्मा, गाणी, नृत्य, पेटी, तबला वादनाने सूरसंगतीचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. नकलांचाही एक भाग सादर झाला. भोंडल्याची गाणी मग गरब्याची गाणी वाजवत फेर धरून झाला. कार्यक्रमाची आणि ह्या गेटटुगेदर ची सांगता प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करून झाली. खूपसं भावनिक झालो होतो सगळेच. 

आणि मग ऊजाडला परतीचा दिवस. आम्हा मुलींची पाठवणी होत आहे असं वाटतं होतं. सगळेच रडत होतो. कारण हा योग कित्येक वर्षांनी जुळून आला होता. हा योग जुळून येता येता मोठे काका काकू, आत्या हे आमचे हिरे गळून गेले होते. पुन्हा हा योग जुळून येईपर्यंत कदाचित आमचे सगळेच हिरे गळून जातील. ह्या भावनेने आम्ही गलबलून गेलो आणि ठरवलं जे हिरे आत्ता आहेत त्यांच्याबरोबर जितके क्षण, जितक्या आठवणी बांधून घेता येतील तितक्या बांधून घ्यायच्या. ‘कल हो ना हो’ म्हणत कॅमेर्‍यात आमच्या हिऱ्यांना कैद केले आमच्याबरोबर. आत्ता खरंच निघण्याची वेळ झाली. आम्हा मुलींना जरा जास्तच भरून आलं. पण निघणं भाग होतं. 

भावनिक मनाने, गोड आठवणींची शिदोरी घेऊन,  पुन्हा अनुभवलेले बालपण सोबत घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला. आपण अख्खं जग जरी फिरलो तरी आपल्या गावी आपल्या प्रेमाच्या, मायेच्या माणसांसोबत केलेला प्रवास, बालपणीच्या आठवणींसोबत केलेला प्रवास हा नेहमीच अवर्णनीय, सुंदर आणि कायम स्मरणात रहाणारा असतो आणि एका मुलीसाठी माहेर म्हणजे अतिशय भावनिक प्रवास.  तसंच काहीसं माझं झालयं.  

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

तुम्ही सुद्धा अनुभवा असाच अविस्मरणीय प्रवास.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top