कथेचे नाव – पुनर्जन्म

WhatsApp Group Join Now

                  ” अरे माझ्या लेकाला फिट आली आहे. इथे कोणी डॉक्टर आहेत का ?” रेल्वेमधील खचाखच  भरलेल्या डब्ब्यात एक स्त्री आपल्या फिट आलेल्या मुलासाठी मदतीची याचना करत होती.

                    ” नमस्ते ! मी अभिजित धर्माधिकारी. मी एक डॉक्टर आहे. मी तुमच्या मुलाला तपासू का ?” 

                      ” डॉक्टर प्लिज माझ्या लेकाला बघा.” ती स्त्री काकुळतीने बोलली. 

                        ‘ अभिजित धर्माधिकारी. कोण आहेत हे डॉक्टर ? त्यांचा आवाज ऐकून माझे मन का सांगत आहे की, ही तीच व्यक्ती असेल जी माझ्या स्वप्नांत रोज धूसर येते, त्यांचा आवाज मी रोज ऐकते. त्यांच्यापर्यंत पोहचू तरी कशी ? ट्रेनमध्ये किती गर्दी आहे.’ अद्विता डोळ्यांनी त्या डॉक्टरांना शोधण्याचा प्रयत्न करत होती परंतु रेल्वेमधील दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ती स्वतः जाऊ शकत नव्हती का तिची नजर देखील. 

                         अद्विता चार मैत्रिणींसोबत मुंबईहून  एका मैत्रिणीच्या आजोळी म्हणजेच निशाच्या आजोळी कोकणात जायला निघाली होती. शेवटच्या वर्षीची परीक्षा दिल्यावर सगळ्या मुलींना बदल म्हणून कुठेतरी दूरवर जायचे होते म्हणून निशाने आजोळी जाण्याची कल्पना मैत्रिणींकडे मांडली. सगळ्याजणींनी ती कल्पना उचलून धरली. एकतर मे महिना असल्याने सुट्ट्यांचे दिवस त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये अफाट गर्दी. रिझर्व्हेशन करून देखील मुलींना ट्रेनमध्ये गर्दीचा मनस्ताप सोसावा लागत होता. संपूर्ण प्रवासात त्या डॉक्टरांचा आवाज ऐकल्यापासून अद्विता शांत बसली होती. सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत, गाणी गात बसल्या होत्या; पण अद्विताचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते.

                    संगमेश्वर स्टेशन आल्यावर सगळ्या मैत्रिणी उतरल्या. स्टेशनवर उतरल्यावर देखील अद्विता त्या डॉक्टरांचा शोध घेत होती. जरी त्या डॉक्टरांना ती पाहू शकली नव्हती तरी तिचे कान त्या डॉक्टरांच्या आवाजाचा मागोवा घेत होते. स्टेशनमधून बाहेर पडल्यावर का कोण जाणे अद्विताला हे ठिकाण ओळखीचे वाटत होते जणू ह्याआधीही ती इथे आल्यासारखे तिला वाटत होते. 

                     निशाने स्टेशनच्या बाहेर पडल्यावर रिक्षा केली आणि सगळ्या मैत्रिणींना घेऊन पोहचली मामाच्या घरी. निशाच्या मामाचे प्रशस्त कौलारू घर होते. बाहेर मोठे अंगण होते. फळाफुलांनी बहरलेली बाग होती. घरामध्ये माजघर, देवघर, स्वयंपाकघर अशा प्रशस्त खोल्या होत्या. एक मोठा झोपाळा दिवाणखान्याची शोभा वाढवत होता. निशाच्या मैत्रिणी इतकं मोठं घर पाहून भयंकर खुश झाल्या होत्या. एकटी अद्विता आल्यापासून एकदम शांत आणि गूढ वाटत होती. 

                       मुलींनी निशाच्या मामेभावंडांच्या हातात खाऊ दिला. खाऊ पाहून निशाची मामेभावंडं खुश झाली. निशा मैत्रिणींना घर दाखवत होती. निशाच्या आजोळी आल्यापासून अद्विताला वाटत होते की हे घर तिच्या ओळखीचे आहे. या घरात ती पूर्वी आली होती. घराच्या मागच्या बाजूला एक मोठी विहीर होती. त्या विहिरीकडे एकटक अद्विता पाहत राहिली होती जणू ती विहीर तिला खुणावत होती.

                   ” विहिरीच्या बाजूला जाऊ नका ग कोणी.” निशाच्या मामीने सगळ्या मुलींना विहिरीजवळून बाजूला केले. 

                     निशाच्या मामीने मुलींसाठी आंबरस, पुरी, बटाट्याची भाजी, काजू घातलेला मसालेभात असा जेवणासाठी बेत केला होता. सगळ्या मुली जेवणाचा आस्वाद घेत होत्या; पण एकटी अद्विता कुठेतरी हरवलेली होती. शेवटी न राहवून निशाने अद्विताला विचारले, ” काय झालं आहे अदू ? तुला आवडलं नाही का इथे ?”

                    ” नाही ग, असं काही नाही. मला हे घर, इथला परिसर पाहून असं वाटतंय की, मी इथे कधीतरी आले होते. का कोण जाणे मला असं वाटतंय की, माझ्या जन्माचं रहस्य दडलंय इथे.” अद्विता म्हणाली.

                     ” असं काही नसेल ग. अजून वाच  मतकरींना आणि अजून हॉरर पिक्चर बघ. मग हे असेच भास होत राहणार तुला.” निशा म्हणाली.

