मराठी भयकथा – पडका वाडा 

WhatsApp Group Join Now

निहाल आज खूप आनंदात होता कारण बॅंकेत काम करणाऱ्या निहालला नोकरीत बढती मिळाली होती आणि नवीन ठिकाणी बदली झाली होती . त्याने बॅंकेतील सर्व कामे उरकली आणि थोड्याच दिवसांत तो कामाच्या नवीन ठिकाणी रुजू झाला. बॅंकेने त्याच्या राहण्याची व्यवस्था जिथे केली होती ते घर बॅंकेपासून थोडे दूर होते. गाव भाग होता आणि घरही त्या गावाबाहेर होते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आणि डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर असे एकंदरीत सुंदर वातावरण होते. निहालला बॅंकेने दिलेले घरही छान होते. निहालला एकूणच वातावरणाची भुरळ पडली. 

         निहाल नवीन ठिकाणी रुळत चालला होता पण ; येता जाता त्याला वाटेत एक पडका वाडा दिसत असे. घरी यायला उशीर झालाच तर येताना रात्रीच्या अंधारात वाडा अजूनच भकास दिसे. निहालला रात्रीच्या अंधारात त्या पडक्या वाड्याची भिती वाटायची पण ; दुर्लक्ष करुन तो पुढे निघून जायचा. त्याला आश्चर्य वाटायचे की रात्रीच्या वेळी त्याच्या घराकडे जाताना रस्ता अगदी सामसूम असायचा. चिटपाखरुही दिसायचे नाही. निहालच्या बॅंकेत देखील त्या पडक्या वाड्याच्या दंतकथा सांगितल्या जायच्या. बॅंकेत येणारे लोकही कधी कधी त्या पडक्या वाड्याच्या चित्रविचित्र कथा रंगवून सांगायचे. निहाल मात्र या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करायचा. आधीच दिवसभराच्या कामाने थकलेला निहाल घरी कधी पोहोचू या विचारात असायचा त्यामुळे काही गोष्टी त्याच्या समोर असूनही त्याच्या नजरेआड होत्या. 

       त्या दिवशी निहालला घरी परतायला बराच उशीर झाला होता. निहाल गाडी भरधाव वेगाने चालवत होता. आभाळ भरुन आले होते. कधीही पाऊस येईल असे वातावरण झाले होते. वाड्यासमोर येताच अचानक त्याची गाडी बंद पडली. त्याने वैतागून गाडी तिथेच उभी केली आणि चेक करु लागला. इतक्यात त्याला कानाजवळ हळुवार फुंकर जाणवली आणि तो दचकला. उठून इकडे तिकडे पाहू लागला आणि आता तो नखशिखांत हादरला. त्याला कळून चुकले की त्याची गाडी त्या पडक्या वाड्याच्या गंजलेल्या गेट समोर बंद पडली आहे. निहाल घाबरला. बऱ्याच उलट सुलट गोष्टी त्याने आजपर्यंत या वाड्या बद्दल ऐकल्या होत्या. एक एक करुन आत्तापर्यंत ऐकलेल्या सगळ्या वाड्या बद्दलच्या कथा त्याला प्रकर्षाने आठवू लागल्या. भितीची एक थंड लहर त्याच्या सर्वांगातून वाहत गेली. कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. 

       वाड्यासमोरच्या प्रांगणात त्याला काही हालचाल जाणवली पण ; गेट तर बंद होते. गेट तसेही गंजलेल्या अवस्थेत होते. अगदी मोडकळीला आलेले. गेटला एक कुलूप मात्र अडकवले होते. अचानक गेट धाडकन कोसळून जमिनदोस्त झाले आणि निहाल जोरात किंचाळत चार पावले पाठीमागे सरकला . अतिशय घाबरलेल्या अवस्थेत छातीवर हात ठेवून तो जोरजोरात श्वास घेत होता. स्वत:ला थोडे शांत करत त्याने त्या पडलेल्या गेटकडे पाहीले. गेट तर मोडकळीस आलेल्या अवस्थेत होते. बरेच दिवस कोणतीही डागडुजी केलेली दिसत नव्हती. 

          निहालने हळुवार पावले पडलेल्या गेटच्या दिशेने वळवली. सावकाश चालत तो गेटजवळ आला. काही क्षण गेटकडे निरखून पाहिल्यावर त्याने समोर वाड्यावर कटाक्ष टाकला. गूढ आणि रहस्यमयी कथा त्याने त्या वाड्याबद्दल ऐकल्या होत्या. तो तसाच पुढे चालू लागला. गेट पार करुन तो वाड्याच्या दिशेने जाऊ लागला . 

