“राम राम मंडळी”, मी ढेमसे गावातला ‘नारू’
म्हणजे “नारायण” सर्व मंडळी प्रीरमानी ‘नारू’ म्हणतात. आज मी तुम्हांसनी आमच्या गावाविषयी माहिती सांगणार हाये.
ढेमसे गाव डोंगरावर वसलेले साधारण पाच-सहा हजार लोकवस्तीचे छोटेसे टुमदार गाव. गावामंधी बजरंगबली चे सुरेख मोठे मंदिर. मंदिराच्या बाजूला मोठा पिंपळवृक्ष व त्याच्या भोवती बांधलेला भलामोठा पार.
पाराच्या खालच्या अंगाला यसटी स्टँड.
दिवसातून एकदाच यसटी गावात येते.
काही कारणामुळे यसटी नाही आली तर ढेमसे गावकऱ्यांचा तालुक्याच्या गावाशी संबंध येत नाही. पावसाळ्यात जनू ढेमसे गावकऱ्यांना अज्ञातवासातच राहावे लागाते.
जमीन काळी व सुपीक असल्यामुळे शेती चांगली होते. गावामध्ये सकाळच्या पारीला पुरुष मंडळी पारावर बसून पत्ते कुटतात, तर सर्व बायाबापड्या शेतामध्ये मोलमजुरी करतात.
दहावीपर्यंत एकच शाळा व एक शिक्षक “आल इन वन”. सगळ्यांनी टाळ्या वाजवून नारूचे कौतुक केले. “सॉलिड फ्रेंडा”, म्हणत जोनीनी नारूला कवेत दाबले.
अरे भावा एवढा छान बोलला की रे तू?
नारूने मान झुकवत एक डोळा मारत म्हणाला ”आपुल्या मास्तुरेने एकदा लिहुलेला कागद सापडला. तालुक्याला त्याच्या संग गेलो होतो, तो भाषणाचा कागद माझ्याकडेच राहिला आज बघ कसा कामी आला…”
बघ दोस्ता आत्ताच मी तुझं शूटिंग घेतलंय तुला माझ्या चॅनलचा ‘हँकर’ करतो बघ जोनी म्हणाला.
नारू येड्यागत चेहरा करत म्हणाला,”हागर म्हणजे काय रे भावा?”तू तर सॉलिड हींग्लिश बोलतो ,आम्हासनी काय बी समजत नाही जरा इस्कुटुन सांग.
अरं फ्रेंडा !‘हागर’ नाही ‘हँकर’ म्हणजे “सूत्रधार” की रे. एवढा बी नाही समजले तुला?आपला अमिताभ त्यो नाही का करत ‘कौन बनेगा करोडपती’ समज मित्रा तू आपल्या गावचा ‘बच्चन’ त्योच रोल दिलाय तुला. अरे भावा तू सातवी पास हाय ना तू ? कोणी शिकवलं तुला?नारू शरमेने गप्प बसला.
जोनी नारूला म्हणाला,”भावा तुला माझ्या चॅनलचा हॅंकर केले आहे ,तुला थोडा पैका द्यावा लागेल त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. एकदा का आपला चॅनल सुरू झाला की बघ पैक्याचा पाऊस पडेल आपण दोघे पार्टनर.
नारूने थोडा ईचार केला व म्हणाला ,”एक पारी काय शूट केलाय ते दाखव की?”
जोनीनी ऐटीत मोबाईल सुरू केला आणि लक्षात आले की रेकॉर्डिंग करायला बटनच दाबले नव्हते. सगळ्या गावासमोर नारूचे हसे झाले होते.ठेवणीतल्या दोन शिव्या हासडून नारूने पायातली वहाण जोनी वर फेकून मारली. ‘चॅनलचा बच्चन नाही हा तर नुसता बोल बच्चन आहे बोल बच्चन’ कोणी एका टवाळाने मागून जोरात आरोळी ठोकली.
आता मात्र जोनी पुढचा बकरा शोधायला बाहेर पडला. थोडे डोके खाजवून त्यानी आता अंड्याला गाठायचे ठरवले.
ए अंड्या एक भारी बिजीनेस आयडिया हाय फस्ट तुला ईचारत आहे, बाद में नहीं बोलनेका ‘क्या भाई बतायाचं नहीं’ जोनी उर्फ ‘जनार्दन’ म्हणाला.
