शालिनी हुशार मुलगी होती होतकरू होती; पण गरीबीच्या परिस्थितीमुळे तिला शाळेची आणि शिक्षणाची आवड असूनही पाचवीच्या पुढे घरच्यांनी शाळा सोडायला लावली. स्वतः सोबत गवंडी कामाला तिची आई तिला घेऊन जात असे. दुपारपर्यंत गवंडी काम करून संध्याकाळी पुन्हा तिची आई दोन-चार घरी घर कामाला मदत आणि स्वयंपाक करायला जात असे .सिमेंट विटा माती उचलून ओझी वाहून तिचा दिवस संपत असे तरी तिला एवढी अभ्यासाची गोडी होती की आई सोबत घर कामाला ज्या घरी ती जायची तिथून कोणाचे तरी जुने पुस्तक मागून आणायची आणि रात्रीच्या अंधारात रस्त्यावरच्या दिव्याखाली ती ते पुस्तक वाचत बसायची. पोट भरलेलं असो वा नसो पण ज्ञानाची भूक तिला जास्त त्रास देत असे. कुठून तरी ज्ञान मिळेल अशी भूक तिला लागलेली असे. खूप ओढ होती तिला अभ्यासाची पण नशीब साथ देत नव्हतं.
जून महिन्याचा पहिला आठवडा होता. शाळेचं नवीन वर्ष सुरू झालं होतं. नवीन कोऱ्या करकरीत पुस्तकांचा सुवास एक वेगळीच अनुभूती देत असतो. आपल्याला काय नवीन शिकायचं आहे यांचा पुस्तकातले रंगबिरंगी चित्र बघताना मुलांकडून अंदाज घेतला जातो. मुलांना नवीन पुस्तके पाहून खूप छान वाटतं. एक प्रसन्न वातावरण त्यांच्यामध्ये तयार होतं. नवीन कोऱ्या पुस्तकांना कव्हर लावायचं आणि त्यांच्यावर नावाचं स्टिकर लावायचं हा पण एक छान कार्यक्रम असतो.
शालिनी तिची आई जिथे कामाला जात असे तिथल्या काही घरात हा सगळा पुस्तकांचा कार्यक्रम बघत असे. स्वतःसाठी पण अशी कधीतरी आपण पुस्तक विकत घेऊ आणि छान नवीन पुस्तकांचा सुगंध घेत आपण अभ्यास करू अशी स्वप्न बघत असे पण ते पूर्ण होणं सध्याच्या परिस्थितीत अवघड वाटत होतं.
ती आई सोबत जायची तिथल्या मुलांना शाळेच्या पुस्तकांना कव्हर घालायला मदत करत असे आणि स्वतःची थोडीशी हौस भागवून घेत असे. मुलेही आनंदाने तिला आपल्या उपक्रमात सहभागी करून घेत असत आणि यातच ती बिचारी फुल ना फुलाची पाकळी समजून आनंद मानत असे.
नवीन दप्तर नवीन गणवेश नवीन पाण्याची बॉटल अशी सगळी खरेदी झाल्यावर बच्चे कंपनी अगदी खुशीत असे आणि शालिनी बिचारी त्यांच्या आनंदात आपला आनंद मानत असे.
शाळा चालू झाल्यावर मित्र मैत्रिणींना भेटण्याचा उत्साह तर कोण सांगणार. सुट्टीतल्या गमती जमती कधी एकदा जाऊन सांगते असं सगळ्यांनाच होतं असे. शिक्षकांना भेटायची सुद्धा एक ओढ असते. आदरयुक्त भीती असली तरी एक शाळा एक कुटुंबच होऊन जात हळूहळू आणि मग एक आपुलकी असते शिक्षकांबद्दल पण.
नवीन वर्षाचा अभ्यास अवघड असेल की सोपा आपल्याला जमेल ना अशी एक धाकधुक सुद्धा मनात असते. हे सगळं शालिनीला स्वतः साठी अनुभवायच होतं.
ती तिच्या आईसोबत कामाला जायची ती एक सुशिक्षित लोकांची सोसायटी होती.
तिथले सेक्रेटरी दीक्षित काका यांच्या घरी सुद्धा ती तिच्या आईसोबत कामाला जात असे. त्यांची परिस्थिती काका जाणून होते आणि म्हणूनच कुठेतरी त्यांच्या मनात या हुशार मुलीबद्दल एक वेगळी आपुलकी होती त्यांना तिच्यासाठी काहीतरी करावेसे वाटत होतं. तिचं शिक्षण व्हावं तिने तिच्या हुशारीचा योग्य वापर करून त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर यावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती.
बरेच दिवस ते या गोष्टीवर विचार करत होते जेव्हा जेव्हा ते तिला बघत तेव्हा एवढ्या हुशार मुलीला गवंडी काम आणि घरकाम करण्यात तिचे बालपण वाया घालवावे लागते याचे त्यांना खूपच वाईट वाटत असे.
एकदा सोसायटीच्या मीटिंगमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडण्याचे ठरवले सोसायटीचा मंथली इन्कम रोजचा खर्च करून सुद्धा बऱ्यापैकी शिल्लक असे त्यातून काहीतरी समाज सेवा करण्याचा विचार सोसायटी समोर मांडण्याचा त्यांच्या मनात होतं. ठरल्याप्रमाणे दिक्षित काकांनी हा मुद्दा सगळ्यांसमोर मांडला.