                      निशाला कितीही सांगितलं तरी आपले म्हणणे पटणार नाही असे वाटून अद्विता शांत बसली. 

संध्याकाळी मुली प्राचीन मंदिरे पाहण्यास बाहेर पडल्या. अद्विताला तेही ठिकाण ओळखीचे वाटत होते; पण आता तिने कोणालाच याबाबत काही सांगितले नाही.

” ए अभिजित ! थांब. कुठे जातो आहेस तिकडे ?” एक मुलगा ओरडला.

” अरे मी फार दूरवर नाही जाणार.” अभिजित म्हणाला.

                     अद्विताला अभिजितचा लांबून आवाज आला; पण अभिजित तिला काही दिसला नाही. त्याचा आवाज पुन्हा एकदा ऐकून तिची खात्री पटली की हाच तो मुलगा जो माझ्या स्वप्नात नेहमी धूसर धूसर येतो.

                     सगळ्या मुली फिरून घरी परतल्या. मामीने मुलींसाठी गरमागरम मुगडाळीची खिचडी, पापड, दही, लोणचं असा बेत केला होता. मामी मुलींना आग्रहाने वाढत होती. अद्विता मात्र न पाहिलेल्या अभिजितचा विचार करत होती.

                     रात्री सगळी लोकं गाढ झोपली. अद्विताला देखील झोप लागली. एक भयंकर स्वप्न तिला पडलं. एक मुलगी, एक मुलगा लपूनछपून आंब्याच्या बागेत भेटतात. मुलीचं घर म्हणजे निशाच्या मामाचं घर दिसत होतं. तो मुलगा म्हणजे तिथल्या माळ्याचा मुलगा. दोघांचं एकमेकांवर अफाट प्रेम. त्यांच्या प्रेमाची खबर मुलीच्या वडिलांना लागली. जमीनदार वडिलांना आपल्या मुलीचे प्रेम पसंत नव्हते. त्या मुलीच्या वडिलांनी क्रूरतेने त्या मुलाला चाबकाचे फटकारे ओढले. चाबकाचे फटकारे खाताना तो मुलगा त्या मुलीचे नाव घेत होता, ‘ मीरा, मीरा ! त्या मुलीच्या वडिलांनी चेव येऊन त्या मुलावर इतके सपासप वार केले की त्याने तो मुलगा जमिनीवर कोसळला तो उठलाच नाही. ती मुलगी ‘ श्याम, श्याम !’ असा आक्रोश करत राहिली. त्याच रात्री तिने आपल्या घरामागील विहिरीला जवळ केले. हे स्वप्न अद्विताला पडले. घाबरतच ती उठली परंतु आता तिने ठरवले होते की ही गोष्ट ती निशाच्या मामाला सांगणार होती. काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे असे अद्विताला राहून राहून वाटत होते.

                    सकाळी तिने निशाच्या मामाला हे स्वप्न सांगितले तेव्हा मामाचा चेहरामोहरा एकदम पलटला. गंभीर होऊन तो म्हणाला, ” हे असं माझ्या आत्याच्या बाबतीत झाले आहे. अद्विता याचा अर्थ तुझा पुनर्जन्म झाला आहे आणि तुझं जे अपूर्ण राहिलेलं प्रेम आहे ते ह्या जन्मात तुला मिळणार आहे. त्याशिवाय हे सारं काही घडून आले नाही. तू इथवर आलीस यात खूप मोठी दैवी शक्ती आहे. माझे आजोबा क्रूर वागले त्याची शिक्षा त्यांनी भोगली आहे. शेवटच्या क्षणी त्यांचे एवढे भयंकर हाल झाले की आम्हाला बघवत नव्हते.”

                    एव्हाना अद्विताच्या सगळ्या मैत्रिणींना सारं काही समजले होते. सगळ्याजणींना अद्विता बद्दल आश्चर्य, भीती, कुतूहल वाटू लागले.

                     त्याच दिवशी दुपारी अद्विता अचानकपणे कोणीतरी बोलावल्यासारखे घराबाहेर चालत गेली. मामा मामीने सगळ्या मुलींना शांत बसा असे खुणावले. अद्विता थेट आंब्याच्या बागेत पोहचली असता तिने पाहिले एक मुलगा तिथे आला होता. तो देखील काहीतरी शोधत असल्यासारखा इकडेतिकडे फिरत होता. त्या दोघांनी एकमेकांना पाहिल्यावर जणूकाही त्या दोघांना गतजन्माची ओळख पटली. ते दोघे गतजन्मातील गोष्टी एकमेकांना सांगू लागले. 

                    तो मुलगा दुसरातिसरा कोणी नसून अभिजितच होता. अभिजित देखील आपल्या मित्रांसोबत नेमका एका मित्राच्या कोकणातील घरी फिरायला आला होता. तिथे आल्यापासून त्यालाही तसेच वाटत होते की, तो इथे यापूर्वी आला आहे. त्यालाही अद्विता सारखे स्वप्न पडल्याने तो देखील आंब्याच्या बागेत आला होता. 

                    अभिजित आणि अद्विताच्या प्रेमाचे रहस्य एव्हाना सगळ्यांनाच समजले होते. त्या दोघांचे प्रेम इतके उत्कट होते की नियतीने त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी त्या दोघांना पुनर्जन्म घ्यायला लावला होता.

                    गेल्याजन्मी दोघांचे प्रेम सफल झाले नसले तरी ह्या जन्मी त्यांचे प्रेम सफल झाले होते. 

( समाप्त )

1 thought on “कथेचे नाव – पुनर्जन्म”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top