अंड्या नुकताच झोपेतून जागा होत होता.
तसे ढेमसे गावातली ही जोडी म्हणजे ‘जय’ व ‘वीरू’ शोले मधले .अंड्या म्हणजे ‘अनंत’ पण आईबापानी ठेवलेली नाव पोट्टी सरळ घेतील तर ‘आई शप्पथ’ .अंड्या खडबडून जागा झाला. भाई सांग काय आहे तरी काय डोक्यात किडा तुझ्या?
फकस्त तू तुझ्या बापा कडन ‘ऐपलचा’ फोन घे जोनी म्हणाला. ‘जोनी’ अरे काय दोस्ता सकाळच्या पारीला लावून आला की काय? अरे फ्रेंडा जोनी, अरे तू म्हराठीत बोल की रे दोस्ता काय बी समजून नाही राहिला अंड्या वैतागून म्हणाला.
अरे! अंड्या जरा स्लोस्लो घे की? सगळं सांगतोयस इस्कटून तुला.
अंड्या आता आपुन ‘ईसतार’ होणार ना, मंग थोडं तरी नको का बोलायला विंग्लिश…बर जरा जमवतो म्हराठी…’फ्रेंडा’ म्हणजे ‘दोस्त’ की रे ‘ईसतार’ म्हणज नटनट्यांना विग्लिश मध्ये म्हणतात आणि आकाशातल्या चांदण्यांना पण तेच तर म्हणतात की रे बाप्या…पाचव्या इयत्तेत मास्तुरीने शिकवली होती की तुला भाभा…..वा ईसरलास की काय तू? एक टपली मारत जोनी म्हणाला.
आपण आपलं ‘यूतुब’ चानल सुरू करू.
आता ती नाक्यावरची बेबी तिला जाऊन फकस्त पकडायचं. “अब बो बो बो, येडाबीडा झाला आहेस की काय तू? ती म्हैस घेईल शिंगावर आपल्या दोघांसनी.. अरे जरा ढंगाचे काहीतरी बोल” अंड्या चउताळून जोनी वर चढला.
अरे! मॅडा, बेबी काय करते? झंपर शिवते, तिला घ्यायचं तिला पण ‘एक्सपोज’ करायचं की रे..
बाबो तो चानल करायचा तुझ्या एवढं विग्रजी नाही जमणार बाबा? अंड्याने कबुली दिली. जोनी कॉलर टाईट करत ,अरे तिला त्या बेबीलाबी जरा देऊनच चानस त्यालाच विंग्रजी मध्ये ‘एक्सपोज’ म्हणतात.
अंड्या तिचं तू सुटिंग घ्यायचं. आता बघ काहीबी घरातले कापडं घ्यायची, ते बायांचे साडी, झंपर, परकर, ती बाआआआ.. अरअरं थांब… ईषय जास्त खोलात नको रे बाबा! समद उघड सांगू नको अंड्या बोंब मारत म्हणाला.
ती फाडायची मग तिच्यापासून काहीतरी येगळच बनवायचं पब्लिक खुळ असतं, ते बघत बसतं मंग जेवढे जास्त बघत तेवढ जास्त पैका आपल्याला मिळतं.
बेबीला चनास दिला ती पण बापडी खुश आणि जो काही फ्राफीट तो हाप हाप आपण दोघं पार्टनर ना…
मंग जायचं सुलभीकडं तिला बी करू की काय रे ते ,अवघड शब्द ‘एक्स्पो’. ‘लय भारी’ अंड्या तू तर एकदम ‘ईंटलीज’ निघाला की रे भावा. सुलभीला म्हणायचं कर काहीतरी ‘डीस’ ‘खांटोळी’, ‘उकडपेंडी’. तिचं बी तू चांगलं शूटिंग घ्यायचं ‘ग्रामीण पदार्थ’ सुलभी कडंन असं काहीतरी बोलायचं .. मग काय पब्लिक बघेल आणि तसं काहीतरी करेल .
जेवढं जास्त पब्लिक बघेल तेवढा आपल्याला प्रॉफिट…जोनी सारखं सारखं ठासून अंड्याला सांगत होता…बघ भावा या बिझनेस साठी खूप लोक माझा पार्टनर राहिला तयार आहेत, पैसा इन्व्हेस्ट केला तर हाफ हाफ प्रॉफिट तुला मिळेल..