        वाड्याच्या मुख्य प्रांगणात आल्यावर त्याला बंद अवस्थेत असणारा एक कारंजा दिसला. पूर्णपणे कोरडा पडलेला , पाण्याचा लवलेश ही नसणारा तो कारंजा ओलांडून निहाल वाड्याच्या दरवाजा समोर येऊन उभा राहिला. भलामोठा लाकडी दरवाजा होता तो ! त्या दरवाजाला बऱ्याच कड्या कोयंड्या होत्या. दरवाजा ही मोडकळीस आल्या सारखा दिसत होता. 

       निहालने दरवाजा जोर लावून ढकलला आणि तो वाड्यात प्रवेश करता झाला. आतून वाड्याची दुर्दशा झाली होती. वाड्याच्या भिंतींचा रंग उडून गेला होता आणि पोपडे पडले होते. आतील काही दरवाजे अर्धवट स्थितीत होते तर काही पूर्ण मोडकळीस आलेले होते. आतल्या काही भिंती अर्ध्या पडल्या होत्या. सगळीकडे धुळीचे साम्राज्य होते पण खरंच धुळीचे साम्राज्य होते की आणखी कोणाचे ? 

        निहाल इकडे तिकडे पाहत चालत होता की त्याचे लक्ष एका कोपऱ्यात असणाऱ्या दरवाजा कडे गेले. तो दरवाजा पूर्णपणे सुस्थितीत होता. अगदी आत्ताच कोणीतरी आणून बसवल्या सारखा तो दरवाजा दिसत होता. निहाल तो दरवाजा पाहून आश्चर्य चकित झाला. सगळा वाडा पडक्या स्थितीत असताना हा दरवाजा सुस्थितीत कसा राहिला असेल हा विचार त्याच्या मनात फेर धरु लागला. 

         निहाल हळूहळू पावले टाकत त्या दरवाज्याकडे जाऊ लागला . त्याने सावकाश तो दरवाजा उघडला आणि आत जाताच त्याचे डोळे आश्चर्याने भारले. ती खोली पूर्ण सुस्थितीत होती. नीटनेटकी आणि स्वच्छ खोली होती. हे कसे काय असा विचार निहालच्या मनात डोकावला होता की त्याच्या कानावर त्याच्या गाडीचा आवाज पडला. तो धावत त्या खोलीच्या खिडकीजवळ पोहोचला आणि समोरील दृश्य पाहून त्याच्या डोळ्यात मूर्तीमंत भिती उभी राहिली. 

         त्याची गाडी त्याला समोर दिसत तर होती पण ती सुरू होती. मघाशी कोलमडून पडलेले गेट जसेच्या तसे परत उभे होते आणि आता ते नवीन , सुस्थितीत उभे होते. त्याने घाबरत वाड्याच्या संपूर्ण प्रांगणात नजर फिरवली आणि तो गर्भगळीत झाला. वाड्याच्या समोर पूर्ण कोरड्या अवस्थेत असणारा कारंजा आता ओसंडून वाहत होता. त्यातून रंगीबेरंगी पाण्याचे तुषार बाहेर पडत होते. 

       निहाल आता मात्र तिथून पळून जाण्याचा विचार करु लागला. वाड्याबद्दल ऐकलेल्या घटना सत्य आहेत याची त्याला मनोमन खात्री पटली. त्याने जिवाच्या आकांताने धावायला सुरुवात केली. तो धावत वाड्याच्या मुख्य दरवाजा समोर आला आणि समोरील दृश्य पाहून जोरात किंचाळला. निहालची किंकाळी मात्र हवेतच विरली. 

         दोन महिने होत आले होते निहालला गायब होऊन पण ; त्याचा काहीच मागमूस लागत नव्हता. आखिर निहाल गेला कुठे हेही त्या पडक्या वाड्या प्रमाणे गूढच बनून राहिले. 

समाप्त 

टीप : सदर कथा कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. 

    कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद. 

2 thoughts on “  मराठी भयकथा – पडका वाडा ”

  1. रश्मी कोळगे

    कथा मांडणी खूप छान आहे पण कथा अर्धवट वाटतेय..म्हणजे ती खोली कोणाची होती, तो गायब कसा झाला या गोष्टी नाही कळल्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top