काही लोकांनी लगेच अनुमती दिली तर काहींनी स्पष्ट नकार दिला. अर्थात दोन्ही बाजूंनी विचार करणारे लोक असतात. काही जण त्यांच्या बाजूने होते तर काही जण विरोधातही होते. आपण आपल्या कष्टाच्या पैशाने सोसायटीचा मेंटेनन्स भरतो आणि ते पैसे दुसऱ्या कोणासाठी तरी का वापरावे असं काहींचं मत होतं. जो तो आपापल्या जागी बरोबर होता. त्यामुळे निर्णय काही होत नव्हता.
पण दीक्षित काका सुद्धा जिद्दी होते. त्यांनी शालिनीला सोसायटी मीटिंगमध्ये आमंत्रित केले होते. तिला सोसायटीतील महत्त्वाच्या लोकांसमोर काही प्रश्न विचारले गेले आणि ही मुलगी किती चुणचुणीत आहे आणि तिला मदत करणं हे किती योग्य आहे कुठे तुमचा पैसा वाया जाणार नाही उलट यातून तुम्हाला समाधान कसं मिळेल हे सगळं त्यांनी सोसायटीतल्या मंडळींना पटवून दिले. त्यांनी हे ही समजावून सांगितले की आज आपण सक्षम आहोत तर आपण गरजू लोकांना मदत करु. उद्या ते सक्षम होतील आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदत करतील. अशा प्रकारे हे आनंदचक्र पुढेही चालत राहिल. काही नाईलाजाने आणि काही आनंदाने कसेही का होईना पण सगळे शालिनीला आर्थिक मदत करण्यास तयार झाले.
पुढच्या वर्षी शालिनीला शाळेत ऍडमिशन घेतलं गेलं आणि कोऱ्या करकरीत पुस्तकांचा सुवास घेण्याचं तिचं स्वप्न दीक्षित काकांच्या मदतीने पूर्ण झालं. नवे कोरे पुस्तक हातात घेऊन ते दीक्षित काकांना धन्यवाद म्हणायला आणि त्यांच्या आशीर्वाद घ्यायला ती सोसायटीत पोहोचली. दीक्षित काकांनी तिला मनापासून आशीर्वाद दिले आणि समजावून सांगितलं की तुला या संधीच सोनं करायचं आहे मोठ्या मुश्किलने तुला ही संधी मिळाली आहे ती गमावू नकोस कष्टाने तिचं चीज कर.
तिने दीक्षित काकांना वचन दिलं किती त्यांची ही मदत सार्थकी लावेल. तिने खूप मेहनतीने अभ्यास करायचं ठरवलं. पुढच्या वर्षीपासून तिने वेगवेगळ्या स्कॉलरशिप परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली आणि तिथून पुढचं शिक्षण तिने स्कॉलरशिपवरच पूर्ण केलं.
एवढेच नाही तर घरात हातभार म्हणून ती लहान मुलांची शिकवणीही घेत असे आणि ती ज्या मुलांना शिकवत असे, त्यांच्यातही तिच्यासारखीच अभ्यासासाठी जिद्द आणि चिकाटी निर्माण करत असे. तिने तिच्या गरीब वस्तीतल्या कितीतरी मुलांना चांगले वळण लावले आणि शिकवणीतून फक्त अभ्यासच नाही तर चांगले नागरिक घडवण्याचे कार्यही ती करत होती. ती तिच्या वापरलेल्या पुस्तकांची एक छोटीशी लायब्ररी बनवून ती या मुलांसाठी उपलब्ध करून देत असे. तिचे बघून इतर लोकही त्यांना लागत नसलेली पुस्तके तिथे आणून देत असत जेणेकरून कोणीतरी त्या पुस्तकांचा वापर करेल आणि लाभ घेऊ शकेल.
परिस्थितीने तिला खूप अडथळे पार करायला लागत होते पण ती पण हट्टी होती ती कुठेच मागे राहिली नाही तिने स्वतःचा संघर्ष सुरूच ठेवला. आणि म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग,
डॉक्टरकीची एंट्रन्स परीक्षा देखील ती सहज पास झाली आणि गव्हर्मेंट कॉलेजमधून तिने वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवलं एवढेच नाही तर ती दरवर्षी वर्गात प्रथम येत होती आणि काहीच दिवसात ती एक प्रतिष्ठित नामांकित डॉक्टर म्हणून नावारूपास आली पण तिचे पाय नेहमीच जमिनीवर होते. तिला आपण कोणत्या परिस्थितीतून आलो आहे याची जाणीव होती आणि म्हणूनच तिने गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या नावाने स्कॉलरशिप चालू केली जी की तिच्यासारख्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात असे.
हे समाजाने लक्षात घेण्याची गरज आहे की चांगल्या गोष्टीसाठी अशा प्रकारे समाज सेवा करून मदत केल्याने ज्या लोकांनी या समाजसेवेचा लाभ घेतला आहे ते पुढे जाऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर त्यांना जशी मदत मिळाली तशी मदत गरजू लोकांना करू शकतील आणि असं हे आनंदचक्र पुढेही फिरत राहिल.
अशा प्रकारे तिने सिद्ध केलं की कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्यात नक्कीच यश मिळवू शकता फक्त गरज आहे ती जिद्द आणि चिकाटीची.
लेखिका- सौ. माधुरी शेलार, नवी मुंबई
छान 👌👌