जोनी इयत्ता पाचवी पासून तालुक्याला शिकायला गेला होता. अधून मधून गावात यायचा, रंगीबेरंगी कपडे, डोळ्याला गॉगल आयटीत येऊन सगळ्यांशी त्याच्या खास शैलीत ले विग्लिश बोलणार.
सतत काहीतरी नवीन धंदा करायचे डोक्यात घोळणार व त्याच्यासाठी नवीन नवीन बकरे शोधायचे “इसकी टोपी उसके सर” करत गावभर उडारायचा.
बराच वेळ शांतपणे ऐकणारा अनंतचा मोठा भाऊ विशाल जोनी व अंड्याच्या जवळ आला. विशालनी BA पॉलिटिकल सायन्स मध्ये केले होते. राजकारणात जाऊन गावाचा विकास व समाजकारण करायचे त्याचे स्वप्न होते. त्याचा धाकटा भाऊ व त्याचे सर्व मित्र खूपच उनाड होते.
जोनी उर्फ जनार्दन याचे विचित्र इंग्लिश व कॉन्फिडन्स पाहून त्याला जाम आश्चर्य वाटले.
आता जनार्दन व अनंत या दोघांचे बौद्धिक त्यांनी घ्यायचे ठरवले.
“काय रे जन्या, आता काय नवीन खुळ डोक्यात आले तुझ्या? आणि कसलं रे हे घाणेरडे तुझे इंग्लिश तुला काय लाज वाटते का आपल्या मातृभाषेत बोलायची. चुकीचं बोलण्यापेक्षा नीट मराठीत तरी बोल आणि एवढी हौस असेल तर चार पुस्तके वाचून स्वच्छ व चांगले इंग्लिश तरी बोल”विशालने जोनीला फैलावर घेतले.
“अरे बास की? केवढा माझा इन्सुलीट करतोयस तू, अरे काय चुकलं असेल तर सांग की एकदम करेक्ट करतो की भावा”जोनी एकदम खवळुन म्हणाला.
विशालनी आता दोघांना समोर बसवले व त्यांना सांगायला सुरुवात केली. जनार्दन जे म्हणतो आहे ते जर तुम्ही नीट शिकलात तर नक्कीच तुम्हाला भरपूर पैसे मिळतील.
कुठलंही काम करायचं असेल तर त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे आहे.
“यूट्यूब चैनल” म्हणजेच “डिजिटल मार्केटिंग”
यामध्ये तुम्ही तुमची विविध कल्पना, कलागुण, तुमच्या कुठल्याही धंद्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्केटिंग करू शकता.
आता जनार्दनचे इंग्लिश या विषयावर विशालने खास भाष्य केले.
‘एक्सपोज’ या शब्दाचा अर्थ खूप वेगळा होतो म्हणजे ‘उघडे करणे’
जनार्दन तुझा हेतू चांगला होता पण चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे नक्कीच गोंधळ उडाला.तुला “एक्सपोजर” म्हणजे बेबीच्या कलागुणांना वाव देणे म्हणायचे होते.
आता ‘फ्रेंडा’ असा कुठला शब्दच नाहीये खरा शब्द “फ्रेंड” आहे.
‘हॅंकर’ ‘हागर’ असा कुठलाही शब्द नसून “अँकर” म्हणजे सूत्रसंचालन करणारा “सूत्रधार” एपल नसून “ऍपल” आणि ‘ईंटलीज’ नसून “इंटेलिजंट” म्हणजे हुशार…विशाल हे सांगताना खूपच दमून गेला “बाबांनो नीट बोला. जे काय करणार आहात ते नीट करा. गरज पडली तर आधी शिकून घ्या. इतक्या गोष्टी सोप्या नसतात…आणि हो ‘ईसतार’ नाही बर का त्याला “स्टार” म्हणतात….”
विशालचे बोलणे ऐकल्यावर जॉनी व आंड्या एकमेकांकडे बघून ‘ओके’ ‘गोट इट’ म्हणाले..
बास! ढेमसे गावात सगळ्यांनाच एकदा ‘एक्स्पोर्ट’ करून टाकू…मग आपल्याकडे पैका च पैका आणि “जोनी अंड्या “ईसतार ….
आता मात्र विशालला जवळजवळ चक्कर यायचीच बाकी होती….
वृषाली पुराणिक
दोन मित्रांची निखळ विनोदी कथा .
ही तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
छान