सहा वर्षांचा देवांश अगदी सकाळी सकाळी देवळात हजर झाला होता आणि बाप्पाच्या मूर्ती कडे पाहून चिडून बडबड करत होता. त्याला तसे पाहून पुजारी बाबांना हसू आले. ते त्याच्या जवळ आले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून विचारले.
” काय रे देवांश ? आज इतक्या सकाळी तू देवळात आला आहेस आणि आजी कुठे आहे ? ” पुजारी बाबांनी विचारताच देवांश हाताची घडी घालून शांत उभा राहिला.
” देवांश काय झाले ? तू असा का रुसून बसला आहेस ? बोल काही तरी “. पुजारी बाबा देवांशचा हात पकडत त्याच्या हातात लाडूचा प्रसाद देत बोलले आणि लाडू पाहून देवांश खुदकन हसला.
” आता बोल काय झाले ? का असा गालांचा फुगा झालाय बरं ? ” पुजारी बाबा हसत हसत देवांशला विचारु लागले तसा देवांश लाडू खाता खाता बोलू लागला.
” पुजारी आजोबा , काल काय झाले माहिती आहे का ? आमच्या घरी बाप्पांसाठी मोदक केले होते. काल चतुर्थी होती ना म्हणून आई आणि आजीने मोदकांसोबत खीर पण केली होती ” . देवांशचे गोड गोड बोल पुजारी बाबा मन लावून ऐकत होते.
” बाप्पाला मोदक आवडतो तसाच मलाही मोदक आवडतो म्हणून मी मोदक खाल्ला ” . पुजारी बाबा स्मितहास्य करत देवांशचे बोलणे ऐकत होते.
” बरं , मग काय झाले ? ” पुजारी बाबांनी पुढे विचारले तसा देवांश काही विचार करत बोलू लागला.
” पुजारी आजोबा , मोदक तर खाण्यासाठीच असतात ना ? मग बाप्पाच्या आधी खाल्ला काय किंवा नंतर खाल्ला काय. त्याने काही फरक पडतो का ? नाही ना. मग तरीही बाप्पांनी खाण्या अगोदर मी मोदक खाल्ला म्हणून आईने पाठीत धपाटा घातला आणि म्हणाली देवाला आधी नैवेद्य अर्पण करून मगच आपण खायचा असतो. किती वेळा सांगितले आहे पण ; तू काही ऐकत नाहीस देवांश. मला हेच विचारायचे होते बाप्पांना की तुम्ही मोदक खाण्याआधी मी खाल्ला तर काय बिघडले बरे ? पण ; कधी पासून मी एकटाच बडबड करत आहे. बाप्पा फक्त माझ्या कडे पाहत बसले आहेत ” . देवांशच्या निरागसतेचे पुजारी बाबांना फार कौतुक वाटले.
” देवांश, काही फरक पडत नाही बाप्पांना. तू आधी मोदक खाल्ला तरी चालणार आहे त्यांना. ते बाप्पा आहेत देवांश. आपण सगळी त्यांची लेकरे आहोत. काळजी आहे आपली त्यांना. असे बाप्पांवरती रुसू नये “. पुजारी बाबा देवांशला समजावत म्हणाले.
” मग हे सगळं मला बाप्पा का नाही सांगत. मी कधी पासून त्यांना विचारत आहे पण ; ते काही बोलतच नाहीत. मला बोलायचे आहे बाप्पांसोबत ” . देवांश एक हात हनुवटीवर ठेवत म्हणाला.
” देवांश, बाप्पा केवळ इथे या देवळात बसलेत असे नाही. बाप्पा तर सगळ्या चराचरात व्यापून आहेत. सगळीकडे आहेत. फुलाच्या सुगंधात बाप्पा आहेत. पानाच्या गर्द हिरवाईत बाप्पा आहेत. फळाच्या अविट गोडीतही आणि संत महात्म्यांच्या ओवीत ही बाप्पा आहेतच. अभंगाच्या ओळीतही आणि किर्तनाच्या रंगातही बाप्पा आहेत. क्षितिजावरून उगवणारा हिरण्यगर्भही आणि शितलतेचा शिडकावा करणारा शशीही बाप्पाचीच रुपे आहेत. पावसाच्या सरीमध्ये आणि गवताच्या पात्यामध्येही बाप्पा आहेतच देवांश. थोडक्यात काय तर बाप्पा या सृष्टीचे रचेता आहेत.
” म्हणजे काय हो पुजारी आजोबा ? ” देवांशचा सालस प्रश्न पुजारी बाबांना परत एकदा त्याच्या निरागसतेचे दर्शन देऊन गेला.
” म्हणजे ही संपूर्ण सृष्टी , हे जग बाप्पाचे आहे. बाप्पांनी आपल्याला दिलेले वरदान म्हणजे ही सुंदर दुनिया आहे आणि म्हणून पहिला हक्क बाप्पांचा “. देवांश खूप काही समजल्या सारखे मान डोलावत होता.
” हमम्, समजले पण ; हे बाप्पा बोलत का नाहीत? ” परत एक कोवळ्या जिवाचा प्रश्न उभा होताच.
” देवांश , लहान मुले सुद्धा बाप्पाचेच सुंदर , निरागस रुप असतात. पक्ष्यांची किलबिल , पानांची सळसळ , हवेची झुळूक , पाण्याचा खळखळाट या सगळ्यांचे हे बोल म्हणजेच बाप्पांचा आवाज असतो. म्हणजेच या सर्वांच्या रुपात बाप्पा नेहमीच आपल्याशी बोलत असतात देवांश. ही त्या देवाची अनेक रुपे आहेत “. पुजारी बाबांनी समजावून सांगितले तसा देवांश परत उठून देवळात गेला.
इकडे देवांशची आजी जास्वंदीच्या झुडुपामागे थांबून पुजारी बाबा आणि देवांश मध्ये चाललेला संवाद ऐकत होती. देवांशच्या निरागसतेचे आजीला फार कौतुक वाटले. आजी देवळात जाऊन देवापुढे हात जोडून उभ्या असणाऱ्या देवांशच्या पाठीमागे उभी राहिली.
देवाला हात जोडून आजीने लाडवांचा प्रसाद पुजारी बाबांच्या हाती दिला. देवांशने वळून पाहिले आणि समोर आजी दिसताच आजीकडे झेपावला.
“आजी तुला माहीत आहे. सगळं सगळं बाप्पांचं आहे. अगदी सगळं आणि म्हणून पहिला मान बाप्पांचा. हो पण ; बाप्पांनंतर मात्र मीच मोदक खाणार “. देवांशच्या या बोलण्यावर पुजारी बाबा आणि आजी मात्र खळखळून हसू लागले.
समाप्त :
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र वेबसाइटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
निरागसता हे सुद्धा बाप्पांचे एक रूपच आहे. खूप सुंदर ऊत्तर दिले आहे ह्या कथेत प्रत्येक बालबुद्धीला पडणाऱ्या प्रश्नाचे.