मराठी कथा – झेंडू

WhatsApp Group Join Now

     झेंडू

      ” राया मी काय म्हणतुय जरा ऐक की . आरं दर न्हाय त्या झ्येंडूला . कशापायी एकरबर झ्येंडू करतुयास. त्या परीस माळवं लाव. दर तर यिल त्येला ” . आबा कधीपासून रायाला समजावत होते ; पण राया म्हणजे अतिशय जिद्दी आणि हट्टी होता. एक एकरात झेंडूचे पीक घ्यायचे आणि त्यातून बक्कळ पैसा कमवायचा. कमावलेल्या पैशातून मोठा ट्रॅक्टर घ्यायचा . शेतीत आधुनिकता आणायची. असा विचार करणारा राया वडिलांचे म्हणणे टाळत होता. आपल्याच मतावर ठाम असणाऱ्या रायाने शेवटी झेंडूच लावला आणि आबा हताश झाले.

         ” आबा दसरा यितुय. झ्येंडूला पक्का दर मिळणार. आस्सा टप्पोरा आणि पिवळाशार झ्येंडू फुललाय ” . राया समोर पसरलेल्या पिवळ्या आणि आकर्षक झेंडूच्या फुलांकडे नजर टाकत बोलला. त्याचे एक एकरात फुललेले झेंडूचे रान सगळ्या शिवारात उठून दिसत होते. कौतुकाने तो त्या रानाला निरखत होता. आबाही खूश झाले त्या टपोऱ्या , मखमली , पिवळ्याशार फुलांना पाहून ; पण अजूनही शंकाकुशंका मनात होतीच. आबांच्या रानाची देखरेख करणाऱ्या पक्याही होता. तो देखील रायाला खूश पाहून खूश होता. रायाचा बालपणीचा मित्र होता. गरीब घरच्या पक्याला आबांनी काम दिले होते. तो इमानेइतबारे रायाची साथ देत होता. 

      राया खूश होता. जिवापाड मेहनत फळाला येताना दिसत होती. बघता बघता फुलांची काढणी सुरू झाली. पिक तर जोमात आले होते. रायाला फुलांच्या विक्रीतून नफा मिळू लागला. 

       दसरा जवळ येताच रायाने अजूनच स्वत:ला कामात झोकून दिले. पक्याही सोबतीला होताच. दिवसरात्र एक केला रायाने या फुलांसाठी. आबा त्याची मेहनत पाहत होते. आनंदी होत होते. रायासारखा मेहनती , समजूतदार आणि कष्टाळू मुलगा मिळाल्याचे त्यांना समाधान होते. 

      दसरा येताच अचानक फुलांचे भाव वाढले आणि रायाला अजूनच फायदा होऊ लागला. दररोज फुलांची पोती बाजारात पोहोचू लागली. राधाक्का देखील आपल्या मुलाची प्रगती पाहून हरखून गेल्या होत्या. दररोज रानात जाऊन ती भाबडी माऊली त्या देखण्या फुलांच्या ताटव्याची कपाळी बोटे मोडून दृष्ट काढत होती. 

      आज देखील राया पोती बाजारात टाकून बाजारातून परतत होता. त्याने साशंक नजरेने आभाळाकडे पाहीले. आभाळ चांगलेच भरुन आले होते. पाऊस पडणार हे नक्की होते. रायाने दुर्लक्ष केले. राया घरी पोहोचला ; पण तरीही राहून राहून लक्ष भरलेल्या आभाळाकडे जात होते. घरात जाणारा राया तसाच आल्या पावली माघारी वळला. आतून राधाक्का त्याला हाक देत होती ; पण राया ती हाक ऐकायला थांबला नाही. वाऱ्याच्या वेगाने आपली दुचाकी घेऊन तो रानात पोहोचला. समोर झेंडूची रोपे पाहताच क्षणात त्याचे अस्वस्थ मन शांत झाले. तो स्वतःशीच हसला आणि घराच्या वाटेकडे परतला. 

       रात्रीची जेवणे आटोपली. आबांचे लक्ष मात्र बाहेर होते. सतत आतून बाहेर आणी बाहेरुन आत येरझाऱ्या घालणाऱ्या आबांना पाहून राधाक्का देखील अस्वस्थ झाल्या होत्या. आबा बराच वेळ जागेच राहीले ; पण पाऊस काही आलाच नाही आणि म्हणूनच थोडीफार मनाची समजूत घालत ते झोपेच्या अधीन झाले. झोप तर नीट लागलीच नाही आणि पहाटे कधी तरी डोळा लागतो न लागतो तोच कसल्याशा आवाजाने आबांना जाग आली. आबा झटकन अंथरुणात उठून बसले. चाचपडत चष्मा शोधला आणि भिंतीवरील घड्याळात पाहीले. सकाळचे सहा वाजले होते. आबा लगबगीने उठून बाहेर गेले आणि त्यांच्या काळजात धस्स झाले. पाऊस पडून गेला होता आणि अंगणात पाणीच पाणी झाले होते. आबांनी पुढे होत समोरील रस्त्यावर नजर टाकली तर पाण्याचे लोट वाहत होते. याचा अर्थ मुसळधार पाऊस पडून गेला होता आणि याचाच अर्थ आबांच्या डोक्यात थैमान घालू लागला. मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आबा एकटेच धावले त्यांच्या लाडक्या रायाच्या लाडक्या झेंडूच्या रानाकडे ! 

