कथेचे नाव – शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

WhatsApp Group Join Now

कथेचे नाव – शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

                   एक गाव होतं. त्या गावात एक म्हातारी आजी एकटीच तिच्या छोट्याश्या कौलारू घरात राहत होती. गावात प्रत्येकाची घरे शेजारी लागून नव्हती तर थोड्या अंतरावर होती. गावामध्ये शेती हाच लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.

                   आजीबाई सकाळी लौकर उठायची.  आपल्या गाईला चारा खाऊ घालायची. गायीचे दूध काढून ते गावात विकायला न्यायची. त्या म्हातारीचा तिच्या गाईवर खूप जीव होता. त्या गाईचे नाव तिने बकुळा ठेवले होते. बकुळासाठी तिने घराला लागूनच गोठा तयार केला होता. 

                    एके दिवशी खूप पाऊस पडत होता. एक वाटसरू सकाळी अकराच्या दरम्यान आजीच्या झोपडीजवळ आला आणि म्हणाला, ” कोणी आहे का घरात ? खूप पाऊस पडतो आहे. मला थोडावेळ घरात घ्या ना. मी खूप भिजलो आहे.”

                     त्या माणसाची हाक ऐकून आजीला दया आली. तिने त्या माणसाला घरात घेतले, त्याचे अंग पुसायला फडके दिले आणि गरम गरम दुधाचा चहा करून त्याला प्यायला दिला. 

                     ” आजी, चहा खूप छान झालाय. खूप गोड आहे.” तो माणूस म्हणाला.

                      ” का नसणार रं बाबा. माज्या बकुळाच्या दुधाचा हाय.” आजी म्हणाली. 

                   तो माणूस चहा प्यायला. त्याच्यासोबत आणलेली चटणी भाकरी त्याने खाल्ली. तितक्यात त्या माणसाची नजर बकुळावर पडली. त्याच्या मनात विचार आला की, ह्या बकुळाला जर आपण दुसऱ्या गावात नेऊन विकलं तर आपल्याला खूप पैसे मिळतील. तसं पण ह्या आजीला काय करायची आहे ही गाय घरात ठेऊन. त्याने आजीशी गोड गोड बोलायला सुरुवात केली. 

                   ” आजी तू झोप जा. दमली असशील ना कामे करून ? मी पण पडतो इथे कोपऱ्यात. पाऊस थांबला की मी निघून जाईन.” माणूस म्हणाला. 

                   ” व्हय रं बाबा. म्या झोपते थोडा येळ.” असे बोलून आजीने सतरंजी अंथरली आणि झोपी गेली.

                    अर्ध्या तासाने पाऊस थांबला. पाऊस थांबल्यावर त्या माणसाने दावणीला बांधलेली गाय सोडली आणि तो त्या गाईला खेचत खेचत आपल्याबरोबर घेऊन निघाला. बकुळा त्या माणसाबरोबर जायला तयार नव्हती. ती मोठ्यांदा हंबरली. इथे आजीला वातावरणातील गारव्यामुळे खूप गाढ झोप लागली असल्याने तिला बकुळाचे हंबरणे ऐकू आले नाही. तो माणूस बकुळाला घेऊन शेजारच्या गावात गेला तिथे बकुळाला एका सावकाराला विकून त्याने पैसे कमावले. 

                    थोड्या वेळाने आजीला जाग आली. नेहमीच्या सवयीने ती बकुळाच्या गोठ्यात गेली आणि बघते तर काय ? बकुळा तिथे नव्हती. आजी खूप रडायला लागली. रडता रडता आजीने विचार केला की त्या माणसाने आपली गाय चोरुन नेली, आता तिला पैशासाठी विकले देखील असेल. मी इथे रडत बसण्यापेक्षा माझ्या गाईला शोधून परत घरी आणणारच. आजी उठली आणि चालू लागली. रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना आपल्या गायीची चौकशी करत करत ती शेजारच्या गावात पोहचली जिथे तिच्या बकुळाला त्या चोराने विकले होते.

                    त्या गावात फिरता फिरता तिला तिची बकुळा एका घराच्या बाहेर अंगणात दिसली. आजी धावत बकुळाकडे गेली. बकुळाने आजीला पाहिल्याबरोबर तिचे अंग चाटायला सुरुवात केली. आजीने बकुळाला दावणीतून सोडवले आणि स्वतःबरोबर घेऊन निघाली. ज्या सावकाराने बकुळाला विकत घेतले होते त्याने त्या आजीला चोर ठरवले. आजी सारखं सांगत होती की ही गाय माझी आहे आणि तो सावकार बोलत होता की ही गाय मी विकत आणलेली आहे त्यामुळे ती माझी आहे. 

                  आजी खूप दुःखी झाली. ती त्या गावातल्या सरपंचाला जाऊन भेटली. तिने सगळं सांगितलं की,’ येका चोरानं माजी गाय तुमच्या गावातल्या सावकाराला इकली हाय. आन त्यो सावकार मला चोर बोलतूया. त्या बकुळापरीस माजं कोणीबी न्हाई.”

                    गावचे सरपंच म्हणाले की, ” आजीबाई तू म्हणतेस ते खरं असेल पण तू कसं सिद्ध करणार की ती गाय तुझी आहे म्हणून ?”

                    ” बाबारं ! अगदी सोप हाय. माज्या बकुळाच्या डोळ्यावर पट्टी बांधा. म्या येका कडंला उभी राहीन आनी ज्यानं बकुळाला ईकत घेतलं हाये त्यो दुसऱ्या कडंला उभा राहील. पहिलं त्या मानसाला बकुळाला हाक माराया सांगू नंतर बकुळाला म्या हाक मारंन. तुमीच बगा मंग बकुळा कोनाकडं जात्ये.”

                      सरपंचांनी आजीने सांगितल्याप्रमाणे केले. आजीच्या हाकेला धावतच आजीजवळ बकुळा जाऊन उभी राहिली. आजीने बकुळाच्या डोळ्यांवरची पट्टी सोडली. बकुळा आजीला प्रेमभराने चाटु लागली. सरपंचांना आजीच्या हुषारीचे खूप कौतुक वाटले. सरपंचांनी आजीला सावकाराकडून अब्रुनुकसानीबद्दल काही रक्कम देऊ केली. आजीला पैशांपेक्षा तिची बकुळा मिळाली ह्यात समाधान होते. तिने पैसे घ्यायला नकार दिला तरीही सरपंचांनी मानाने आजीला पैसे देऊ केले. आजी आता आनंदाने तिच्या बकुळाबरोबर घरी जाण्यास निघाली. 

मुलांनो !  ह्या गोष्टीवरून आपण काय शिकलो तर आजीकडे तिची गाय परत आणण्याची शक्ती नव्हती पण आजीच्या हुषारीमुळे तिची गाय तिला परत मिळाली.

म्हणून शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते.

( समाप्त )

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

2 thoughts on “कथेचे नाव – शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top