      चिखलाने माखलेले रस्ते , निसरड्या झालेल्या वाटा या कशाचीही पर्वा न करता आबा धावत होते. सरतेशेवटी ते कसेबसे झेंडूच्या रानाच्या बांधावर पोहोचले आणि समोरील दृश्य पाहताच धाडकन खाली कोसळले. धाय मोकलून रडू लागले. रडता रडता स्वतःला शांत करत एकटक त्या फुलांच्या ताटव्याला न्याहाळू लागले आणि काही तरी जाणवताच आबांनी हळूहळू मान पाठीमागे वळवून पाहिले तर राया अगदी स्तब्ध उभा होता. आबा गडबडले. धडपडत उठले आणि रायाकडे जाणार तोच राया जोरात ओरडला. 

      ” न्हाय न्हाय न्हाय आसं कसं झालं ? माजं रान , माजी झेंडूची फुलं , रोपं आशी कशी बुडाली ? ” राया आक्रोश करत पाण्याने तुडुंब भरलेल्या झेंडूच्या रानात धावला. सगळी झेंडूची रोपे पाण्यात बुडली होती. राया वेड्यासारखा त्या पाण्यात आणि चिखलात धडपडत होता , पडत होता आणि परत उठून धावत होता. हातात येतील ती रोपे छातीशी घट्ट कवटाळत होता. राया हंबरडा फोडून रडत होता. मागून आलेला पक्याही हताश होऊन समोरील दृश्य पाहत होता. डोळे काठोकाठ भरले होते. 

     आबा आणि पक्याने कसेबसे रायाला बांधावर आणून बसवले. रायाचे अश्रू थांबले होते ; पण कासावीस नजर अजूनही त्या रोपांवर गढली होती. आतापर्यंत आबांनी स्वतःला सावरले होते. त्यांनी हळुवारपणे रायाच्या खांद्यावर हात ठेवला. 

       ” आबा , पाऊस तर सगळीकडंच पडला आसल. रस्त्यावर , झाडावर , शहरात , गावात , नदीत , समुद्रात ; पण जितकं नुकसान त्यानं माजं केलं त्येवडंच नुकसान सगळ्याचंच केलं आसल का ? ” राया भरल्या डोळ्यांनी आबांकडे पाहून विचारु लागला. आबांना कळेना रायाला काय म्हणायचे आहे. 

       “आबा , माजंच नुकसान एवढं का झालं ? मी शेतकरी हाय म्हणून का ? पावसाचा मार मीच का म्हणून जास्त सहन करायचा आबा ? मी शेतकरी हाय म्हणून ? मी का बळी पडायचं पाऊस , पाणी , वाऱ्याला , दुष्काळाला ? ” राया कंठ दाटून बोलत होता. 

      ” माजीच येवढी परीक्षा का आबा ? मी शेतकरी हाय म्हणून का ? मला न्हाय करायची शेती. असं होणार आसल तर मला न्हाय करायची शेती. ” रायाच्या म्हणण्यावर क्षणभर आबा गोंधळले होते ; पण आता आबा पुरते सावरले. 

        ” राया , या पावसावर तर शेतकऱ्यानं आजपातूर भरभरून माया केली आणि पावसानं पण या शेतकऱ्यावर मनापासून ममतेचा शिडकावा केलाय. तू शेतकरी हायस म्हणून ह्यो पाऊस जरा जास्तच तुझ्या पदरात पडला हाय. गोड मानून घे. तसं बी झालं गेलं इसरुन फुडची वाट चालायची असती राया. तू शेतकरी हायस याचा अभिमान हाय न्हवं तुला मग आज आसा कसा खचून गेलास ” . आबा समजावत होते आणि रायाही आता शांत झाला होता. 

       ” राया शेतकरी उन , वारा , पाऊस सगळं सहन करतो. शेतात राबून मोती पिकिवतो ; पण जर शेतकऱ्यानं थांबायचं ठरवलं तर जग थांबल. जितं हाय तिथंच. तू थांबलास तर दुनियेनं खायचं काय राया. शेतकऱ्याला थांबायची अन् थकायची परवानगी न्हाय दिली निसर्गानं. का म्ह्यायती हाय राया ? जग उपाशी राह्यल राया. जगाला पोसणारा शेतकरीच जर म्या शेती करत न्हाय म्हणत आसल तर दुनियेला पोटाला कोण घालायचं राया? तू , शेतकरी हायस आन् हे इसरु नगो की शेतकरी जगाचा पोशिंदा हाय ” . आबांचा कंठ दाटून आला. 

       ” चल उठ राया , पुन्यांदा हुबा र्हा. पुन्यांदा सुरुवात कर. तू शेतकरी हायस आन् शेतकरी कधी बी थकत न्हाय. उठ आन् परत नव्या जोमानं सुरुवात कर. आरं हीच तर शेतकरी आसल्याची खूणगाठ हाय. हासत सामोरं जा राया या संकटाला आणि लाव परतावून. दाखवून दे त्याला की शेतकरी कधी बी हार मानत न्हाय ” . राया भरल्या डोळ्यांनी आबांकडे पाहू लागला. चेहऱ्यावर स्मित उमटले. 

       ” आबा , माझं म्हातारं आभाळ आजून थकल्यालं न्हाय आन् म्या का म्हणून थकून जाऊ या एवढ्याशा आडचणीनं. म्या पुन्यांदा हुबा राह्यन आबा. माझ्यात त्यवडी ताकद हाय दुनियेला पोसायची. म्या हारणार न्हाय कारण म्या शेतकरी हाय ” . राया आबांच्या गळ्यात पडून रडू लागला आणि दूर उभ्या पक्याने आपले डोळे पुसत बांधाकडे धाव घेतली. 

समाप्त :

कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाइटला भेट द्या. आमचे what’s up चॅनेल फाॅलो करा. धन्यवाद. 

1 thought on “    मराठी कथा – झेंडू”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top